हे मंदिर तामिळनाडूमधल्या थिरुकोहमबिअम येथे स्थित आहे. कुंभकोणम-मयीलादुथुराई मार्गावर कुंभकोणम पासून २० किलोमीटर्स वर तर थिरुवडुथुराई पासून पूर्वेकडे ५ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केली आहे. मंदिराचा आवार साधारण २ किलोमीटर्स वर पसरला आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. सिम्बिअन महादेवी ह्या चोळा राणीने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचं दगडी बांधकाम केलं.
मूलवर: श्री कोकिळेश्वरर, श्री गोगणेश्वरर, श्री कोहंबनाथर
देवी: श्री सौन्दर्यनायकी
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ
पवित्र वृक्ष: चमेली, बिल्व
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार एकदा भगवान शिव आणि भगवान विष्णू द्यूत खेळत होते आणि श्री पार्वती देवी ह्या खेळाच्या पंचाची भूमिका करत होत्या. खेळामध्ये एक क्षण असा आला की ज्या वेळी भगवान शिवांनी खेळामध्ये फासे फिरविण्याच्या योग्य पद्धतीवर श्री पार्वती देवींकडे म्हणजेच पंचांकडे स्पष्टीकरण मागितलं. श्री पार्वती देवींचं स्पष्टीकरण हे भगवान विष्णूंना अनुकूल होतं म्हणून भगवान शिवांना राग आला आणि त्यांनी श्री पार्वती देवींना पृथ्वीवर गाय म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. गायीच्या रूपात जन्म घेतल्यावर श्री पार्वती देवींनी ह्या ठिकाणी भगवान शिवांची पूजा केली. इथल्या शिव लिंगाच्या पायथ्याशी (अवूदयार) गायीच्या खुरांची चिन्हे दिसतात. म्हणून भगवान शिवांना इथे श्री कोळंबनाथर म्हणून संबोधलं जातं. श्री पार्वती देवींना इथे शापातुन मुक्ती मिळाली. भरत ऋषींनी केलेल्या यज्ञामध्ये त्या एका बालिकेच्या रूपात प्रगट झाल्या. भरत ऋषींनी त्या बालिकेचं संगोपन केलं. जेव्हा ती बालिका विवाहयोग्य झाली त्यावेळी भरत ऋषींनी भगवान शिवांना तिच्यासाठी वर शोधण्याची विनंती केली. भगवान शिवांनी भरत ऋषींना ज्ञात करून दिलं की ती बालिका म्हणजेच साक्षात श्री पार्वती देवीच आहेत आणि भगवान शिव स्वतः तिच्याशी विवाह करतील. त्यांनी भरत ऋषींना सांगितलं की श्री पार्वती देवींनी पृथ्वीवर ह्याच कारणासाठी जन्म घेतला जेणेकरून त्यांना भगवान शिवांशी पृथ्वीवर विवाह करायचा होता.
२. पूर्वीच्या एका लेखात आम्ही भगवान विष्णू आणि श्री ब्रह्मदेव ह्यांच्यातील भगवान शिवांच्या ज्योतिर्लिंगाच्या आदी आणि अंताचा शोध लावण्याच्या स्पर्धेबद्दल उल्लेख केला होता. त्या स्पर्धेमध्ये श्री ब्रह्मदेवांनी त्यांना शोध लागला असं खोटंच सांगितलं म्हणून भगवान शिवांनी त्यांना शिक्षा दिली. त्यांनी श्री ब्रहादेवांना शाप दिला कि त्यांची कुठल्याही मंदिरामध्ये पूजा होणार नाही. ह्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी श्री ब्रहादेव येथे आले आणि त्यांनी इथे तीर्थ निर्माण करून भगवान शिवांची पूजा केली आणि त्यांची शापातून मुक्ती झाली.
३. संथन नावाच्या विद्याधराला श्री इंद्रदेवांकडून कोकिळा बनण्याचा शाप मिळाला होता. त्यांनी इथे येऊन भगवान शिवांची पूजा केल्यावर त्यांना शापातून मुक्ती मिळाली. म्हणून इथे भगवान शिवांना कोकिळेश्वर असं संबोधलं जातं.
४. श्रीइंद्रदेवांनी गौतम ऋषींच्या पत्नी अहिल्या ह्यांच्याबरोबर व्यभिचार केल्याने त्यांच्या सर्व शरीरभर नेत्र निर्माण होतील असा शाप मिळाला होता. श्री इंद्र देवांनी इथे येऊन शापमुक्तीसाठी भगवान शिवांची पूजा केली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री पार्वती देवी, भरत ऋषी, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव
वैशिष्ट्ये:
१. लिंगोद्भवर ह्यांच्या आजूबाजूला श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू असल्याकारणाने तिन्ही देवांचे इथे दर्शन होते.
२. इथल्या मूर्ती खुप सुंदर आहेत.
३. थिरुकोहंबिअन हे सहा पाडळ पेथ्र स्थळांशी निगडित असल्याकारणाने ह्या स्थळाला विशेष महत्व आहे. ती सहा स्थळे अशी
अ) थिरुचेन्दूर येथे त्यांना मिळालेल्या शापानुसार श्री पार्वती देवींनी गाय म्हणून जन्म घेतला. भगवान विष्णू गोपाळ रूपात त्यांचे रक्षण करण्यासाठी आले.
ब) थिरुकोहमबिअम येथे श्री पार्वती देवींनी गायीच्या रूपात भगवान शिवांची पूजा केली आणि गायीच्या खुरांची चिन्हे शिव लिंगावर ठेवली.
क) कुत्रालम (थिरुथुरुथी) येथे श्री पार्वती देवी भरत ऋषींनी केलेल्या यज्ञातून एका बालिकेच्या रूपात प्रगट झाल्या.
ड) एथिरकोलपडी येथे भरत ऋषींना भगवान शिव हे जामात म्हणून प्राप्त झाले.
इ) थिरुवेलकुडी येथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह आणि त्यातील यज्ञ पार पडला.
फ) थिरुमनंचेरी येथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींनी आपल्या विवाह सोहळ्याचे दर्शन सर्वांना घडवले.
४. ह्या स्थळांभोवती बरीच पाडळ पेथ्र स्थळे आहेत ती अशी - कोनेरीराजापूरम, वैकलनाथेश्वरर, थिरुनीलकुडी, थेनकुरंगडूथुराई, थिरुवीळीमाली (येथे भगवान शिवांना श्री माप्पिळई स्वामी असं म्हणतात)
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि इथल्या राजगोपुराला स्तरे नाही. इथे प्रवेशाजवळ एक सुंदर कमान आहे ज्यावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे सुंदर शिल्प आहे. इथे मंदिराच्या आतमध्ये तीन स्तरांचे गोपुर आहे. इथे दोन परिक्रमा आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. शिव लिंगाचे बाण (दंडगोलाकार भाग) हा पायथ्याच्या (अवूदयार) तुलनेत मोठा आहे. पायथ्यावर गायीच्या खुरांची चिन्हे आहेत. गाभारा पूर्वाभिमुख आहे.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री विनायकर, श्री नटराज, अगस्त्य ऋषी, श्री सट्टाईनाथर, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर ज्यांच्या आजूबाजूला श्री ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू आहेत, श्री अर्धनारीश्वरर, श्री भिक्षाटनर आणि श्री दुर्गा देवी. श्री चंडिकेश्वरांची मूर्ती त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे.
इतर देवता आणि देवालये: श्री गणेश, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री गजलक्ष्मी, चोळालींग, शैव संत अप्पर, श्री सूर्यदेव, श्री भैरव, श्री अंबिका ह्यांच्या मूर्ती परिक्रमेमध्ये आहेत.
उत्सव मूर्ती स्वतंत्र सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत.
प्रार्थना:
दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक पूजा नियमित केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम, सोमवार पूजा
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरम
मंदिराच्या वेळा: सकाळी ९ ते १२, दुपारी ४ ते ६
मंदिराचा पत्ता: श्री कोकिळेश्वरर, थिरुकोहमबिअम ऍट पोस्ट पुडूर, थिरुविडाईमरुथुर, तामिळनाडू ६२१२०५
दूरध्वनी: +९१-४३६४२३२०५५, +९१-४३६४२३२००५
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.