हे मंदिर थिरुमैज्ञानम ह्या गावांत वसले आहे. पंचमयानम स्थळांपैकी हे पांचवं मयानम स्थळ आहे. बाकीची चार मयानम स्थळे अशी आहेत - कांचीपुरम, सिरकाळी, थिरुविळीमलै आणि थिरुकाडीयुर. ह्या स्थळाचे वर्तमान नाव थिरुनल्लूर मयानम असे आहे. पुराणकाळी ह्या स्थळाचे नाव चतुर्वेदी मंगलम असे होते.
हे मंदिर कुंभकोणम-कूडवासल (थिरुचेरै मार्गे) मार्गावर कुंभकोणमपासून १६ किलोमीटर्सवर, कूडवासलपासून ३ किलोमीटर्स, थिरुचेरैपासून ४ किलोमीटर्स आणि थिरुवारुरपासून २५ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेत्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या मंदिराचं माड कोविल शैलीचं विटांचं बांधकाम कोचेंगट चोळा राजाने केलं असा समज आहे. कालांतराने ह्या मंदिराचं दगडी बांधकाम तसेच जीर्णोद्धार आदित्य चोळा I राजाने केला. ह्या मंदिरात २४ शिलालेख आहेत ज्यामध्ये विविध राजांनी मंदिराला दिलेल्या देणग्या तसेच भेटवस्तूंचे उल्लेख आहेत. वर्तमान मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे.
मूलवर: श्री ज्ञानपरमेश्वरर, श्री मयानाथूपरमेश्वरर, श्री मयानाथु मूलथनाथू पेरूमन
देवी: श्री ज्ञानाम्बिका, श्री पेरियानायकी
पवित्र तीर्थ: ज्ञानतीर्थ, चंद्र तीर्थ
पवित्र वृक्ष: पळस, बिल्व
पुराणिक नाव: थिरुमयानम, थिरुनल्लूर मयानम, नथुर
वर्तमान नाव: थिरुमैज्ञानम
जिल्हा: तंजावूर, तामिळ नाडू
क्षेत्र पुराण:
१. इथले क्षेत्र पुराण आपस्तंभ ऋषींशी निगडित आहे. असा समज आहे की आपस्तंभ ऋषींना इथे भगवान शिवांचे दर्शन घडले. आपस्तंभ धर्मसूत्राचे ते लेखक आहेत तसेच यजुर्वेदातील आपस्तंभ शाखेचे ते संस्थापक आहेत. कृष्ण यजुर्वेदातील तैत्तिरीय संप्रदायातील तीन धर्मसूत्रांपैकी आपस्तंभ एक आहे.
२. क्षेत्र पुराणानुसार ह्या स्थळाला चतुर्वेद मंगलम असे नाव होते. इथे चारही वेद शिकलेल्या प्रकांड पंडितांची वसाहत होती. ही वसाहत त्याकाळी इथे राज्य करणाऱ्या राजाने वसवली होती. ह्या स्थळाला नालवेदीयुर असे पण नाव होते. तामिळ मध्ये नाल म्हणजे चार आणि वेदीयुर म्हणजे वैदिक ब्राह्मण. ह्या नावाचा अपभ्रंश होऊन ते नल्लूर असे झाले.
३. इथे पळस वृक्षाचे वन होते म्हणून इथे भगवान शिवांना श्री पळसवननाथर असे संबोधले जाते. (तामिळ मध्ये पूरसु म्हणजे वनातील ज्योती).
४. स्थळ पुराणानुसार प्राचीन काळापासून इथे बऱ्याच वेळा शिव लिंगाच्या भोवती सर्प नजरेस आले आहेत. शैव संत संबंधर ह्यांनी त्यांच्या पवित्र रचनांमध्ये भगवान शिवांची सर्प पूजा करत आहेत असा उल्लेख केला आहे.
५. भगवान शिवांनी इथे ऋषींना आणि वेदांना ज्ञान प्रदान केलं म्हणून त्यांना इथे श्री ज्ञानपरमेश्वरर असं संबोधलं जातं.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, शैव संत थिरुज्ञानसंबंधर, चार वेद आणि आपस्तंभ ऋषी.
वैशिष्ट्ये:
१. इथे गाभाऱ्यामध्ये काही वेळा शिव लिंगाच्या भोवती वेटोळे घातलेले सर्प नजरेस येतात.
२. इथल्या गाभाऱ्याचा आकार चौकोनी आहे.
३. इथे राजगोपुर नाही पण एक बांधकाम पूर्ण न झालेले गोपुर आहे ज्यावर एक प्रवेशाची कमान आहे.
४. चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या ३ऱ्या, ४थ्या आणि ५व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराला राजगोपुर नाही. ह्या मंदिराचे प्रवेशद्वार सुंदर आहे. ह्या प्रवेशद्वारावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचे शिल्प आहे ज्यामध्ये त्यांच्या बाजूंना श्री विनायक आणि श्री मुरुगन आहेत.
मंदिराच्या गर्भगृहामध्ये गाभारा, अंतराळा आणि अर्धमंडप आहेत. नंदी आणि बलिपीठ गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. गाभारा चौकोनी आकाराचा आहे. मंदिराचे तीर्थ मंदिराच्या समोर आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि छोटं आहे. गाभाऱ्यावरील विमान गजपृष्ठाच्या आकाराचे आहे. गाभाऱ्यामधले स्तंभ गोलाकार आहेत आणि त्यांच्यावर सुंदर शिल्पे आहेत.
चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या ३ऱ्या, ४थ्या आणि ५व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री भिक्षादनर, श्री नटराज, श्री भैरव, श्री महाविष्णू आणि श्री दुर्गादेवी. श्री चंडिकेश्वरर ह्यांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे.
गाभाऱ्याच्या भिंतीवर चोळा राजा भगवान शिवांची पूजा करत आहे असे शिल्प आहे.
इतर देवालये आणि मूर्ती: श्री महाविष्णू, श्री मुरुगन, नवग्रह, थिरुज्ञानसंबंधर, नाग, आत्मलिंग, श्री शनीश्वरर, श्री भैरव, श्री सूर्य.
परिक्रमेमध्ये पुढील शिव लिंगे आहेत: श्री अमृतकडेश्वरर, श्री सट्टाईनाथर, श्री एकांबरेश्वरर.
श्री अंबिकादेवी गाभाऱ्याच्या डावीकडील महामंडपामध्ये दक्षिणाभिमुखी देवालयात आहेत.
ह्या शिवाय ह्या मंदिरात पुढील देवालये आणि मूर्ती आहेत: श्री सोमस्कंदर, श्री कुंभकर्ण विनायक, उत्सव मूर्ती, मुचुकुंद चक्रवर्ती, रोमेश महर्षी, शैव संत नालवर, श्री अरुणाचलेश्वरर, श्री विश्वनाथ आणि श्री विशालाक्षी, श्री शनीश्वरर, श्री महालक्ष्मी, श्री स्वर्ण विनायक, श्री दक्षिण कैलास नाथर, श्री उत्तर कैलास नाथर, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य आणि श्री विळीअळगर.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, समृद्धीप्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी तसेच शिक्षणात प्राविण्य प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करतात.
पूजा:
रोज दिवसभरात तीन पूजा केल्या जातात तसेच प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री विनायक चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरु कार्थिगई दीपम
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पूरत्तासी, मासी आणि मारगळी ह्या महिन्यांमध्ये विशेष उत्सव साजरे होतात.
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते ११, संध्याकाळी ५ ते ७.३०
मंदिराचा पत्ता:
श्री ज्ञानपरमेश्वरर मंदिर,
थिरुनल्लूर मयानम (थिरुमैज्ञानम),
ऍट पोस्ट थिरुचेरै,
तालुका कुंभकोणम,
तामिळ नाडू ६१२६०५
No comments:
Post a Comment