Sunday, November 22, 2026

आलंगुडी येथील श्री थिरुआपत्सहाय्येश्वरर मंदिर

हे मंदिर कुंभकोणमपासून मन्नारगुडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंभकोणम पासून १७ किलोमीटर्सवर आहे. थिरुवारुरपासून ३६ किलोमीटर्सवर, मन्नारगुडीपासून २२ किलोमीटर्सवर, तंजावूरपासून ४० किलोमीटर्सवर आहे. हे नवग्रह स्थळांपैकी गुरु ग्रहाचं मंदिर आहे. हे पंचारण्य स्थळांपैकी एक स्थळ आहे. हे थिरुविदाईमरुथुर येथील महालिंगेश्वररचे परिवार स्थळ आहे. पंचारण्य स्थळांच्या यात्रेसमयी दर्शन घेण्याच्या क्रमामध्ये हे चौथं मंदिर आहे. मूळ मंदिर चोळा राजांनी बांधलं असा समज आहे. ह्या मंदिराचे वर्तमान दगडी बांधकाम नायक राजांनी १६व्या शतकामध्ये केले. हे मंदिर २००० वर्षांपेक्षाही जुनं आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेत्र स्थळांपैकीपण एक मंदिर आहे. 

मूलवर: श्री आपत्सहाय्येश्वरर, श्री काशीअरण्येश्वरर
उत्सव मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती
देवी: श्री एळवरकुळली, श्री उमाई अम्मन
क्षेत्र वृक्ष: सावरीचे झाड (तामिळमध्ये पूलाई)
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, अमृत पुष्करिणी आणि इतर १३ तीर्थे
पुराणिक नावे: एरुम पोल्लाई (थिरुइरुमपूलाई)
वर्तमान नाव: आलंगुडी
जिल्हा: तंजावूर (तामिळ नाडू)

क्षेत्र पुराण:

१) पुराणानुसार समुद्र मंथनामध्ये मंथन करण्यासाठी वासुकीला दोरखंड म्हणून वापरलं गेलं. त्यावेळी वासुकीच्या मुखातून अलाकल नावाचे विष बाहेर आलं. हे विष समुद्रामध्ये मिसळू नये म्हणून आणि देवांचे ह्या विषापासून रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं. म्हणून ह्या स्थळाला आलंगुडी हे नाव प्राप्त झालं. असा समज आहे की ह्या ठिकाणी कोणीही सर्पदंशाने मृत्यू पावत नाही. 

२) स्थळ पुराणानुसार भगवान शिव काळ्या सावरीच्या वृक्षाखाली (तामिळमध्ये पुलाई) प्रकट झाले. म्हणून ह्या स्थळाला इरुमपुलाई असे नाव प्राप्त झाले. अजून एका आख्यायिकेनुसार हे स्थळ पुलाई नदीच्या काठाशी असल्याने ह्याला इरुमपुलाई असे नाव प्राप्त झाले.

३) मुचुकुंद चक्रवर्ती राजाचा मंत्री अमुथोहर ह्याने हे मंदिर बांधल्यामुळे प्राप्त झालेल्या पुण्याचा भाग राजाबरोबर वाटून घेण्यास नकार दिला. म्हणून राजाने मंत्र्याचा शिरच्छेद केला. त्यावेळी त्या मंत्र्यांचं नाव पूर्ण मंदिरामध्ये प्रतिध्वनित झाले. राजाने ह्या मंदिरामध्ये प्रायश्चित केल्यानंतर त्याची ह्या ब्रह्महत्या दोषातून मुक्ती झाली.

४) सुंदरमूर्ती नायनार ह्यांच्या मुर्तीवर देवीरोगाचे व्रण दिसतात. ह्या व्रणांची आख्यायिका अशी आहे. थिरुवारुरच्या राजाने आलंगुडी इथून हि मूर्ती थिरुवारुरला नेली. त्याला ती मूर्ती काही करून तिथून हलवायची नव्हती. एका ब्राह्मणाने हि मूर्ती चोरपावलांनी आलंगुडी येथे आणली. त्याने हि मूर्ती एका कपड्यामध्ये गुंडाळली. त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले कि तो त्याच्या देवीरोग झालेल्या लहान मुलाला घेऊन चालला आहे. जेव्हा तो आलंगुडीला पोचला आणि त्याने मूर्तीवरचे कापड उलगडले तेव्हा त्या मूर्तीवर त्याला देवीरोगाचे व्रण दिसले. 

५) श्री महालक्ष्मी देवींनी अपत्यप्राप्तीसाठी इथे भगवान शिवांची आराधना केली. 

६) श्री पार्वती देवींनी थिरुमनमंगला ह्या ठिकाणी भगवान शिवांशी विवाह करण्याच्या आधी इथे तपश्चर्या केली. हे थळ आलंगुडीच्या खूप जवळ आहे. ह्या विवाहाच्या समयी श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री इंद्रदेव, श्री लक्ष्मीदेवी, अष्टदिक्पाल आणि श्री वीरभद्र उपस्थित होते.

७) शैव संत सुंदरर ह्यांना इथे श्री दक्षिणामूर्तींकडून पंचाक्षर मंत्राचा उपदेश प्राप्त झाला.

८) आदि शंकराचार्यांना इथे श्री दक्षिणामूर्तींकडून महावाक्याचा उपदेश प्राप्त झाला.

९) एकदा श्री पार्वती देवी एका फुलांच्या चेंडूंबरोबर खेळत होत्या. त्यांनी तो वर उडवला होता आणि तो झेलण्यासाठी त्यांनी हात वर केले. सूर्यदेवांना वाटलं की त्यांना थांबण्यासाठी हा संकेत आहे म्हणून त्या संकेताला आदर देऊन ते थांबले. सुर्यदेवांचं भ्रमण काही काळाकरता थांबल्याने सृष्टीमध्ये गडबड उडाली. जेव्हा भगवान शिवांना श्री पार्वती देवींनीं अनावधानाने केलेल्या चुकीची माहिती झाली तेव्हा त्यांनी त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून श्री पार्वती देवींना पृथ्वीवर जन्म घेण्याची आज्ञा केली. ह्या मंदिरात श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना प्रसन्न करून त्यांच्याशी परत विवाह करण्यासाठी तपश्चर्या केली. ह्या विवाहसमयी सर्व देव उपस्थित होते. ह्या मंदिराला काशीअरण्य असे नाव प्राप्त झाले. ह्या स्थळाला काशी एवढंच महत्व आहे.

१०) गजमुखासूर नावाचा राक्षस मनुष्य आणि देवांना त्रास देत होता. भगवान शिवांनी आपल्या पुत्राला म्हणजेच गणपतीला ह्या राक्षसाला शिक्षा देण्यासाठी पाठवलं. म्हणून इथे गणपतींचं मंदिर आहे जिथे गणपतींना काथ विनायक असं संबोधलं जातं. (तामिळ मध्ये काथ म्हणजे संरक्षक).

११) असा समज आहे की भगवान महाविष्णूंनी इथे त्यांच्या सुदर्शन चक्राने तीर्थ निर्माण केलं ज्याला चक्र तीर्थ म्हणतात.

१२) स्थळपुराणानुसार एकदा शैव संत सुंदरर पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. भगवान शिव एका नावेतून आले आणि त्यांनी सुंदरर ह्यांना वाचवलं. गणपतींनी नावेला पलटलू दिलं नाही. म्हणून इथे गणपतींना कलनगमल काथ विनायक असे संबोधले जाते. (तामिळ मध्ये कलनगमल म्हणजे पलटणे, काथ म्हणजे संरक्षक. म्हणजे विनायक ज्यांनी नावेचं पलटण्यापासून रक्षण केलं).

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

विश्वामित्र ऋषी, अष्ट दिक्पाल, अगस्त्य ऋषी, पुलस्ती ऋषी, काकभूजंदर ऋषी, ब्रम्हर्षी शुक, आदि शंकराचार्य, श्री पार्वती देवी, श्री महाविष्णू, श्री वीरभद्र, राजा मचुकुंद, शैव संत सुंदरर, श्री लक्ष्मी देवी, अमुथोहर.

वैशिष्ट्ये:

१. इथले मुलवर स्वयंभू मूर्ती आहे.

२. हे स्थळ गुरु स्थळ किंवा दक्षिणामूर्ती क्षेत्र म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. 

३. हे गुरु दोषासाठी परिहार स्थळ आहे.

४. शैव संत सुंदरर ह्यांच्या मूर्तीवर देवीरोगाचे व्रण आहेत. 

५. नंदिंना एका तांब्याच्या पट्टीने आच्छादित केले आहे.

६. हे एकच स्थळ आहे जिथे श्री दक्षिणामूर्तींची मिरवणूक निघते.

७. प्रत्येक वर्षी मासी (फेब्रुवारी-मार्च) ह्या तामिळ महिन्यामध्ये श्री दक्षिणामूर्तींवर विशेष अभिषेक केला जातो. गुरु गोचर समयाच्या दिवसापेक्षाही हा दिवस शुभ मानला जातो. (ग्रहांच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या भ्रमणाला गोचर म्हणतात). ह्या ठिकाणी श्री दक्षिणामूर्तींनी सनकादि ऋषींना (सनक आणि इतर ऋषी) गुरु उपदेश दिला. म्हणून श्री दक्षिणामूर्तींना आदि-गुरु म्हणजेच गुरुपरंपरेतील प्रथम गुरु मानले जाते. 

८. ह्या ठिकाणाला आलंगुडी नाव प्राप्त होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे इथले क्षेत्र वृक्ष (काळे सावरीचे झाड) आणि दुसरं कारण म्हणजे समुद्र मंथन समयी भगवान शिवांनी देवांसाठी प्राशन केलं आणि ते इथे आसनस्थ झाले.

९. थिरुविदाईमरुथुर इथल्या श्री महालिंगेश्वरर ह्यांच्या परिवार स्थळांपैकी हे एक स्थळ आहे.  

१०.  ह्या मंदिराच्या जवळ एका देवालयामध्ये श्री पार्वती देवींचे पिता दक्ष राजाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला मेंढीचे शिर आहे. दक्षयज्ञामध्ये जेव्हा वीरभद्रांनी दक्ष राजाचा शिरच्छेद केला तेव्हा पार्वती देवींच्या विनंतीवरून भगवान शिवांनी दक्ष राजाच्या शरीराला मेंढीचे शिर जोडून त्यांना जिवंत केले.

११. श्री शुक्रवार अंबिका देवींचे इथे स्वतंत्र देवालय आहे. प्रत्येक शुक्रवारी इथे विशेष पूजा केल्या जातात. 

१२. वेदांमध्ये देवांच्या आराधनेचा जो क्रम दिलेला आहे तो क्रम ह्या मंदिरामध्ये अनुसरला जातो. तो क्रम म्हणजे माता-पिता-गुरु आणि मग देव. म्हणून इथे प्रथम श्री पार्वती देवींची आराधना केली जाते, मग भगवान शिव आणि मग श्री दक्षिणामूर्तींची आराधना केली जाते.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. राजगोपुरावर अनेक स्टुक्कोच्या मूर्ती आहेत. पहिल्या प्रवेशानंतर लगेचच श्री कलनगमल काथ विनायक ह्यांची मूर्ती आहे. गर्भगृहामध्ये गाभारा, अंतराळा आणि अर्धमंडप आहेत. गाभाऱ्यासमोर ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत.

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गादेवी.

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री चंडिकेश्वरर, श्री शिवगामी समवेत श्री नटराज, शिव लिंग, श्री सूर्येश्वर, श्री सोमेश्वर, शैव संत नालवर, श्री भैरव, श्री चंद्र, श्री सूर्य, गुरु मुकेश्वरर, श्री विशालाक्षींसमवेत श्री काशी विश्वनाथ, सप्त लिंग (श्री सूर्येश्वरर, श्री सोमेश्वरर, श्री घृष्णेश्वरर, श्री सोमनाथ, श्री सप्तऋषीनाथर, श्री विश्वनाथ, श्री ब्रह्मेश्वरर), श्री देवींसमवेत वरदराज पेरुमल, श्री शनीश्वरर, सप्त मातृका, विश्वामित्र ऋषी, अगस्त्य ऋषी, नवग्रह, सोमस्कंदर, शुक्रवार अंबिका आणि वसंत मंडप.

महामंडपाच्या बाजूला द्वारपालकांच्या मूर्ती आहेत.

दुसऱ्या प्रवेशद्वारानंतर श्री अंबिका देवींचे स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालय आहे.

ह्या मंदिराची अजून काही वैशिष्ट्ये आहेत:

१. इथे रथयात्रेमध्ये फक्त श्री दक्षिणामूर्तींची मिरवणूक काढली जाते.

२. इथे स्वतंत्र नागसंनिधी आहे. नाग दोषांचे निरसन होण्यासाठी इथे भाविकजन आराधना करतात. ह्या ठिकाणी कोणाचाही सर्प दंशाने मृत्यू होत नाही.

३. इथे भगवान शिवांची आराधना संध्याकाळी होते.

४. इथे श्री मुरूगन ह्यांची आराधना होण्याआधी अगस्त्य ऋषींची आराधना होते.

५. श्री महालिंगेश्वरर ह्यांची परिवार स्थळे अशी आहेत - १) थिरुवळमचुळी विनायक मंदिर, २) स्वामीमलै मुरुगन मंदिर, ३) आलंगुडी येथील श्री दक्षिणामूर्ती मंदिर, ४) थिरुवडुथुराई येथील नंदी मंदिर ५) सूर्यनार कोविल (नवग्रह), ६) थिरुवप्पडी येथील चंडिकेश्वरर मंदिर ७) चिदंबरम येथील नटराज मंदिर ८) सिरकाळी येथील भैरव मंदिर ९) थिरुवारुर येथील सोमस्कंदर मंदिर

६. पंचारण्य क्षेत्र यात्रेच्या दर्शन क्रमामध्ये ह्या मंदिराचे दर्शन संध्याकाळी ५.३० ते ६.३० च्या दरम्यान घेतले जाते.

प्रार्थना:

१) भाविक जन इथे पुढील कारणांसाठी आराधना करतात - नागदोष निवारण, विचारांमध्ये स्पष्टता प्राप्त करण्यासाठी, विवाहातील अडचणींतुन मुक्तता प्राप्त करण्यासाठी, शिक्षणामध्ये प्रगतीसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी.

२) हे पुनर्वसू नक्षत्रासाठी तसेच गुरुग्रह दोषांसाठी परिहार स्थळ आहे.

पूजा:

दररोज दिवसातून सहा वेळा पूजा होते. ह्याशिवाय प्रदोष दिवशी प्रदोष पूजा, तसेच सोमवार, शुक्रवार, पौर्णिमा, कृत्तिका नक्षत्र दिवस आणि चतुर्थीला विशेष पूजा केल्या जातात. तसेच गुरु गोचर समयी (गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करतो त्या दिवशी) विशेष पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): पौर्णिमेच्या दिवशी उत्सव

वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्र दिवशी उत्सव

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा आषाढा नक्षत्र दिवशी उत्सव)

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी आणि अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्र दर्शन

थै (जानेवारी-फेब्रुवारी): पुष्य नक्षत्र दिवशी उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): माघ नक्षत्र दिवशी उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव आणि रथयात्रा

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, दुपारी ४ ते संध्याकाळी ८.३०

मंदिराचा पत्ता:

श्री थिरुआपत्सहाय्येश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट आलंगुडी,
तालुका: वलनगैमन,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१२ ८०१

दूरध्वनी: +९१-४३७४२६९४०७

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment