सप्त विडंगम स्थळांमधल्या सात मंदिरातलं हे दुसरं मंदिर तामिळनाडूमधल्या पॉंडिचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशातील कारैक्कल जिल्ह्यामधल्या थिरुनल्लर गावामध्ये स्थित आहे. ह्या विडंगाचे नाव नगर विडंग असे आहे आणि भगवान शिवांनी इथे केलेल्या तांडवाचे नाव उन्मथ पाद नटनं (एखाद्या मद्यधुंद व्यक्तीने केलेल्या नृत्यासारखं). हे मंदिर नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे शिव मंदिर असलं तरी हे शनी ग्रहाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
मुलवर: श्री दर्भारण्येश्वरर, श्री थिरुनल्लारईश्वरर
देवी: श्री प्राणांबिका, श्री भोगमार्ता पूंमुलैयल, श्री प्राणेश्वरी
क्षेत्र वृक्ष: दर्भ
पवित्र तीर्थ: नल तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ. श्री नलविनायकांच्या मंदिरामध्ये असलेल्या विहिरीमध्ये हंस तीर्थ (तामिळ मध्ये वेल्लई अन्नम) आणि गंगा तीर्थ आहे. ह्या शिवाय इथे आठ अष्ट दिक्पाल तीर्थे आहेत.
क्षेत्र पुराण:
१. एका आख्यायिकेनुसार सृष्टी निर्माण केल्यावर श्री ब्रह्मदेव सृष्टीभोवती फेरफटका मारायला निघाले. जेव्हा ते इथे दर्भाने भरलेल्या अरण्यामध्ये आले तेव्हां ह्या प्रदेशाच्या सौन्दर्याने ते मोहित झाले आणि त्यांनी इथे राहून येथील स्वयंभू लिंगाची आराधना करून तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिव इथे प्रकट झाले आणि त्यांनी श्री ब्रह्मदेवांना वेदांचे गूढ रहस्य तसेच इतर शास्त्रांचे ज्ञान प्रदान केले. श्री ब्रह्मदेव श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांची आराधना करत इथे बराच काळ राहिले. त्यांनी श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांची अनेक मंदिरे बांधली. त्यांनी ब्रह्म तीर्थ निर्माण केले तर श्री सरस्वती देवींनी वाणी तीर्थ निर्माण केले. तसेच अष्टदिक्पाल (आठ दिशा) देवतांनी आणि हंस पक्ष्याने आपापली शिव लिंगे तयार करून त्यांची पूजा केली. इथे प्रथम श्री ब्रह्मदेवांनी पूजा केली म्हणून ह्या जागेला आदिपुरी असे नाव प्रसिद्ध झाले. आणि इथे दर्भ गवत भरपूर प्रमाणात असल्यामुळे ह्याला दर्भारण्यं असे पण नाव प्रसिद्ध झाले.
२. तसेच नलाने येथे भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या जागेला नल्लर असे नाव प्रसिद्ध झाले आणि भगवान शिवांचे श्री नल्लेश्वर असे नाव प्रसिद्ध झाले आहे.
३. पुराणांनुसार ह्या ठिकाणी भगवान विष्णूंनी श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांची आराधना केली आणि त्याच्या प्रभावाने त्यांना मन्मथ (कामदेव) हा पुत्र प्राप्त झाला. ह्या लाभाच्या कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भगवान विष्णूंनी सोमस्कंद (श्री पार्वती देवी, भगवान शिव आणि त्यांच्या मध्ये श्री मुरुगन) मूर्ती बनवली. कालांतराने भगवान विष्णूंनी हि मूर्ती श्री इंद्रदेवांना दिली. श्री इंद्रदेवांनी ह्या मूर्तीची पूजा केली आणि त्या पूजेच्या प्रभावाने त्यांना जयंत नावाचा पुत्र आणि जयंती नावाची पुत्री प्राप्त झाली. त्यानंतर श्री इंद्रदेवांनी अजून सहा सोमस्कंद मूर्ती बनवल्या आणि त्यांनी मूळ मुर्तीसकट त्या मूर्ती मुचुगुंद राजाला दिल्या. मुचुगुंद राजाने त्या सातही मूर्ती सात ठिकाणी स्थापन केल्या. ह्या सात स्थळांना एकत्रित सप्त विडंग स्थळे असं संबोधलं जातं. हे ठिकाण त्या सप्त विडंगांपैकी एक आहे. ह्या विडंगाचे नाव श्री त्यागराज विडंग असे आहे.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री सरस्वती देवी, श्री अष्ट दिक्पाल देवता, अगस्ती ऋषी, पुलस्ती ऋषी, हंस पक्षी आणि अर्जुन
मंदिराची वैशिष्ट्ये:
१. हे स्वयंभू लिंग आहे.
२. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे कि हे मंदिर दर्भाच्या गवतामध्ये सापडले. ह्या समजुतीला आधार म्हणजे ह्या लिंगावर दर्भाचे ठसे दिसतात.
३. प्रवेशद्वाराजवळ राजगोपुराला नमस्कार करून येताना प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करण्याची प्रथा आहे. असा समज आहे कि प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात श्री शनिदेवांचा वास आहे. असा समज आहे कि श्री शनिदेवांनी नळ राजाला शिक्षा केली तेव्हा भगवान शिव क्रोधीत झाले. त्यांच्या क्रोधापासून स्वतःला वाचविण्यासाठी श्री शनिदेव ह्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात लपले.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या ठिकाणी श्री स्वर्ण गणपती, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री आदिशेष, नायनमार, श्री महालक्ष्मी ह्यांच्या मूर्ती आहेत.
ह्या मंदिरातील इतर देवालये:
मुख्य देवालयाच्या दक्षिणेला एक देवालय आहे ज्यामध्ये एक मेंढपाळ, त्याची पत्नीं आणि एक लेखापाल ह्यांच्या मूर्ती आहेत. आख्यायिकेनुसार लेखापालाने मेंढपाळाला मंदिराला पुरविल्या जाणाऱ्या दुधाच्या व्यवहारामध्ये फसवले होते. राजाच्या क्रोधापासून मेंढपाळाचे रक्षण करण्यासाठी तसेच लेखापालाला शिक्षा देण्यासाठी भगवान शिवांनी राजाच्या समक्ष लेखापालावर आपले त्रिशूल फेकले. त्या त्रिशूळाचा मार्ग मोकळा करण्यासाठी नंदि आणि बलीपीठ थोडे वाकले. आजही ह्या ठिकाणी नंदि आणि बलीपीठ सरळ रेषेमध्ये नसून थोडे वाकलेले आढळतात. भगवान शिवांनी आपल्या त्रिशुळाने लेखापालाचा शिरच्छेद केला आणि त्याचबरोबर मेंढपाळाला दर्शन दिले.
ह्या शिवाय श्री स्वर्ण गणपती, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंद ह्यांची देवालये आहेत तसेच श्री आदिशेष, नायनमार, श्री महालक्ष्मी देवी, श्री सूर्य आणि श्री भैरव ह्यांच्या मूर्ती आहेत. नळ राजाची मूर्ती आणि त्याने पूजिलेले शिव लिंग पण इथे आहे. ह्या शिवाय इथे बाकीच्या मंदिरांप्रमाणे कोष्ठ मूर्ती पण आढळतात. त्यागराज विडंग (पाचूचे विडंग) ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे.
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): पौर्णिमेला पाचूच्या लिंगाची विशेष पूजा
वैकासि (मे-जुन): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव
श्री शनीदेवाच्या भ्रमणासमयी शनिवारी श्री शनिदेवांची विशेष पूजा
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment