हे मंदिर मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर मयीलादुथुराईपासून २८ किलोमीटर्सवर वर, पेरलम पासून १८ किलोमीटर्सवर, थिरुपांपुरं पासून १२ किलोमीटर्सवर, थिरुवारुर पासून ३५ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणमपासून २५ किलोमीटर्स वर आहे. ह्या पाडळ पेथ्र स्थळाची स्तुती शैव संत अप्पर ह्यांनी त्यांच्या पवित्र स्तोत्रांमधे गायली आहे. हे स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आणि अरिसीलारू ह्या कावेरी नदीच्या उपनदीच्या उत्तर काठावर आहे.
मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. कालांतराने चोळा राजांनी ह्या मंदिराला दगडी बांधकामामध्ये रूपांतरित केले. ह्या मंदिराचा सांभाळ विजयनगर आणि मराठा राजे तसेच नागरथारांनी केला.
मूलवर: श्री अग्निपुरीश्वरर, श्री अग्नीश्वरर
देवी: श्री गौरी, श्री पार्वती
पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ
पवित्र वृक्ष: शमी वृक्ष
पुराणिक नाव: थिरुअन्नीयुर, थिरुवन्नीयुर
वर्तमान नाव: अन्नीयुर
क्षेत्र पुराण:
१. प्रजापती दक्ष राजाने यज्ञ आयोजित केला होता. ह्या यज्ञामध्ये त्याने सर्व देवांना आमंत्रित केले पण त्यातून आपली पुत्री आणि जावई म्हणजेच श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांना वगळले. पार्वती देवींना ह्या यज्ञात सहभागी होण्याची इच्छा होती. भगवान शिवांनी त्यांना यज्ञाला न जाण्याचा सल्ला दिला. पण पार्वती देवींनी त्याकडे दुर्लक्ष करून त्या यज्ञात सहभागी होण्यासाठी गेल्या. यज्ञस्थळी त्यांच्या पितांनी म्हणजेच दक्ष राजाने पार्वती देवी आणि भगवान शिवांचा अपमान केला. हा अपमान सहन न होऊन पार्वती देवींनीं यज्ञकुंडामध्ये उडी मारून आत्मदहन केलं. भगवान शिवांना हे ज्ञात झाल्यावर त्यांना प्रचंड क्रोध आला आणि त्यांनी वीरभद्र आणि भद्रकाली ह्यांना यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली. वीरभद्र आणि भद्रकालींनी यज्ञाचा विध्वंस केला आणि त्याचबरोबर यज्ञात सहभागी झालेल्या देवांना पण शिक्षा दिली. अग्नीदेव ह्या यज्ञामध्ये सहभागी झाले होते म्हणून त्यांना शिक्षा म्हणून भगवान शिवांनी त्यांनी शाप दिला कि त्यांची सर्व शक्ती लोप पावेल आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही यज्ञामध्ये सहभागी होता येणार नाही. अग्निदेवांनी आपली शक्ती गमावल्यामुळे पृथ्वीवर यज्ञ संपन्न होणे थांबले आणि ह्याचा परिमाण म्हणून पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व जीव कष्टी झाले. आपल्या चुकीचा परिहार करण्यासाठी म्हणून अग्निदेव ह्या स्थळी आले. त्यांनी एक तीर्थ निर्माण केलं, एक शिवलिंग निर्माण केलं आणि ह्या लिंगाची त्यांनी शमीच्या पत्रांनी पूजा केली. भगवान शिवांच्या कृपेने त्यांची शापातून मुक्ती झाली. म्हणून ह्या स्थळाला अन्नीयुर असे नाव प्राप्त झाले. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ते वन्नीयुर असे झाले. (तामिळ मध्ये वन्नी म्हणजे शमी). आणि भगवान शिवांना अग्नीपुरीश्वरर असे नाव प्राप्त झाले. अग्निदेवांनी निर्माण केलेल्या तीर्थाचे नाव अग्नी तीर्थ झाले.
२. भगवान शिवांशी विवाह करण्यासाठी श्री पार्वती देवींनी कात्य ऋषींची कन्या म्हणून जन्म घेतला. त्यांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि तपश्चर्येच्या अंती भगवान शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी कृपावर्षाव केला. पुढे थिरुविळीमिळलै इथे दोघांनी विवाह केला.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्म, श्री अग्नी, अगस्त्य ऋषी, सनत कुमार, सनातन ऋषी आणि श्री पार्वती देवी
वैशिष्ट्ये:
१. बाहेरील मंडपामध्ये पितळी पट्टीवर स्थळ पुराणे चित्रित करणारी उठावदार चित्रे आहेत.
२. इथल्या द्वारपालकांच्या मूर्ती लहान आहेत.
३. श्री दुर्गादेवींच्या देवालयाजवळ काही ऋषींची शिल्पे आहेत.
४. असा समज आहे कि इथले क्षेत्र वृक्ष १६०० वर्षे जुने आहे.
५. आवनी आणि पंगूनी ह्या तामिळ महिन्याच्या १८व्या, १९व्या आणि २०व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
६. असा समज आहे की इथून जवळ असलेल्या आठ शिव मंदिरांमध्ये अष्टदिक्पालांची पूजा केली जाते. त्यात हे स्थळ म्हणजेच वन्नीयुर पण आहे.
७. ह्या मंदिरात २ चंडिकेश्वरांच्या मूर्ती आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्धमंडप आणि खुला मुखमंडप आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला दोन स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. इथे प्रवेशावर नंदीमंडपामध्ये बलीपीठ आणि नंदी आहेत. इथले स्वयंभू लिंग पूर्वाभिमुख आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गादेवी.
परिक्रमेमध्ये पुढल्या मूर्ती आणि देवालये आहेत - श्री गणेश, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, शैव संत नालवर, अनेक शिवलिंगे, श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र आणि श्री शनीश्वर.
ह्या मंदिरात दोन चंडिकेश्वरांच्या मूर्ती आहेत. परिक्रमेमध्ये श्री सोमस्कंदर आणि श्री नटराज ह्यांच्यापण मूर्ती आहेत. इथे पंचमूर्ती आहेत आणि त्या सुंदर आणि प्रसिद्ध आहेत. भगवान शिवांच्या देवालयाच्या प्रवेशावर द्वारपालकांची दगडी शिल्पे आहेत. गाभाऱ्याच्या भिंतींवर पुढल्या मूर्ती आहेत - शैव संत अप्पर, श्री अग्नी, श्री गौरीदेवी, शिवलिंग, शिवलिंगावर आपल्या आचळांमधून दुधाचा अभिषेक करणारी कामधेनू आणि श्री ऋषभारूढर. ह्या सगळ्या मूर्ती एका रेषेत आहेत. परिक्रमेमध्ये श्री गणेश, श्री बालसुब्रमण्य आणि श्री गजलक्ष्मी देवींची देवालये आहेत. नालवर ह्यांच्या मूर्ती मुखमंडपामध्ये आहेत. श्री अंबिकादेवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या उजव्याबाजूला आहे. श्री अंबिका देवींची मूर्ती छोटी पण खूप सुंदर आहे. ह्या स्थळाच्या भोवती आठ मंदिरे ज्यांना अष्टदिक्पालांची मंदिरे असं म्हणलं जातं. ह्या मंदिरांमध्ये पूजा करणं हे खूप शुभ मानलं जातं. ती आठ मंदिरे अशी आहेत
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींचा परिहार करण्यासाठी प्रार्थना करतात.
२. भाविक जन इथे उष्णतेने निर्माण झालेल्या रोगांचे तसेच उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या रोगांचे निरसन करण्यासाठी अग्नी तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा करतात.
३. हे वास्तुदोष परिहार स्थळ असल्याकारणाने भाविक जन इथे वास्तुदोषांच्या परिहारासाठी पूजा करतात
४. इमारतीचे बांधकाम सुरु करण्याआधी भाविक जन इथे सात विटा घेऊन येतात आणि पूजा करतात. आणि मग इमारतीचे बांधकामाची सुरुवात ह्या सात विटांनी करतात.
पूजा:
सर्व दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष पूजा.
मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): वैकासि विशाखं
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८
मंदिराचा पत्ता:
श्री अग्नीपुरीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट वन्नीयुर (अन्नीयुर),
तालुका: कूडवासल,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळनाडू ६१२२०१
पुरोहिताचा संपर्क: श्री गणेश गुरुक्कल - +९१४३५२४४९५७८
No comments:
Post a Comment