Sunday, June 7, 2026

थिरुवीरकुडी येथील श्री वीराट्टेश्वरर मंदिर

हे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. हे अष्टवीराट्टम स्थळांपैकी पांचवं मंदिर आहे. तामिळ नाडू राज्यातल्या थिरुवारुर जिल्ह्यातील थिरुवीरकुडी गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. थिरुवारुरपासून ११ किलोमीटर्सवर, थिरुपनैयुरपासून १० किलोमीटर्सवर, कुंभकोणमपासून ४३ किलोमीटर्सवर, नागपट्टीनंपासून ३० किलोमीटर्सवर तर मयीलादुथुराईपासून ३७ किलोमीटर्सवर आहे. कावेरी नदीच्या काठावर असलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. 

ह्या ठिकाणी जालंधरसंहार घटना घडली. 

चोळा साम्राज्याच्या काळांत ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती झाली. त्यानंतर ह्या मंदिराच्या विस्ताराचे काम पांड्या, विजयनगर राजांनी तसेच नट्टूकोट्टै नागरथरांनी केलं. इथे शिलालेख आहेत ज्यामंध्ये विविध चोळा राजांनी मंदिरासाठी केलेली कामे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांची माहिती आहे.

मूलवर: श्री वीराट्टेश्वरर
देवी: श्री परिमल नायकी, श्री एळवरकुळली
उत्सवर: श्री जालंधरसंहार मूर्ती
क्षेत्र वृक्ष: तुलसी
पवित्र तीर्थ: चक्र तीर्थ, शंख तीर्थ
पौराणिक आणि वर्तमान नाव: थिरुवीरकुडी
जिल्हा: थिरुवारुर, तामिळ नाडू

क्षेत्र पुराण:

१. एकदा इंद्रदेव अहंकार भावनेने भगवान शिवांचं दर्शन घेण्यासाठी कैलासावर आले. भगवान शिवांना हे लक्षात आलं म्हणून ते प्रवेशावर द्वारपाल म्हणून उभे राहिले. त्यांनी इंद्रदेवांना कैलासामध्ये प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे इंद्रदेवांना क्रोध आला आणि त्यांनी आपल्या वज्रायुधाने द्वारपालावर प्रहार केला. भगवान शिवांनी उलट क्रोधाने त्यांचे तिसरे नेत्र उघडले. इंद्रदेवांना जेव्हा कळालं की हा द्वारपाल म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान शिव आहेत तेव्हां त्यांनी क्षमायाचना केली.

२. जेव्हां भगवान शिव तपश्चर्येमध्ये होते त्यावेळी त्यांच्या घामाचा एक थेंब क्षीरसमुद्रामध्ये पडला. त्या थेंबाचे रूपांतर एका मनुष्यामध्ये झाले. तो मनुष्य ब्रह्मदेवांची दाढी ओढू लागला. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब त्या बालकावर पडला. त्या बालकाचे नाव जालंधर असे झाले कारण त्याचा जन्म क्षीर समुद्रामध्ये भगवान शिवांच्या घामाचा थेंब आणि ब्रह्मदेवांच्या अश्रूच्या थेंबापासून झाला होता. जालंधराने ब्रहादेवांकडे वर मागितला की तो जेव्हा मोठा होईल त्यावेळी त्याला मृत्यूचं भय नसावं आणि तिन्ही लोकांवर त्याचं राज्य असावं. शेवटी त्याला वरदान मिळालं एका शर्तीवर की जोपर्यंत त्याच्या पत्नीचं म्हणजेच वृंदाचं पातिव्रत्य तिच्या मनामध्ये टिकून राहील तोपर्यंत त्याला मृत्यूचं भय राहणार नाही. त्यानंतर जालंधरने सगळ्या देवांना त्रास द्यायला चालू केलं. त्याची मजल इथपर्यंत गेली की त्याने भगवान शिवांना मारायचा प्रयत्न केला. भगवान शिव जालंधरच्या पुढे एका ब्राह्मणाच्या रूपांत आले. आणि त्यांनी त्यांच्या उजव्या पायाने जमिनीवर एक वर्तुळ (चक्र) काढलं. त्यांनी जालंधरला सांगितलं की ते जेव्हां हे चक्र जालंधरच्या शिरावर ठेवतील तेव्हां त्याचा मृत्यू होईल. जालंधरने आव्हान दिलं की असं होणार नाही कारण त्याची पत्नी वृंदाचं पातिव्रत्य अजून टिकून आहे. वृंदा भगवान विष्णूंची भक्त होती. भगवान शिवांनी भगवान विष्णूंना जालंधरच्या रूपांत वृंदाकडे पाठवलं. वृंदाने त्यांना जालंधर समजून घरामध्ये घेतलं. पण त्यामुळे तिचं पातिव्रत्य मोडलं. त्याचवेळी जालंधरने ते चक्र आपल्या डोक्यावर ठेवलं आणि त्याचा मृत्यू झाला. हे जेव्हा वृंदाला कळलं आणि जेव्हा तिला हे समजलं की भगवान विष्णूंनी तिची फसवणूक केली आहे तेव्हा तिने भगवान विंष्णूंना शाप दिला की जसं वृंदाला पतिवियोगाला सामोरं जायला लागत आहे तसंच भगवान विष्णूंनापण पत्नीवियोगाला सामोरं जायला लागेल. तिने आपल्या पतीच्या चिताग्नीमध्ये उडी मारून स्वतःला संपवलं. ह्या घटनेनंतर भगवान विष्णूंची मनःशांती भंगली. भगवान शिवांनी वृंदेच्या चिताभस्मामध्ये बीज पेरलं ज्यामधून एक वृक्ष उगवलं ज्याला तुलसी असं नाव प्राप्त झालं. जेव्हां तुळशीच्या पानांचा हार भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये घातला तेव्हा भगवान विष्णूंची मनःशांती पूर्ववत झाली. भगवान विष्णूंना भगवान शिवांकडून चक्र प्राप्त करायची इच्छा झाली. त्यांनी भगवान शिवांची १०० कमळांनी पूजा केली आणि चक्र प्राप्त केलं. ह्या भगवान शिवांच्या विराट्ट रुपाला जालंधरसंहार असं नाव प्राप्त झालं.

३. ह्या मंदिराची देखभाल करत अप्पर ह्या नायनमारांनी आपल्या आयुष्यातली शेवटची वर्षे इथे घालवली.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
शैव संत अप्पर, श्री इंद्रदेव, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू

वैशिष्ट्ये:

१. ह्या स्थळाला वास्तुदोषनिवृत्ती स्थळ म्हणतात.

२. भाविकांचा असा समज आहे की ह्या स्थळातला एक दगड त्यांच्या वास्तुनिर्माणामध्ये वापरला तर वास्तू दोष निघून जातात.

३. हे पितृदोषांचं परिहार स्थळ आहे. 

४. हे स्थळ मारुतींच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे.

५. प्रवेशावर नागलिंगाचं एक सुंदर शिल्प आहे.

६. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.

७. शिव लिंगाच्या पुढ्यात तांब्याने बनवलेला नंदी आहे.

८. जालंधरसंहार ह्यांची उत्सव मूर्ती कास्याची आहे.

९. श्री अंबिका देवींच्या देवालयाच्या छतावर १२ राशींची पितळ्याची उठावदार चित्रे आहेत.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि मुखमंडप आहेत. राजगोपुराच्या पुढे चक्र तीर्थ आहे. हे तीर्थ खुप मोठं आहे. गाभाऱ्याच्या पुढे ध्वजस्तंभ आणि श्री द्वार गणपती आहेत. तीर्थाच्या जवळ श्री विनायकांचे देवालय आहे. हे शिव लिंग स्वयंभू आहे आणि ते चौकोनी पायथ्यावर (अवूदयार) आहे. तांब्याचा नंदी शिव लिंगाच्या पुढ्यात आहे.

कोष्ठ मूर्ती: श्री ब्रह्म, श्री महाविष्णू, श्री दक्षिणामूर्ती, श्री दुर्गादेवी आणि श्री नर्दन विनायक

इतर मूर्ती आणि देवालये: 

मंदिरात प्रवेश केल्यावर नागलिंग आहे. शिव मंदिरामध्ये बाहेरील परिक्रमेमध्ये श्री विष्णूंची मूर्ती आहे. ज्या ठिकाणी भगवान शिवांनी वृंदाला (जालंधर असुराची पत्नी) तुलसी रूपांत पुनर्जीवित केलं ते ठिकाण इथून जवळच आहे. तसेच बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत - श्री गणेश, श्री महालक्ष्मी, वल्ली आणि दैवानै समवेत श्री मुरुगन, श्री भैरव, नालवर, सोमस्कंदर, नवग्रह, श्री महाविष्णूंनी पुजीलेलं शिव लिंग, श्री भैरवी आणि श्री भैरव, श्री शनिदेव, श्री सूर्य, श्री पिदारी अम्मन, श्री मरी अम्मन आणि श्री चंडिकेश्वरर. 

इथे एक विहिर आहे ज्याचे नाव ज्ञान तीर्थ आहे. 

अर्धमंडपामध्ये नटराज सभा आणि उत्सव मूर्ती आहेत. 

जालंधर संहार मूर्ती ही उत्सव मूर्ती आहे आणि ती कास्याची आहे. त्यांच्या उजव्या हातामध्ये चक्र आहे, आणि इतर हातांमध्ये हरीण (तामिळ मध्ये मान), मळू (एक प्रकारचं शस्त्र) आणि एक हात अभय मुद्रेमध्ये आहे. 

श्री अंबिका देवी एका स्वतंत्र उत्तराभिमुख देवालयामध्ये आहेत. ह्या देवालयाच्या मंडपाच्या छतावर १२ राशींची पितळ्याची उठावदार चित्रे आहेत. असा समज आहे की ह्याच्या खाली उभं राहून प्रार्थना जो करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

प्रार्थना:

१. असा समज आहे की ह्या स्थळामधला एक दगड घराच्या बांधकामामध्ये वापरला तर बांधकामामध्ये कुठल्याही अडचणी येत नाहीत.

२. असा समज आहे की इथे प्रार्थना केल्याने पितृदोषाचे निवारण होते.

३. भाविकांचा असा समज आहे की श्री अंजनेयांच्या उपासनेसाठी ही जागा सर्वात योग्य जागा आहे.

४. असा समज आहे की इथे प्रार्थना केल्याने पितरांच्या शापातून मुक्ती मिळते.

पूजा:

दैनंदिन पूजा, साप्ताहिक पूजा तसेच प्रदोष पूजेसारख्या पाक्षिक पूजा केल्या जातात. अरुद्र दर्शन उत्सव पण साजरा होतो.

मंदिरात साजरे होणारे सण:

शैव संत अप्पर ह्यांचा उत्सव

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): कार्थिगई दीपम नावाचा दीपोत्सव

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति

मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि 

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, दुपारी ४.३० ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री वीराट्टेश्वरर मंदिर.
थिरुवीरकुडी,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळ नाडू ६०९४०५

दूरध्वनी: +९१-९४४३९२११४६, +९१-८८७०८८७७१७

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment