हे मंदिर थिरुवारुर-कुंभकोणम मार्गावर कुडवासल मार्गे जाताना थलयंकाडू ह्या गावात वसले आहे. कुडवासलपासून ८ किलोमीटर्सवर, थिरुवारुरपासून १८ किलोमीटर्सवर, परुवेलूरपासून ५ किलोमीटर्सवर, कुंभकोणमपासून २६ किलोमीटर्सवर आणि मयीलादुथुराईपासून ४८ किलोमीटर्सवर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील पाडळ पेत्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. तामिळ संगम काळामध्ये ह्या स्थळाचे नाव थलयंकोणम असे होते. ही युद्धभूमी होती जिथे पांड्या राजा नेडुनचेळीयिअन ह्याने चेरा आणि चोळा राजांच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. इथे १२व्या शतकातील शिलालेख आहेत. शैव संत अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. हे मंदिर ५व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. मंदिराचे वर्तमान बांधकाम १५०० वर्षे जुनं आहे.
मूलवर: श्री नर्दनपुरीश्वर, श्री आडवळ्ळनाथर, श्री नटनेश्वरर
देवी: श्री बालांबिका, श्री उमादेवी, श्री थिरुमदंथी अम्माई
पवित्र तीर्थ: संगु (शंख)
क्षेत्र वृक्ष: फणस, बिल्व वृक्ष
पुराणिक नाव: थलयंकोणम
वर्तमान नाव: थिरुथलयंकाडू
क्षेत्र पुराण:
१. आधीच्या ब्लॉग्समध्ये आम्ही दारुकावनातल्या (नर्दनपुरी) ऋषींबद्दल सविस्तर गोष्ट लिहिली होती. थोडक्यात त्या गोष्टींमध्ये असा उल्लेख केला होता की त्या ऋषींना अभिमान आणि अहंकार झाला आणि त्यामुळे ते स्वतःला देवांपेक्षाही श्रेष्ठ मानायला लागले. त्यांना शिक्षण देण्यासाठी भगवान शिव भिक्षादनरच्या रूपांत (भिक्षुक) आणि भगवान विष्णू मोहिनीच्या रूपांत (मोहात पाडणारी सुंदर स्त्री) दारुकावनांत आले आणि त्यांनी ऋषींना आणि त्यांच्या स्त्रियांना मोहांत पाडून त्यांना विचलित केले. आपल्या स्त्रिया भिक्षादनरच्या मोहांत पडलेल्या आहेत हे पाहून ऋषींनी भिक्षादनरला म्हणजेच भगवान शिवांना वेगवेगळ्या मार्गांनी संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विविध अस्त्रे, वाघासारखी हिंस्त्र श्वापदे, हत्ती तसेच मूयलागन नावाचा राक्षस भिक्षादनरवर धाडला. पण भगवान शिवांनी त्या सर्वांचा नाश केला. वाघाला आणि हत्तीला मारून त्यांच्या कातड्याचा पोषाख तयार करून तो धारण केला. त्यांनी मूयलागन राक्षसाच्या शरीरावर नृत्य केले. ऋषींना आपली चूक लक्षात आली आणि ते भगवान शिवांना शरण गेले. म्हणून ह्या स्थळाला नर्दनपुरी असे नाव प्राप्त झाले.
२. श्री सरस्वती देवींनी इथे भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांना भगवान शिवांचे ज्योतिर्लिंग स्वरूपांत दर्शन झाले.
३. कृतयुगामध्ये कपिल ऋषींनी भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांना चिंतामणी रत्नाची प्राप्ती झाली.
४. शैव संत अप्पर ह्यांनी ह्या स्थळाला एवढे पवित्र मानले की त्यांना ह्या मंदिराच्या जमिनीवर पाय ठेवणे हे पण पाप वाटले. असा समज आहे की ते ह्या मंदिरामध्ये आपल्या शिरावर (हात खाली आणि पाय वर) प्रवास करून आले. थै ह्या तामिळ महिन्याच्या अमावास्येला भगवान शिवांनी त्यांना फणसाच्या झाडाखाली दर्शन दिले. म्हणून ह्या स्थळाला थलयंकाडू असे नाव प्राप्त झाले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे: श्री शनीश्वरर, श्री काळीदेवी, श्री सरस्वती देवी, कपिल ऋषी आणि शैव संत अप्पर.
वैशिष्ट्ये:
१. हे अशा स्थळांपैकी एक आहे जिथे भगवान शिवांनी तांडव नृत्य केले.
२. इथे श्री सरस्वतींच्या हातात वीणेच्या ऐवजी ताडपत्रे (तामिळमध्ये उलैचूवडी) आहेत.
३. श्री पार्वती देवींच्या देवालयासमोर सभागृहामध्ये श्री शनीश्वरर ह्यांचे पूर्वाभिमुख देवालय आहे. हे खूप शुभ मानले जाते.
४. पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या ३०व्या आणि ३१व्या दिवशी तसेच चित्राई महिन्याच्या १ल्या आणि २ऱ्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
५. ह्या मंदिराच्या मुखमंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.
६. मंदिराच्या आवारामध्ये खूप जुनं वडाचं झाड आहे.
७. ह्या स्थळामध्ये भगवान शिवांनी मुयलागन राक्षसाचा वध केला.
मंदिराबद्द्ल माहिती:
८व्या शतकामध्ये चोळा राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मराठा आणि नायक राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. ७व्या शतकाच्या काळचे इथे शिलालेख आढळतात. हे छोटं मंदिर एका छोट्या गावांत आहे. ह्या मंदिराचे राजगोपुर विस्कळीत अवस्थेत आहे. दुसरं राजगोपुर तीन स्तरांचं आहे. मंदिराचा प्रवेश दक्षिणेकडून आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. गाभाऱ्याच्या प्रवेशावर नंदी आहेत. नंदीमंडप खूप छोटा आहे. गर्भगृहामध्ये गाभारा, अंतराळा आणि अर्धमंडप आहे. गाभाऱ्यावरील विमान एका स्तराचे आहे. देवीचा मंडप आणि अर्धमंडप वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे. ह्या मंदिरातील मुख्य देवालये भगवान शिव आणि पार्वती देवींची आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. हे लिंग खूप सुंदर आहे आणि पूर्वाभिमुख आहे.
कोष्ट मूर्ती: श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री दुर्गा देवी.
परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री गणेश, श्री विशालाक्षींसमवेत श्री विश्वनाथ, श्री क्षेत्र विनायक, श्री नटराज, श्री मुरुगन, श्री दशभुजा काली, श्री चंडिकेश्वरींसमवेत श्री चंडिकेश्वर, श्री काळभैरव, श्री शनीश्वरर आणि शैव संत नालवर. श्री विनायक आणि श्री सरस्वती ह्यांच्या मूर्ती पहिल्या प्रवेशावर आहेत. दुसऱ्या प्रवेशावर श्री गणेशांची अजून एक मूर्ती आहे ज्याचे नाव श्री पोळ्ळपिल्लैयार असे आहे.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी पवित्र तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करतात.
२. त्वचारोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन इथे पवित्र तीर्थामध्ये स्नान करतात.
३. पितृदोषांसाठी हे परिहार स्थळ आहे.
पूजा:
नित्य दैनंदिन पूजा, अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष पूजा तसेच प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्र दिवशी पूजा
आनी (जून-जुलै): थिरुमंजनं
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पुर्वा आषाढा नक्षत्र दिवशी पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी आणि अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, थै पुसम (पुष्य नक्षत्र दिवशी पूजा)
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ६ ते ८
मंदिराचा पत्ता:
श्री नर्दनपुरीश्वरर मंदिर,
सेंबंगुडी मार्गे थलयंकाडू,
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१२६०३
दुरध्वनी: +९१-०४३६६२६९२३४
मंदिराचा पुजारी: के वैद्यनाथ गुरुक्कल +९१-९४४३५००२३५
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment