Sunday, November 15, 2026

आंदनकोविल (कडूवैकरैपुथूर) येथील श्री स्वर्णपुरीश्वरर

ह्या स्थळाचे पूर्वीचे नाव कडूवैकरैपुथूर असे होते. हे शिव मंदिर कुंभकोणम-कुडवासल-वलनगैमन मार्गावर कुडवासल पासून १० किलोमीटर्सवर, नाचियार कोविल पासून ११ किलोमीटर्सवर, थिरुचेरै पासून ६ किलोमीटर्सवर आणि थिरुवारुरपासून ३१ किलोमीटर्सवर स्थित आहे. शैव संत अप्पर ह्यांनी स्तुती केलेल्या पाडळ पेत्र स्थळांपैकी हे स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर तसेच कावेरी नदीची उपनदी असलेल्या कूडमुरूट्टी ह्या नदीच्या काठावर आहे. ह्या नदीचे मूळ नाव कडूवै असे होते. म्हणून ह्या स्थळाला कडूवैकरैपुथूर असे नाव प्राप्त झाले. ह्या मंदिराचे वर्तमान बांधकाम साधारण १५०० वर्षे जुने आहे. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चोळा राजांनी केला आणि विस्तार नायक राजांनी केला.

मूलवर: श्री स्वर्णपुरीश्वरर, श्री सेम्पोननाथर
देवी: श्री स्वर्णाम्बिका, श्री शिवांबीगाई, श्री शिवशेखरी, श्री पूर्णाम्बिका
पवित्र तीर्थ: स्वर्णगंगा (विहीर), त्रिशूळगंगा, कुडूमुरूट्टी नदी
क्षेत्र वृक्ष: शमी (तामिळ मध्ये वन्नी)
पुराणिक नाव: थिरुकडूवैकरै पुथूर
वर्तमान नाव: आंदनकोविल
तालुका: वलनगैमन
जिल्हा: थिरुवारुर

क्षेत्र पुराण:

१.  मुचुकुंद चक्रवर्ती राजाच्या दरबारात कंडदेवर नावाचा मंत्री होता. तो भगवान शिवांचा निष्ठावान भक्त होता. शिवांचं दर्शन घेतल्याशिवाय तो भोजन करायचा नाही. जेव्हा मुचुकुंद राजा थिरुवारुर येथील त्यागराजा मंदिर बांधत होता त्यावेळी त्याने कंडदेवरला डोंगराच्या पायथ्यावरुन दगड आणि चुना गोळा करण्याचे काम सोपवले. एकदा काम करत करत अंधार झाला आणि कंडदेवरने शिवांचं दर्शन घेतलं नसल्याने तो भोजन न करताच रस्त्याच्या कडेला झोपला. भगवान शिव त्याच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी त्याला जवळच शमी (तामिळ मध्ये वन्नी) झाडाच्या खाली असलेल्या शिव लिंगाचे दर्शन घेऊन मग भोजन करण्यास सांगितले. भगवान शिवांनी स्वप्नांत दृष्टांत दिल्याप्रमाणे कंडदेवरला झाडाखाली शिव लिंग दिसले. त्या लिंगाचे दर्शन घेऊन त्याने भोजन केले. त्यानंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमधून एक दगड आणि थोडा चुना असे गोळा करण्यास सुरुवात केली आणि ते जमलेले दगड आणि चुना वापरून त्याने एक शिव मंदिर बांधून शिव लिंगाची स्थापना केली. त्याने ह्या मंदिराबद्दल मुचुकुंद राजाला सांगितले आणि मंदिराचे दर्शन घेण्याची विनंती केली. मुचुकुंद राजाला ह्या गोष्टीचा राग आला. त्याने कंडदेवरला मंदिराच्या बांधकामाची किंमत आणि त्याने जमा केलेले पुण्य राजाला देण्याची आज्ञा केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंडदेवर म्हणाला की तो त्याचा जीव द्यायला तयार आहे पण पुण्य द्यायला तयार नाही. राजाने शिक्षास्वरूप कंडदेवरचा शिरच्छेद केला. जेव्हा कंडदेवरचे शीर जमिनीवर पडले तेव्हा त्यातून “अंडवा” (मराठी मध्ये “माझ्या देवा”) असा आवाज आला. राजाला कळून चुकले कि त्याने एका सच्च्या भक्ताचा वध केला आहे. ह्याची शिक्षा म्हणून त्याला स्वतःचा शिरच्छेद करावा असा विचार आला. त्याचवेळी भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी राजाला स्वतःचा शिरच्छेद करण्यापासून थांबवले. तसेच भगवान शिवांनी कंडदेवरला पण पुनर्जीवित केले. म्हणून ह्या स्थळाला अंडवन कोविल असे नाव प्राप्त झाले जे कालांतराने आंदनकोविल असे झाले.

२. क्षेत्र पुराणानुसार असा समज आहे की भगवान शिव आणि पार्वती देवींनी हि शांत जागा विश्रांतीसाठी निवडली. पार्वती देवींना अभिषेक करता यावा म्हणून भगवान शिवांनी इथे गंगा आणली. पार्वती देवींनी गंगेच्या पाण्याने अभिषेक केला आणि शिव लिंगाची फुलांनी आणि सोन्याने पूजा केली. म्हणून भगवान शिवांना इथे सेम्पोन नाथर (तमिळमध्ये सेम्पोन म्हणजे सोनं).

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

कश्यप ऋषी, रोमा ऋषी, मुचुकुंद चक्रवर्ती, कंडदेवर, सुंडदेवर, शैव संत अप्पर आणि पार्वती देवी.

वैशिष्ट्ये:

१. भगवान शिव आणि पार्वती देवींचे देवालय उंचावर आहे.

२. इथल्या स्थळ विनायकांना कुंभकर्ण विनायक असे संबोधले जाते.

३. इथे श्री दक्षिणामूर्तींच्या दोन मूर्ती आहेत.

४. कोष्ठ भिंतीच्या मागे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव भगवान शिवांची पूजा करत आहेत असे दृश्य चित्रित केले आहे. 

५. पार्वती देवींच्या देवालयाच्या छतावर १२ राशींची शिल्पे दगडावर कोरली आहेत.

६. चित्राई महिन्याच्या ११व्या, १२व्या आणि १३व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.

७. मुखमंडपामधल्या स्तंभांवर पुराणामधल्या कथा चित्रित केल्या आहेत. 

८. शैव संत अप्पर ह्यांनी त्यांच्या रचनांमध्ये ह्या स्थळाला कडूवैकरै तेनपुथूर असं संबोधून स्तुती केली आहे.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. इथे दोन परिक्रमा आहेत. मुख मंडपासमोर ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहे. भगवान शिवांच्या देवालयाच्या प्रवेशावर विनायक आणि मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.

कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णुदूर्गा.

इथे श्री पार्वती देवींची दोन देवालये आहेत. एकामध्ये त्यांचं नाव श्री स्वर्णाम्बिका आहे तर दुसऱ्यामध्ये त्यांचे नाव श्री पूर्णाम्बिका आहे.

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत - श्री सिद्धिविनायक, श्री स्वर्णविनायक, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री नटराज, श्री महालक्ष्मी, श्री चंद्र, मुचुकुंद चक्रवर्ती, रोमा ऋषी, नालवर, सेक्कीळर, दक्षिण कैलास नाथर लिंग, उत्तरकाशी नाथर लिंग, अरुणाचलेश्वरर लिंग, काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी. 

मुख्य सभा मंडपामध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत - नवग्रह, श्री सरस्वती, श्री दुर्गा, श्री सूर्य आणि श्री भैरव.

प्रार्थना:

१. भाविक जनांचा असा समज आहे की ह्या मंदिरात आराधना केल्याने आर्थिक समस्यांचे निरसन होते.

२. पार्वती देवींच्या देवालयामधल्या छतावर कोरलेल्या १२ राशींमधल्या स्वतःच्या राशीखाली उभे राहून प्रार्थना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात असा भाविकांचा समज आहे.

३. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी अंबिका म्हणजेच पार्वती देवींची आराधना करतात. 

४. ज्या मुलींना यौवन स्तिथीमध्ये जाण्यामध्ये अडचणी येतात त्यांनी सोमवारी इथल्या तीर्थामध्ये स्नान करून, एक दिवा लावून भगवान शिवांची पूजा केल्यास त्यांची अडचण दूर होते.

पूजा:

नियमित दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, सोमवारी विशेष पूजा, अमावस्या आणि पौर्णिमा दिवशी पूजा

मंदिरात साजरे होणारे सण:

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा आषाढा नक्षत्र दिवशी पूजा)

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऐप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरु कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरम (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी पूजा)

मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते १२, संध्याकाळी ५ ते ७.३०

मंदिराचा पत्ता:

श्री स्वर्णपुरीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट आंदनकोविल,
तालुका: वलनगैमन,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१२८०४

मंदिराचे पुजारी: श्री ए व्ही दुरै गुरुक्कल +९१३७४२६५१३०

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment