हे शिव मंदिर पाँडिचेरी मधील कारैक्कल ह्या जिल्ह्यातील थिरुनल्लर गावात आहे. हे सप्त विडंग स्थळातलं एक स्थळ आहे. इथल्या विडंगाचे नाव नगर विडंग असे आहे. इथे भगवान शिवांनी जे नृत्य केलं त्या नृत्याचे नाव उन्मत्त पद नटनं (मद्यधुंद व्यक्तीने केल्यासारखे नृत्य) असे आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक स्थळ आहे. जरी हे शिव मंदिर असलं तरी हे शनी ग्रहाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
ह्या मंदिराच्या परंपरेनुसार भगवान शिवांच्या पूजेआधी इथे श्री शनिदेवांची पूजा करण्याची प्रथा आहे. ह्या मंदिरामध्ये श्री शनिदेव मंदिराचे द्वारपाल समजले जातात. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर, अप्पर आणि सुंदरर ह्यांनी गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. हे मंदिर थिरुनल्लर बस नाक्यापासून २ किलोमीटर्स वर, कारैक्कल रेल्वे स्थानकापासून ७ किलोमीटर्स वर, कुंभकोणमपासून ५३ किलोमीटर्स वर, नागपट्टीनं पासून २६ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून ३७ किलोमीटर्स वर आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. चोळा साम्राज्याच्या राजांनी ह्या मंदिराचे दगडी बांधकाम करून जीर्णोद्धार केला आणि विजयनगर आणि मराठा राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी ह्या मंदिरासाठी केलेली कामे तसेच दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे.
अभिधान: फार पूर्वी इथे श्री ब्रह्मदेवांनी उपासना केली म्हणून ह्या स्थळाला आदिपूरी (आदि = सुरुवात) असे नाव प्राप्त झाले. इथे दर्भ विपुल प्रमाणात उगवत होते म्हणून ह्या स्थळाला दर्भारण्य असे नाव प्राप्त झाले. इथे नळ राजाने उपासना केली म्हणून ह्या स्थळाला नल्लर असे नाव प्राप्त झाले आणि इथे भगवान शिवांना नल्लेश्वर असे नाव प्राप्त झाले.
मूलवर: श्री दर्भारण्येश्वरर, श्री थिरुनल्लर-ईश्वरर
देवी: श्री प्राणांबिका, श्री भोगमार्ता पुनमुलैयल, श्री प्राणेश्वरी
क्षेत्र वृक्ष: दर्भ
पवित्र तीर्थ: नळ तीर्थ, ब्रह्म तीर्थ, वाणी तीर्थ, श्री नळविनायकांच्या मंदिरातील विहिरीमध्ये अन्न आणि गंगा तीर्थे आहेत. तसेच इथे आठ अष्टदिक्पाल तीर्थे आहेत.
विशेषता: पुराणानुसार इथले शिव लिंग दर्भाच्या गवतामध्ये सापडले म्हणून इथल्या शिव लिंगावर दर्भाची चिन्हं दिसतात.
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार सृष्टी निर्माण केल्यावर ब्रह्मदेव सृष्टीमध्ये भ्रमण करण्यासाठी निघाले. ते जेव्हा इथे दर्भाने भरलेल्या अरण्यात आले तेव्हां इथले निसर्गसौंदर्य पाहून ते मुग्ध झाले. त्यांनी इथे तपश्चर्या केली आणि येथील स्वयंभू लिंगाची पूजा केली. भगवान शिव त्यांच्या पूजेवर प्रसन्न होऊन इथे आले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना वेदांची रहस्ये सांगितली तसेच इतर शास्त्रांचं ज्ञान दिलं. ब्रह्मदेवांनी इथे बराच काळ राहून शिव-पार्वतींची उपासना केली आणि त्यांची मंदिरे बांधली. ब्रह्मदेवांनी ब्रह्म तीर्थ निर्माण केलं तर सरस्वती देवींनी वाणी तीर्थ निर्माण केलं. इंद्रदेव, अष्टदिक्पाल (आठ दिशा) तसेच स्वर्गीय हंसाने त्यांची त्यांची शिव लिंगे निर्माण केली आणि त्यांची पूजा केली.
२. पुराणानुसार भगवान विष्णूंनी इथे शिव-पार्वतींची पूजा केली आणि त्या पूजेच्या प्रभावाने मन्मथ (कामदेव) ह्या पुत्राची प्राप्ती केली. त्यांनी कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून सोमस्कंद मूर्ती निर्माण केली ज्यामध्ये श्री मुरुगन भगवान शिव आणि पार्वती देवींच्या मध्ये बसले आहेत. काही काळाने त्यांनी हि मूर्ती इंद्रदेवांना दिली. इंद्रदेवांनी ह्या मूर्तीची पूजा केली आणि त्या प्रभावाने त्यांना जयंत आणि जयंती असे पुत्र आणि पुत्री प्राप्त झाले. कालांतराने इंद्रदेवांनी अजून सहा सोमस्कंद मूर्ती निर्माण केल्या आणि त्या मूर्ती मुचुगंद राजाला दिल्या. मुचुगंद राजाने ह्या मूर्ती सात ठिकाणी स्थापन केल्या ज्यांना एकत्रित सप्त विडंग स्थळ असे म्हणले जाते. हे मंदिर त्या सात स्थळांपैकी एक आहे. इथे भाविक जन अपत्य प्राप्तीसाठी ह्या मूर्तीची पूजा करतात. इथल्या विडंगाचे नाव नगर विडंग असे आहे. सप्त विडंग स्थाने अशी आहेत
३. पुराणानुसार एकदा देव भगवान शिवांकडे गेले आणि त्यांनी पृथ्वीवर सत्र यज्ञ करण्यासाठी कुठली जागा योग्य आहे असं विचारलं तेव्हा भगवान शिवांनी एक दर्भाचं (कुश गवत) चक्र (नेमी) निर्माण केलं. ते चक्र फिरत फिरत इथे स्थिर झालं म्हणून हि जागा यज्ञ आणि उपासनेसाठी निवडली. म्हणून ह्या स्थळाला नैमिषारण्य असं संबोधलं जातं. अजून एका पुराणानुसार ह्या ठिकाणी भगवान शिवांनी एका निमिषात अनेक राक्षसांचा संहार केला म्हणून ह्या स्थळाला नैमिषारण्य असं संबोधलं जातं असा पण समज आहे.
४. पुराणानुसार निषाद राज्याच्या नळ राजाने विदर्भाच्या दमयंतीबरोबर विवाह केला. शनिदेवांना दमयंतीबरोबर विवाह करायचा होता. पण ते जमलं नाही म्हणून शनिदेवांना खूप राग आला. त्यांना नळ राजाविषयी मत्सर निर्माण झाला. नळ राजा हा न्याय्य आणि धार्मिक असल्याकारणाने शनिदेव नळ राजांना काही त्रास देऊ शकले नाहीत. एकदा नळ राजाने पूजा चालू करण्याआधी पाय धुतले. पण त्यांनी पाय बरोबर धुतले नाहीत म्हणून शनिदेवांना नळ राजाच्या आयुष्यात व्यत्यय आणण्याची संधी प्राप्त झाली. शनिदेवांच्या प्रभावाने नळ राजाचे खूप नुकसान झाले. त्याचे सर्व राज्य गेले तसेच त्यांची पत्नी पण त्यांना सोडून गेली. काही काळाने नारद मुनी आणि भारद्वाज मुनींनी नळ राजाला भगवान शिवांच्या स्थळांची तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला. नळ राजा त्यांच्या तीर्थयात्रेमध्ये ह्या स्थळी आले. त्यांनी एक तीर्थ निर्माण केलं आणि ते मंदिरामध्ये भगवान शिवांची पूजा करण्यास गेले. शनिदेव भगवान शिवांना भिऊन असल्याकारणाने ते बाहेरच थांबले. भगवान शिवांनी शनिदेवांना आज्ञा केली की जे कोणी शनिदेवांची पूजा करून मग मंदिरात येतील त्यांना शनिदेव कधीही कष्ट पोचविणार नाहीत. तेव्हापासून जे कोणी शनिदेवांची पूजा करून मग मंदिरात दर्शन घेण्यास जातात त्यांची शनिदेवांच्या दुःखमय प्रभावातून मुक्ती होते असा समज आहे.
५. पुराणानुसार वेदवर्थन राज्याच्या थुयकुंड ह्या राजाने पुत्रकामेष्ठी यज्ञ केला. राजाला पुत्रप्राप्ती झाल्यावर हा यज्ञ ज्या दोन ब्राह्मणांनी केला त्या ब्राह्मणांना राजाने संपत्ती, उपहार तसेच एक एक गाय दान दिली. ह्या गायींपैकी एक गाय जास्त निरोगी असल्याने त्या दोन ब्राह्मणांमध्ये वाद चालू झाला. ते काठी घेऊन एकमेकांवर वार करू लागले. हे चालू असताना एका ब्राह्मणाच्या काठीचा वार एका गायीवर पडला आणि त्यामुळे ती गाय मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्या ब्राह्मणावर गोहत्येचा दोष लागला. ह्या दोष परिहारासाठी तो ब्राह्मण रोमास ऋषींकडे गेला. रोमास ऋषींनी त्या ब्राह्मणाला ह्या स्थळी येऊन तीर्थामध्ये स्नान करून इथल्या भगवान शिवांची पूजा करण्याचा सल्ला दिला. त्या ब्राह्मणाने तसे केल्यानंतर त्याला गोहत्या दोषापासून मुक्ती मिळाली.
६. पुराणानुसार भारद्वाज ऋषी अवंती नगरीच्या उरुची राजाला भेटावयास गेले त्यावेळी राजाने त्यांना सर्व दानांमध्ये श्रेष्ठ दान कुठले असा प्रश्न विचारला. ऋषींनी राजाला सांगितले कि दर्भारण्येश्वरर इथे केलेले अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. राजा ह्या स्थळी आला आणि त्याने भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा केली. भगवान शिवांनी राजाला वरदान दिले. राजाने भगवान शिवांकडे शाश्वत कृपा मागितली आणि तसेच त्याच्याकडे जो कोणी येईल त्याला अन्नदान करण्याची क्षमता मागितली. त्यानंतर राजा इथेच राहिला आणि त्याने आपलं उरलेलं आयुष्य गरिबांच्या सेवेत घालवलं.
७. अजून एक पुराण एका गवळ्याशी निगडित आहे. इथल्या राजाच्या आज्ञेनुसार हा गवळी दररोज मंदिरासाठी दूध पुरवायचा. इथल्या लेखापालाने गवळ्याला त्याच्या घरी दुध पोचवायला सांगितले आणि त्याची नोंद मंदिराच्या खात्यामध्ये करण्यास सांगितले. त्या प्रामाणिक गवळ्याने तसे करण्यास नकार दिला त्यामुळे त्या लेखापालाने त्याला शिक्षा देण्याची धमकी दिली. त्या गवळ्याने श्री दक्षिणामूर्तींकडे न्याय मागितला. असा समज आहे की त्यावेळी श्री दक्षिणामूर्तींनी त्या लेखापालाच्या दिशेने त्रिशूल फेकले. त्या त्रिशुळाच्या मार्गामध्ये बलीपीठ होते ते त्रिशूळाला मार्ग देण्यासाठी थोडे बाजूला झाले. म्हणून इथे बलीपीठ शिव लिंगाच्या समरेषेमध्ये नाही.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री विष्णू, श्री ब्रह्म, श्री इंद्र, अष्टदिक्पाल, अगस्त्य ऋषी, पुलस्ती ऋषी, अर्जुन, नळ राजा, प्रभू श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश, व्यास ऋषी, शुक ऋषी आणि श्री बलराम.
वैशिष्ट्ये:
१. राजगोपुराला नमस्कार करून मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रवेशाच्या पायरीला नमस्कार करून आत जायची प्रथा आहे.
२. हे सप्त विडंग स्थळांपैकी एक आहे.
३. हे शक्ती पीठांपैकी एक असून ह्या पीठाला प्राणेश्वरी शक्ती पीठ असे म्हणतात.
४. इथल्या शिव लिंगावर दर्भाची चिन्हे दिसतात.
५. इथले बलीपीठ शिव लिंगाच्या समरेषेमध्ये नाही.
६. ह्या मंदिरामध्ये शनिदेवांना प्राधान्य आहे.
७. हे नवग्रह स्थळांपैकी शनिश्वरांचे स्थळ आहे.
८. इथे नवग्रहांचे देवालय नाही.
९. इथल्या शनिश्वरांच्या मूर्तीमध्ये त्यांना दोन हात आहेत. सहसा चार हात असतात.
१०. ह्या मंदिराच्या आवारामध्ये १७ शिव लिंगे आहेत.
११. वसंत मंडपामध्ये स्टुक्कोची चित्रे आहेत ज्यामध्ये भगवान शिवांनी केलेली १० नृत्ये चित्रित केली आहेत.
१२. इथे अशी चित्रे आहेत ज्यामध्ये नळ राजाची पुराणे चित्रित केली आहेत.
१३. इथे गाभाऱ्याच्या समोर सोन्याचा मुलामा दिलेला ध्वजस्तंभ आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर २ एकर्स वर पसरलेलं आहे. इथे सात स्तरांचे राजगोपुर आणि दोन परिक्रमा आहेत. मंदिराच्या पुढे मंडप आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. ते दर्भाच्या गवतामध्ये सापडले. म्हणून ह्या स्थळाला दर्भारण्यं असं म्हणतात. शिव लिंगावर दर्भाची चिन्हे आहेत. इथले बलीपीठ आणि नंदी हे शिव लिंगाच्या समरेषेमध्ये नाहीत. गाभाऱ्याच्या समोर सोन्याचा मुलामा दिलेला भव्य ध्वजस्तंभ आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री विष्णू, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गा देवी
कोष्ठ मूर्तींच्या बाजूला त्यागराजांची मूर्ती आहे ज्याचे नाव उन्मत्त नर्थन त्यागराज असे आहे आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी निलोथंबाळ आहेत. बाहेरील परिक्रमेमध्ये नळ राजाच्या कथा चित्रित केल्या आहेत. वसंत मंडपामध्ये भगवान शिवांनी केलेली विविध नृत्ये स्टुक्को चित्रांमध्ये चित्रित केली आहेत. भगवान शिवांच्या देवालयाच्या डाव्या बाजूला प्रवेशावर श्री शनीश्वरांचे देवालय आहे. शनीश्वरांच्या देवालयामध्ये एक छोटा गाभारा आहे. शनीश्वर पूर्वाभिमुख आहेत आणि त्यांना दोन हात आहेत.
आतल्या परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये: शैव संत सुंदरर, ६३ नायनमार, श्री नल्लेश्वरर, श्री स्थळविनायक, श्री स्वर्ण गणपती, श्री सुब्रह्मण्य, श्री आदिशेष, श्री नळअरण्य पेरुमल, श्री महालक्ष्मी, श्री भैरव, नटराज सभा आणि उत्सव मूर्ती. उजव्या बाजूला गवळी, त्याची पत्नी आणि लेखापाल ह्यांच्या मूर्ती आहेत.
इथलं मरगद लिंग सुरक्षित ठेवले आहे. दररोज सकाळी ८.३० वाजता ह्या लिंगावर अभिषेक केला जातो आणि पूजा केली जाते.
ह्या मंदिरातली इतर देवालये: श्री स्वर्ण गणपती, श्री मुरुगन, श्री नटराज, श्री सोमस्कंद, श्री आदिशेष, श्री सूर्य आणि श्री भैरव ह्यांच्यापण मूर्ती आहेत. तसेच इथे नळ राजाची मूर्ती आणि त्याने पुजीलेलं लिंग पण आहे.
प्रार्थना:
१. श्री शनीश्वरांच्या प्रभावामुळे उत्पन्न होणाऱ्या आव्हानांपासून मुक्ती मिळविण्यासाठी इथे भाविक जन नळ तीर्थामध्ये स्नान करतात आणि भगवान शिवांची पूजा करतात.
२. पूर्व आणि वर्तमान पापांचं क्षालन करण्यासाठी भाविक जन इथे ब्रह्म तीर्थामध्ये स्नान करतात आणि भगवान शिवांची पूजा करतात.
३. ज्ञानप्राप्तीसाठी, गायनामध्ये प्राविण्य प्राप्त करण्यासाठी तसेच काव्यकलेमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी भाविक जन इथे सरस्वती तीर्थामध्ये (वाणी तीर्थ) स्नान करतात.
पूजा:
दररोज सकाळी ६ पासून ते रात्री ९ पर्यंत भगवान शिवांच्या सहा पूजा केल्या जातात. श्री शनीश्वरांच्या पांच पूजा केल्या जातात. शनी गोचर समयी (शनिदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात) तसेच पौर्णिमा, पूरत्तासी महिन्यातील अमावस्या ह्या दिवशी विशेष पूजा केली जाते. ह्याशिवाय नियमित प्रदोष पूजा केली जाते. शुक्रवार, तामिळ नववर्ष तसेच इंग्लिश नववर्ष ह्या दिवशी विशेष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
वैकासि (मे-जून): १० दिवसांचा ब्रह्मोत्सव
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
आनी (जून-जुलै): नटराज उत्सव
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): पौर्णिमेला मरगद लिंगावर विशेष पूजा, नवरात्री उत्सव
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई, दिवाळी
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उथिरम (उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर उत्सव)
थै (जानेवारी-फेब्रुवारी): पोंगल
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १, दुपारी ४ ते रात्री ९
मंदिराचा पत्ता:
श्री थिरुनल्लर शनीश्वरर मंदिर,
थिरुनल्लर,
कारैक्कल,
पॉंडिचेरी
दूरध्वनी: +९१-४३६८२३६५३०, +९१-९४४२२३६५०४
आभार: https://tamilnadu-favtourism.blogspot.com/,
https://temple.dinamalar.com/en/
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment