Monday, November 1, 2021

दीपावलीचं आध्यात्मिक महत्व

हिंदू धर्मातला सर्वात प्रसिद्ध आणि सर्व जगभरात साजरा होणारा सण कुठला असेल तर तो आहे दीपावली. दीप + अवली = दीपावली. अवली म्हणजे रांग. म्हणजे दीपावली म्हणजे दिव्यांची रांग.   


दीपावली सणाचा उगम कुठून झाला? दीपावलीचं आध्यात्मिक महत्व काय आहे? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.  


भगवद्गीता किञ्चिदधीता | 

गङ्गाजललवकणिका पीता | 

सकृदपि येन मुरारी समर्चा | 

क्रियते तस्य यमेन न चर्चा || २० ||

                                -  आदिशंकराचार्यकृत् “भज गोन्विन्दं” काव्य 


मतितार्थ - ज्यांनी कोणी किञ्चिद् जरी गीतेचा अभ्यास केला आहे, लवमात्र जरी गंगाजलाचं प्राशन केलं आहे किंवा स्नान केलं आहे, एकदा तरी मुरारी म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अर्चना केली आहे, त्यांचा यमदेवाशी काहीही संबंध येणार नाही.   


शंकराचार्यांच्या मते भगवद्गीता, गंगा, मुरारी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि यम ह्या चारांचं दीपावली सणाशी काही नातं आहे.  


१) भगवद्गीतेला दीपावलीचा भाऊ समजलं जातं. साधारणतः ज्ञान हे गुरु शिष्यांना आश्रमाच्या शांत वातावरणात प्रदान करतात. पण ज्ञानदात्रे असलेल्या भगवद्गीता आणि दीपावली ह्यांचा उगम अनपेक्षित परिस्थितीमध्ये रणांगणाच्या वातावरणात झाला आहे. गीतेचा उगम पुरुषोत्तम श्रीकृष्ण आणि नरोत्तम अर्जुन ह्यांच्या रणांगणांतील संवादांतून झाला आहे तर दीपावलीचा उगम लीलावतारी भगवान श्रीकृष्णांच्या नरकासुरवध घटनेतून झाला आहे. 


ह्या अर्थाने भगवद्गीतेचं दीपावलीशी नातं आहे.  


२) साधारणतः मनुष्य स्वभाव असा असतो की जेव्हा मनुष्याला दुःख होतं तेव्हा सर्व जग पण दुःखी असावं अशी एक साहजिक भावना मनामध्ये येते. पण जेव्हां भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला तेव्हां नरकासुराच्या आईच्या मनात मात्र तिच्या समोर तिच्या पुत्राचा वध होताना पाहून तिला दारुण दुःख झालेलं असतानापण साऱ्या विश्वाने मात्र हा दिवस आनंदाने, आपल्या घराभोवती दिव्यांची रांग सजवून साजरा करावा अशी तिच्या मनात इच्छा झाली. किंबहुना आपल्या पुत्राला साक्षात भगवंताच्या हातून मरण आलं ह्याचा तिला आनंदच होता. ह्यातूनच नरकचतुर्दशी हा दिवस दीपावली म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्यादिवशी अत्यंत आनंदमय वातावरणात हा दिवस साजरा करण्याची प्रथा प्रचलित झाली. किंबहुना आपलं स्वतःच दुःख विसरून सर्व जग सुखी असावं ही इच्छा करणं हे आध्यात्मिक प्रगतीचं प्रमुख लक्षण आहे हे ज्ञान दीपावलीचा सण आपल्याला देतो.


नरकासुराच्या आईने म्हणजेच भूमिदेवीने अशी पण इच्छा केली की ह्या दिवशी सर्वांनी गंगास्नान घ्यावं जेणेकरून त्यांना पुण्यप्राप्ती होईल. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे कि जिथे गंगा जल उपलब्ध नसेल तेथे गरम पाण्यामध्ये तिळाचं तेल घालून त्या पाण्याचं स्नान घेतल्यास गंगास्नानाचं पुण्य लाभेल. पूजेमध्ये देवाला स्नान अर्पण करताना तैले लक्ष्मी: जले गंगा.. हा श्लोक म्हणतात. असा समज आहे कि ब्राह्ममुहुर्ताच्या समयी गरम पाण्यामध्ये गंगेचा तर तिळाच्या तेलामध्ये लक्ष्मीचा वास असतो म्हणून दीपावलीमध्ये ब्राह्ममुहूर्तावर तिळाचं तेल डोक्यावर घालून गरम पाण्याने स्नान म्हणजेच अभ्यंगस्नान घेण्याचा प्रघात आहे आणि लक्ष्मीपूजन करण्याचा पण प्रघात आहे. 


ह्या अर्थाने गंगेचं दीपावलीशी नातं आहे.


३) नरकासुर ह्याचं खरं नाव भौमिक होतं. कारण तो भूमिदेवीचा पुत्र होता. त्याने तपश्चर्या करून वर मिळवला होता कि त्याला फक्त त्याच्या आईकडूनच म्हणजे भूमिदेवीकडूनच मरण येईल. अर्थातच आई कधी आपल्या मुलाला मारत नाही त्यामुळे नरकासुर खूप उद्दाम झाला आणि त्याने खूप अत्याचार केले. त्याने अनेक स्त्रियांना (१६०००) बंदिस्त करून ठेवले होते. आपल्या तपश्चर्येच्या बळावर त्याने आपल्या राज्याच्या सुरक्षेसाठी राज्याच्या भोवती अग्नी, वायू ह्यांचे किल्ले उभारले होते. त्याचा सहाय्यक असलेल्या मूर नावाच्या असुराने आपल्या तपश्चर्येच्या बळावर राज्याभोवती आधुनिक मायावी तारांचे (wires) वलय उभारले होते. लीलावतारी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराच्या ह्या अभेद्य कवचाला छेदलं आणि मूर ह्या असुराचा वध केला. आणि म्हणूनच त्यांना मुरारी हे नाव प्राप्त झालं. 


नरकासुर वधाच्या मोहिमेवर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भार्येला म्हणजे देवी सत्यभामांना पण आपल्या बरोबर नेलं होतं. त्याला पण काही कारण होतं. देवी सत्यभामा भूमिदेवीचा अवतार होत्या. आणि नरकासुराला मिळालेल्या वरानुसार त्याचा वध हा त्याच्या आईच्या हातून म्हणजेच भूमिदेवीच्या हातूनच शक्य होता. अंततः भूमिदेवीनेच म्हणजेच त्यांचा अवतार असलेल्या देवी सत्यभामांनीच नरकासुराचा वध केला. त्या दिवशी चतुर्दशी तिथी होती आणि म्हणूनच हा दिवस नरकचतुर्दशी ह्या नावाने प्रसिद्ध झाला. भूमिदेवीने हा दिवस सर्वांनी आनंदाने साजरा करावा ही इच्छा केली म्हणून दीपावली सण अस्तित्वात आला. 


ह्या अर्थाने भगवान श्रीकृष्णांचं दीपावलीशी नातं आहे. 


४) नरक म्हणलं की अर्थातच स्मरण होतं ते यमदेवांचं. मरणानंतर जीवाला स्वर्गात पाठवावं का नरकांत ह्याचा निर्णय यमदेव करतात. आणि म्हणूनच नरकगमन टाळण्यासाठी नरकचतुर्दशीला यमतर्पण करण्याची प्रथा आहे. 


ह्या अर्थाने यमदेवांचं पण दीपावलीशी नातं आहे.  


श्री सत्यसाईबाबांच्या मते मनुष्याची आध्यात्मिक प्रगती होण्यास त्याने तीन तत्वांचं आचरण करावं असं ते म्हणतात - १) परक्याने आपल्यावर केलेल्या उपकारांचं सतत स्मरण ठेवावं, २) आपण परक्यावर केलेल्या उपकारांचं विस्मरण करावं आणि ३) परक्याने आपल्यावर केलेल्या अपकारांचं विस्मरण करावं. किंबहुना हीच आध्यात्मिक शिकवण दीपावली सण पण आपल्याला देतो. 


आपल्याला झालेलं दुःख विसरून सर्व जग सुखी व्हावं अशा इच्छेतून निर्माण झालेल्या दीपावली सणानिमित्त भूमिदेवीला साष्टांग नमस्कार.   


परमाचार्य जगद्गुरू श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वतींचे उपन्यास आणि कामकोटी डॉट कॉम ह्या वेबसाईट वरील पुराणकथा ह्यांचा आधार घेऊन आणि श्रीगुरूंना अभिवादन करून हा प्रयत्न केला आहे. ह्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याबद्दल क्षमस्व. 

No comments:

Post a Comment