Sunday, October 25, 2026

कुडवासल येथील श्री कोणेश्वरर मंदिर

हे मंदिर कुंभकोणम-थिरुवारुर मार्गावर थिरुवारुर पासून २३ किलोमीटर्सवर, कुंभकोणमपासून २० किलोमीटर्सवर, थिरुचेरै पासून ४ किलोमीटर्सवर, नाचियार कोविल पासून ९ किलोमीटर्सवर आणि मयीलादुथुराईपासून ४६ किलोमीटर्सवर आहे.

हे महामाघम उत्सवाशी निगडित असलेल्या बारा मंदिरांपैकी हे सहाव्व मंदिर आहे. हे २००० वर्षे जुनं मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर थिरुवारुर जिल्ह्यामध्ये कुडवासल गावामध्ये वसले आहे. महाप्रलयाच्या समयास ह्या ठिकाणी कलशाचे मुख पडले आणि त्याचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले. कलशाच्या मुखाला तामिळ मध्ये कुडवायील असं म्हणतात. म्हणून ह्या स्थळाला कुडवासल असं नाव प्राप्त झालं. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेत्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शैव संत संबंधर ह्यांना इथे भगवान शिवांचे दिव्य दर्शन प्राप्त झालं म्हणून ह्या स्थळाला छोटा कैलास (तामिळ मध्ये चिन्न) असं प्राप्त झालं. कोचेंगट चोळा राजाने बांधलेल्या ७० माड कोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. माड कोविल शैलीची मंदिरं अशा पद्धतीने बांधली आहेत कि जेणेकरून ह्या मंदिरांत हत्ती प्रवेश करू शकत नाहीत. चोळा राजांनी ३ऱ्या शतकातील बांधलेल्या मंदिरांपैकी हे काही पहिल्या मंदिरांमधलं मंदिर आहे असा समज आहे.

मूलवर: श्री कोणेश्वरर, श्री सूर्येश्वरर, श्री भृगुनाथर, श्री कोणनाथर, श्री वान्मिकनाथर
देवी: श्री पेरियानायकी, श्री ब्रहन्नायकी
पूजा / आगम: कारण आगम
पवित्र तीर्थ: अमृत तीर्थ
क्षेत्र वृक्ष: केळ्याचे झाड (तामिळ मध्ये वाळै)
पुराणिक नाव: कदळीवन, वान्मिकचरम, गरुडगिरी

ह्या मंदिराला पेरूनथिरुकोविल असं पण म्हणतात.

क्षेत्र पुराण:

१. तामिळमध्ये को म्हणजे सर्व जीव आणि ईश्वरर म्हणजे भगवान शिव. भगवान शिव सर्व जीवांवर प्रेम करतात म्हणून त्यांना कोणेश्वरर असं संबोधलं जातं.

२. हे शिव लिंग वारुळामध्ये मिळाले म्हणून इथे भगवान शिवांना वान्मिकनाथर असं संबोधलं जातं.

३. ह्या मंदिरातलं गरुडाचं वास्तव्य हे खूप दुर्मिळ दृश्य आहे. कश्यप ऋषींना विनिता आणि कद्रू नावाच्या दोन पत्नी होत्या. गरुड हा विनिताचा पुत्र होता आणि भगवान विष्णूंचा परम भक्त होता. कद्रुचे पुत्र विषारी साप होते. एकदा विनिता आणि कद्रूने इंद्रदेवांना त्यांच्या उच्चैश्रवस ह्या घोड्यावर स्वार असतांना बघितलं. त्या घोड्याचा रंग कुठला ह्यावरून विनिता आणि कद्रुमध्ये वाद झाला. त्यांच्यामध्ये शर्त लागली. शर्त अशी होती की कद्रूने समजा त्या घोड्याच्या शेपटीचा रंग काळा आहे असे सिद्ध केले तर विनिता आणि गरुड कद्रुचे आजन्म गुलाम बनतील. कद्रूने तिच्या पुत्रांना तिला हि शर्त जिंकण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला पण आपल्या मातेच्या शापाच्या भयाने ते मदत करायला तयार झाले. कद्रुच्या पुत्रांपैकी एक पुत्र कर्कोटक (काळा साप) ह्याने स्वतःला त्या घोड्याच्या शेपटीला गुंडाळून घेतले आणि त्या शेपटीवर आपले विष पसरवले. ह्यामुळे त्या घोड्याची शेपटी काळी झाली. जेव्हा विनिताने त्या घोड्याची शेपटी काळी आहे हे पाहिले तेव्हा तिने आपला पराभव मान्य केला. जेव्हा तिने हि घटना आपल्या पुत्राला म्हणजेच गरुडाला सांगितली तेव्हा गरुडाने तिला ह्यावर उपाय विचारला. तेव्हा विनिता म्हणाली कि देवलोकांतील अमृताचा घट कद्रुला दिला तरच गुलामगिरीतून मुक्ती मिळू शकते. गरुड देवलोकांत गेला आणि त्याने भीषण युद्ध करून देवांचा पराभव केला. त्याने इंद्रदेवाला सांगितले की तो अमृताचा घट कद्रुला म्हणजेच त्याच्या सावत्र आईला फक्त दाखविण्यासाठी नेत आहे कारण त्याच्या मते कद्रू ह्या अमृताचे प्राशन करण्यास पात्र नव्हती. आणि त्याने आश्वासन दिले तो अमृताचा घट सुरक्षितरित्या परत आणला जाईल. जेव्हा अमृताचा घट घेऊन गरुड आपल्या आईला भेटण्यासाठी निघाला तेव्हा त्याला वाटेमध्ये एका भीषण राक्षसाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्याने अमृताचा घट काही वेळेपुरता एका कुश गवताच्या झुडपावर ठेवला. जेव्हा त्या राक्षसाचा पराभव करून तो परत आला तेव्हा त्याने पाहिले कि त्या घटातले अमृत एका वारुळावर झिरपत होते. जेव्हा आपल्या चोचीने त्याने ते वारूळ मोकळे केले तेव्हा त्याला तो अमृताचा घट हातात घेतलेले भगवान शिव (श्री अमृतलिंगेश्वरर) दिसले. भगवान शिवांनी गरुडाला आशीर्वाद दिला आणि त्याच्या मातेला गुलामगिरीतून मुक्त करून परत येण्याची आज्ञा दिली. अमृताचा घट प्राप्त झाल्यावर कद्रूने तो घट कुश गवतावर ठेवला आणि ती स्नानासाठी गेली. दरम्यान इंद्रदेवाने वायुदेवाच्या मदतीने तो अमृताचा घट परत घेतला. कद्रू जेव्हा परत आली तेव्हा अमृताचा घट न दिसल्याने ती निराश झाली. तिने आणि तिच्या पुत्रांनी कुश गवतावर सांडलेले अमूताचे काही थेंब चाखले. पण गवताच्या धारदार काड्यांमुळे त्या सर्पांच्या जिव्हा कापल्या गेल्या. (म्हणून पुराणानुसार सर्पांच्या दुभंगलेल्या जिव्हांचं हे कारण आहे). भगवान शिवांच्या आज्ञेनुसार गरुड परत त्या लिंगाशी आला. त्याने भगवान शिव आणि पार्वती देवींचे एक मंदिर बांधले. त्याचबरोबर त्याने अमृत तीर्थ नावाचे पवित्र तीर्थ निर्माण केले. म्हणून इथे भगवान शिवांना श्री अमृतनाथर असे संबोधले जाते आणि श्री पार्वती देवींना श्री अमृतवल्ली असे संबोधले जाते. गरुडाने श्री गणेशांची पण प्रतिष्ठापना केली. ह्या श्री गणेशाचे नाव श्री आदि-गणेश असे आहे. 

४. अजून एका क्षेत्र पुराणानुसार नऊ पवित्र नद्यांनी (गंगा, कावेरी, यमुना, गौतमी, नर्मदा, सरस्वती, शरयू, कन्याकुमारी आणि सिंधू) भगवान शिवांकडे त्यांच्यामध्ये स्नान करून सर्व जीवांनी सोडलेल्या पापांचं निरसन कसं करायचं ह्यावर उपाय विचारला. भगवान शिवांनी त्यांना नऊ कुमारिकांमध्ये रूपांतरित केलं आणि जेव्हा रवी कुंभ राशीत असेल, गुरु सिंह राशीत असेल आणि चंद्र मघा नक्षत्रामध्ये असेल त्यावेळी कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील तीन पवित्र स्थानांमध्ये त्यांना स्नान करण्यास सांगितलं. भगवान शिवांच्या सल्ल्यानुसार त्या नऊ नद्यांनी म्हणजेच नऊ कुमारिकांनी पहिल्यांदा कुंभकोणम येथील महामाघम तीर्थात आणि साक्कोटाई येथील कलशनल्लुर ह्या पवित्र तीर्थामध्ये स्नान घेतलं. त्यानंतर त्या ह्या स्थळी आल्या. जेव्हां त्या येथील तीर्थामध्ये शिरल्या त्यावेळी ह्या तीर्थ कोरडं झालं. जेव्हा त्या भगवान शिवांकडे ह्याची विचारणा करण्यासाठी गेल्या त्यावेळी भगवान शिव त्यांना म्हणाले की त्यांनी प्रथम इथे स्नान घेऊन मग साक्कोटाई आणि शेवटी कुंभकोणम येथे जाऊन स्नान घेणं अपेक्षित होतं. भगवान शिवांनी त्यांना इथल्या श्री आदि गणेशांची आराधना करून नंतर भगवान शिव आणि पार्वती देवी ह्यांची आराधना करण्याचा सल्ला दिला. पुराणानुसार ह्या पवित्र नद्या दर बारा वर्षांनी महामाघम उत्सवाच्या समयी ही आराधना करतात असा उल्लेख आहे.

५. एकदा प्रलय होण्याआधी ब्रह्मदेवांना अशी शंका आली की सृष्टी निर्माण करण्यासाठी लागणारी सर्व बीजे नष्ट झाली तर मग सृष्टीनिर्मिती कशी करायची. ह्या समस्येचं निरसन करण्यासाठी ते सृष्टिसंहारक भगवान शिवांकडे गेले. त्यावेळी भगवान शिवांनी ब्रह्मदेवांना बीजांचं रक्षण कसं करायचं हे सांगितलं तसंच प्रलयाच्या अंती सृष्टिनिर्मिती कशी करायची ह्याचं पण ज्ञान दिलं. त्यांनी ब्रह्मदेवांना अमृत आणि माती ह्यांचं मिश्रण करून त्यापासून एक कलश निर्मायला सांगितलं. आणि त्यामध्ये अमृत आणि सृष्टीनिर्मितीला आवश्यक सर्व बीजे कलशामध्ये पेरायला सांगितली. त्या कलशाच्या चारी बाजूंना वेद, पुराणे, आगमशास्त्रे पसरायला सांगितली. त्या कलशाच्या तोंडाशी पांच आंब्याची पाने ठेवून त्या वरती नारळ ठेवण्यास सांगितले जेणेकरून त्याला कलशाचा आकार येईल. तसेच तो कलश बंद करण्याआधी त्या कलशाला एक यज्ञोपवीत (जानवे) गुंडाळण्यास सांगितले. त्या तयार झालेल्या कलशाला भगवान शिवांनी मेरुपर्वताच्या शिखरावर जेथे ब्रह्मदेवांचे वसतिस्थान आहे तिथे ठेवावयास सांगितले आणि त्याला दर्भाच्या दोरीने छतास टांगावयास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या कलशाची बिल्वपत्र आणि फुलांनीं पूजा करण्यास सांगितले. आणि त्या कलशावर अमृताचा शिडकाव करून पवित्र करण्यास सांगितले. भगवान शिव म्हणाले कि प्रलयाच्या वेळेस हा कलश वाहत जाऊन एका स्थळी थांबेल. आणि मग भगवान शिव स्वतः किराटमूर्तींच्या (शिकारी) रूपात येऊन तो कलश फोडतील जेणेकरून ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती परत चालू करू शकतील.

ब्रह्मदेवांनी भगवान शिवांच्या सर्व सूचनांची अचूक अंमलबजावणी केली. पुढे जेव्हा प्रलय आला त्यावेळी निसर्गाच्या कोपाची पराकाष्ठा झाल्याने सगळीकडे अंदाधुंदी माजली. मेरू पर्वत पण प्रलयामध्ये बुडून गेला. तो कलश वाहत वाहत दक्षिणेकडे जाऊ लागला आणि एका स्थळी जाऊन थांबला. जसजसं प्रलयाचे पाणी ओसरायला लागले तसतसं कलशाच्या भोवतीचे दर्भ, आंब्याची पाने, बिल्व पत्रे हे कलशापासून अलग झाले. ज्या ठिकाणी आंब्याची पाने पडली त्या ठिकाणी तिथे शमी वृक्ष प्रगटला तसेच कलशाच्या भोवती गुंडाळलेल्या दर्भामधून शिव लिंग निर्माण झाले. ज्या ठिकाणी बिल्व पत्रे पडली त्या ठिकाणी बिल्व वन तयार झाले. तसेच सप्त मातृका देवी प्रकट झाल्या आणि त्या स्थळाच्या रक्षक बनल्या. दर्भापासून निर्माण झालेल्या लिंगाचे नाव दर्भ लिंग असे झाले. हे सगळं समुद्राच्या पश्चिम दिशेला घडलं. त्यानंतर कलश वायव्य दिशेला सरकायला लागला आणि मग ह्या ठिकाणी जागी स्थिर झाला. इथे कलश स्थिर झाला म्हणून ह्या स्थळाला कुंभकोणम असे नाव प्राप्त झाले. कलशाच्या भोवतील गोष्टी पडायला सुरुवात झाली. जिथे कलशाला धरून असलेली पवित्र दोरी थांबली तिथे शिव लिंग निर्माण झाले. त्या शिव लिंगाचे नाव श्री सोमेश्वरर असे आहे. जिथे जानवे पडले तिथे लिंग निर्माण झाले. त्याचे नाव गौतमेश्वरर असे आहे. जिथे बिल्व पत्रे पडली तिथे लिंग निर्माण झाले त्याचे नाव नागेश्वरर असे झाले. नारळाचे पण शिव लिंगात रूपांतर झाले. ह्या स्थळाचे नाव नल्लिकेश्वरम असे झाले आणि शिव लिंगाचे नाव अभिमुक्तेश्वरर असे झाले. शेवटी बीजे असलेला कलशच उरला. श्री ब्रह्मदेवांनी ह्या कलशामधली बीजे सृष्टीनिर्मितीसाठी उपलब्ध होण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिव किराटमूर्तिस्वरूपांत आले आणि त्यांनी आपल्या बाणांनी कलश फोडला. कलश फुटला आणि त्यातील गोष्टी विविध ठिकाणी पडल्या. ह्या सर्व ठिकाणी शिव लिंग निर्माण झाले आणि प्रत्येक ठिकाणी कालांतराने शिव मंदिर बांधले गेले. ह्या ठिकाणी कलशाची कडा पडली आणि इथे पण शिव लिंग निर्माण झाले आणि त्यावर शिव मंदिर बांधले गेले. ह्या शिव लिंगाला श्री कोणेश्वरर असे संबोधले जाते.

ह्या ठिकाणी ज्यांनी आराधना केली त्यांची नावे: श्री गरुड, श्री अग्निदेव, श्री जटायू, सूत ऋषी, सुदामा ऋषी, थळप्पियार, भृगु ऋषी आणि थिरुनपींडु (भगवान शिवांनी त्यांना ह्या ठिकाणी कुष्ट रोगांतून बरे केले).

वैशिष्ट्ये:
१. असा समज आहे अमृताचे काही थेंब ह्या तीर्थामध्ये पडले. म्हणून भाविक जन महामाघम उत्सवामध्ये ह्या तीर्थामध्ये स्नान करतात.

२. इथे गरुडाने वारुळातून भगवान शिवांना प्रकट केले म्हणून इथे भगवान शिवांना वान्मिकनाथर असे संबोधले जाते.

३. इथे श्री विनायकांची अनेक देवालये आहेत. त्यांची नावे अशी - श्री सिद्धीविनायक, श्री अनुमती विनायक, श्री आदि गजनाथर (मंदिराच्या तीर्थामध्ये) आणि श्री मलै विनायक.

४. पंगूनी ह्या तामिळ महिन्यामधल्या तीन दिवशी सूर्यदेव त्यांच्या किरणांना येथील शिव लिंगाच्या दिशेने वळवतात तर थै ह्या तामिळ महिन्यामधल्या तीन दिवशी ते आपली किरणे श्री काशी विश्वनाथांच्या दिशेने वळवतात. असा समज आहे की असे करून ते भगवान शिवांची आराधना करतात.

५. भगवान शिवांच्या देवालयाचा गाभारा एवढा अरुंद आहे कि त्यातून हत्ती शिरू शकत नाही.

६. शैव संत संबंधर ह्यांनी त्यांच्या पवित्र रचनांमध्ये ह्या मंदिराची स्तुती एळीकोला माड कोविल अशी केली आहे. (तामिळ मध्ये एळीकोला म्हणजे अत्यंत सुंदर).

७. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.

८. मासी महिन्यातल्या माघ नक्षत्र दिवशी पंच देव (श्री कोणेश्वरर, श्री पेरियानायकी, श्री गणेश, श्री मुरुगन आणि श्री चंडिकेश्वरर) तीर्थवारी उत्सवानिमित्त अमृत तीर्थाला भेट देतात.

मंदिराबद्दल माहिती:

गर्भगृहामध्ये गाभारा, अंतराळा आणि अर्धमंडप आहेत. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून ह्याला राजगोपुर नाही. प्रवेशावर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची सुंदर शिल्पे आहेत. ह्या मंदिराला दोन परिक्रमा आहेत.  

माड कोविल शैलीनुसार ह्या मंदिरात भगवान शिवांचे दर्शन घेण्यासाठी २४ पायऱ्या चढून जायला लागतं. 

जवळ जवळ ३०० ख्रिस्तपूर्व आणि इसवी सनातील ३०० वर्षे ह्या कालखंडातल्या तामिळ साहित्यांमध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आढळतो. ह्या मंदिरातले शिव लिंग स्वयंभू आहे आणि छोटं आहे. ह्या लिंगावर व्रण आहेत जे गरुडाच्या चोचीने उमटले असा समज आहे. मंदिराच्या प्रवेशावर एक दुर्मिळ शिल्प आहे ज्यामध्ये गरुड भगवान शिवांची पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.

कोष्ट मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू आणि श्री ब्रह्मदेव

श्री चंडिकेश्वरांचे स्वतंत्र देवालय त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे. 

बाहेरील परिक्रमेमध्ये श्री अनुमती विनायक ह्यांची मूर्ती आहे. प्रवेशाच्या विरुद्ध दिशेला श्री काशी विश्वनाथांचे देवालय आहे. प्रवेशाच्या समोर नंदी आणि ध्वजस्तंभ आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर श्री ब्रहन्नायकी ह्यांचे देवालय आहे. ह्या देवळामध्ये त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्यांचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्या दक्षिणाभिमुख आहेत. इथे श्री ब्रहन्नायकी देवींचीच ब्रहन्-दुर्गादेवी म्हणून पूजा केली जाते म्हणून इथे श्री दुर्गादेवींचे स्वतंत्र देवालय नाही. मंदिराच्या आतमध्ये तीन स्तरांचं गोपुर आहे. 

बाहेरील परिक्रमेमध्ये पुढील देवालये आहेत: श्री इडुम्बन, श्री दंडपाणी आणि श्री सरस्वती देवी.

श्री अंबिकादेवींच्या देवालयाच्या वायव्येला वल्ली आणि दैवानै समवेत श्री मुरुगन, मोर आणि महामंडप आहे. 

शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. ह्या परिक्रमेमध्ये क्षेत्र वृक्ष, एक फणसाचे झाड आहे, नवग्रह, श्री मुरुगन, श्री महालक्ष्मी, थिरुध्यानबिंदू मुनी, सप्त मातृका, नालवर, शैव संत सुंदरर आणि त्यांच्या पत्नी परवाई नाचियार ह्यांची देवालये आहेत. सुंदरर ह्यांच्या देवालयासमोर भगवान शिवांच्या देवालयाकडे जाण्यासाठी २४ पायऱ्या आहेत. भगवान शिवांच्या जवळ श्री नटराज आणि श्री शिवगामी देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. भगवान शिव (श्री कोणेश्वरर) ह्यांच्या देवालयाकडे जाण्यासाठी महामंडप, नंदी मंडप आणि अर्धमंडप ओलांडून जायला लागतं. 

इथले शिव लिंग मोठे असून ते एका चौकोनी चौथऱ्यावर आहे (ज्याला तामिळ मध्ये अवूदयार म्हणतात). हे शिव लिंग पश्चिमाभिमुख आहे. इथे एक श्री विनायकांचे देवालय आहे ज्यांचे सायंकाळी प्रथम पूजन केले जाते. म्हणून ह्या विनायकांना मलैवळीपाटु विनायक (ज्यांचं संध्याकाळी पूजन होतं) असं संबोधलं जातं. इथे एक जुळ्या विनायकांचें देवालय आहे ज्यामध्ये त्यांना श्री सिद्धी विनायक असे संबोधले जाते. मंदिरासमोर मंदिराचे पवित्र तीर्थ आहे ज्याचे नाव अमृत तीर्थ आहे. ह्या तीर्थाच्या काठावर श्री आदि विनायक ह्यांचे देवालय आहे. भगवान शिवांच्या देवालयाच्या गाभाऱ्यातून आपल्याला तीर्थाचे तसेच श्री आदिविनायकाच्या गोपुराचे दर्शन होते. ह्या मंदिरामध्ये दोन भैरवांच्या मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती त्यांच्या वाहनाशिवाय (श्वान) आहे.

ह्या मंदिरातल्या मूर्ती: बैठ्या मुद्रेतील श्री सूर्यदेव, उभ्या मुद्रेतील श्री चंद्र, भगवान शिवांची आराधना करत असलेले सूत मुनी. ह्याशिवाय नालवर, सुंदरर, परवाई नाचियार, वीणेशिवाय श्री सरस्वती, श्री गजलक्ष्मी आणि सप्त मातृका ह्यांची देवालये आहेत.

प्रार्थना:

१.  भाविक जन इथे भगवान शिव, श्री सूर्यदेव आणि श्री चंद्रदेव ह्यांची पूजा करतात. असा समज आहे की असे केल्याने पितरांचे श्राद्ध न केल्याने प्राप्त झालेल्या पापांचे निरसन होते.

२. भाविक जन इथे समृद्धीप्राप्तीसाठी, विवेकबुद्धीप्राप्तीसाठी, आपल्या अपत्यांच्या कल्याणासाठी, आपल्या मातेच्या इच्छा न पूर्ण केल्याने प्राप्त झालेल्या दोषांचे निरसन होण्यासाठी तसेच मानसिक शांतीप्राप्तीसाठी आणि सर्व दोषनिरसनासाठी भगवान शिवांची पूजा करतात.

३. ज्यांचे विवाह ठरण्यामध्ये अडचणी येतात असे भाविक जन इथे राहू काळामध्ये श्री दुर्गा देवींच्या देवालयात लिंबाच्या निरांजनामध्ये तुपाचे दिवे लावतात.

पूजा: 
कारण आगमानुसार नित्य पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष दिवशी प्रदोष पूजा, मासिक, साप्ताहिक आणि पाक्षिक पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): वैकासि विशाखम (विशाखा नक्षत्र दिवशी विशेष पूजा)
आनी (जुने-जुलै): थिरुमंजनं
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा आषाढा नक्षत्र दिवशी विशेष पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायक चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी आणि अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी(डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): मासी माघम (माघ नक्षत्र दिवशी विशेष पूजा), महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तीरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी विशेष पूजा)

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता:
श्री कोणेश्वरर स्वामी मंदिर
कुडवासल,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळनाडू ६१२६०१

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment