हे १८०० वर्षे जुनं मंदिर तामिळनाडू राज्यातील थिरुवारुर जिल्ह्यामध्ये हरिद्वार मंगलम ह्या गावी वसले आहे. कुंभकोणमपासून २१ किलोमीटर्सवर, आलंगुडीपासून १० किलोमीटर्सवर आणि थिरुवारुरपासून ४० किलोमीटर्सवर. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील ह्या पाडळ पेत्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधर आणि वल्लाळर ह्यांनी त्यांच्या पवित्र रचनांमध्ये केली आहे. म्हणून मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा साम्राज्यामध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पुढील काळात नायक आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिराला दिलेल्या देणग्या तसेच भेटवस्तूंचा उल्लेख आहे. पण हे शिलालेख सध्या विस्कळीत स्थितीमध्ये आहेत.
हे पंचारण्यस्थळांपैकी एक स्थळ आहे. पंचारण्य स्थळांपैकी इतर चार स्थळे अशी आहेत - थिरुकारूकावूर येथील मूल्लैवननाथर मंदिर, अवलिवनल्लूर येथील साक्षीनाथर मंदिर, आलंगुडी येथील आपत्सहाय्यर मंदिर आणि थिरुकोल्लमपुथुर येथील विल्ववनेश्वरर मंदिर. ह्या स्थळाला पूर्वी वन्नीवनम असे नाव होते. पंचारण्य स्थळ यात्रा हि एका दिवसात पूर्ण करायची प्रथा आहे. त्या यात्रेमध्ये ह्या मंदिराचे दर्शन सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान घेतले जाते.
मूलवर: श्री पाताळेश्वरर, श्री पाताळवरदर
देवी: श्री अलंकारवल्ली, श्री अलंकारनायकी
स्थळ वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ
पुराणिक नाव: अरथै पेरूमपळली
वर्तमान नाव: हरिद्वार मंगलम
क्षेत्र पुराण:
१. एकदा श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू ह्यामध्ये त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे ह्या विषयावर वाद झाला. ह्या वादाचं निरसन करण्यासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका प्रचंड अग्नीरुपी स्तंभाच्या रूपांत प्रकट झाले. त्यांनी श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू ह्यांना ह्या स्तंभाचे शिखर आणि तळ शोधण्यास सांगितले. ब्रह्मदेव हंसाचं रूप घेऊन शिखर शोधण्यासाठी निघाले तर भगवान विष्णू वराह रप घेऊन तळ शोधण्यासाठी निघाले. शोध पूर्ण झाल्यावर भगवान विष्णूंनी त्यांना तळ सापडला नाही हे स्वीकार केलं पण ब्रह्मदेवांनी त्यांना शिखर सापडलं असं खोटंच सांगितलं आणि त्याची साक्ष म्हणून केतकीचे फुल दाखवले. भगवान शिव क्रोधीत झाले आणि त्यांनी ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प ह्या दोघांनाही शाप दिला कि त्यांची ह्यापुढे पृथ्वीवर पूजा होणार नाही. आणि भगवान विष्णूंना वरदान दिलं कि त्यांची सर्व ठिकाणी पूजा होईल म्हणून. असा समज आहे की वराह रूपामध्ये असताना भगवान विष्णूंचे एक शिंग तुटले म्हणून भगवान विष्णूंनी इथे भगवान शिवांची आराधना केली. स्तंभाच्या तळाचे शोधकार्य संपवून भगवान विष्णू ज्या छिद्रामधून बाहेर आले ते छिद्र ह्या मंदिरामध्ये आहे. ते एका दगडाने झाकून ठेवले आहे. असा समज आहे कि हि घटना पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या कृष्ण पक्षातील १४व्या दिवशी घडली.
२. स्थळ पुराणानुसार ह्या ठिकाणी वन्नी वृक्षांचे वन होते. म्हणून ह्या स्थळाला वन्नीवनम असे नाव प्राप्त झाले.
३. स्थळ पुराणानुसार इथून जवळच असलेले साक्षीनाथर मंदिर हे भगवान विष्णूंच्या वराह अवताराशी निगडित आहे.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे: भगवान विष्णू, पातंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी, शैव संत संबंधर आणि वल्लाळर
वैशिष्ट्ये:
१. श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती अद्वितीय आहे.
२. ह्या मंदिरात श्री विनायकांच्या सात मूर्ती आहेत.
३. इथल्या शिवलिंगामध्ये एक पोकळ खड्डा (छिद्र) आहे.
४. ह्या ठिकाणी नवग्रह मंदिर नाही.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. राजगोपुरासमोर बलीपीठ आणि नंदी आहेत. प्रवेशावर द्वारपालकांची स्टुक्कोची चित्रे आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू असून त्यावर एक पोकळ छिद्र आहे.
कोष्ट मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती एका स्वतंत्र देवालयामध्ये आहेत, श्री लिंगोद्भवर आणि श्री ब्रह्मदेव.
मुखमंडपामध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री शिवगामींसमवेत श्री नटराज, पातंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी, श्री विनायक आणि श्री मुरुगन.
बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत - श्री विनायक, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री चंडिकेश्वरर, श्री भैरव, श्री विशालाक्षींसमवेत श्री विश्वनाथ, महालिंग, श्री शनीश्वरर, श्री चंद्र, सप्त मातृका, श्री नटराज आणि श्री विनायकांच्या सात मूर्ती.
इथे भगवान शिव हे सर्व ग्रहांचे स्वामी असल्याकारणाने ह्या मंदिरामध्ये नवग्रहांचे देवालय नाही.
श्री अंबिका देवी एका स्वतंत्र पूर्वाभिमुख देवालयामध्ये आहेत. इथे श्री अंबिका देवी स्वतःच दुर्गा देवी असल्याकारणाने इथे श्री दुर्गादेवींचे स्वतंत्र देवालय नाही. इथे श्री अंबिका देवी भगवान शिवांच्या डाव्या बाजूला असून दोघेही पूर्वेकडे मुख करून आहेत म्हणून हि रचना ह्या दैवी दाम्पत्याचे वधुवररूप दर्शवते.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाह होण्यासाठी तसेच अपत्य प्राप्तीसाठी माता अलंकारवल्ली ह्यांची आराधना करतात.
२. पंचारण्य स्थळांच्या यात्रेमधील दर्शन क्रमामध्ये हे तिसरं मंदिर आहे. ह्या मंदिराचे दर्शन दुपारी १२ वाजता घेतले जाते. असा समज आहे की पंचारण्य स्थळ यात्रा केल्यास उत्तरेमधील हरिद्वार ह्या क्षेत्राचे दर्शन घेतल्याचे फळ प्राप्त होते.
३. असा समज आहे कि इथे भगवान शिवांची आराधना केल्याने सर्व कर्जांतुन मुक्ती मिळते.
पूजा:
नित्य दैनंदिन पूजा, तसेच प्रदोष दिवशी प्रदोष पूजा.
मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्र दिवशी भव्य उत्सव
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायक चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, पुष्य नक्षत्र दिवशी उत्सव
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८
मंदिराचा पत्ता:
श्री पाताळेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट हरिद्वार मंगलम,
तालुका: वलंगैमन,
जिल्हा: थिरुवारुर
तामिळनाडू ६१२८०२
दूरध्वनी: +९१-४३७४२६४५८६, +९१-४३७४२७५४४१, +९१-९४४२१७५४४१
काळजीवाहू व्यक्ती: श्रीमती श्रीदेवी - +९१-८४८९२३४९८१
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment