थिरुप्पांथूरै हे कुंभकोणम-कारैक्कल मार्गावर नाचीयार कोविल-इरावांचेरा मार्गे गेल्यावर आहे. कुंभकोणम पासून ११ किलोमीटर्स वर तर नाचीयार कोविल पासून २ किलोमीटर्स वर आहे. अरिसिलारू ह्या नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर आहे. ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत संबंधरांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा राजा कारिकलन ह्याने ह्या मंदिराची पुनर्निर्मिती दगडी बांधकाम करून केली. म्हणून वर्तमान बांधकाम साधारण १३०० वर्षे जुनं असावं. इथे काही शिलालेख आहेत ज्यामध्ये विविध चोळा राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचे उल्लेख आहेत.
मूलवर: श्री शिवनंदेश्वरर, श्री प्रणवेश्वरर
देवी: श्री मंगलांबिका, श्री मलै-आरसी-अम्मन
उत्सवर: श्री प्रणवेश्वरर
क्षेत्र वृक्ष: शमी वृक्ष
पवित्र तीर्थ: मंगल तीर्थ, मलै-आरसी-अम्मन तीर्थ
पुराणिक नाव: थिरुपेनुपेरूंथुरै
वर्तमान नाव: थिरुप्पांथुरै
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार एकदा श्री ब्रह्मदेव कैलासावर गेले असताना त्यांनी बाल वयातल्या श्री मुरूगांना योग्य तो आदर दिला नाही. श्री मुरूगांनी श्री ब्रह्मदेवांना ते सृष्टीची निर्मिती कसे करतात ह्याबद्दल विचारले. तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की ते सृष्टीची निर्मिती वेदांच्या साहाय्याने करतात. श्री मुरूगांनी श्री ब्रह्मदेवांना वेदांचा घोष करायची विनंती केली. श्री ब्रह्मदेवांनी प्रणव म्हणजेच ओम चा उच्चार करून वेदघोषाला सुरुवात केली. त्याचवेळी श्री मुरूगांनी ब्रह्मदेवांना थांबवलं आणि प्रणव मंत्राचा अर्थ विचारला. जेव्हा ब्रह्मदेव अर्थ सांगू शकले नाहीत तेव्हा श्री मुरूगांना क्रोध आला आणि त्यांनी ब्रह्मदेवांना कैदेत टाकले आणि ते स्वतः सृष्टी निर्माते बनले. जेव्हा देवांना श्री ब्रह्मदेव कुठे दिसले नाहीत तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंना मध्यस्थ बनून श्री मुरुगन ह्यांच्या बरोबर विचार विनिमय करून ब्रह्मदेवांची सुटका करण्याची विनंती केली. जेव्हा भगवान विष्णू काही करू शकले नाहीत तेव्हा त्यांनी भगवान शिवांकडे मदतीची विनंती केली. जेव्हा भगवान शिव पण श्री मुरुगन ह्यांचे मन वळवायला असमर्थ ठरले तेव्हा भगवान शिवांनी मुरुगन ह्यांना प्रणव मंत्राचा अर्थ सांगायची विनंती केली. श्री मुरुगन ह्यांनी ह्या विनंतीला मान देऊन भगवान शिवांना प्रणव मंत्राचा अर्थ समजावला. ही घटना स्वामी मलै ह्या ठिकाणी घडली. श्री ब्रह्मदेवांची सुटका झाल्यानंतर श्री मुरुगन अहंकारी आणि अभिमानी झाले. त्यांना शिक्षण देण्यासाठी भगवान शिवांनी त्यांची वाचा काढून घेतली. आपल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्यासाठी ते इथे आले आणि त्यांनी एक शिवलिंग स्थापून त्याची पूजा केली आणि आपली वाचा परत मिळविली. म्हणून इथे भगवान शिवांना प्रणवेश्वरर असं संबोधलं जातं. जेव्हां श्री मुरुगन इथे आले त्यावेळेस श्री गणेश जुळ्या विनायकांचे रूप घेऊन इथे श्री मुरुगन ह्यांच्या सोबतीला आले. आणि ते इथेच थांबले. ह्या मंदिरात आपल्याला जुळ्या विनायकांच्या मूर्ती बघावयास मिळतात. त्यांची नावे श्री साक्षी विनायक आणि श्री गुह विनायक अशी आहेत.
ह्या मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, श्री पार्वती देवी, जुळे विनायक, श्री मुरुगन.
वैशिष्ट्ये:
१. श्री भिक्षादनर हे इथले उत्सव मूर्ती आहेत. त्यांची मूर्ती खूप सुंदर आहे.
२. गाभाऱ्याच्या प्रवेशावर श्री विनायक आणि श्री मुरुगन ह्यांच्या मूर्ती.
३. हे मंदिर श्री दंडायुधपाणि आणि श्री भिक्षादनर ह्यांची पूजा करण्याचे स्थान मानले जाते.
४. श्री दक्षिणामूर्तींना इथे शिखा (मराठीमध्ये शेंडी) आहे. हे खूप दुर्मिळ दृश्य आहे. त्यांचे डोळे बंद आहेत. ते चिनमुद्रा धारण करून ध्यानामध्ये आहेत. त्यांचे कान लांब आहेत.
५. मंदिराच्या प्रवेशावर जुळ्या विनायकांची मूर्ती आहे.
६. ह्या मंदिरामध्ये श्री मुरुगन ह्यांचे महत्व खूप आहे.
७. गाभाऱ्याच्या समोर श्री दंडायुधपाणि (श्री मुरुगन) ह्यांची मूर्ती आहे.
८. गाभाऱ्याच्या गोपुरावर श्री अर्धनारीश्वरर, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री वीणादक्षिणामूर्ती ह्यांची स्टुक्कोची चित्रे आहेत.
९. इथे नवग्रहांच्या देवालयामध्ये श्री सूर्य त्यांच्या पत्नींसमवेत आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून तीन स्तरांचं राजगोपुर आणि एक परिक्रमा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदी आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. इथले शिवलिंग स्वयंभूलिंग आहे. भगवान शिवांच्या देवालयामध्ये श्री मुरुगन ह्यांची खूप प्राचीन मूर्ती आहे. भगवान शिवांच्या देवालयाच्या विमानावर श्री अर्धनारीश्वरर, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री वीणादक्षिणामूर्ती ह्यांची स्टुक्कोची चित्रे आहेत.
कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री भैरव आणि श्री विष्णूदुर्गादेवी.
एका छोट्या देवालयामध्ये श्री चंडिकेश्वर ह्यांची मूर्ती आहे. हे शिव मंदिर असलं तरी इथे श्री मुरुगन ह्यांचे महत्व जास्त आहे. म्हणून त्यांची मूर्ती इथे गाभाऱ्यामध्ये आहे. त्यांना इथे श्री दंडायुधपाणि म्हणून संबोधले जाते. ह्या मंदिरामध्ये श्री गणेशांच्या दोन मूर्ती आहेत - श्री गुह विनायक आणि श्री साक्षी विनायक. नवग्रहांच्या देवालयामध्ये श्री सूर्य एका उंच पिठावर त्यांच्या पत्नींसमवेत आहेत.
श्री अंबिकादेवी एका स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालयामध्ये आहेत.
परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये: श्री विनायक, शैव संत नालवर, चोळा राजा आणि राणी, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री गजलक्ष्मी देवी, सप्त मातृका, श्री काळभैरव, श्री महालक्ष्मी, श्री विशालाक्षींसमवेत श्री काशी विश्वनाथ, श्री लक्ष्मीनारायण आणि शिव लिंगे.
प्रार्थना:
१. तोतरेपणा आणि मुकेपणापासून मुक्ती मिळविण्यासाठी भाविक जन इथे पूजा करतात. ते मंगळ तीर्थामध्ये स्नान करतात आणि श्री मुरुगन ह्यांची ४५ दिवस मधाचा अभिषेक करून पूजा करतात.
पूजा:
दैनंदिन पूजा, मासिक, साप्ताहिक, पाक्षिक पूजा (प्रदोष पूजा, पौर्णिमा पूजा, अमावस्या पूजा)
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): भरणी नक्षत्र दिवशी श्री भिक्षादनर ह्यांच्यासाठी अमुदुपदयाल नावाचा उत्सव साजरा केला जातो.
वैकासि (मे-जून): वैकासि विशाखम
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थै पुसम (पुष्य नक्षत्र दिवशी पूजा), मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्र दिवशी पूजा)
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, संध्याकाळी ५ ते ७
मंदिराचा पत्ता:
श्री शिवनंदेश्वरर मंदिर,
थिरुप्पांथूरै (नाचीयार कोविल मार्गे),
तालुका: कुंभकोणम,
तामिळ नाडू ६१२६०२
मंदिराच्या पुरोहिताचा संपर्क: के नटराज गुरुकल +९१-९४४३६५०८२६, ०४३५-२४४८१३८
No comments:
Post a Comment