Sunday, January 29, 2023

शैव संप्रदाय - शिव मंदिरांचा उगम

दक्षिण भारतातील शिव मंदिरांबद्दलच्या माहितीस्वरूप लेखांमधला हा पहिला लेख आहे. शिव मंदिरांबद्दलचे लेख साधारण २०१५-१६ पासून इंग्लिश भाषेमध्ये आम्ही प्रकाशित करत आलो आहोत. त्याच लेखांतली माहिती आम्ही आता मराठी भाषेमध्ये प्रकाशित करत आहोत.

शिव मंदिरांचा उगम हा शैव संप्रदायामधून झाला. शिव भक्ती म्हणजेच भगवान शिवांना सर्वेसर्वा मानून त्यांची भक्ती करणाच्या परंपरेला शैव संप्रदाय असं म्हणतात.

शैव संप्रदाय हा भारतात अनुसरीत केल्या जाणाऱ्या पांच मुख्य संप्रदायांपैकी एक आहे.

शैव संप्रदायाला शिवपंथ किंवा नुसतच शैव असं पण म्हणलं जातं. ह्या संप्रदायाचे अनुसरण करणारे भगवान शिवांना सर्वेसर्वा मानतात. म्हणजेच भगवान शिव हे विश्वाचे प्रमुख असं समजतात. 

शैव संप्रदायाच्या अनुयायांनी शिव भक्तीचा प्रसार केला आणि त्यासाठीच त्यांनी विविध ठिकाणी भगवान शिवांची मंदिरे बांधली. दक्षिण भारतात शैव संप्रदायाचा प्रभाव सर्वात जास्त दिसतो आणि म्हणूनच दक्षिण भारतात भरपूर शिव मंदिरे दिसतात. 

मुख्यत्वेकरून भारत, श्रीलंका आणि नेपाळ ह्या देशांमध्ये ह्या संप्रदायाचं अनुसरण केलं जातं. ह्याशिवाय दक्षिण-पूर्व भागात म्हणजेच जावा, बाली, कंबोडिया सारख्या देशांमध्येपण ह्या संप्रदायाचा खूप प्रसार झालेला आढळतो.  

शैव संप्रदायामध्ये भरपूर साहित्य आहे. विविध तत्त्वप्रणालींचा ह्या साहित्यामध्ये समावेश आढळतो - द्वैत, अद्वैत, विशिष्टाद्वैत वगैरे. शैवसंप्रदायामध्ये विभूती धारण करणे (कपाळावर, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर विभूती/भस्म लावणे) हे शैव असल्याचं मुख्य लक्षण किंवा मुख्य खूण समजली जाते. शैवसाहित्यामध्ये विभूती धारण करताना उच्चारायचे मंत्र आणि उपचारांची माहिती स्पष्टपणे आढळते. ख्रिस्तपूर्व सुमारे २५०० वर्षांपासून भारतामध्ये (तत्कालीन सिंधू नदीच्या खोऱ्यांतील वस्ती) शिव उपासना कार्यरत आहे असे आढळते. ह्या समजुतीला आधार देणारे पुरावे (दस्त ऐवज) मोहेंजोदारो, हडप्पा आणि उत्तर भारत, उत्तर पाकिस्तान मधल्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी प्रयोगासाठी/अभ्यासासाठी उत्खनन केलेल्या प्रदेशांमध्ये सापडले आहेत. शिवोपासना परंपरेची सुरुवात साधारणतः ख्रिस्तपूर्व २०० ते ख्रिस्तनंतर १०० वर्ष ह्या काळात झालेली आढळते आणि त्याचा मुख्य प्रसार हा गुप्त साम्राज्यात (ख्रिस्तनंतर ३२० ते ५०० ह्या काळामध्ये) झाला असं आढळून येतं. ह्या प्रसाराचं मुख्य श्रेय जातं ते त्या काळच्या पुराणकथनांसाठी काव्य रचणाऱ्या साहित्यिकांना आणि ते काव्य गाणाऱ्या कलाकारांना.


शैव संप्रदायाचा विकास कसा झाला:




स्मार्त:


शैव संप्रदायांतील अजून एक शाखा म्हणजे स्मार्त. ह्या शाखेमध्ये एकाच परमदेवतेला पुजण्याऐवजी देवांना समूहामध्ये पूजलं जातं. ह्याच शाखेतून पंचायतन पूजेचा उगम झाला. पंचायतन पूजेमध्ये पांच देवांच्या समूहाला पुजलं जातं. ते पांच देव म्हणजे - गणेश, सूर्य, विष्णू, शिव आणि देवी. ह्या पूजापद्धतीचा प्रसार मुख्यत्वेकरून आदि शंकराचार्यांनी केला. म्हणजे साधारण ख्रिस्तनंतर ७८८ ते ८२० ह्या मधला काळ. ह्या पूजापद्धतीचं वैशिष्ठ्य म्हणजे एक देव प्रधान मानून उरलेले देव हे त्याच, म्हणजे प्रधान मानलेल्या, देवाची रूपे आहेत असं समजून पूजा केली जाते. विशषतः तामिळनाडूमध्ये ह्यां पांच देवांबरोबर श्री सुब्रमण्यम म्हणजेच श्री षण्मुख ह्यांचीपण पूजा केली जाते. 


शैवसिद्धांताचां प्रभाव जास्तकरून दक्षिण भारतात आढळतो. किंबहुना जिथे जिथे तामिळ समाज आहे, म्हणजे दक्षिण भारत, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, अशा प्रदेशांत शैवसिद्धांत प्रसिद्ध आहे. म्हणूनच दक्षिण भारतामध्ये, मुख्यत्वेकरून तामिळनाडू राज्यातील तंजावूर जिल्ह्याच्या परिसरात, भरपूर शिव मंदिरे आहेत. हा भाग चोळा साम्राज्याचा भाग होता. चोळा साम्राज्य हे साधारण ख्रिस्तनंतर ८०० ते १२०० ह्या काळामध्ये अस्तित्वात होतं. सहाव्या आणि सातव्या शतकांमध्ये तामिळ प्रदेशांत ६३ संतकवि होऊन गेले ज्यांनी शिवभक्तीपर काव्य रचली आणि गायली. ह्या ६३ कविंना एकत्रितरित्या नायनमार असं संबोधलं जातं. त्यांच्या कवितांचे साधारण १२ संच आहेत, ज्यांना एकत्रित थिरूमुराई असं संबोधलं.  


शैवसिद्धांताच्या शाखा:


  1. वैदिक-पुराणिक शैववाद : ह्या शाखेचा उगम वेदांमध्ये आढळतो. दक्षिण आणि उत्तर भारतातील स्मार्त ब्राह्मणांनी ह्याचं अनुसरण केलं. ह्या शाखेमध्ये वैदिक धर्माचा सनातन धर्म म्हणून प्रचार झाला. ह्या मध्ये शिव पुराण हा प्रमुख ग्रंथ मानला जातो. 

  2. अपुराणिक शैववाद: ह्या शाखेचे अनुयायी दीक्षा ग्रहण करतात. ह्या शाखेच्या परत दोन उपशाखा आहेत - अतिमार्ग (ज्यामध्ये मुक्ती हे प्रधान आणि एकमेव ध्येय मानलं जातं) आणि मंत्रमार्ग (ज्यामध्ये भुक्ती म्हणजेच ऐहिक सुखं आणि मुक्ती अशी दोन ध्येय मानली जातात)

  3. पशुपत शैववाद: ही शाखा सर्वात पुरातन आहे. तपस्वी लोकं ह्याचं  अनुसरण करतात. ह्याचा प्रभाव मुख्यत्वेकरून गुजरात, काश्मीर आणि नेपाळ ह्या राज्यांमध्ये आढळतो. 

  4. शैवसिद्धांत: ह्या शाखेला शिस्तबद्ध (नियमावली असणारं) तांत्रिक शैव असं समजलं जातं. एके काळी ह्या शाखेचं अनुसरण भारतभर होत होतं. काळाच्या ओघात दक्षिण भारतात ह्याचं अनुसरण सीमित झालं आणि काही काळांनंतर ही शाखा तामिळ शैव शाखेमध्ये मिसळून गेली. आणि म्हणूनच ही शाखा दक्षिण भारतीय समजली जाते. अजूनही ह्या शाखेचं अनुसरण जीवित आहे.

  5. काश्मीर शैववाद: कपालिकांनी लिहिलेल्या भैरव तंत्राच्या व्याख्यांवर आधारित ही शाखा आहे.

  6. नाथसिद्धसिद्धांत: ही शाखा मच्छिन्द्रनाथांनी सुरु केली. त्यांचा काळ साधारणत: ख्रिस्तनंतर  ८०० ते १००० दरम्यान होता. आणि ह्या शाखेची विस्तृती गोरखनाथांनी केली. त्यांचा काळ साधारणतः ख्रिस्तनंतर ९५० च्या दरम्यान होता. ह्या शाखेचा प्रभाव नेपाळ, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आहे. 

  7. लिंगायत: ही शाखा बसवण्णांनी प्रसिद्ध केली. बसवण्णांचा काळ होता ख्रिस्तनंतर ११०५ ते ११६७.  ह्या शाखेचा प्रभाव कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात आढळतो. 

  8. शिव अद्वैत: ही शाखा सुरु केली श्रीकांत ह्यांनी साधारणतः ख्रिस्तनंतर १०५० ह्या काळात. ह्या शाखेचा प्रभाव मूख्यत्वेकरून कर्नाटकात आढळतो. अप्पया दीक्षित (ख्रिस्तनंतर १५५४ - १६२६) ह्यांनी ह्या शाखेबद्दलच्या समजुतींचं निराकारण केलं.   



अस्वीकरण आणि शिष्टाचार:

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment