Sunday, September 1, 2024

सप्त मातृका - श्री माहेश्वरी - अरुलमीगु शक्तिपुरीश्वरर

ह्या मंदिरामध्ये सप्त मातृकांमधल्या श्री माहेश्वरी यांनी राक्षसांची हत्या केल्यामुळे प्राप्त झालेल्या पापांचे क्षालन करण्यासाठी भगवान शिवांची पूजा केली. तसेच सप्तमातृकांमधील अजून एक देवी श्री वाराही ह्यांनी पण इथे भगवान शिवांची पूजा केली. 


श्री माहेश्वरींबद्दल माहिती:

श्री माहेश्वरी ह्या भगवान शिवांच्या शक्ती रूप आहेत. राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये त्या श्री अंबिका देवींच्या बाहुंमधून प्रकट झाल्या. त्यांना तीन नेत्र, पांच मुखे, दहा हात आणि त्यांचा वर्ण श्वेत आहे. त्यांचे वाहन ऋषभ आहे. त्यांच्या हातामध्ये पाश, अंकुश, घंटा, त्रिशूल आणि कुऱ्हाड अशी शस्त्रे आहेत आणि दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या ध्वजावर ऋषभाचे चिन्ह आहे. त्या कंठामध्ये सर्पाची माला आणि शिरावर जटामुकुट धारण करतात. त्या बसलेल्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्या आपल्या भक्तांना ऐश्वर्य, वैभव प्रदान करतात तसेच त्यांच्या क्रोधाचा नाश करतात. त्यांना श्री सर्वमंगला असं पण संबोधलं जातं. त्यांना धर्माचे मनुष्य रुपी प्रतीक मानलं जातं. त्यांनी ह्या मंदिराशिवाय कुंभकोणम-पापनाशम-तंजावूर मार्गावरील अय्यम पेट्टई जवळील अरियामंगलम गावातील श्री हरिमुक्तेश्वरर ह्या मंदिरामध्ये पण श्री पार्वती देवींसमवेत भगवान शिवांची पूजा केली. 


मुलवर: श्री शक्तिपुरीश्वरर

देवी: श्री आनंदवल्ली

क्षेत्र वृक्ष: बिल्व

पवित्र तीर्थ: करुणा तीर्थ

पुराणिक नाव: करुणापूरम

वर्तमान नाव: करुणकुईलनाथन पेट्टई

जिल्हा: मयीलादुथुराई, तामिळ नाडू


क्षेत्र पुराण:

कौशिक गोत्रामध्ये जन्मलेला ब्राह्मण अत्यंत विद्वान आणि बुद्धिमान होता. पण गतजन्मातील पापांच्या परिणामाने तो शास्त्रबाह्य कर्मांमध्ये गुंतला उदारहर्णार्थ जुगार, मद्यपान, वेश्यासंग वगैरे. शेवटी त्याला कुष्ठरोग जडला. ह्या रोगामुळे कुणाला भेटायची त्याला लाज वाटायला लागली. एका संतांनी त्याला करुणापूरम येथे येऊन करुणा तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्याने त्या सल्ल्याला मान देऊन इथे येऊन त्या प्रमाणे पूजा केली आणि त्याला कुष्ठरोगातून मुक्ती मिळाली. म्हणून इथे त्वचारोगांतून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन ह्या मंदिरात येतात.


परियालूर येथे दक्ष राजाने आयोजित केलेल्या यज्ञाला श्री इंद्र देवांसह सर्व देव उपस्थित होते. पण दक्ष राजाने भगवान शिव आणि श्री पार्वती देवींना आमंत्रण नाही दिलं. तरीपण श्री पार्वती देवी ह्यांना ह्या यज्ञामध्ये भाग घ्यायची इच्छा झाली. भगवान शिवांनी त्यांना तिथे न जाण्याबद्दल सूचित केलं. पण श्री पार्वती देवींनी त्या सूचनेकडे दुर्लक्ष करून त्या यज्ञामध्ये सहभागी झाल्या. दक्ष राजाने त्यांचा अपमान केला आणि भगवान शिवांबद्दल अपशब्द उद्गारले. श्री पार्वती देवींना आपल्या पतीचा झालेला अपमान सहन न होऊन त्यांनी यज्ञकुंडामध्ये स्वतःला अर्पित केलं. जेव्हां भगवान शिवांना हे ज्ञात झालं तेव्हा त्यांनी श्री वीरभद्र आणि श्री काली देवींना पाठवून यज्ञाचा विध्वंस केला. जेव्हा श्री इंद्रदेवांना भगवान शिवांच्या क्रोधाबद्दल ज्ञात झाले तेव्हा घाबरून त्यांनी तिथून पलायन केले आणि स्वतःला लपविण्यासाठी  काळ्या रंगाच्या कोकिळेचं (तमिळ मध्ये कुईल) रूप धारण केलं. पुढे जाऊन त्यांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि इंद्रपद गमावल्याचे खूप दुःख झाले. देवांचे गुरु श्री बृहस्पती ह्यांनी श्री इंद्रदेवांना करुणापूरम येथे येऊन भगवान शिवांची पूजा करण्याचा सल्ला दिला. श्री बृहस्पतींच्या सल्ल्यानुसार श्री इंद्रदेवांनी इथे येऊन करुणा तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली. भगवान शिव त्यांच्या पूजेने प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री इंद्रदेवांना दर्शन देऊन त्यांना परत आपले मूळ रूप आणि मूळ पद म्हणजेच इंद्रपद प्रदान केले. श्री इंद्रदेवांनी इथे कोकिळेच्या रूपात तपश्चर्या केली म्हणून ह्या स्थळाला करुणकुईलपेट्टई हे नाव प्राप्त झाले. 


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर कावेरी नदीच्या उत्तर काठावर मयीलादुथुराई-कारैक्कल महामार्गावर वसले आहे. हे छोटं मंदिर पूर्वाभिमुख आहे. श्री पार्वती देवींचे देवालय दक्षिणाभिमुख आहे तर भगवान शिवांचे देवालय पूर्वाभिमुख आहे. बाहेरील परिक्रमेमध्ये सप्त मातृका, श्री विनायक, श्री सुब्रमण्यम त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै समवेत, श्री दक्षिणामूर्ती, श्री भैरव, श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री सूर्य आणि श्री शनीश्वरर ह्यांच्या मूर्ती एकाच देवालयामध्ये आहेत. हे मंदिर साधारण १८०० वर्षे जुनं आहे. बाकीच्या मंदिरांसारखे ह्या मंदिरात ह्या मंदिराचा इतिहास दर्शवणारे शिलालेख नाहीत. हे मंदिर धर्मपूरम अधिनाम ह्यांच्या अधिपत्याखाली आहे.


वैशिष्ट्य:

ह्या मंदिरामध्ये नवग्रह नाहीत. इथे शमीच्या वृक्षाचीच नवग्रह म्हणून पूजा केली जाते. 


कुंभाभिषेकाचे फायदे:

शैव संत श्री संबंधर ह्यांच्या मते जे कोणी कुंभाभिषेक आयोजित करतात, किंवा आयोजनाला मदत करतात, किंवा त्यात सहभागी होतात त्यांना भरपूर शिव पुण्याची प्राप्ती होते. ह्या शिवाय त्यांना पारमार्थिक तसेच ऐहिक सुखाची प्राप्ती होते.


ह्या मंदिरामध्ये पूजा करण्याचे फायदे:

इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींवर अभिषेक करून त्यांना नवीन वस्त्रे अर्पण केल्यास शापविमोचन होते तसेच कुष्ठरोगांतून मुक्ती मिळते.


मंदिराच्या वेळा:

सकाळी ६ ते ७ आणि संध्याकाळी ५ ते ७. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment