Sunday, January 18, 2026

थिरुकोट्टारं येथील श्री ऐरावतेश्वरर मंदिर

हे शिव मंदिर कारैक्कल-कुंभकोणम मार्गावर कारैक्कल पासून १२ किलोमीटर्स वर, मयीलादुथुराई पासून २८ किलोमीटर्स वर, कुंभकोणम पासून ४८ किलोमीटर्स वर, पेरलम पासून १२ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून ३६ किलोमीटर्स वर आणि थिरुनल्लर पासून १० किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर (कावेरी नदीची उपनदी वांचीयारूच्या काठावर) आहे. मंदिराचे वर्तमान बांधकाम चोळा साम्राज्याच्या कुलोथंगन ह्या राजाने साधारण १३०० वर्षांपूर्वी केले. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधी पासून अस्तित्वात असावं. इथे काही शिलालेख आहेत ज्यांमध्ये चोळा, पांड्या राजांनी तसेच नाट्टूकोट्टै चेट्टीयार ह्यांनी दिलेल्या देणग्यांचे तसेच त्यांनी मंदिरासाठी केलेल्या कामांचे उल्लेख आहेत.

मूलवर: श्री ऐरावतेश्वरर
देवी: श्री सुंगंधाकुंडलांबिका, श्री वंदारपुनगुळली
स्थळ वृक्ष: पारिजात वृक्ष, बिल्व
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, वांचीयारू

क्षेत्र पुराण:

१. एकदा इंद्रदेवांच्या ऐरावत ह्या हत्तीला दुर्वास ऋषींनी सामान्य पांढरा हत्ती बनण्याचा शाप दिला. ह्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी ऐरावताने विविध शिव स्थळांना भेट दिली. ह्या शिव मंदिरामध्ये आल्यावर ऐरावताने आपल्या दातांनी ढगांना तडाखा देऊन कोट्टारू नावाची नदी निर्माण केली. आणि ह्या नदीतील पाण्याने त्याने भगवान शिवांची पूजा केली (तामिळ मध्ये कोट्टु म्हणजे सुळा आणि अरु म्हणजे नदी). म्हणून ह्या स्थळाला कोट्टारू असे नाव प्राप्त झाले आणि भगवान शिवांना श्री ऐरावतेश्वरर असे नाव प्राप्त झाले. सध्या ह्या नदीला वांचीयारू असे नाव आहे. विविध शिव मंदिरांमध्ये भगवान शिवांची पूजा करून शेवटी ऐरावताने मदुराई येथे भगवान शिवांची पूजा केली त्यावेळेस त्याला शापातून मुक्ती मिळाली.

२. क्षेत्र पुराणानुसार सुबक महर्षी ह्या मंदिराला दररोज भेट द्यायचे. एकदा त्यांना ह्या मंदिरात यायला खूप उशीर झाला आणि मंदिराचे दरवाजे बंद झाले होते. असा समज आहे की त्यांनी एका मधमाशीचे रूप घेऊन मंदिरात प्रवेश केला. त्यांनी भगवान शिवांची पूजा केली आणि ते मंदिरातच राहिले.  तेव्हापासून मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर मधमाशांचे पोळे आहे.

ह्या मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

इंद्र देव, ऐरावत हत्ती, अगस्त्य ऋषी, सुबक महर्षी.

वैशिष्ट्ये:

१. इथल्या मधमाशांच्या पोळ्यामधले मध भगवान शिवांच्या अभिषेकासाठी वापरले जाते.

२. इंद्र देवांचे वाहन ऐरावत हत्तीने इथे भगवान शिवांची पूजा केली.

३. असा समज आहे की ऐरावत हत्तीने इथे पवित्र तीर्थ निर्माण केले.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख असून आहे इथे तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे. प्रवेशाजवळ ध्वजस्तंभ, नंदी आणि दोन बलिपीठे आहेत. एक बलीपीठ नंदीच्या समोर आहे आणि एक पाठीमागे आहे. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, अर्ध मंडप आणि मुख मंडप आहे. गाभाऱ्यामध्ये मधमाशांचे पोळे आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशावर द्वारपालांची स्टुक्कोची चित्रे आहेत. मुख मंडपामध्ये दोन नंदी आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. शैव संत संबंधर ह्यांची एक छोटी मूर्ती आहे. मंडपाच्या प्रवेशाला ध्वजस्तंभ आणि श्री द्वार गणपती आहेत. ध्वजस्तंभाच्या समोर भगवान शिवांचे श्री कैलासनाथर रूपातले शिल्प आहे. डाव्याबाजूला श्री बाळगणेशांची मूर्ती आहे. कमानीच्या आकाराच्या मंडपामध्ये, ज्यामध्ये स्तंभ आहे आणि ज्याला छत आहे, भगवान शिवांकडे मुख्य गाभाऱ्याकडे मुख करून असलेला नंदी बघावयास मिळतो. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णु

महामंडपामध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री शिवगामी आणि श्री नटराज, श्री मुरुगन आणि श्री सोमस्कंद. अर्ध मंडपाच्या वायव्येला बोगशक्ती ह्यांची उत्सव मूर्ती आहे. अर्ध मंडपाच्या शेवटी श्री बाळगणपती आणि नागराज ह्यांची शिल्पे आहेत.  

एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री कुमारभुवनेश्वरर ह्यांची मूर्ती तसेच अगस्त्य ऋषी आणि शुभकामूनी ऋषी ह्यांनी प्रतिष्ठापित केलेली शिव लिंगे आहेत.

परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: शैव संत नालवर, श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री गणेश, श्री थिरुमल (श्री विष्णू), श्री कैलासनाथर, शुभकामूनी ऋषी, नागराज, श्री सुब्रह्मण्य, श्री गजलक्ष्मी आणि श्री चंडिकेश्वरर. 

एका स्वतंत्र पश्चिमाभिमुख देवालयामध्ये अगस्त्य ऋषी आणि शुभकामूनी ऋषींनी पूजिलेली श्री काळभैरवांची मूर्ती आहे. 

नंदी मंडपाच्या उजव्या बाजूला श्री अंबिका देवींची उभ्या मुद्रेतील मूर्ती आहे.

प्रार्थना:

१. भाविक जन इथे अपत्य प्राप्ती, विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच शिक्षणात प्रगती प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करतात. 

२. भाविक जन इथे वैभव प्राप्ती आणि बुद्धिमतेसाठी प्रार्थना करतात.

पूजा:

इथे रोज एक पूजा होते तसेच प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते ११.३०, संध्याकाळी ६ ते ८.३०

मंदिराचा पत्ता:

श्री ऐरावतेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट थिरुकोट्टारं (नेडुंगडू मार्गे),
तालुका नन्नीलम,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळ नाडू ६०९६०३

दूरध्वनी: +९१-४३६८२६१४४७

मंदिराच्या पुरोहिताचा संपर्क: श्रीराम गुरुक्कल +९१-८९०३८८८१७४, श्री मधू गुरुक्कल +९१-७५०२२१२३१९


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment