Sunday, November 12, 2023

दिवाळीचा उगम आणि महत्व

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सर्वांस आणि आपल्या प्रियजनांस शुभदायक होवो.


ह्या लघु लेखामध्ये दिवाळी सणाचा उगम कसा झाला तसेच दिवाळीतील लक्ष्मीपूजेचं महत्व ह्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती थोर संत आणि आचार्यांच्या प्रवचनांमधून संकलित केली आहे. ह्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास जरूर कळवाव्या.


ग्रंथांमध्ये जशी भगवद्गीता हि श्रेष्ठ मानली जाते, त्याचप्रमाणे सणांमध्ये दिवाळी सण हा श्रेष्ठ मानला जातो. ह्या सणाचं खरं नाव आहे दीपावली. “दीप” आणि “आवली” ह्या शब्दांनी हे नाव तयार झाले आहे. अवली म्हणजे रांग. दीपांची रांग म्हणून दीपावली.


दीपावलीची सुरुवात होते ती नरकचतुर्दशीच्या अभ्यंगस्नानाने. अभ्यंग म्हणजे तेल लावणे किंवा तेल चोळणे. ह्यादिवशी ब्रह्ममुहूर्तावर (सूर्योदयाच्या १ तास ३६ मिनिटे आधी चालू होऊन ४८ मिनिटांपर्यंतच्या काळाला ब्रह्ममुहूर्त म्हणतात) डोक्यावर तिळाचं तेल चोळून गरम पाण्याने स्नान केले जाते.


तैले लक्ष्मी: जले गंगा

- तुला मास माहात्म्य


असा समज आहे कि भूमादेवीला मिळालेल्या वरदानानुसार ह्या दिवशी ह्या वेळी तिळाच्या तेलामध्ये लक्ष्मीदेवीचा वास असतो तर गरम पाण्यामध्ये गंगेचा वास असतो आणि म्हणून ह्या स्नानामुळे गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि लक्ष्मीदेवीचा पण आशीर्वाद मिळतो.

तिळाचं तेल डोक्यावर चोळताना एक श्लोक म्हणायचा असतो. ह्या श्लोकामध्ये ७ चिरंजीव (अश्वत्थामा, बली राजा, महर्षी व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम) ह्यांचा उल्लेख आहे. ह्या ७ चिरंजिवांच्या आशीर्वादाने आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं असा समज आहे.


अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: ।

कृप: परशुरामश्च सप्तै: ते चिरञ्जीविनः ||


त्याचबरोबर स्नान करताना श्री सत्यभामा देवी, भगवान श्रीकृष्ण, नरकासुर आणि भूमादेवी ह्यांच्या कथेचं चिंतन करावं. ह्या कथेतूनच दीपावलीचा सणाचा उगम झाला. 


ती कथा अशी आहे. आसाम प्रदेशातल्या प्राग्ज्योतिषपुरं मध्ये बौमन नावाचा राजा होता ज्यालाच नरकासुर असं नाव पडलं. हा भूमादेवीचा (पृथ्वी) पुत्र होता. अनेक तपश्चर्या करून त्याने बरीच वरदानं मिळवली होती ज्यातलं एक वरदान असं होतं की त्याला मरण आलं तर ते फक्त त्याच्या आईकडूनच त्याची हत्या झाली तर. अर्थात आई कधी आपल्या मुलाची हत्या करीत नाही त्यामुळे त्याचं मरण अशक्यच होतं. आणि त्यामुळे तो उन्मत्त झाला आणि त्याने लोकांवर अत्याचार करायला चालू केलं. त्याने १६००० स्त्रियांचं अपहरण करून त्यांना बंदिस्त केलं होतं. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा अंत करायचं ठरवलं. त्यांनी त्यांच्या पत्नी श्री सत्यभामा ह्यांना पण बरोबर घेतलं. ह्याचं कारण नरकासुराला मिळालेलं वरदान भगवान श्रीकृष्णांना ज्ञात होतं. श्री सत्यभामा ह्या भूमादेवीच्याच अवतार होत्या. त्यामुळे फक्त त्यांच्या हातूनच नरकासुराचा वध शक्य होता. अर्थात भगवान श्रीकृष्णांच्या संकल्पानुसार नरकासुराचा वध झाला. नरकासुराचा वध झाल्यावर भूमादेवींना पुत्रवियोगामुळे खूप दुःख झालं. पण त्यांनी विचार असा केला कि आपल्या पुत्राचं भाग्य थोर कि ज्यामुळे त्याला प्रत्यक्ष भगवंतांकडून मरण आलं. मरणाच्या वेळी प्रत्यक्ष भगवंत समोर असणं हे भाग्याचं लक्षण आहे. तसंच त्यांनी अशी पण प्रार्थना केली कि ह्यापुढे हा दिवस मंगलमय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा व्हावा, सर्व लोकांनी नवीन वस्त्रे परिधान करून स्वादिष्ट फराळ करावा आणि तसेच त्यांना ब्रह्ममुहूर्तावर तिळाचं तेल डोक्याला चोळून गरम पाण्याचं स्नान केल्यामुळे श्री गंगादेवी आणि श्री लक्ष्मीदेवी ह्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत. आणि तिथूनच नरकचतुर्दशी म्हणजेच दीपावली सण साजरा होण्यास सुरवात झाली. भूमादेवींच्या ह्या निःस्वार्थी आणि परोपकारी भावनेला प्रणाम केल्याशिवाय दीपावली उत्सव पूर्ण होत नाही. 


दीपावलीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे श्री लक्ष्मी पूजा. प्रचलित पूजा हि धन-लक्ष्मीची पूजा आहे. पण खरं धन हे पैसे नव्हे. लक्ष्मी हा शब्द लक्ष्य ह्या शब्दापासून आला आहे. मनुष्य जीवनाच्या परम ध्येयावर म्हणजेच मुक्तीवर लक्ष्य ठेवून त्या लक्ष्यप्राप्तीसाठी लागणाऱ्या साधनांची आणि गुणांची प्राप्ती व्हावी ह्या इच्छेने केलेली पूजा ती खरी लक्ष्मी पूजा. 



No comments:

Post a Comment