Sunday, June 28, 2026

थिरुकन्नपुरम येथील श्री रामनाथस्वामी मंदिर

थिरुकन्नपुरम हे नन्नीलं पासून १२ किलोमीटर्सवर, थिरुचेनगट्टनकुडी पासून ३ किलोमीटर्सवर तर थिरुपुगलूरपासून २ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. ह्या स्थळाला पूर्वी रामनाथीचरम / रामनंदीचरम अशी नावे होती. शैव संत संबंधर आणि वल्ललर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती गायली आहे. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. कालांतराने चोळा राजांनी ह्या मंदिराचे दगडी बांधकाम केले. ह्या मंदिराचा विस्तार नायक आणि मराठा राजांनी केला. येथील शिलालेखांमध्ये चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत.

मुलवर: श्री रामनाथस्वामी, श्री रामनाथीश्वरर
उत्सवर: सोमस्कंद समवेत नंदी
देवी: श्री करूवरकुळली, श्री शूलीअंबळ, श्री सरीवरकुळली
क्षेत्र वृक्ष: मराठी मध्ये सोनचाफा (तामिळ मध्ये शेनबाग), मराठीमध्ये बकुळ (तामिळ मध्ये माघीळम)
पवित्र तीर्थ: राम तीर्थ
पूजा / आगम: कामिग आगम
पुराणिक नाव: रामनंदीचरम, रामनाथीचरम
वर्तमान नाव: थिरुकन्नपुरम
जिल्हा: थिरुवायूर

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार फार पूर्वी इथे एक राजा राज्य करीत होता. त्याला अपत्य नव्हते. तो शिव भक्त असल्याकारणाने त्याने अपत्यप्राप्तीसाठी भगवान शिवांचा यज्ञ केला. त्यावेळी आकाशवाणी झाली कि पार्वती देवी राजाची पुत्री म्हणून जन्म घेईल. एकदा तो राजा शिकारीसाठी गेला असताना त्याने चार छोट्या मुलींना पाहिलं. राजाने त्यांना आपल्या राजवाड्यात आणले आणि त्यांचे तो आपल्या पुत्रींप्रमाणे संगोपन करू लागला. लहान वयापासूनच ह्या मुली भगवान शिवांची भक्ती करत होत्या. त्या मोठ्या झाल्यावर त्या राजाने त्या मुलींचा भगवान शिवांशी विवाह करविला. विवाहानंतर त्या चार मुली चार विविध गावांमध्ये अंबिका झाल्या. १. ह्या मंदिरात म्हणजेच रामनंदीचरम येथे श्री सरीवर कुळली २. थिरुचेंगट्टनगुडी येथे श्री वैथकारू कुळली ३. थिरुपुगलूर येथे श्री करुंधर कुळली  ४. थिरुमरुगल येथे श्री वरंदर कुळली. ह्या प्रत्येक स्थळी अंबिका देवींचे स्वतंत्र देवालय आहे. 

२. असा समज आहे कि ह्या चारही अंबिकांनी एका गर्भवती स्त्रीला प्रसूतीमध्ये मदत केली. त्या गावांत एक गरीब स्त्री होती जी अंबिकांची उत्कट भक्त होती. ती गर्भवती असताना एके दिवशी तिची आई काही कामासाठी नदीच्या दुसऱ्या काठाच्या गावी गेली. पण परत येताना नदीला पूर आल्याने ती नदी पार करू शकली नाही. त्याचवेळी ह्या स्त्रीला प्रसूतिवेदना चालू झाल्याने तिने आर्ततेने आपल्या आईला हाक मारली. असा समज आहे कि त्यावेळी चार अंबिका तिच्या आईच्या रूपांत प्रगट झाल्या आणि त्यांनी तिची प्रसूती केली. आणि त्या परत जेव्हा मंदिरात गेल्या तेव्हा भगवान शिवांच्या पवित्र देवालयात जाऊ नाही शकल्या आणि बाहेरच थांबल्या. म्हणून त्यांची देवालये भगवान शिवांच्या देवालयापासून थोडी दूर आहेत.

त्यांनी प्रसूती केली म्हणून त्यांना शूलीअंबळ असं संबोधलं जातं. तामिळ मध्ये शूली / करू म्हणजे गर्भ.

३. पुराणानुसार श्रीलंकेवरून अयोध्येकडे परत जाताना श्री रामांनी अनेक शिव मंदिरांना भेट दिली. रावणाबरोबरच्या युद्धामध्ये प्राप्त झालेल्या पापांचं निरसन करण्यासाठी म्हणून त्यांनी ह्या मंदिरांमध्ये भगवान शिवांची पूजा केली. ते जेव्हा ह्या मंदिरात आले त्यावेळी नंदींना श्रीरामांची ओळख नसल्याने त्यांनी श्री रामांना पूजा करायची परवानगी दिली नाही. तेव्हा श्री पार्वती देवींनी नंदींचा हात धरला आणि श्रीरामांना पूजा करू दिली. श्री सोमस्कंदरांच्या मिरवणुकीमध्ये हे दृश्य अभिनयातून सादर केलं जातं. म्हणून पूर्वी ह्या स्थळाचे नाव रामनंदीश्वरम (रामनंदीचरम) असं होतं. ह्या स्थळाचे वर्तमान नाव थिरुकन्नपुरम असे आहे. असा समज आहे कि श्रीराम अजूनही संध्याकाळी इथे भगवान शिवांची पूजा करतात.

४. अजून एका आख्यायिकेनुसार अगस्त्य मुनी इथे आले आणि त्यांनी श्री भैरवांची स्थापना करून त्यांची पूजा केली. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
अगस्त्य मुनी, श्रीराम, सीतादेवी, चोळा राजा

वैशिष्ट्ये:

१. श्रीलंकेवरून अयोध्येकडे परत जाताना ज्या अनेक शिव मंदिरांना श्रीरामांनी भेट दिली त्यापैकी हे एक मंदिर आहे.

२. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. ते भव्य असून त्याचा तळ पण मोठा आहे. 

३. आरतीच्या ज्योतीचे प्रतिबिंब अद्वितीय आहे.

४. गाभाऱ्याच्या मागे श्री लिंगोद्भवरांच्या आजूबाजूला श्री विष्णू आणि श्री ब्रह्म ह्यांची शिल्पे आहेत.

५. इथे श्री पार्वती देवींना कारू-कट्ट-अंबिका असे संबोधले जाते (अंबिका ज्यांनी गर्भाचं रक्षण केलं).

६. श्री अंबिका देवींच्या देवालयाच्या बाजूला काही चित्रे आहेत ज्यामध्ये एका चित्रामध्ये अगस्त्य ऋषी भगवान शिवांची पूजा करत आहेत असं चित्रित केलं आहे तर दुसऱ्या चित्रामध्ये अगस्त्य ऋषी श्री भैरवांची पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.

७. पुनर्वसू नक्षत्रावर जन्मलेल्यांसाठी हे स्थळ खूप शुभ मानलं जातं.

८. इथली उत्सव मूर्ती खूप शुभ आणि अद्वितीय आहे. 

९. इथल्या शिव लिंगाची पूजा श्री रामांनी केली म्हणून ह्या शिव लिंगाला श्री रामनाथस्वामी असे संबोधले जाते.

१०. श्री विष्णूंच्या १०८ दिव्यदेशांपैकी श्री सौरराज पेरुमल कोविल हे मंदिर इथून जवळच आहे.

११. इथल्या स्थळ विनायकांना अनुग्रह विनायक असे संबोधले जाते.

१२. हे अशा सात पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक आहे ज्यांच्या मूळ नावाच्या शेवटी चरम शब्द आहे. (चरम शब्दाने शेवट होणारी सगळी मूळ नावे उपलब्ध नाहीत). ती सात स्थळे अशी - थिरुमुंडीचरम, थिरुपट्टिश्वरम, थिरुनरैवायूर, सिद्धीचरम, थिरुकोंडीचरम, थिरुवर्धमानीचरम, रामनंदीचरम / रामनाथीचरम (हे स्थळ थिरुकन्नपुरम).

मंदिराबद्दल माहिती:

मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहेत. हे मंदिर पूवाभिमुख असून इथे दोन परिक्रमा आहेत आणि प्रवेशावर कमान आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशावर वृषभवाहनावर आरूढ असलेले भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे स्टुक्कोचे चित्र आहे.

मंदिरात प्रवेश केल्यावर लगेच गाभाऱ्याकडे मुख करून असलेले नंदी आणि बलीपीठ आहेत. इथे ध्वजस्तंभ नाही. गाभाऱ्यावर तीन स्तरांचं गोपुर आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. इतर लिंगांच्या तुलनेत हे शिव लिंग मोठे आहे आणि त्याचा तळ (अवूदयार) खूप मोठा आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गादेवी. 

श्री चंडिकेश्वरांची मूर्ती आतल्या परिक्रमेमध्ये आहे. जेव्हा भगवान शिवांच्या लिंगावर दीपारती केली जाते त्यावेळी शिव लिंगावर ज्योत दिसते. मंदिराच्या पुढ्यात पवित्र तीर्थ आहे. भगवान शिवांच्या उजव्याबाजूला श्री सरीवरकुळलीअम्मनदेवींचे देवालय आहे. त्या दक्षिणाभिमुख असून उभ्या मुद्रेत आहेत. 

श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. त्यांचा उजवा हात अभय मुद्रेमध्ये आहे आणि डाव्या हातात एक पुष्प आहे असे त्यांना चित्रित केले आहे. परिक्रमेमध्ये अगस्त्य ऋषी काशी भैरवांची पूजा करीत आहेत असे दृश्य असलेले शिल्प आहे. असा समज आहे की अगस्त्य ऋषींनी काशी भैरवांची इथे स्थापना केली आणि त्यांची पूजा केली. 

परिक्रमेमध्ये दुर्वास ऋषी, अगस्त्य ऋषी, शैव संत अप्पर आणि संबंधर आणि स्वर्गीय गाय कामधेनू ह्यांनी पूजिलेली शिव लिंगे आहेत.

बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील देवालये आणि मूर्ती आहेत - श्री गणेश, श्री मुरुगन, श्री गजलक्ष्मी देवी, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री महालक्ष्मीदेवी आणि नवग्रह.

नंदींसमवेत असलेली सोमस्कंदर ह्यांच्या उत्सव मूर्तीची महती ह्या मंदिरात खूप आहे. ही मूर्ती अशा रीतीने चित्रीत केली आहे कि श्री पार्वती देवी नंदीचा हात धरून त्यांना श्री रामांच्या भगवान शिवांच्या दर्शन घेण्याच्या मार्गातून दूर करत आहेत. 

प्रार्थना:

१. भाविक जन इथे जाणते अजाणते पणे केलेल्या पापांचे निरसन होण्यासाठी प्रार्थना करतात.

२. ग्रहांच्या दोषांचे निरसन होण्यासाठी भाविक जन इथे भगवान शिवांची रुद्राभिषेक करून पूजा करतात.

३. सुरक्षित प्रसूती घडण्यासाठी भाविक जन इथे श्री पार्वती देवींची पूजा करतात.

पूजा:

१. कामिग आगमानुसार इथे दैनंदिन पूजा केल्या जातात.

२. संध्याकाळी विशेष पूजा केली जाते

३. तसेच प्रदोष पूजा, पौर्णिमा आणि अमावस्या दिवशी पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे सण:

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक आणि स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थै पुसम (पुष्य नक्षत्र दिवशी पूजा), मकर संक्रांति     

मंदिराच्या वेळा: सकाळी ८.३० ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते ८

मंदिराचा पत्ता:

श्री रामनाथस्वामी मंदिर,
थिरुकन्नपुरम (रामनंदीचरम),
तालुका: थिरुमारुगल
तामिळ नाडू ६०९७०४

दूरध्वनी: +९१-४३६६२९२३००, +९१-४३६६२९१२५७ 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment