हे मंदिर श्री अलनथूरैनाथर कोविल म्हणून पण प्रसिद्ध आहे. तसेच वेल्ललपशुपती कोविल म्हणून पण प्रसिद्ध आहे. पापनाशम पासून १२ किलोमीटर्स वर, तंजावूर पासून १५ किलोमीटर्स वर, थिरुवैयारू पासून १२ किलोमीटर्स वर तर कुंभकोणम पासून २६ किलोमीटर्सवर हे मंदिर स्थित आहे. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या ७० माडकोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकीपण हे एक मंदिर आहे. ह्या मंदिरांची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी केली आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर तसेच कावेरी नदीची उपनदी कुडूमुरूट्टीच्या काठावर हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी अस्तित्वात असून २००० वर्षांपेक्षाही जुनं असावं असा अंदाज आहे. हे मंदिर विविध समूहांशी निगडीत आहे. श्री पार्वती देवींनी ज्या सात स्थानांमध्ये नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी सप्त मातृकांमधल्या प्रत्येक देवीसमवेत भगवान शिवांची पूजा केली त्या सप्तमंगै स्थानांपैकी हे एक स्थान आहे. इथे नवरात्रीतील सप्तमीच्या दिवशी श्री पार्वती देवींनी श्री चामुंडीदेवींसमवेत भगवान शिवांची पूजा केली.
ह्या मंदिराचा परान्तक चोळा I राजाने ९व्या शतकामध्ये जीर्णोद्धार केला. ह्या मंदिरातल्या शिलालेखांमध्ये चोळा आणि मराठा साम्राज्यातल्या राजांनी दिलेल्या देणग्यांचा आणि मंदिरासाठी केलेल्या कामांचा उल्लेख आढळतो. कुडूमुरूट्टी नदीच्या पुरामध्ये बऱ्याच वेळेला हे मंदिर पाण्यामध्ये बुडाले आहे.
मूलवर: श्री पशुपतीश्वरर, श्री पशुपतीनाथर, श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री अलनथूरैनाथर
देवी: श्री सौंदर्यनायकी देवी, श्री अल्लीयनकोथै
क्षेत्र वृक्ष: वड
पवित्र तीर्थ: कावेरी, कुडूमुरूट्टी
पुराणिक नाव: थिरुपुल्लमंगै
वर्तमान नाव: पशुपती कोविल
जिल्हा: तंजावूर, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
१. पुराणांनुसार श्री पार्वती देवींनी चक्रवाक पक्ष्याच्या रूपामध्ये इथे भगवान शिवांची उपासना केली. म्हणून ह्या स्थळाला पुल्लमंगै असं नाव प्राप्त झालं.
२. असा समज आहे की अष्टनागांनी (८ दिव्य नाग) इथे शिवरात्रीच्या रात्री ३० कोटी नागलिंग (कैलासपती) पुष्पांनी भगवान शिवांची पूजा केली. म्हणून ह्या स्थळाला नागशक्ती मंदिर मानलं जातं.
३. इथे एक शिल्प आहे ज्यामध्ये कामधेनू भगवान शिवांची पूजा करत आहे असे चित्रित केले आहे.
४. श्री ब्रह्मदेवांना इथे भगवान शिवांची उपासना करून शापापासून मुक्ती मिळाली.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, श्री पार्वती देवी, अष्टनाग, कामधेनू, कोचेंगट चोळा, सप्त ऋषी, शैव संत संबंधर, श्री चामुंडी देवी.
वैशिष्ट्ये:
१. येथील नवग्रह देवालय खंदकाच्या आकाराचे आहे.
२. नवग्रहाच्या देवालयाच्या मध्यभागी नंदि आहेत.
३. गोपुराच्या वरती नेहमी गरुड उडताना दिसतात.
४. ह्या स्थळाला पूर्वी अलनथूरै असे नाव होते. तामीळ अलन शब्दाचा अर्थ मराठीतला वड (वडाचे झाड) असा आहे. ह्या मंदिराचे स्थळ वृक्ष वड (अलन) असल्याकारणाने इथे भगवान शिवांचे अलनथूरैनाथर असे नाव आहे.
५. येथील श्री दुर्गादेवींची मूर्ती अद्वितीय आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून इथे तीन स्तरांचे राजगोपुर आहे. बलीपिठ आणि नंदि हे मुखमंडपात आहेत. येथील शिवलिंग स्वयंभू आहे आणि बाकीच्या मंदिरातील शिवलिंगांच्या तुलनेत मोठे आहे. ह्या मंदिरात ध्वजस्तंभ नाही. मंदिराच्या भोवताली खंदक आहे.
कोष्टामधील मूर्ती अशा आहेत: श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर (त्यांच्या दोन बाजूला श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू आहेत), श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा देवी.
श्री अंबिका देवी मुख मंडपामध्ये एका स्वतंत्र दक्षिणाभिमुख देवालयामध्ये आहेत. श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या जागी आहे.
परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये:
श्री गणेश, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री भैरव, शैव संत नालवर, श्री सूर्य, नवग्रह.
मुखमंडपाच्या प्रवेशाजवळ श्री गणेशांची मूर्ती आहे. इथे बरीच पटले आहेत ज्यावर शिव पुराणातल्या कथा चित्रित केल्या आहेत, हातात संगीत वाद्ये घेतलेले शिव गण चित्रित केले आहेत. ह्या शिवाय हे शिव मंदिर असलं तरी रामायण आणि वैष्णव पुराणातल्या कथा तसेच कृष्णलीला पण इथे चित्रित केल्या आहेत.
येथील श्री दुर्गा देवींची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याचे नाव श्री महिषासुरमर्दिनी असे आहे. ह्या मूर्तीमध्ये श्री दुर्गादेवी छत्रधारी आहेत आणि त्यांचा एक पाय महिषासूराच्या शिरावर आहे. त्यांच्या हातांमध्ये शंख, चक्र, तलवार, धनुष्य, गदा, त्रिशूल, अंकुश आणि खटवांग ही शस्त्रे आहेत. त्यांच्या दोन बाजूंना हरीण आणि सिंह उभय मुद्रेमध्ये आहेत. तसेच दोन सैनिक पण चित्रित केले आहेत. एक सैनिक त्याचे शिर अर्पण करत आहे तर दुसरा सैनिक आपल्या मांडीतून रक्त अर्पण करत आहे. श्री दुर्गा देवींचा एक हात अभय मुद्रेमध्ये आहे. असा समज आहे कि थिरुनागेश्वरम आणि पट्टिश्वरम येथील श्री दुर्गा देवींच्या मूर्ती एकाच शिल्पकाराने बनवल्या आहेत.
श्री पार्वती देवींनी चक्रवाक पक्ष्याच्या रूपामध्ये इथे सप्त मातृकांमधल्या श्री चामुंडी देवींसमवेत भगवान शिवांची पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या गळ्यातील नागाचे दर्शन झाले. ह्या दर्शनाला शिव-नाग-भूषण असे नाव आहे.
प्रार्थना:
भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर करण्यासाठी, वैभव आणि समृद्धीप्राप्तीसाठी तसेच शिक्षणात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.
पूजा:
दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा आणि साप्ताहिक आणि मासिक पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीरै)
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): सप्तस्थान उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, दुपारी ४ ते रात्री ८.३०
पत्ता: श्री अलनथूरैनाथर कोविल, पशुपतीकोविल, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू ६१४२०६
दूरध्वनी: +९१-९७९१४८२१०२, +९१-८०५६८५३४८५
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.