Sunday, March 8, 2026

थिरुवीळीमिळलै येथील श्री नेत्रपाणेश्वरर मंदिर

हे मंदिर मयीलादुथुराई - थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराई पासून २७ किलोमीटर्स वर, पुंथोट्टम पासून १० किलोमीटर्स वर, पेरलम पासून १४ किलोमीटर्स वर, कारैक्कल पासून ३६ किलोमीटर्स वर, कुंभकोणम पासून ३० किलोमीटर्स वर, थिरुपांपुरं पासून ७ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिणकाठावर आहे. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे. शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे मंदिर अरिसिलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या उत्तर काठावर आहे. पूर्वी इथे विपुल प्रमाणात फणस, चंदन, चंपक आणि कवठाचे वृक्ष होते. म्हणून ह्या स्थळाला वीळीवन असं नाव आहे. 

हे मंदिर साधारण २००० वर्षे जुने आहे. हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. ह्या मंदिराचे दगडी बांधकाम करून पुनर्निर्माणाचे काम चोळा राजांनी केले आणि विस्तार विजयनगर राजांनी केला. इथे कुलोथंगन I ह्या चोळा राजाच्या काळापासूनचे ६८ शिलालेख आहेत. ह्या शिलालेखांमध्ये विजयनगर आणि चोळा राजांनी दिलेल्या देणग्या आणि भेटवस्तूंचे उल्लेख आहेत. 

मूलवर: श्री नेत्रपाणेश्वरर, श्री वीळीनाथरस्वामी, श्री वीळीअळगेसर, श्री कल्याणसुंदरमूर्ती
देवी: श्री सुंदरभुजांबिका, श्री कात्यायनी
पवित्र तीर्थ: विष्णू तीर्थ, दामोदर तीर्थ आणि इतर २५ तीर्थे
क्षेत्र वृक्ष: वीळी वृक्ष

क्षेत्र पुराण:

१. कात्यायन ऋषी आणि त्यांच्या पत्नीनें त्यांच्या पोटी श्री पार्वती देवींनी जन्म घ्यावा ह्यासाठी प्रखर तपश्चर्या केली. ह्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींनी त्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना कात्यायनी असं नाव प्राप्त झालं. जेव्हा कात्यायनी विवाहयोग्य झाली त्यावेळी कात्यायन ऋषींनी भगवान शिवांना कात्यायनीबरोबर विवाह करण्याची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन भगवान शिवांनी चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या मघा नक्षत्र दिवशी कात्यायनीबरोबर विवाह केला. कात्यायन ऋषींनी भगवान शिवांना कात्यायनीसमवेत इथे विवाहाच्या पोशाखात राहून सर्वांना दर्शन देत राहावे अशी प्रार्थना केली. म्हणून भगवान शिव इथे श्री पार्वती देवींसमवेत विवाहाच्या पोशाखात इथे प्रकट झाले.  

२. स्थळ पुराणानुसार ह्या स्थळी कवठ, चंपक आणि फणसाचे वृक्ष विपुल प्रमाणात होते. म्हणून ह्या स्थळाला वीळीवनम असे नाव होते. मीळलै नावाचा पारधी भगवान शिवांना रोज एक कवठाचे फळ अर्पण करून पूजा करायचा. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याला अष्टमहासिद्धी प्रदान केल्या. मीळलैने तपश्चर्या करून तो सिद्धमुनि झाला. इथे त्याचे स्वतंत्र देवालय आहे. म्हणून ह्या स्थळाला थिरुवीळीमिळलै असं नाव प्राप्त झालं. आणि भगवान शिवांना थिरुवीळीनाथर असं नाव प्राप्त झालं.

३. पुराणानुसार दधिची ऋषींबरोबरच्या युद्धामध्ये भगवान महाविष्णूंनी त्यांचे सुदर्शन चक्र वापरले होते. पण दधिची ऋषींच्या शरीराशी त्या चक्राचा स्पर्श होताच त्या चक्राची शक्ती लोप पावली. ह्या चक्राची शक्ती पूर्ववत होण्यासाठी महाविष्णूंनी इतर देवांना सल्ला विचारला. तेव्हा इतर देवांनी त्यांना भगवान शिवांकडे जाण्याचा सल्ला दिला कारण भगवान शिवांनी जालंधर असुराचा वध करण्यासाठी चक्राचा वापर केला होता. महाविष्णू इथे गाभारा आणि विमान घेऊन आले. त्यांनी त्याच्या आत शिवलिंगाची स्थापना केली आणि दररोज १००० कमळांनी त्याची पूजा केली. भगवान शिवांनी महाविष्णूंची परीक्षा बघण्यासाठी एक दिवस एक कमळ फुल कमी केले. त्याची भरपाई करण्यासाठी महाविष्णूंनी फुलाच्या जागी आपलं एक नेत्र अर्पण केलं. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी महाविष्णूंचं नेत्र पूर्ववत केलं आणि त्यांना सुदर्शन चक्र प्रदान केलं. म्हणून महाविष्णूंना इथे कमलकन्नन (कमळासारखे नेत्र असलेला) असं नाव प्राप्त झालं. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांच्या पवित्र स्तोत्रांमधे ह्या घटनेचा उल्लेख आहे.

४. स्थळ पुराणानुसार एकदा शैव संत अप्पर आणि सुंदरर इथे आले. त्यावेळी इथे प्रखर दुष्काळ पडला होता. अप्पर आणि सुंदरर ह्यांनी भगवान शिवांकडे दुष्काळ दूर होण्यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्या दोघांना रोज एक पडीकासू द्यायला चालू केलं जे वापरून ते दुष्काळात लोकांना मदत करू शकतील (तामिळ मध्ये पडी म्हणजे भत्ता आणि कसु म्हणजे सुवर्णमुद्रा). संबंधरांना त्यांची सुवर्णमुद्रा ध्वजस्तंभाच्या जवळ महामंडपात मिळायची आणि अप्परांना त्यांची सुवर्णमुद्रा पश्चिमेकडील परिक्रमेच्या जवळ पीठावर मिळायची. संबंधरांना वाटलं कि त्यांना मिळणारी मुद्रा अप्परांना मिळणाऱ्या मुद्रेपेक्षा कमी शुद्ध आहे म्हणून त्यांनी भगवान शिवांना प्रार्थना केली. भगवान शिवांनी संबंधरांना सिरकाळी येथे दर्शन दिलं आणि अप्परांना वीळुवन येथे दर्शन दिलं.

५. उत्तरेकडच्या श्वेतकेतु राजाला ज्योतिषांनी सांगितलं कि त्याचं आयुष्य हे फक्त १८ वर्षेच उरलं आहे. त्याने विचिध ज्योतिषांची सल्लामसलत केली तेव्हा ज्योतिषांनी त्याला इथे येऊन भगवान शिवांची प्रार्थना करायचा सल्ला दिला. श्वेतकेतु इथे आला आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्याने भगवान शिवांची प्रार्थना केल्यावर भगवान शिवांनी त्याचं यमदेवांपासून रक्षण केलं. म्हणून इथे कालसंहारमूर्ती आहे. 

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

वसिष्ठ ऋषी, अगस्त्य ऋषी, कामदेव, रती देवी, मनू, शैव संत संबंधर, श्वेतकेतु राजा, सिद्धमिळलै, कात्यायन ऋषी आणि श्री महाविष्णू.

वैशिष्ट्ये:

१. हे मंदिर किल्ल्यासारखे बांधले आहे.

२. हे मंदिर माड कोविल सारखे आहे.

३. इथला गाभारा खूप सुंदर आहे.

४. हे अशा सहा स्थळांपैकी एक स्थळ आहे जिथे उपासना केल्याने मृत्यूचे भय निघून जाते. उरलेली पांच स्थळे अशी आहेत - थिरुकडयूर, थिरुवैयारू, थिरुवेंगाडू, थिरुवैकावूर आणि थिरुवांचिअम.

५. इथे गाभाऱ्याला एक छिद्र आहे. असा समज आहे ह्या छिद्रातून रोज एक पोपट येतो आणि भगवान शिवांची पूजा करतो.

६. मुख्यमंडपाचे प्रवेशद्वार वटवाघुळाच्या कपाळासारखे आहे.

७. इथे एक १०० स्तंभांचा मंडप आहे.

८. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे. 

९. हे अशा ४४ पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक आहे जिथे मूवर (तीन श्रेष्ठ नायनमार) ह्यांनी पवित्र स्तोत्रे गायली आहेत.

१०. ह्या मंदिरात कोष्ट मूर्ती नाहीत.

११. गाभाऱ्यावरचे विमान १६ सिंहांच्या आधाराने उभे आहे.

१२. उत्सव मूर्तींनी हातामध्ये तराजू घेतला आहे तर पार्वती देवींनी माप मोजण्याचे भांडे (तामिळ मध्ये पडी, मराठीमध्ये पायली) हातामध्ये घेतले आहे. 

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून ४ एकरवर पसरले आहे. मुख्य मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि मुखमंडप आहेत. ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. एक बलीपीठ पूर्वेला आहे आणि एक बलीपीठ पश्चिमेला आहे. ध्वजस्तंभाजवळ एक स्वतंत्र शिवलिंग आहे ज्याचे नाव थिरुमूलनाथर असे आहे. हे मंदिर किल्ल्यासारखे बांधले आहे. दिसायला हे मंदिर माड कोविल सारखे आहे. गाभाऱ्यावरचे विमान अशा रीतीने शिल्पीले आहे कि १६ सिंह हे विमान धरून आहेत असा भास होतो. ह्या विमानाला विन्नळीविमानम असं नाव आहे. असा समज आहे कि हे विमान श्री महाविष्णूंनी स्वर्गातून आणले. इथले शिवलिंग स्वयंभू आहे. इथे जमिनीच्या पातळीच्या खाली एक नंदी आहे ज्याचे नाव पाताळनंदी असे आहे. असा भास होतो कि पूर्ण मंदिरच नंदीच्यावरती बांधले आहे. इथे एक मंडप आहे ज्याचा आकार वटवाघुळाच्या शिरासारखा आहे. ह्या मंडपामध्ये १०० स्तंभ आहेत. ह्या मंडपात सुंदर शिल्पे आहेत. ह्या मंदिरामध्ये कोष्ठ मूर्ती नाहीत. गाभाऱ्याच्या प्रवेशाला थोड्या पायऱ्या आहेत. प्रवेशावरचे स्तंभ एखाद्या केळ्याच्या पानांशिवाय असलेल्या विवाह मंडपासारखे भासतात. शिवलिंगाशिवाय इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची मानवी रूपातील १५ फूट उंच मूर्ती आहे. ते नवविवाहित दाम्पत्यासारखे दिसतात. (ह्या मूर्तीला तामीळमध्ये मप्पीलैस्वामी असे नाव आहे). आंतले गोपुर रथाच्या आकाराचे असून भगवान शिव रथामध्ये बसले आहेत आणि इंद्रदेव सारथ्य करीत आहेत असे दृश्य आहे. मंदिराच्या दक्षिणेला श्री विनायकांची मूर्ती आहे ज्याचे नाव श्री पडिकासुविनायक असे आहे (पडी म्हणजे माप, मराठी मध्ये पायली आणि कासू म्हणजे मुद्रा). मंदिराच्या पश्चिमेला श्री सोमस्कंदर, श्री मुरुगन आणि श्री महालक्ष्मी ह्यांची देवालये आहेत. मंदिराच्या उत्तरेला श्री चंडिकेश्वरर आणि श्री शिवगामीसमवेत श्री नटराज ह्यांची देवालये आहेत. ह्याशिवाय परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती बघावयास मिळतात - श्री भिक्षादनर, श्री कालसंहारमूर्ती, श्री त्यागराज, श्री दक्षिणामूर्ती, शैव संत नालवर, श्री थुंडीविनायक, श्री बाल गणपती, श्री बालसुब्रमण्यम, शिवलिंगे, श्री मुक्तादेवी, श्री एकांबरेश्वरर, श्री अरुणाचलेश्वरर, श्री वैद्यनाथर, श्री मयूरनाथर, श्री सूर्य आणि श्री भैरव. 

श्री पार्वती देवींचे देवालय एका स्वतंत्र परिक्रमेमध्ये आहे. ह्या देवालयाच्या प्रवेशाला श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती आहेत. 

श्री कल्याणसुंदरेश्वरर ह्या मिरवणुकीच्या मूर्तीमध्ये श्री महाविष्णू आपले नेत्र अर्पण करत आहेत असे दृश्य आहे. 

प्रार्थना:

१. हे विवाहातल्या अडचणींसाठी परिहार स्थळ आहे. म्हणून इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी इथे भाविक जन प्रार्थना करतात.

२. भाविक जन इथे अपत्यप्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी तसेच शिक्षणात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी इथे प्रार्थना करतात.

पूजा:

दररोज ५ पूजा केल्या जातात. तसेच नियमित प्रदोष पूजा पण केली जाते.

मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): १० दिवसांचा चित्राई उत्सव
आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरम - पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवशी उत्सव
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी, मूळ नक्षत्र दिवशी उत्सव
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा : सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८

मंदिराचा पत्ता:

श्री नेत्रपाणेश्वरर मंदिर (श्री वीळीनाथर मंदिर)
ऍट पोस्ट थिरुवीळीमिळलै,
तालुका कूडवासल,
तामिळ नाडू ६०९५०५

दूरध्वनी: ०४३६६-२७३०५०, ९४४३९२४८२५

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment