Sunday, October 11, 2026

थिरुपेरूवेलूर / मनक्कल अय्यमपेटै येथील श्री प्रियनाथर / श्री अभिमुक्तिश्वरर मंदिर

मनक्कल अय्यमपेटै हे गाव थिरुवारुर-कुंभकोणम मार्गावर थिरुवारुर पासून ८ किलोमीटर्सवर, कुंभकोणमपासून ३१ किलोमीटर्सवर, मयीलादुथुराईपासून ४८ किलोमीटर्सवर आणि नन्नीलंपासून १२ किलोमीटर्सवर आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या काठावर वसले आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. येथील श्री मुरुगन ह्यांची शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी स्तुती गायली आहे. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या माड कोविल शैलीच्या ७० मंदिरांपैकी एक मंदिर आहे. पुढील काळात चोळा राजांनी ह्या मंदिराची पुनर्बांधणी करून ह्या मंदिराचे वर्तमान दगडी बांधकाम केले. चोळा राजा कुथोंगचोलन ह्याने मंदिरासाठी केलेल्या कामाचे शिलालेखांमध्ये उल्लेख आहेत. वायू आणि आदिशेष ह्यांच्या मध्ये झालेल्या द्वंद्वामध्ये मेरू पर्वताचा काही भाग उडाला आणि इथे पडला. असा समज आहे की हे मंदिर त्या पर्वताच्या तुकड्यावर बांधले आहे. ललितात्रिशति ह्या स्तोत्राचा उगम ह्या ठिकाणी झाला.

मूलवर: श्री अभिमुक्तिश्वरर, श्री प्रियनाथर, श्री शेषपुरीश्वरर
देवी: श्री मिन्ननैयाल अम्माई
पूजा/आगम: कारण आगम
पवित्र तीर्थ: सरवण पोईगाई, अग्नी तीर्थ
क्षेत्र वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)
पुराणिक नाव: पेरूवेलूर, कट्टूराय्यनपेटै
वर्तमान नाव:  मनक्कल अय्यमपेटै

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार भक्तांनी तिच्यामध्ये स्नान केल्याने गंगादेवीने जी पापं शोषून घेतली त्या पापांचे क्षालन कसं करावं ह्यासाठी गंगादेवी भगवान शिवांकडे गेल्या. भगवान शिवांनी त्यांना ह्या ठिकाणी जिथे श्री मुरुगन ह्यांनी पवित्र तीर्थ निर्माण करून भगवान शिवांची पूजा केली त्याठिकाणी येऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार गंगादेवींनी इथे येऊन तपश्चर्या केल्याने त्यांच्या पापांचं क्षालन झालं. म्हणून इथे अंबिका देवी तपश्चर्येच्या मुद्रेत आहेत.

२. श्री मुरुगन इथे आले आणि त्यांनी तीर्थ निर्माण करून भगवान शिवांची पूजा केली. त्यांना भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त झाला तसेच वेल (म्हणजे भाला) पण प्राप्त झाला. म्हणून ह्या स्थळाला पेरूवेलूर हे नाव प्राप्त झालं. श्री मुरुगन ह्यांना वेलन असं नाव प्राप्त झालं आणि त्यांनी जे तीर्थ निर्माण केलं त्याला सरवण पोईगाई असं नाव प्राप्त झालं. 

३. समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान विष्णूंनी असुरांना अमृत मिळू नये म्हणून मोहिनी रूप धारण केलं. त्या रूपाचा उद्देश सफल झाल्यावर त्यांनी आपल्या मूळ रूपांत परत येण्यासाठी इथे येऊन भगवान शिवांची आराधना केली. म्हणून इथे भगवान विष्णूंचे स्वतंत्र देवालय आहे जिथे त्यांना श्री वैकुंठ नारायण पेरुमल असे संबोधले जाते.

४. स्थळ पुराणानुसार एका मुक्या मुलाला त्याचे पालक इथल्या सरस्वतीश्वरर देवालयात घेऊन आले. त्यांनी भगवान शिवांकडे आपल्या मुलाला मुकेपणापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना केली. असा समज आहे की भगवान शिवांनी त्याची मुकेपणापासून मुक्तता केली.

५. आधीच्या ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हे स्थळ वायू आणि आदिशेष ह्यांच्या द्वंद्वाच्या कथेशी निगडित आहे.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

गौतम ऋषी, भृंगी ऋषी, भगवान विष्णू, श्री मुरुगन, अगत्स्य ऋषी आणि शुक्र ग्रह.

वैशिष्ट्ये:

१. श्री मुरुगन ह्यांनी भगवान शिवांची ज्या स्थळांमध्ये आराधना केली त्या स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. इतर स्थळे अशी आहेत - वैतीश्वरन कोविल, किळवेलूर आणि थिरुविदाईकळी.

२. श्री मुरुगन ह्यांनी ह्या ठिकाणी एक पवित्र स्थळ निर्माण करून त्यामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली आणि त्यांना वेल (मराठीत भाला) प्राप्त झाला. म्हणून ह्या स्थळाला पेरूवेलूर असं म्हणतात. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.

३. मोहिनी अवतारातून परत आपल्या मूळ रूपांत येण्यासाठी भगवान विष्णूंनी इथे भगवान शिवांची आराधना केली.

४. ह्या मंदिरात सहा शिव लिंगे आहेत. त्यापैकी एक श्री सरस्वतीश्वरर आहे.

५. कांचीपुरम आणि थिरुमेयचूर ह्या स्थळांसारखेच इथे पण श्री पार्वती देवींना तपश्चर्या करत आहेत असे चित्रित केले आहे.

६. श्री दक्षिणामूर्ती वटवृक्षाच्या पायथ्याशी बसले आहेत असे एका ग्रॅनाईट च्या मूर्तीमध्ये चित्रित केले आहे.

७. श्री विनायकांची मूर्ती पांढऱ्या दगडाची बनवली आहे.

८. ह्या मंदिरात ३ भैरव मूर्ती आहेत, २ दुर्गा देवींच्या मूर्ती आहेत आणि २ चंडिकेश्वरांच्या मूर्ती आहेत.

९. मंदिराच्या मुखमंडपामध्ये श्री नटराजांचे देवालय आहे. मुखमंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.

१०. असा समज आहे की ३ श्रेष्ठ कर्नाटकी संगीतज्ञांनी ह्या मंदिरात भगवान शिवांची आराधना केली.

मंदिराबद्दल माहिती:

मंदिराच्या वरच्या भागात गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. ह्या वरच्या भागात जाण्यासाठी १७ पायऱ्या चढून जायला लागतं.

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. राजगोपुरानंतर ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. ध्वजस्तंभाच्या खाली श्री विनायकांची मूर्ती आहे ज्याला श्री कोडीमार विनायक असे संबोधले जाते. ह्या मंदिरात दोन प्रकार आहेत. मंदिराच्या पुढच्या सभागृहाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे. 

इथले मूलवर स्वयंभू लिंग आहे. मूलवरच्या समोर दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी जाळी आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, महर्षी मिरुकंड, श्री लिंगोद्भवर आणि श्री ब्रह्मदेव.

श्री दुर्गादेवी स्वतंत्र देवालयात आहेत. 

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री नटराज, श्री सोमस्कंदर, श्री महालक्ष्मी, नवग्रह, श्री शनीश्वरर, श्री सूर्य, शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर, श्री वैकुंठ नारायण पेरुमल (श्री विष्णू), श्री चंडिकेश्वरर आणि श्री योग चंडिकेश्वरर. 

इथे श्री भैरवांच्या तीन मूर्ती एकाच देवालयामध्ये आहेत - श्री कालभैरव, श्री भैरव आणि श्री वटुकभैरव. त्यांना एकत्रितपणे तीन कालभैरव असे म्हणतात. अष्टमीच्या दिवशी ह्या देवालयात विशेष पूजा केली जाते. 

तसेच इथे पुढील शिव लिंगे आहेत - श्री धर्मपुरीश्वरर, श्री रामलिंगेश्वरर, श्री तर्केश्वरर, श्री सरस्वतीश्वरर, श्री जम्बुकेश्वरर आणि श्री ऐरावतेश्वरर.

श्री अंबिका देवींचे देवालय जमिनीच्या पातळीवर पूर्वाभिमुख आहे. त्या वीरासनामध्ये बसल्या आहेत. त्या चतुर्भुज रूपांत चित्रित केल्या आहेत. ह्यापैकी एक हात अभय मुद्रेमध्ये तर अजून एक हात वरदमुद्रेमध्ये आहे. ह्या मंदिराशिवाय कांचीपुरम आणि थिरुनीदुर ह्या मंदिरांत पण श्री अंबिका अशाच मुद्रेमध्ये आहेत. 

भगवान शिवांच्या देवालयाच्या आजूबाजूला श्री मुरुगन आणि श्री अंबिका देवींची देवालये आहेत. श्री मुरुगन ह्यांचे देवालय मध्यभागी आहे आणि श्री अंबिका देवींचे देवालय भगवान शिवांच्या उजव्याबाजूला आहे. ही सोमस्कंदर रचना आहे.

प्रार्थना:

१. हे शुक्र दोषासाठी परिहार स्थळ आहे. इथे भाविक जन कर्जातून मुक्ती मिळविण्यासाठी प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करतात.

३. ह्या मंदिरामध्ये दुर्मिळ देवालय आहे ज्यामध्ये श्री योग चंडिकेश्वरर आणि श्री चंडिकेश्वरी ह्यांच्या मूर्ती आहेत. भाविक जनांचा असा समज आहे की ह्यांची प्रार्थना केल्याने दाम्पत्यांच्या समस्यांचे निरसन होते.

४. वाचेच्या दोषांतून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन श्री सरस्वतीश्वरर ह्यांची पूजा करतात.

पूजा:

कारण आगमानुसार इथे रोज तीन वेळा पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:

ह्या मंदिरात ऎप्पासी महिन्यात स्कंद षष्ठी आणि वैकासि महिन्यात (मे-जून) वैकासि विशाखा हे सण मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. 

इतर सण:

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा आषाढा दिवस नक्षत्र दिवशी उत्सव)

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव)

मंदिराचा पत्ता:

श्री प्रियनाथर / श्री अभिमुक्तिश्वरर,
थिरुपेरूवेलूर (मनक्कल अय्यमपेटै),
तालुका कूडवासल,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१०१०४

दूरध्वनी: +९१-४३६६३२५४२५

मंदिराचे पुजारी: रवि गुरुक्क्ल +९१-९९४३८६०१९६, +९१-९९४४२४९९४१


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment