हे शिव मंदिर कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर थिरुवारुर जिल्ह्यातील पुंथोट्टम (फुलांचे वन) जवळ असलेल्या थिरुमक्कलम ह्या गावी आहे. मयीलादुथराई-थिरुवारुर मार्गावर हे मंदिर पेरलम पासून ६ किलोमीटर्स वर आहे. अंबरपेरूमथिरुकोविल पासून १ किलोमीटर्स वर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी केली आहे. कोचेंगटचोळा राजाने बांधलेल्या माडकोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मूळ मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. इथल्या शिलालेखांनुसार ह्या मंदिराचे दगडी बांधकाम कुलोथंग I राजाने केले आणि कालांतराने ह्या मंदिराचा विस्तार विक्रम चोळा राजाने केला.
मूलवर: श्री महाकाळनाथस्वामी, श्री काळकंडेश्वर
देवी: श्री राजमातंगी, श्री इयनअम्माई, श्री भयअक्षयअंबिका
पवित्र तीर्थ: अमृत वावी (विहीर), महाकाळ तीर्थ
क्षेत्र वृक्ष: मरुद वृक्ष (मराठी मध्ये खैर), कारुंगकाली, मरूर (मराठीमध्ये किंजल)
ऐतिहासिक नाव: इंद्रपुरी
पुराणिक नाव: कोविलथिरुमक्कलम, थिरु-अंबल-मक्कलम
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार दुर्वास ऋषींना मधलोला ह्या स्वर्गीय अप्सरेकडून दोन पुत्र प्राप्त झाले होते - अंबन आणि अंबरसुराल. ह्या पुत्रांनी भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या केली आणि वरदाने मिळविली. ह्या वरदानांमुळे ते देव, ऋषी आणि इतरांना त्रास देऊ लागले. जेव्हां देव, ऋषी आणि इतर जन भगवान शिवांकडे मदतीसाठी गेले तेव्हां भगवान शिवांनी त्यांना श्री पार्वती देवींकडे पाठवलं. पार्वती देवींनी कालीदेवींकडे कटाक्ष टाकला. कालीदेवींनी एका सुंदर तरुण मुलीचं रूप धारण केलं. कालीदेवी इथे आल्या आणि त्यांच्याबरोबर भगवान विष्णू एका वृद्ध माणसाचं रूप घेऊन आले. जेव्हां दुर्वास ऋषींच्या पुत्रांनी ह्या तरुण मुलीला पाहिलं ते तिच्या प्रेमात पडले आणि तिला प्राप्त करण्यासाठी दोघांमध्ये भांडण चालू झाले. ह्या भांडणांमध्ये ज्येष्ठ पुत्र मरण पावला आणि नंतर कालीदेवींनी कनिष्ठ पुत्राला म्हणजेच अंबनला पण मारून टाकले. जिथे तिने अंबनला मारले त्या जागेला अंबकरथुर असे नाव प्राप्त झाले. अंबनला मारल्यामुळे कालीदेवींना ब्रह्महत्येचा दोष जडला. ह्या दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी कालीदेवींनी इथल्या पवित्र तीर्थाजवळ एक शिवलिंग निर्माण करून त्याची बिल्व पत्रांनी पूजा केली. त्यांच्या हाताची चिन्हे अजूनही लिंगावर पाहावयास मिळतात. कालीदेवींनी इथे असुरांचा संहार केला आणि भगवान शिवांची पूजा केली म्हणून ह्या स्थळाला अंबरमक्कलम असं म्हणतात.
२. स्थळ पुराणानुसार मातंग महर्षींनी अपत्यप्राप्तीसाठी इथे भगवान शिवांची उपासना केली. ह्या उपासनेचे फळ म्हणून त्यांना पुत्रीप्राप्ती झाली. त्यांनी तिचे नाव राजमातंगी असे ठेवले. असा समज आहे की योग्य वेळी भगवान शिव तिच्यापुढे प्रकट झाले आणि तिच्याशी विवाह केला. राजमातंगीने इथे भगवान शिवांसमवेत विवाह पोषाखात राहण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांनी अशी पण इच्छा व्यक्त केली कि इथे जे कोणी त्यांच्या समस्यांचा परिहार करण्यासाठी प्रार्थना करतील त्यांच्या समस्यांचा परिहार व्हावा.
३. अजून एक पुराण आहे जे महाकाळ महाऋषींशी निगडित आहे. असा उल्लेख आहे कि महाकाळ महाऋषींनी इथे भगवान शिवांची उपासना केली. म्हणून ह्या स्थळाला मक्कलम असे नाव पडले. आणि भगवान शिवांना श्री महाकाळनाथर असे नाव पडले.
४. स्थलपुराणानुसार काशीमध्ये विमलन नावाचा ब्राह्मण रहात होता. त्याला अपत्य नव्हते. त्याने विविध शिव स्थळांना भेट दिली आणि अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना केली. त्याने दक्षिण भारताची तीर्थयात्रा करावयास सुरुवात केली. त्याने बऱ्याच शिव मंदिरांत जाऊन भगवान शिवांना अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना केली. एकदा भगवान शिवांनी विमलनला एका वृद्धाच्या रूपांत दर्शन दिलं आणि त्याला ह्या ठिकाणी येऊन श्री महाकाळनाथर ह्यांची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्याला हे पण सांगितलं कि इथे त्याला मनुष्याचे शिर असलेले श्री विनायक आणि किशोर वयातले श्री मुरुगन ह्यांचे पण दर्शन होईल. त्यांची पण उपासना करण्याचा भगवान शिवांनी विमलनला सल्ला दिला. भगवान शिवांनी विमलनला हे पण सांगितलं कि त्याला पुत्रप्राप्ती होईल आणि त्याचे नाव त्याने महादेवन असे ठेवावे. विमलनने भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार उपासना केली आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली.
५. स्थळ पुराणानुसार हे ठिकाण सोमयाजी मर नायनार (सोमसी मर नायनार) ह्यांचे जन्मस्थान आहे. ते इथे सुशीला ह्या त्यांच्या पत्नीसमवेत वास्तव्य करून होते. त्यांना भगवान शिवांच्या भक्तांना अन्नदान करण्याची खूप आवड होती. एकदा त्यांना भव्य सोमयाग साजरा करण्याची आणि ह्या यागासाठी थिरुवारुर येथील त्यागराजांना आमंत्रित करण्याची इच्छा झाली. त्यांना माहित होतं कि शैव संत सुंदरर हेच फक्त त्यागराजांना यागासाठी आमंत्रित करण्यास समर्थ आहेत. सुंदरर ह्या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा ते त्यांना भेटायला गेले. त्यांना कळलं की सुंदरर हे सर्दी आणि खोकल्याने पीडित आहेत. त्यांनी सुंदरर ह्यांना थूडूवलर ह्या वनस्पतीपासून बनवलेले औषध दररोज द्यायला सुरुवात केली. जेव्हां सुंदरर पूर्ववत झाले तेव्हा ते सोमसी नायनार ह्यांचे आभार मानण्यासाठी आले. तेव्हां सोमसी नायनार ह्यांनी सुंदरर ह्यांच्या यज्ञामध्ये त्यागराजांना आमंत्रित करण्यासाठी मदत मागितली. सुंदरर ह्यांनी ती विनंती मान्य केली. सुंदरर ह्यांनी भगवान शिवांना विनंती केली की त्यांनी वैकासि ह्या तामिळ महिन्यातील आश्लेषा ह्या नक्षत्र दिवशी यज्ञामध्ये येऊन दर्शन द्यावे. सुंदरर ह्यांनी केलेल्या विनंतीची बातमी वणव्यासारखी पसरली आणि विविध ठिकाणाहून सर्व ऋषी, मुनी आणि संत ह्या यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी अंबर येथे आले. भगवान शिव, पार्वती देवी, श्री विनायक आणि श्री मुरुगन हे पारधी कुटुंबाच्या रूपांत तेथे आले. त्यांच्याबरोबर चार वेद चार श्वानांच्या रूपांत आले. भगवान शिवांच्या खांद्यावर एक मृत वासरू होते. त्या काळी पारधी हे समाजातून बहिष्कृत मानले जायचे. पारधी कुटुंबाला पाहून तिथे जमलेले विद्वान आणि ऋषी ह्यांना यज्ञ साजरा करण्यामधे घोडचूक झाली आहे असे मानून निघून गेले. पण सोमसी नायनार ह्यांनी पारधी कुटुंबाचं स्वागत केलं आणि पारधी कुटुंबाने पण त्यांचं आदरातिथ्य आनंदाने स्वीकारलं. ह्या घटनेच्या स्मृत्यर्थ इथे एक श्री विनायकांचं देवालय आहे जिथे श्री विनायकांना अच्चू तीर्थ विनायक असे संबोधले जाते. इथे त्यांचे शिर हत्तीचे नसून मानवी आहे. यज्ञाचे हवीस स्वीकारल्यावर पारधी कुटुंबाने आपल्या मूळ रूपांत दर्शन दिलं. इथे एक छोटा मंडप आहे जिथे हा सोमयज्ञ साकार झाला असा समज आहे. हा यज्ञकुंड अंबरमक्कलम आणि अंबरपेरूनथिरुकोविल ह्या स्थळांच्या मध्यभागी आहे. प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी सोमयज्ञ साजरा केला जातो. ह्या यज्ञाच्या समयी थिरुवारुर येथे त्यागराजांची पूजा होत नाही कारण असं मानलं जातं की त्यागराज ह्या यज्ञासाठी ह्या ठिकाणी आले आहेत.
६. असा समज आहे की वासुकीने इथे भगवान शिवांची पूजा करून ब्रह्महत्या दोषातून मुक्ती प्राप्त केली.
७. नागकन्नीकांनी इथे भगवान शिवांची पूजा केली. सर्पांनी (तामिळ मधे कालम) इथे पूजा केली म्हणून ह्या स्थळाला मक्कलम असे नाव प्राप्त झाले.
८. पुराणानुसार संहारशीलन ह्याने इंद्रदेवांना पराभूत केले. इंद्रदेवांनी भगवान शिवांची इथे प्रार्थना करून त्यांची मदत मागितली. भगवान शिवांनी श्री भैरवांच्या रूपांत (श्री सट्टाईनाथर) संहारशीलन ह्याचा पराभव करून इंद्रदेवांना त्यांचे मूळ पद प्राप्त करून दिले.
९. पुराणानुसार जेव्हा विश्वामित्र ऋषी तपश्चर्या करत होते त्यावेळी देवांनी मन्मदांच्या मदतीने त्यांच्यावर बाण फेकून त्यांची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. क्रोधीत झालेल्या विश्वामित्रांनी मन्मदांना शाप दिला. मन्मदांनी इथे भगवान शिवांची उपासना करून शापातून मुक्ती प्राप्त केली.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
हे स्थळ नैमिषारण्यांपैकी एक मानलं जातं म्हणून असं मानलं जातं की व्यास ऋषी, दुर्वास ऋषी आणि सप्त ऋषींनी इथे उपासना केली. तसेच इंद्रदेव, सोमसी नायनार, सुंदरर, मन्मद, कालीदेवी, मातंग महर्षी, महाकाळ महर्षी ऋषी, विमलन, वासुकी, नागकुमारिका आणि विश्वामित्र ऋषी ह्यांनी उपासना केली.
वैशिष्ट्ये:
१. हे कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी एक आहे.
२. इथे मोहिनीदेवींना अलंकार करताना इथले ब्राह्मण त्यांना स्पर्श करत नाहीत कारण मोहिनी देवी अस्पर्शित आहेत (तामिळ मधे थिंदाथिरुमेनिं). मोहिनीदेवींना अलंकार चढविण्यासाठी आणि हार अर्पण करण्यासाठी काठीचा वापर केला जातो.
३. श्री विनायक आणि श्री बालमुरुगन ह्यांच्या मूर्तींमध्ये त्यांची मुखे मानवी आहेत.
४. श्री कालीदेवींच्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातात शिवलिंग आहे.
५. श्री सुब्रह्मण्य ह्यांनी इथे धनुष्य आणि बाण घेतले आहे असे चित्रित केले आहे.
६. श्री महाकाळनाथर ह्यांची तीन मंदिरे आहेत जिथे महाकाळ ऋषींनी शिवलिंग प्रस्थापित केले आहे. १) हे मंदिर २) विल्लूपुरम येथील इरुम्बाई ३) उज्जैन
मंदिराबद्दल माहिती:
मंदिराचा आवार साधारण सहा एकर वर पसरलेला आहे. इथे अनेक गोपुरे आहेत ज्यावर आकर्षक स्टुक्कोची चित्रे आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि आणि दोन परिक्रमा आहेत. इथले शिवलिंग स्वयंभू असून ते पूर्वाभिमुख आहे. अंबर आणि अंबर मक्कलम ह्यांच्या मध्यभागी सोमसी मार नायनार ह्यांनी बांधलेली यागशाळा आहे. इथे भगवान शिवांची पारधी रूपांतली मूर्ती आहे. उजव्या बाजूला अलंकार मंडप आहे ज्यामध्ये श्री मरुदप्पर ह्यांचे देवालय आहे. श्री पार्वती देवी त्यांच्या पूर्वाभिमुख देवालयातून भक्तांवर कृपावर्षाव करतात. इथे त्यांना श्री बयाक्ष्यअंबिका ह्या नावाने पूजले जाते.
परिक्रमेमधील इतर मूर्ती आणि देवालये: श्री विनायक, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री निलोथ्थपलमअंबळ समवेत भगवान शिव, श्री नटराज, श्री कालीदेवी, मातंग महर्षी, श्री दक्षिणामूर्ती, श्री महालक्ष्मी, श्री चंडिकेश्वरींसमवेत श्री चंडिकेश्वरर, श्री वाल्मिकनाथर, श्री शनीश्वरर, श्री विश्वनाथ, श्री दंडपाणी, मोक्ष लिंग, श्री नागनाथर, ईशान्य लिंग, ज्वरनिवृत्ती लिंग, अगस्त्य लिंग, बाण लिंग, श्री ब्रह्मदेव, श्री योग सुब्रह्मण्य, नाग (सर्प), ६३ नायनमार, शैव संत नालवर, संत सोमयाजी मार नायनार त्यांच्या पत्नीं सुशीला ह्यांच्या समवेत, नवग्रह. इथे वासुकी ह्यांचे देवालय आहे तसेच श्री सट्टाइनाथर ह्यांचे देवालय आहे. श्री सुब्रमण्यम ह्यांच्या हातामध्ये धनुष्य बाण आहेत.
इथल्या मिरवणुकीच्या मूर्ती खूप सुंदर आहेत. त्या मूर्ती अशा आहेत: काट्चिकुथौ नायनार, भगवान शिव पारधी रूपांत आणि श्री पार्वती देवी त्यांच्या पत्नींच्या रूपांत, हातामध्ये शिवलिंग असलेल्या श्री कालीदेवी, सोमस्कंद आणि श्री नटराज. ह्या मूर्ती मंडपामध्ये ठेवल्या आहेत.
मुख्य देवालयाच्या जवळ भगवान विष्णूंची श्री वेट्रीरुंध पेरुमल ह्या नावाची मूर्ती आहे.
ह्या मंदिरामध्ये श्री विनायकांचे नाव आदिविनायक तर श्री बाल मुरुगन ह्यांच हे नाव आदिस्कंद असे आहे. ह्या शिवाय श्री विनायकांचे इथे अजून एक देवालय आहे जिथे त्यांना श्री पडीक्कासु पिल्लैयार असे संबोधले जाते.
उत्तर दिशेला श्री पाताळेश्वरर ह्यांचे देवालय आहे. पुन्नाग वृक्षाखाली श्री पुन्नागवननाथर ह्यांचे देवालय आहे. इथे वासुकी आणि मोहिनीदेवी ह्यांची पण देवालये आहेत. इथे भगवान शिवांची एक मूर्ती आहे ज्यामध्ये भगवान शिव पारधी रूपांत आहेत, श्री पार्वती देवींच्या माथ्यावर एक मडकं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र श्री विनायक आणि श्री कार्थिकेय आहेत.
प्रार्थना:
१. विवाहातल्या अडचणींचा परिहार करण्यासाठी इथे भाविक जन श्री पार्वती देवींना दोन लाल कण्हेर फुलांचे हार अर्पण करतात. ह्यातील एक हार भक्तांना परत दिला जातो. असा समज आहे कि हा परत मिळालेला हार परिधान केल्यावर विवाहातल्या अडचणी दूर होतात.
२. मृत्यूशय्येवर असलेल्यांसाठी इथे मोक्ष लिंगावर अभिषेक केल्यास त्यांना मोक्ष प्राप्त होतो असा समज आहे.
पूजा:
दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, इतर साप्ताहिक आणि पाक्षिक पूजा.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
वैकासि (मे-जून): आश्लेषा ह्या नक्षत्र दिवशी इथे सोमयाजी मर नायनार यज्ञ उत्सव भव्य प्रमाणावर साजरा केला जातो. ह्या दिवशी भगवान शिव त्यांच्या खांद्यावर एक मृत वासरू अशा रूपांत, त्यांच्या बरोबर चार वेद चार श्वानांच्या रूपांत, श्री पार्वती देवी त्यांच्या डोक्यावर एक मडके आहे अशा रूपांत अशा मूर्तींची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक यज्ञशाळेपर्यंत जाते. नंतर त्यांना यज्ञाचे हवीस अर्पण केले जाते. नंतर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ऋषभावर आरूढ होऊन भक्तांना दर्शन देतात.
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी, अन्नाभिषेक
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८
मंदिराचा पत्ता:
श्री महाकाळनाथस्वामी मंदिर,
ऍट पोस्ट कोविल थिरूमलम (पुंथोट्टम मार्गे),
तालुका: नन्नीलम,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळनाडू ६०९५०३
दूरध्वनी: +९१-४३६६२९१४५७, +९१-९४४२७६६८१८
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.