हे मंदिर थिरूचेरै ह्या गावात वसले आहे. थिरुचेरै गाव कुंभकोणम-नाचियार कोविल मार्गावर कुंभकोणम पासून १५ किलोमीटर्सवर, कुडवासल पासून ५ किलोमीटर्सवर आणि थिरुवारुर पासून २७ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेत्र स्थळ कावेरी नदीची उपनदी असलेल्या मुडीकोंडण ह्या नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर आणि थिरुनावूक्करसर (अप्पर) ह्यांनी मंदिराची स्तुती गायली आहे. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. त्यामुळे हे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं असावं. ११व्या शतकामध्ये कुलोथुंग I राजाच्या काळांत ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. इथल्या शिलालेखांमध्ये ह्या राजाच्या मंदिरासंबंधित जीर्णोद्धाराच्या कामांचा उल्लेख आहे. ह्या मंदिराला उडयारकोविल असं पण म्हणतात. ह्या स्थळाला पूर्वी थिरुसरम असं नाव होतं (तामिळ मध्ये सरम म्हणजे सर्वोच्च गुणसंपन्न पवित्र स्थळ). कालांतराने ह्या स्थळाचं नाव थिरुचेरम असं झालं आणि शेवटी थिरुचेरै असं झालं. भगवान शिवांना इथे थिरुसेन्नरीअप्पर असं संबोधलं जातं. तामिळ मध्ये सेन्नरी म्हणजे नीतिमान किंवा न्याय्य. म्हणजे स्वामी जे नीतिमान आणि न्याय्य आहेत.
मूलवर: श्री सरपरमेश्वरर, श्री सेन्नरीअप्पर
देवी: श्री ज्ञानाम्बिका, श्री ज्ञान-वल्ली-अम्माई
पवित्र वृक्ष: बर्ण (ज्याला लसूण नाशपाती असं पण म्हणतात) / वयवर्ण (तीन पातींचं कॅस्पर)
पवित्र तीर्थ: मार्कंडेय तीर्थ, बिंदूसुधा तीर्थ, ज्ञान तीर्थ
पुराणिक नाव: उडयार कोविल
वर्तमान नाव: थिरुचेरै
क्षेत्र पुराण:
१. सूर्य पूजा: क्षेत्र पुराणानुसार दक्ष यज्ञात सहभागी झाल्याने प्राप्त झालेल्या पापांचं निरसन करण्यासाठी श्री सूर्य देवांनी विविध शिव मंदिरांत जाऊन भगवान शिवांची आराधना केली. असा समज आहे की श्री सूर्यदेव प्रत्येक वर्षी मासी महिन्यामधल्या १३व्या, १४व्या आणि १५व्या दिवशी इथल्या शिव लिंगाची तसेच श्री पार्वती देवींच्या पादुकांची पूजा करतात. म्हणून त्या दिवशी इथे सूर्य पूजा पण केली जाते. अशीच सूर्यपूजा थिरुकंडीयुर मध्ये पण संध्याकाळी केली जाते.
२. क्षेत्र पुराणानुसार भगवान शिव आपल्या भक्तांना नीतिमत्तेकडे घेऊन जातात. तामिळ मध्ये सेन्नरी म्हणजे नीतिमान किंवा न्याय्य. म्हणून इथे भगवान शिवांना श्री सेन्नरीअप्पर असं संबोधलं जातं. ह्या स्थळाला थिरुसरम असं म्हणतात (तामिळ मध्ये सरम म्हणजे सर्वोच्च गुणसंपन्न पवित्र स्थळ). म्हणून भगवान शिवांना इथे श्री सरपरमेश्वरर असं पण संबोधलं जातं.
३. स्थळ पुराणानुसार मार्कंडेय ऋषींनी इथे शिव लिंगाची स्थापना केली. पूर्वजन्मीच्या साचलेल्या कर्माचा नाश करण्यासाठी त्यांनी इथे भगवान शिवांची आराधना केली. त्यांच्या इच्छेनुसार भगवान शिवांनी त्यांना बंधमुक्त केलं आणि त्यामुळे ते चिरंजीव झाले. म्हणून इथे भगवान शिवांना ऋण विमोचन लिंगेश्वरर असं संबोधलं जातं. असा समज आहे की इथे मार्कंडेय ऋषींना मुक्ती प्राप्त झाली.
४. क्षेत्र पुराणानुसार कुंती देवींचे गुरु धौम्य ऋषींनी इथे भगवान शिवांची आराधना केली आणि मुक्ती प्राप्त केली. पांडवांना लाक्षागृहातून पलायन करण्याची सूचना देणारे धौम्य ऋषीच होते.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री सूर्यदेव, धौम्य ऋषी, मार्कंडेय ऋषी, शैव संत अप्पर, शैव संत संबंधर, कावेरी नदी.
वैशिष्ट्ये:
१. हे तीन ऋण विमोचन लिंगेश्वरर मंदिरांमधलं एक मंदिर आहे. बाकीची दोन मंदिरे थिरुवारुर आणि अचलपुरम येथे आहेत.
२. स्थानिक जन ह्या स्थळाला उडयार कोविल असं संबोधतात.
३. ह्या मंदिरात श्री दुर्गादेवींच्या तीन मूर्ती आहेत. ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे.
४. श्री ब्रह्मदेवांची मूर्ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.
५. मासी (फेब्रुवारी-मार्च) ह्या तामिळ महिन्याच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या दिवशी श्री सूर्यदेव भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची पूजा करतात. ह्या दिवशी सूर्याची किरणे श्री पार्वती देवींच्या चरणांवर आणि शिव लिंगावर पडतात.
६. इथल्या क्षेत्र वृक्षाची वैशिष्ट्ये विलक्षण आहेत.
७. श्री दुर्गादेवींच्या देवालयात राहुकाळामध्ये दिवे लावून पूजा केली जाते.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पश्चिमाभिमुख असून इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. मंदिर साधारण १.५ एकर्सवर पसरलेलं आहे. इथले शिव लिंग स्वयंभू असून ते मोठं आहे आणि पूर्वाभिमुख आहे. राजगोपुरानंतर नंदी, बलीपीठ आणि ध्वजस्तंभ गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. नंदींच्या बाजूला अजून एक तीन स्तरांचं गोपुर आहे. गर्भगृहामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहे. गाभाऱ्याचा आकार शिव लिंगासारखा आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री भैरव, श्री नटराज, श्री चंडिकेश्वरर, श्री ब्रह्मदेव, श्री शिवदुर्गा आणि श्री विष्णुदूर्गा.
हे कदाचित एकच मंदिर असेल जिथे तीन दुर्गादेवींच्या मूर्ती आहेत.
श्री ब्रह्मदेवाचे देवालय श्री नटराजांच्या देवालयाशेजारी आहे. श्री ब्रह्मदेवांच्या डाव्याबाजूच्या वरच्या हातावर त्रिशूल आणि घंटा ह्यांची चित्रे गोंदलेली आहेत. शैव संत अप्पर ह्यांनी श्री ब्रह्मदेवांना भगवान शिव मानून त्यांची स्तुती गायली आहे. ह्या देवालयामध्ये अष्टमी दिवशी विशेष पूजा केली जाते. दक्षिण भारतात जसं हनुमानांची त्यांना वड्यांची माला अर्पण करून पूजा केली जाते तशीच पूजा इथे शनिवारी ब्रह्मदेवांची केली जाते.
श्री चंडिकेश्वरांच्या देवालयामध्ये श्री चंडिकेश्वरांच्या दोन मूर्ती आहेत.
श्री अंबिकादेवींचे देवालय पूर्वाभिमुख असून ते गाभाऱ्याच्या डाव्याबाजूला बाहेरील परिक्रमेमध्ये आहे.
पश्चिमेकडील परिक्रमेमध्ये भगवान शिवांची ऋण विमोचन लिंगेश्वरर मूर्ती आहे. तामिळ मध्ये कदन म्हणजे ऋण. म्हणून भगवान शिवांना कदन-निवृत्ती-ईश्वरर असं संबोधलं जातं. ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना मार्कंडेय ऋषींनी केली. ह्या देवालयाच्या जवळ श्री विनायक, मार्कंडेय ऋषी आणि श्री बालसुब्रमण्यम ह्यांची देवालये आहेत.
ह्याशिवाय परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, श्री ज्वरहरेश्वरर, श्री काळभैरव, श्री गजलक्ष्मी, श्री नटराज, श्री महालक्ष्मी, श्री ऋषभारूढर (ऋषभ म्हणजेच नंदींवर आरूढ झालेले भगवान शिव), सप्त मातृका, शैव संत नालवर, वायूलिंग, श्री ज्येष्ठादेवी, श्री सूर्य, श्री कालीश्वरर, श्री शनीश्वरर आणि नवग्रह.
इथले स्थळ वृक्ष अद्वितीय आहे. त्याचे तामीळमधले नाव माविलंगै असे आहे. ज्याला इंग्लिश मध्ये गार्लिक कॅस्पर म्हणतात आणि मराठी मध्ये वयवरुण असं म्हणतात. ह्या वृक्षाला फक्त चार महिनेच पानं असतात. चार महिने फुलं असतात आणि उरलेले चार महिने ना पानं ना फुलं असतात. ह्या वृक्षाच्या सालाला उच्च वैद्यकीय मूल्ये आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे अष्टमीच्या दिवशी श्री ब्रह्मदेवांना वड्यांची माळा अर्पण करून अर्चना आणि अभिषेक करतात. असा समज आहे की ही पूजा केल्याने न्यायायलीन खटल्यांमध्ये यश प्राप्त होते तसेच नवग्रह दोषांचे पण निवारण होते.
२. राहुकाळामध्ये केलेली श्री दुर्गादेवींची पूजा खूप शुभदायक मानली जाते. भाविक जन राहुकाळामध्ये दुर्गादेवींच्या तीनही मंदिरात दिवा लावतात.
३. असे अनेक भाविक ज्यांच्या जन्मकुंडली मध्ये सूर्य दोष आहे ते मासी ह्या तामिळ महिन्याच्या १३व्या, १४व्या आणि १५व्या दिवशी सूर्याची पूजा करतात.
४. पितृ ऋण, ऋषी ऋण आणि देव ऋण ह्या ऋणांतून तसेच ऐहिक ऋणांतून (स्थावर आणि जंगम मालमत्तेची कर्जे) मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन ऋण विमोचन लिंगेश्वरांची पूजा करतात. ह्यासाठी ते ११ सोमवारी अर्चना आणि अभिषेक करतात. असा समज आहे की असे केल्याने त्यांना संपत्ती, शैक्षणिक प्रगती प्राप्त होईल तसेच आजारांतून मुक्ती मिळेल.
पूजा:
नित्य पूजा तसेच प्रदोष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
आनी (जुन-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा आषाढा नक्षत्र दिवशी पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर) : गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक आणि स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (जानेवारी-फेब्रुवारी): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १२, दुपारी ४.३० ते ८.३०
मंदिराचा पत्ता:
श्री सरपरमेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट थिरुचेरै,
तालुका - कुंभकोणम,
तामिळ नाडू ६२१६०५
दूरध्वनी: +९१-०४३५२४६८००१
मंदिराचे पुजारी: श्री सुंदरमूर्ती गुरुक्कल +९१-४३५२४६७७५९, +९१-९४४२६३७७५९, +९१-९४४३७३७७५९
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment