Monday, December 25, 2023

श्री एकांबरेश्वरर कोविल

तामिळनाडू मधील कांचीपुरम शहरात हे मंदिर स्थित आहे. पंच भूत स्थळांपैकी हे पहिलं मंदिर आहे आणि पंचमहाभूतांपैकी हे पृथ्वी तत्व दर्शवतं. श्रेष्ठ शिवभक्त नायनमारांनी ज्या शिव मंदिरांची स्तुती गायिली आहे त्या २७६ शिव मंदिरांपैकी, ज्यांना एकत्रित पाडळ पेथ्र स्थळे असं म्हणतात, त्या मंदिरांपैकी पण हे एक मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये श्री विष्णूंची पण सन्निधी असल्याकारणाने हे श्री विष्णूंच्या १०८ दिव्यदेश मंदिरांपैकी पण एक मंदिर मानलं जातं. तसेच हे पंच मायनं स्थळांपैकी पण आहे. 


मुलवर: श्री एकांबरेश्वरर, श्री एकांबर नादर

देवी: श्री कामाक्षी (श्री ऎळवर कुळाली)

क्षेत्र वृक्ष: आम्र वृक्ष

पवित्र तीर्थ: शिव गंगा तीर्थ


ह्या मंदिराच्या आवारात साधारण ३५०० वर्षे जुनं आंब्याचं झाड आहे. एकं म्हणजे एक आणि अंबर म्हणजे आंबा. म्हणून इथल्या शिवलिंगाचं  श्री एकांबर नादर असं नाव आहे. 


ह्या मंदिराचा आवारा जवळ जवळ २५ एकर वर पसरलेला आहे. हे भव्य मंदिरांपैकी एक समजलं जातं. ह्या मंदिराला ४ गोपुरं आणि १ राजगोपुर आहे. राजगोपुर ११ स्तरांचं असून साधारण १९५ फूट उंच आहे. 


पल्लव राजांनी बांधलेलं हे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. कालांतराने चोळा आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अगदी अलीकडे ब्रिटिश राजवटीमध्ये वल्लाळ पचईयप्पा मुदलियार ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ह्या मंदिराच्या आवारात त्यांचा पुतळा आहे. ह्या मंदिराच्या आवारात अनेक मंडप आहेत. त्यातील एका मंडपामध्ये १००० स्तंभ आहेत. ह्या मंडपाला आयिरं (१०००) काल (स्तंभ) मंडप असं म्हणतात. ह्या मंडपाच्या भिंतींना लागून १००८ शिव लिंग स्थापित केली आहेत. येथील कंपाई तीर्थाच्या खाली भूमिगत नदी आहे असा समज आहे. ह्या मंदिराच्या आवारात चार अंगणे आहेत. त्यातील चौथ्या अंगणात श्री गणपती मंदिर आहे आणि एक तलाव आहे. तर तिसऱ्या अंगणामध्ये छोटी छोटी मंदिरे आहेत. पृथ्वी लिंग असं नाव असलेल्या गाभाऱ्यातील शिव लिंगाच्या बाजूला भगवान शिवांचं चित्र आहे. ह्या आणि कांचीपुरम मधल्या इतर शिव मंदिरांमध्ये श्री पार्वती देवींचं स्वतंत्र मंदिर नाही कारण कांचीपुरममध्ये श्री पार्वती देवी श्री राजराजेश्वरी म्हणून राज्य करते. 


मंदिराच्या आवारात एका छोट्या मंदिरात श्री विष्णूंची उभी मूर्ती आहे. ह्या मूर्तीला निल्ल थिंगल थुंडथन असं नाव आहे. इथे श्री विष्णूंची वामन मूर्ती म्हणून पूजा केली जाते. 


येथील क्षेत्र वृक्षाच्या चार शाखांना चार प्रकारचे आंबे येतात. ह्या चार प्रकारच्या आंब्यांना चार वेगळ्या चवी आहेत (कडू, आंबट, गोड आणि खारट). 


आतील परिक्रमेमध्ये १० स्तंभ आहेत. ह्यातील प्रत्येकस्तंभावर काठीने हलकासा वार केल्यास संगीताचा एक स्वर ऐकू येतो. प्रत्येक स्तंभामधून एक असे एकूण १० स्वर ऐकावयास येतात. 


क्षेत्र वृक्षाच्या खाली श्री पार्वती देवी आणि श्री शिवांची मूर्ती बघावयास मिळते. 


इतर मुर्त्या:

श्री ब्रह्मदेवाने पुजीयेले श्री वल्लकंबर, श्री विष्णूंनी पुजीयेले श्री कल्लकंबर, श्री इंद्रदेवांनी पुजीयेले श्री नल्लकंबर, श्री विकट चक्र विनायक, श्री षण्मुख, १०८ शिव लिंगे, ६३ नायनमार, श्री मार्कंडेय ऋषी, श्री भिक्षाटनर, श्री नटराज, प्रलयापासून रक्षण करणारी देवी आणि नवग्रहांच्या मुर्त्या. इथे श्री गणेश मोरावर बसले आहेत अशी एक अत्यंत दुर्मिळ मूर्ती पाहावयास मिळते. 


येथील श्री विष्णूंच्या मंदिराविषयी माहिती:

येथील श्री विष्णूंच्या मूर्तीला श्री चंद्र-चूड-पेरुमल असं नाव आहे. हि मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. श्री महालक्ष्मींचे नाव श्री निल्ल-थिंगल-थिंड-थयार (तामिळ मध्ये नेर-ओरुदर-इल्लवल्ली-नचियार). इथे दैनंदिन पूजा एक शैव पुजारी करतो. मंदिरामधल्या तलावाला चंद्र-पुष्करिणी असे नाव आहे. गाभाऱ्याच्या वरती असलेल्या गोपुराला पुरुष-सूक्त-विमान असे म्हणले जाते.


मुख्य मंदिराची महती:

इथले शिव लिंग स्वयंभू आहे. हे लिंग मातीचे आहे. श्री कामाक्षी देवीने ह्या लिंगाची आराधना केली. श्री कामाक्षी देवीने ह्या लिंगाला आलिंगन दिल्याचे चिन्ह दिसते. गाभाऱ्याच्या समोर पश्चिमाभिमुख स्फटिक लिंग आहे ज्याच्या समोर स्फटिक नंदी आहे. थै ह्या तामिळ महिन्याच्या सप्तमीला म्हणजेच रथ-सप्तमीला सूर्याची किरणे ह्या लिंगावर पडतात. इथल्या आंब्याच्या झाडाला चार फांद्या आहेत. प्रत्येक फांदी एक वेद असे चार फांद्या चार वेद दर्शवतात. श्री शिवांची उत्सव मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये काचेच्या आवरणामध्ये आहे. ५००८ रुद्राक्षांनी बनवलेल्या मंडपामध्ये हि मूर्ती आहे. ह्या रुद्राक्षांमधून श्री शिवांच्या हजारो प्रतिमा प्रतिबिंबित होतात. ह्या शिवाय इथे प्रभू रामचंद्रांनी ब्रह्महत्येच्या दोषाचे निरसन करण्यासाठी पुजीयेले सहस्र लिंग (१००८) आणि अष्टोत्तर लिंग (१०८) बघावयास मिळतात. येथील श्री गणेशांना श्री विकट-चक्र-विनायक असे नाव आहे तर श्री मुरुग ह्यांचे श्री मावदी-सुंदरर असे नाव आहे. 


क्षेत्र पुराण:

एकदा श्री पार्वतीदेवींनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या हाताने श्री शिवांचे डोळे मिटले. ज्यावेळी त्यांना त्यांची चूक लक्षात आली त्यावेळी दोषनिरसनासाठी श्री शिवांकडे उपाय विचारला. श्री शिवांनी श्री पार्वतीदेवींना पृथ्वीवर जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. श्री पार्वती देवी कांचीपुरमजवळ मांकाडू (आंब्याच्या वनात) मध्ये  आल्या आणि एका आंब्याच्या झाडाखाली मातीचे शिव लिंग तयार करून तिथे तपश्चर्या चालू केली. एका अग्निकुंडात उभं राहून त्यांनी तपश्चर्या चालू केली. ह्या अग्निकुंडाच्या बाजूला अजून चार अग्निकुंडे होती. ह्या पांच अग्निकुंडांना एकत्रित पंचाग्नी कुंड असं म्हणतात. श्री पार्वतीदेवींची परीक्षा घेण्यासाठी श्री शिवांनी गंगानदीला पूर आणून तिला श्री पार्वतीदेवींच्या दिशेने पाठवले जेणेकरून त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय येईल. त्या पुराच्या पाण्यात शिव लिंग वाहून जाईल ह्या चिंतेने श्री पार्वतीदेवींनी त्या लिंगाला आलिंगन देऊन घट्ट धरून ठेवलं. ह्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री शिवांनी त्यांना दर्शन दिलं आणि दोषापासून मुक्त केलं आणि परत श्री पार्वतीदेवींशी विवाह केला. 


अजून एका आख्यायिकेनुसार शैव संत सुंदरर ह्यांना त्यांच्या डाव्या डोळ्याची गेलेली दृष्टी परत प्राप्त झाली. श्री अनंथथाई नावाच्या भगवान शिवांच्या एक दासी पृथ्वीवर भगवान शिवांची भक्ती करत होत्या. एका तीर्थयात्रेमध्ये श्री सुंदरर ह्यांची श्री अनंथथाइंची भेट झाली. श्री सुंदरर ह्यांनी त्यांच्याबरोबर विवाह केला आणि वचन दिलं कि ते त्यांना कधीही सोडून जाणार नाहीत. पण श्री सुंदरर ह्यांनी ते वचन मोडलं आणि त्यामूळे त्यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. एका तीर्थयात्रेमध्ये ते ह्या स्थळी आले आणि त्यांनी भगवान शिवांकडे आपल्या चुकीची क्षमायाचना केली. भगवान शिवांनी ती मान्य केली आणि त्यांना त्यांची दृष्टी परत मिळवून दिली. 


आंब्याच्या झाडाखाली भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या विवाहाचे दृश्य चित्रित केले आहे. ह्या दृश्यातले भगवान शिव हे नवरदेव रूपात आहेत. ह्या आंब्याच्या झाडाला वेद-मारं असं म्हणतात. 


नील-थुन्डु-पेरुमल: समुद्रमंथनामध्ये वासुकी नाग हा दोर बनला होता. मंथन चालू असताना त्याच्या तोंडातून गरम विषारी वायू बाहेर पडत होते. भगवान विष्णूंवर ह्या वायूचा प्रभाव पडून ते अस्वस्थ झाले. ह्या अस्वस्थतेपासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिवांच्या शिरावरील चंद्रकोरीच्या शीतल किरणांनी भगवान विष्णूंना स्वस्थता प्राप्त झाली. म्हणून इथे भगवान विष्णूंना नील-थुन्डु-पेरुमल असे नाव आहे. 


एकदा श्री पार्वती देवींना भगवान शिवांनी श्रीकाळी देवीसारखा काळा वर्ण प्राप्त होण्याचा शाप दिला. ह्या शापाचं निरसन करण्यासाठी श्री पार्वती देवींनी वेगवती नदीच्या काठाशी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करण्यास आरंभ केला. त्यांची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी त्यांच्यावर ज्वाळांचा वर्षाव केला. श्री पार्वती देवींनी आपल्या भावाची म्हणजेच भगवान विष्णूंची मदत घेतली. भगवान विष्णूंनी भगवान शिवांच्या शिरावरील शीतल चंद्रकोर आणून ह्या ज्वाळांना शांत केलं. त्यानंतर भगवान शिवांनी श्री गंगा नदीला श्री पार्वती देवींच्या दिशेने फिरवलं. श्री पार्वती देवींनी श्री गंगा देवींना आपण भगिनी असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे श्री गंगा देवींनी त्यांच्या तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणला नाही. त्यानंतर श्री पार्वती देवींनी मातीचं  शिव लिंग तयार करून त्याची आराधना केली. ह्या आराधनेवर प्रसन्न होऊन ह्या आंब्याच्या झाडाखाली भगवान शिवांनी त्यांच्याशी पुनर्मीलन केले. म्हणून ह्या स्थळी भगवान शिवांचे श्री एकांबरेश्वर (आंब्याच्या झाडाचे स्वामी) असे नाव आहे. 


६३ नायनमारांपैकी थिरु कुरिप्पू थोंड नायनमार हे ह्या मंदिराजवळ राहायचे.ते व्यवसायाने धोबी होते. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शिव तिथे एका शैव ब्राह्मणाच्या रूपात प्रगट झाले. त्यांनी त्या धोब्याला काही कपडे देऊन ते सूर्यास्ताच्या आत धुण्यास सांगितले. त्याचवेळेस त्यांनी त्यादिवशीची संध्याकाळ खूप ढगाळ बनवली ज्यामुळे सूर्यास्त झाल्याचा भास झाला. आपण आपले वचन पूर्ण करू शकलो नाही ह्या भावनेने त्या धोब्याने आपले शिर एका दगडावर आपटले. त्याच्या ह्या कृत्यावर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्या धोब्याला आपली मूळ रूपात दर्शन दिले आणि आशीर्वाद दिला. 


प्रार्थना: 


१. हे सिद्ध स्थळ आहे. इथे वरदान प्राप्त होतं ह्या समजुतीने भक्त दर्शन घेण्यास येतात. 

२. मनःशांती प्राप्त करण्यास पण इथे भक्त दर्शनास येतात. 

३. ह्या ठिकाणी भगवान शिव हे नवरदेवाच्या रूपात आहेत म्हणून इथे बरेच भक्त विवाह संपन्न करण्यास येतात. 


सण:


पंगूनी (मार्च-एप्रिल): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव ज्याची सांगता कल्याणोत्सवाने होते. पाचव्या दिवशी श्री एकांबरेश्वर ह्यांची मूर्ती रुपेरी रथातून मिरवली जाते. सकाळी श्री नंदिदेवांची मिरवणूक निघते तर संध्याकाळी श्री रावणेश्वर ह्यांची मिरवणूक निघते. सहाव्या दिवशी सकाळी ६३ नायनमारांची मिरवणूक निघते आणि संध्याकाळी परत श्री एकांबरेश्वरांची रुपेरी रथातून मिरवणूक निघते. नवव्या दिवशी रौप्य मावदि नावाची पूजा आंब्याच्या झाडाखाली केली जाते. 


प्रत्येक सप्ताहामधल्या सोमवारी आणि शुक्रवारी पूजा केली जाते. 


प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, कृतिका नक्षत्र, चतुर्थी आणि प्रदोषकाळी पूजा केली जाते. 


तामिळ आणि इंग्लिश नववर्ष दिन, दिवाळी आणि संक्रांतीच्या दिवशी विशेष अभिषेक केले जातात. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment