Sunday, January 21, 2024

श्री चिदंबरम

हे मंदिर अतिभव्य मंदिरांपैकी एक आहे. पंचमहाभूतांपैकी हे आकाश ह्या तत्वाचं प्रतीक आहे. नायनमारांनीं ज्या २७६ मंदिरांमध्ये भगवान शिवांची स्तुती केली त्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. तामिळनाडू राज्यातील कडलूर ह्या जिल्ह्यामध्ये हे मंदिर वसलं आहे. 


पंच सभइ म्हणजेच भगवान शिवांनी ज्या पांच स्थळांमध्ये तांडव नृत्य केलं त्या स्थळांपैकी पण एक आहे. पंच सभइ स्थळांमध्ये ह्या स्थळाला सुवर्ण सभा  (तामिळ मध्ये पोन्नबलं) असं नाव आहे. चिंदंबरमला थिल्लई (एक प्रकारचं खारपुटी झाड) असं पण म्हणतात कारण ह्या स्थळामध्ये ह्या प्रकारची खूप झाडं होती. ह्या मंदिराला चिदंबरम नटराज मंदिर असं पण म्हणतात. हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. 


मुलवर: श्री थिरुमोल्लनादर, श्री कुठनादर

देवी: श्री उमयांम्बीका, श्री शिवगामसुंदरी

क्षेत्र वृक्ष: थिल्लई 

पवित्र तीर्थ: शिवगंगा, व्याघ्रपाद तीर्थ, अनंत तीर्थ, ब्रह्म तीर्थ. ह्या शिवाय अजून पण काही तीर्थे आहेत. एकूण साधारण १० तीर्थे आहेत. 


क्षेत्र पुराण:

वसिष्ठ ऋषींनी एकदा आपल्या आप्तेष्टाच्या माध्यंदिनार नावाच्या पुत्राला पूर्णज्ञान प्राप्तीसाठी थिल्लईवनं येथील स्वयंभू शिवलिंगाची उपासना करण्याचा उपदेश दिला. ह्या उपासनेमध्ये सूर्योदयाच्या आधी झाडाची फुले गोळा करून ती शिवलिंगावर वाहणे अपेक्षित होतं. पण हे त्या मुलाला जमत नव्हतं. सूर्योदयाच्या आधी अंधारामध्ये झाडावर चढून फुलं काढणं त्याला शक्य नव्हतं आणि सूर्योदयानंतर त्या फुलांमधील मध मधमाश्यांनी शोषल्यामुळे ती फुलं शिवलिंगावर वाहण्यासाठी अयोग्य होती. त्याने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि आपली असमर्थता व्यक्त केली. भगवान शिवांनी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला वाघासारखे पाय दिले आणि अंधारामध्ये फुलं शोधण्याची दृष्टी पण प्रदान केली. आणि त्यामुळे त्या मुलाची उपासना पूर्ण होऊ शकली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला ऋषिपद प्रदान केलं आणि भविष्यात व्याघ्रपाद ऋषी ह्या नावाने तो प्रसिद्धी पावेल असा आशीर्वाद दिला. 


मुख्य आख्यायिका अशी आहे. थिल्लईवनामध्ये काही ऋषी तपस्या करून आपलं जीवन व्यतीत करत होते. त्यांच्या तपश्चेर्येने त्यांना आपल्या यज्ञयागादी कर्मांमुळे आपण देवांवर नियंत्रण करू शकतो असा अभिमान  झाला. त्यांच्या आभिमानाचं हरण करण्यासाठी भगवान शिव ह्या वनामध्ये भिक्षादनर रूपामध्ये अवतरले. आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू पण मोहिनी ह्या स्त्री रूपामध्ये अवतरले. भगवान शिवांचं भिक्षादनर हे रूप खूप मोहक होतं आणि त्यामुळे ऋषींच्या पत्नी त्या रूपावर भाळल्या आणि त्यामुळे त्यांचं आपल्या पतींच्या कर्मामध्ये लक्ष लागेना. त्याचबरोबर ऋषि पण भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाकडे मोहित झाले. आपल्या पत्नींची अवस्था बघून ऋषींनी भिक्षादनरचा नाश करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांनी अत्यंत उग्र वाघाला निर्माण करून त्याला भिक्षादनरवर म्हणजेच भगवान शिवांवर सोडला. पण भगवान शिवांनी त्या वाघाला मारून त्याचं कातडं आपल्या कमरेभोवती गुंडाळलं. मग ऋषींनी एका उग्र हत्तीला भगवान शिवांवर सोडलं. भगवान शिवांनी त्या हत्तीचा संहार केला. म्हणूनच भगवान शिवांना गजसंहार असं नाव प्राप्त झालं. ऋषींनी त्यानंतर एका राक्षसाला आवाहन करून त्याला भगवान शिवांवर सोडलं. भगवान शिवांनी त्याला स्तंभित केलं. अंततः ते ऋषी भगवान शिवांना शरण गेले कारण त्यांना कळून चुकलं कि भगवान शिव हे मंत्र आणि कर्मकांडाच्या पलीकडे आहेत आणि फक्त ह्यांच्या साहाय्याने ते वश होत नाहीत. 


मंदिरातल्या देवता आणि मुर्त्या:

१. श्री थिरुमोल्लनादर आणि श्री उमैल्या - व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषींनी पूजिलेलं शिव लिंग 

२. ६३ नायनमारांच्या मुर्त्या

३. श्री शिवगामसुंदरी 

४. श्री विनायक 

५. श्री मुरुग 


ह्याशिवाय अजून पण इथे अनेक छोट्या मुर्त्या आहेत.


मंडप (सभा, अंबालम)

१. चित्रम्बलं - ह्या मंडपामध्ये श्री नटराज आणि श्री शिवगामसुंदरी ह्यांच्या मुर्त्या आहेत.   

२. पोन्नबलं किंवा कनकसभा - पूजा उपचार ह्या मंडपामध्ये साजरे होतात. 

३. नृत्यसभा - हा ५६ स्तंभ असलेला मंडप ध्वजस्तंभाच्या समोर आहे. ह्या मंडपामध्ये श्री नटराजांनी श्री कालीदेवींना नृत्यामध्ये पराभूत केलं आणि आपल्या प्रभुत्वाची प्रचिती दिली. 

४. राजसभा - हा १००० स्तंभ असलेला मंडप सहस्रार ह्या योगचक्राचं प्रतीक आहे. 

५. देवसभा - ह्या मंडपामध्ये पंच मूर्ती आहेत  - श्री गणेश, श्री सोमस्कंद, श्री शिवानंदनायकी देवी आणि श्री चंडिकेश्वर


मंदिराची वैशिष्टये:

ह्या मंदिरातील मुख्य देवता स्वयंभू लिंग आहे ज्याचे नाव श्री थिरुमोल्लनादर आहे. अधिदेवता श्री नटराज आहेत. श्री थिरुमोल्लनादर ह्यांच्या पश्चिमेला दगडापासून बनवलेलं झाड आहे. भगवान विष्णू (श्री गोविंदराज पेरुमल) आणि श्री थिल्लई काली ह्यांच्या मुर्त्या जवळजवळ आहेत. श्री नटराजांच्या समोर असलेल्या मंडपातून श्री ब्रह्म, श्री विष्णू आणि श्री शिव ह्यांचं एकत्र दर्शन होतं. ह्या मंदिराला चित्रम्बलं असं पण नाव आहे. 


ह्या मंदिरामध्ये आपल्याला भगवान शिवांचं ३ रूपांमध्ये दर्शन होतं - श्री नटराज, आकाश लिंग आणि स्फटिक लिंग. व्याघ्रपाद ऋषी आणि पतंजली ऋषी ह्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. त्यांच्या उपासनेचा प्रतिसाद म्हणून भगवान शिवांनी त्यांना ३००० मुनींसमवेत इथे दर्शन दिलं. थै ह्या तामिळ महिन्यातील (जानेवारी-फेब्रुवारी) पुष्य नक्षत्रावर इथे उत्सव साजरा केला जातो. 


असा समज आहे की माणसाला मुक्ती प्राप्त होण्यासाठी त्याचा जन्म थिरुवरुर येथे झालेला असला पाहिजे, किंवा त्याच वास्तव्य कांची मध्ये असलं पाहिजे किंवा त्याला थिरुवन्नमलै ह्याचं सतत स्मरण असलं पाहिजे किंवा त्याचा मृत्यू काशीमध्ये व्हायला पाहिजे. तसेच श्री नटराज किंवा श्री थिरुमोल्लनादर ह्यांची आराधना केल्यामुळे पण मुक्ती मिळते. 


श्री आदी शंकराचार्यांनी इथल्या श्री अंबिका देवीच्या देवालयामध्ये श्री चक्राची स्थापना केली आहे. 


मंदिराची महती:

१. पंच भूत स्थळांपैकी श्री कालहस्ती, श्री कांचीपुरम आणि श्री चिदंबरम हे ७९’४१” पूर्व रेखांशामध्ये एका सरळ रेषेमध्ये आहेत. श्री थिरुवन्नईकवल हे ह्या रेषेच्या ३’ दक्षिणेकडे आणि ह्या रेषेच्या उत्तरेच्या टोकाच्या १’ पश्चिमेकडे आहे. श्री थिरुवन्नमलै हे ह्या रेषेवर दोघांच्या मध्ये आहे. 

२. ह्या मंदिराची ९ प्रवेशद्वारे हि मानवी शरीराच्या ९ द्वारांची प्रतीके आहेत. 

३. पोन्नबलं ह्या मंडपातील गाभारा हे हृदयाचं प्रतीक आहे. ह्या गाभाऱ्याला पाच पायऱ्या आहेत ज्या पंचाक्षरी (शि वा य न म) मंत्रातील एक एक अक्षराचं प्रतीक आहेत.

४. पोन्नबलं मंडप २८ स्तंभांच्या आधाराने बनला आहे. हे २८ स्तंभ २८ आगमांची (पूजेच्या पद्धती)  प्रतीके आहेत.  

छतावरील ६४ तुळया ह्या ६४ कलांची प्रतीके आहेत. तुळयांचं जाळं हे रक्त वाहिन्यांचं प्रतीक आहे. छतावरील २१६०० सोन्याच्या टाईल्स ह्या २१६०० श्वासांची प्रतीके आहे. आणि ह्या टाईल्स ज्या ७२००० खिळ्यांनी घट्ट बसवल्या आहेत ते खिळे मानवी शरीरातल्या ७२००० नाड्यांची प्रतीके आहे. ह्या मंडपातील ९ सुवर्ण कलश ९ प्रकारच्या ऊर्जा किंवा शक्तींची प्रतीके आहेत. अर्थ मंडपामध्ये ६ स्तंभ आहेत जी ६ शास्त्रांची प्रतीके आहेत.

५. अर्थ मंडपाच्या शेजारच्या सभागृहामध्ये १८ स्तंभ आहेत जे १८ पुराणांची प्रतीके आहेत. 


मंदिरात साजरे होणारे सण:

ह्या मंदिरात ६ प्रमुख सण साजरे होतात 

१. चित्राई (एप्रिल-मे): तिरुवोनं 

२. आनी (जून-जुलै): उत्तिरं नक्षत्र उत्सव 

३. अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो  

४. पूरत्तासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो

५. मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवदीराई

६. मासी (फेब्रुवारी-मार्च): ह्या महिन्याच्या चतुर्दशीला उत्सव साजरा केला जातो

७. फेब्रुवारी महिन्यात नाट्यांजली उत्सव साजरा केला जातो ज्यामध्ये भरतनाट्यमचे नृत्यक नृत्य करून श्री नटराजांना आदरांजली वाहतात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment