Sunday, June 14, 2026

थिरुपुगलूर येथील श्री अग्नीश्वरर मंदिर

थिरुपुगलूर मयीलादुथुराईपासून ३२ किलोमीटर्सवर आहे आणि थिरुवारुर पासून २० किलोमीटर्सवर आहे. थिरुवारुर-पेरलम मार्गावर सन्ननल्लूर पासून ७ किलोमीटर्सवर आहे. इथे एकाच संकुलामध्ये दोन पाडळ पेथ्र स्थळं आहेत. एक श्री अग्नीश्वरर आणि दुसरं श्री वर्धमानीचरम. कावेरी नदीच्या काठावरील २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे ज्याची स्तुती शैव संत संबंधर, सुंदरर आणि अप्पर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. कालांतराने १०व्या आणि ११व्या शतकामध्ये चोळा राजांनी ह्या मंदिराची पुनर्निर्मिती केली. इथे ६७ शिलालेख आहेत.

शैव संत अप्पर ह्यांना इथे मुक्ती प्राप्त झाली. हे मंदिर शतभिषा नक्षत्र ज्यांचे आहे त्यांच्यासाठी उपासना करण्यासाठी योग्य आहे.

मूलवर: श्री अग्नीश्वरर, श्री कोनलपिरन, श्री शरण्यपुरीश्वरर, श्री पुन्नगवननाथर
देवी: श्री कुरुंथरकुळली, श्री चूडाम्बिका
उत्सव मूर्ती: श्री अग्निदेव, श्री चंडिकेश्वरर, श्री थिरुपुरनकरर, श्री ब्रह्मदेव
क्षेत्र वृक्ष: पुन्नग वृक्ष
पौराणिक नाव: पुन्नगवनम, शरण्यपुरम, रक्तारण्यम
पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ, बाण तीर्थ

क्षेत्र पुराण:

१. एकदा अग्निदेव, वायुदेव आणि वरुणदेवांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे अग्निदेव अदृश्य झाले. त्यामुळे पृथ्वीवर यज्ञादी कर्मे थांबली. ह्यावर उपाय म्हणून ऋषी, मुनी आणि देवांनी भगवान शिवांची उपासना केली. ह्याचा परिणाम भगवान शिवांच्या आज्ञेने अग्निदेव परत कार्यरत झाले. भगवान शिवांनी अग्निदेवांना जे नवीन रूप दिलं ते असं होतं - दोन मुखे, तीन पाय, चार शृंगे, सात हात आणि सात ज्वाला. भगवान शिवांनी इथे अग्निदेवांना अनुग्रह दिला म्हणून इथे भगवान शिवांना श्री अग्नीश्वरर असं संबोधलं जातं. भगवान शिवांनी अग्निदेवांना श्री चंडिकेश्वरांच्या रूपांत दर्शन दिलं.

२. इथे शरण्य राजाने भगवान शिवांची उपासना केली म्हणून भगवान शिवांना इथे श्री शरण्यपुरीश्वरर असं संबोधलं जातं.

३. बाणासुर नावाचा असुर होता. त्याची आई भगवान शिवांची रोज नवीन लिंग बनवून उपासना करायची. जेव्हा तिने १०८व्या लिंगाची पूजा केली त्यावेळी तिच्यामध्ये अशी भावना निर्माण झाली कि तिच्याएवढी भगवान शिवांची भक्ती करणारी दुसरी कुठलीच व्यक्ती नाही. त्यामुळे भगवान शिवांनी तिच्या प्रार्थनेला प्रतिसाद दिला नाही. तिला आपली चूक लक्षात आली आणि तिने भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी तिला काशीला जाऊन मातीच्या लिंगाची उपासना करण्याची आज्ञा केली. तिचं वय जाणून बाणासुराने भगवान शिवांना त्याच्या आईला ह्या स्थळीच उपासना करू द्यायची परवानगी देण्यासाठी विनंती केली. भगवान शिवांनी बाणासुराची विनंती मान्य केली. बाणासुर आणि त्याच्या आईने इथे मातीचे लिंग तयार केले. त्याची पूजा करताना हे लिंग थोडं उत्तरेकडे झुकलं. अजूनही इथे शिव लिंग थोडं झुकलेलं दिसतं. म्हणून इथे भगवान शिवांना कोनलपिरन असं संबोधलं जातं (तामिळ मध्ये कोनल म्हणजे झुकणे आणि पिरन म्हणजे भगवान शिव).

४. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात साडे सात वर्षांचा काळ येतो ज्यामध्ये शनीदेवाचा प्रवास त्या व्यक्तीच्या जन्मराशीतुन होत असतो. ह्या काळाला साडे साती असं म्हणतात. नळ राजाची जेव्हां साडे साती चालू होती तेव्हां त्याला अनेक संकटांना तोंड द्यायला लागत होतं. हा त्रास कमी व्हावा म्हणून तो विविध शिव स्थळांना भेट देत होता. जेव्हां तो ह्या स्थळी पूजा करत होता त्यावेळी आकाशवाणीने त्याला सुचवले कि लवकरच त्याची ह्या त्रासातून मुक्तता होईल. म्हणून इथे श्री शनिदेवांना अनुग्रहमूर्ती समजलं जातं.

५. स्थळ पुराणानुसार शैव संत अप्पर शिव मंदिरांमध्ये जमीन आणि भक्तांसाठी बनवलेले पादचारी मार्ग स्वच्छ करून सेवा करायचे. ते ह्या कामासाठी उळवरम नावाचं कुदळीसारखं हत्यार वापरायचे. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली बरीच वर्षं ह्या मंदिरातल्या भगवान शिवांची सेवा करण्यात घालवली. एकदा त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी अप्पर जिथे स्वच्छता करत होते तिथे काही रत्ने विखुरली. पण अप्पर ह्यांनी ती कचरा समजून कचऱ्याबरोबरच स्वच्छ केली. त्यानंतर भगवान शिवांनी काही अप्सरांना धाडलं. पण अप्पर ह्यांनी त्यांच्याकडे पण लक्ष दिलं नाही. भगवान शिवांना कळून चुकलं की अप्पर ह्यांना धन, स्त्री, जमीन ह्यामध्ये काही रुची नाही. अप्पर शिवांकडे मुक्तीसाठी प्रार्थना करायचे. ते जेव्हा ८१ वर्षाचे होते त्यावेळी त्यांनी चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या शतभिषा नक्षत्र दिवशी शेवटचं पथीगं गायलं. त्याच दिवशी ते भगवान शिवांमध्ये विलीन झाले. हा दिवस अप्पर उत्सव म्हणून साजरा केला जातो. ही घटना मंदिरातील एका चित्रामध्ये चित्रित केली आहे.

७. एकदा शैव संत सुंदरर ह्या मंदिरात आले आणि त्यांनी भगवान शिवांकडे धनाची मागणी केली. हे धन त्यांच्या पत्नींसाठी हवे होते. त्यावेळी मंदिरामध्ये काही दुरुस्तीचं काम चालू होतं. सुंदरर ह्यांनी त्यांची प्रार्थना आटोपल्यावर थोडी डुलकी घ्यायचं ठरवलं आणि तिथल्या दोन विटा उशी म्हणून वापरल्या. ते जेव्हा जागे झाले तेव्हा त्या दोन विटांचं रूपांतर सोन्यामध्ये झालं होतं. त्यांचा आनंद गगनांत मावला नाही आणि त्या आनंदभरात त्यांनी भगवान शिवांची स्तुती गायली.

८. अजून एका स्थळ पुराणामध्ये ह्या स्थळाच्या बाजूचे स्थळ पण समाविष्ट आहे ज्याचे नाव रामनंदीचरम आहे. इथल्या राजाने अपत्यप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि भगवान शिवांना प्रार्थना केली. आकाशवाणीने घोष केला कि राजाला एक कन्या प्राप्त होईल. ही कन्या श्री पार्वती देवींचा अवतार असेल. जेव्हा राजा वनामध्ये शिकारीला गेला तेव्हा एका झाडाखाली त्याला चार मुली दिसल्या. त्याने त्यांना घरी आणले आणि त्यांना आपली अपत्ये मानून त्यांचे संगोपन केले. त्या जेव्हा विवाहयोग्य झाल्या त्यावेळी राजाने भगवान शिवांना त्यांच्याबरोबर विवाह करण्याची विनंती केली. असा समज आहे कि भगवान शिवांनी राजाच्या विनंती स्वीकारून त्या मुलींशी विवाह केला. म्हणून ह्या मंदिराच्या बाजूला चार मंदिरे आहेत ज्यामध्ये ह्यातील प्रत्येक कन्या स्थित आहे. त्या चार कन्यांची म्हणजेच श्री पार्वती देवींची नावे अशी आहेत १. ह्या मंदिरात श्री करुंधर कुळली २. थिरुमरुगल येथील श्री वरंदर कुळली ३. रामनंदीचरम येथील श्री सरीवर कुळली ४. थिरुचेंगट्टनगुडी येथील श्री वैथकारू कुळली.

अशी आख्यायिका आहे की ह्या चार देवींनी एका गर्भवतीला प्रसूतीसमयी मदत केली. म्हणून त्यांना चुलीअंबळ (तामिळ मध्ये गरोदर किंवा गर्भ) असं संबोधलं जातं. जेव्हा प्रसूती करून त्या परतल्या तेव्हा त्या भगवान शिवांपासून दूर राहिल्या. म्हणून ह्यातील प्रत्येक मंदिरात देवींचे देवालय शिवाच्या देवालयापासून दूर आहे. ह्या मंदिरात श्री पार्वती देवींना श्री करुकाथांबिगाई असं संबोधलं जातं.

९. असा समज आहे की इथे भगवान शिवांनी श्री भूमादेवी आणि सत्यशरद ऋषींना तांडव नृत्याचं दर्शन घडवून पावन केलं.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

बाणासुर, देव, श्री भूमादेवी, श्री अग्निदेव, नळ राजा, शरण्य राजा, भारद्वाज ऋषी, १८ सिद्ध, नीलकंठ नायनार, सिरूथोंड नायनार, शैव संत अप्पर, सुंदरर आणि संबंधर.

वैशिष्ट्ये:

१. हे एकच स्थळ आहे जिथे श्री अग्निदेवांचे देवालय आहे. त्यांची मूर्ती दगडाची आहे.

२. उत्सव मूर्ती खूप सुंदर आहेत.

३. भूत, वर्तमान आणि भविष्य काळ दर्शविणारी तीन शिव लिंगे अलौकिक आहेत.

४. हे मुरुग नायनारांचे जन्मस्थान आहे. ते भगवान शिवांना रोज पुष्पे अर्पण करायचे. नल्लूर पेरुमानम (अचलापूरम) येथे शैव संत संबंधर ह्यांच्या विवाहाच्या दिवशी त्यांना मुक्ती प्राप्त झाली.

५. पेरिया पुराणानुसार मुरुग नायनार ह्यांच्या मठामध्ये पांच श्रेष्ठ नायनमारांनी शैव सिद्धांतावर चर्चा केली.

६. इथे श्री शनीश्वरांना अनुग्रह शनीश्वर असे संबोधले जाते.

७. हे शतभिषा नक्षत्रासाठी परिहार स्थळ आहे.

८. इथे कालसंहारमूर्तींचे स्वतंत्र देवालय आहे.

९. शैव संत अप्पर ह्यांनी त्यांनी रचलेल्या शिव स्तोत्रांपैकी शेवटचे स्तोत्र ह्या ठिकाणी रचले आणि इथेच त्यांना मुक्ती प्राप्त झाली. 

१०. हे स्थळ वास्तुपूजेसाठी प्रसिद्ध आहे.

११. ह्या मंदिराच्या भोवताली असलेला खंदक बाणासुराने खोदला असा समज आहे.

१२.  ह्या ठिकाणी अशी प्रथा आहे कि संधिप्रकाशाच्या समयी अंबिका देवींना शुभ्र साडी नेसवली जाते आणि त्यांची राजराजेश्वरी देवी म्हणून पूजा केली जाते. 

१३. इथले शिव लिंग थोडे कलंडले आहे.

१४. नवग्रह देवालयामध्ये सर्व नवग्रह इंग्लिश L ह्या आकारामध्ये सामावलेले आहेत. 

१५. ह्या स्थळी शनीश्वरांना अनुग्रह शनीश्वर असे संबोधले जाते.


मंदिराबद्दल माहिती:

मंदिराचा आवार साधारण ७३०० स्क्वेअर फूट वर पसरलेला आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. परिक्रमेच्या प्रवेशाला तीन स्तरांचं राजगोपुर आहे. मंदिराच्या भोवताली खंदक आहे ज्याचे नाव बाण तीर्थ / अग्नी तीर्थ आहे. दोन राजगोपुरांच्या मध्ये ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. इथले शिव लिंग (श्री अग्नीश्वरर) स्वयंभू आहे. हे लिंग शिव लिंगाच्या आकाराच्या गाभाऱ्यामध्ये पूर्वाभिमुख आहे. बाणासुराच्या कथेनुसार हे लिंग थोडे कलंडले आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री नटराज, श्री दक्षिणामूर्ती, अगस्त्य मुनी, श्री लिंगोद्भवर आणि त्यांच्या बाजूला श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी, श्री भिक्षादनर, श्री आलिंगन-कल्याण-सुंदरर. श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे. 

श्री अंबिका देवींचे दक्षिणाभिमुखी स्वतंत्र देवालय आहे. हे देवालय राजगोपुराच्या अगदी जवळ आहे. 

श्री अग्निदेवांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयातल्या मूर्तीमध्ये त्यांना दोन मुखे, सात हात, सात ज्वाला, चार शिंगे आणि तीन पाय आहेत. हे अग्निदेवांचं रूप दुर्मिळ आहे. अग्निदेवांची अशीच एक उत्सव मूर्ती पण आहे. श्री शनीश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. श्री शनीश्वरांच्या मूर्तीच्या शेजारी नळ राजाची मूर्ती आहे ज्यामध्ये नळ राजा शनीश्वरांना नमस्कार करत आहे. इथे श्री शनीश्वर आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्यांना इथे अनुग्रह शनीश्वर असे संबोधले जाते. 

इथे तीन शिव लिंगे आहेत जी भूत, वर्तमान आणि भविष्याची प्रतीके. आहेत. त्यांची नावे अशी आहेत - श्री भूतेश्वर (तामिळ मध्ये कदंथ काळ नाथर), श्री वर्धमानीश्वरर (तामिळ मध्ये निगळ काळ नाथर) आणि श्री भविष्येश्वरर (तामिळ मध्ये वरुंकाळ नाथर). भाविकांचा असा समज आहे कि ह्यांची उपासना केल्याने पूर्वजन्माची आणि सध्याची पापे नाहीशी होऊन भविष्यामध्ये मोक्षप्राप्तीची निश्चिती होते. 

नवग्रहांच्या देवालयामध्ये सर्व नवग्रह इंग्लिश L आकारामध्ये समाविष्ट आहेत. 

परिक्रमेमध्ये विविध देव, ऋषी आणि आचार्यांनी पूजिलेली शिव लिंगे आहेत जसे श्री विष्णू आणि श्री मुरुगन ह्यांनी पूजिलेली लिंगे तसेच नीलकंठशिव आचार्य, श्री इंद्रदेव, भारद्वाज ऋषी, दधिची ऋषी, व्यास ऋषी, भृगु ऋषी, जमदग्नी ऋषी, पुलस्ती ऋषी आणि जाबाली ऋषी ह्यांनी पूजिलेली लिंगे. 

परिक्रमेमध्ये पुढील देवालये आणि मूर्ती पण आहेत - स्थळ विनायक ज्यांना ज्ञानविनायक असे संबोधले जाते, ६३ नायनमार, पंचलिंग, शैव संत अप्पर आणि सुंदरर, वातापी, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री शनीश्वरर, श्री अन्नपूर्णा, श्री महालक्ष्मी, श्री सरस्वती, श्री कालसंहारमूर्ती, श्री चिंतामणीश्वरर, श्री नर्दन विनायक, श्री नटराज, श्री काशी विश्वनाथ, श्री सोमस्कंदर, त्रिमूखासूर, श्री सोमनायकींसमवेत श्री सोमनायक, श्री भैरव, वामदेवलिंग आणि अघोरलिंग. 

ह्या मंदिराच्या संबंधित पुराणे चित्रित करणारी चित्रे ह्या मंदिरात आहेत. 

मंडपामध्ये श्री अग्नी तीर्थाच्या जवळ श्री चंडिकेश्वरांची मूर्ती आहे. 

असा समज आहे कि भगवान विष्णू क्षेत्र वृक्षाच्या खाली प्रकट झाले. 

प्रार्थना:

१. भाविक जन इथे चांगल्या गृहाची प्राप्ती होण्यासाठी तसेच चांगले सहचर आणि चांगली अपत्ये प्राप्त होण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करतात.

२. नवीन गृह बांधणारे भाविक जन ह्या मंदिरातून तीन विटा नेतात आणि आपल्या नवीन गृहातील देवघराच्या आग्नेय आणि ईशान दिशेला त्या विटा ठेवतात. असे केल्याने वास्तुदोषांचे निवारण होते असा समज आहे. म्हणून इथे भगवान शिवांना वास्तूनाथर असे संबोधले जाते.

३. ज्या भाविकांना प्रसुती आणि विवाहामध्ये अडचणी येतात ते श्री पार्वती देवींची प्रार्थना करतात. विवाहातल्या अडचणींचे निरसन होण्यासाठी ते देवींना शुभ्र साडी आणि कल्याण माला अर्पण करतात.

४. शतभिषा नक्षत्रावर ज्यांचा जन्म झाला आहे ते इथे प्रार्थना करतात.

पूजा:

नियमित त्रिकाल पूजा, प्रदोष पूजा, संकष्टी, पौर्णिमा तसेच दिवाळी आणि पोंगल दिवशी विशेष पूजा केल्या जातात. तामिळ नववर्ष दिन आणि इंग्लिश नववर्षदिनी विशेष पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:

चित्राई (एप्रिल-मे): शतभिषा नक्षत्रावर १० दिवसांचा अप्पर उत्सव

वैकासि (मे-जून): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव, श्री अग्निदेवांना भगवान शिवांनी ज्या दिवशी दर्शन दिलं त्या दिवशी उत्सव साजरा होतो, तसेच वैकासि पौर्णिमा उत्सव साजरा होतो.

आनी (जून-जुलै): थिरुमंजनं

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम - पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी, अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई, प्रत्येक सोमवारी विशेष पूजा

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीराई

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरम, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा

मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते १२.३०, संध्याकाळी ४ ते रात्री ९

मंदिराचा पत्ता:
श्री अग्नीपुरीश्वरर,
ऍट पोस्ट थिरुपुगलूर थिरुकन्नपुरम मार्गे,
तालुका थिरुमारुगल,
जिल्हा नागपट्टीनम,
तामिळनाडू ६०९७०४

दूरध्वनी: +९१-४३६६२३७७६, +९१-९४४३५८८३३९

पुरोहिताचा संपर्क: श्री रामनाथ गुरुक्कल - +९१-९४८७८६४८५८ 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment