Sunday, January 4, 2026

धर्मपुरम (कारैक्कल जिल्हा) येथील श्री याळमुरीनाथर मंदिर / श्री धर्मपुरीश्वरर मंदिर

ह्या मंदिराला श्री ब्रह्मपुरीश्वरर मंदिर असं पण म्हणतात. थिरुनल्लरू-कारैक्कल मार्गावर थिरुनल्लरू पासून हे मंदिर ३ किलोमीटर्स वर आहे. सध्या ह्या स्थळाला कोविलपथु असं म्हणतात. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे आणि ह्याची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. म्हणून हे स्थळ सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या मंदिराचं दगडी बांधकाम चोळा राजांनी केलं. आणि मंदिराचा विस्तार विजयनगर आणि मराठा राजांनी केला. 

मूलवर: श्री याळमुरीनाथर, श्री धर्मपुरीश्वरर
देवी: श्री मदुरामिन्नअम्माई, श्री थेनअमृतवल्ली, श्री अभयाम्बिका
पवित्र तीर्थ: विष्णू तीर्थ, धर्म तीर्थ, ब्रह्म तीर्थ
पवित्र वृक्ष: केळ्याचे वृक्ष

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार श्री यमदेव मार्कंडेय ऋषींना यमलोकांत न्यायला आले तेव्हां भगवान शिव त्यांच्या मदतीला धावून आले. त्यावेळी यमदेवांनी त्यांचा पाश मार्कंडेय ऋषींच्या गळ्याभोवती टाकला होता. भगवान शिवांनी यमदेवांना त्यांच्या मृत्यूचा स्वामी ह्या पदावरून काढलं. म्हणून पृथ्वीवर कोणालाही मृत्यू येण्याचं थांबलं आणि म्हणून पृथ्वीवरची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. भूमादेवींनी भगवान शिवांना यमदेवांना त्यांच्या मृत्यूचा स्वामी ह्या मूळ पदावर आणण्याची विनंती केली. त्याचवेळी यमदेवांनापण आपल्या पापाचा पश्चात्ताप झाला. भगवान शिवांनी त्यांना इथे येऊन एक तीर्थ निर्माण करून तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. भगवान शिवांनी यमदेवांना दर्शन दिलं आणि लवकरच त्यांना मृत्यूचा स्वामी हे त्यांचं मूळ पद प्राप्त होईल असं आश्वासन दिलं. यमदेवांना धर्म असं पण म्हणतात म्हणून ह्या स्थळाला धर्मपूरम असं नाव प्राप्त झालं आणि भगवान शिवांना श्री धर्मपुरीश्वरर असं नाव प्राप्त झालं. 

२. इथे अजून एक पुराण आहे ज्याच्यामध्ये भगवान शिवांना याळमुरीनाथर असं संबोधलं जातं. श्री नीलकंठ याळपनर नायनार हे भगवान शिवांचे कट्टर भक्त होते. त्यांचं ह्या गावात म्हणजेच एरुकथम्ब पुलियूर मध्ये वास्तव्य होतं. त्यांनी शैव संत संबंधर ह्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि म्हणून ते त्यांच्याबरोबर शिव स्थळांच्या तीर्थयात्रेमध्ये सामील झाले. संबंधर ह्यांच्या स्तोत्रांसाठी नीलकंठ नायनार याळ ह्या त्यांच्या संगीत वाद्यावर सुंदर पार्श्वसंगीत आयोजित करायचे. नीलकंठ नायनार ह्यांचं पार्श्वसंगीत लोकप्रिय झाल्याबरोबर त्यांचा अहंकार वाढायला लागला. त्यांना असं वाटायला लागलं की पडिगमच्या (संबंधरांची पवित्र स्तोत्रे) लोकप्रियतेचे कारण त्यांचे पार्श्वसंगीतच आहे. भगवान शिवांनी त्यांचा अहंकार काढून त्यांना शिक्षण देण्याचे ठरवले. संबंधर आणि नीलकंठ नायनार जेव्हा ह्या मंदिरात आले तेव्हा संबंधरांनी आपली पवित्र स्तोत्रे गायला चालू केलं आणि त्याचबरोबर नीलकंठ नायनार ह्यांनी पार्श्वसंगीत जोडण्यास चालू केलं. पण कितीही प्रयत्न केला तरी ते पार्श्वसंगीत जोडू शकत नव्हते. त्यामुळे नीलकंठ नायनार दुःखी झाले. त्यांनी आपलं संगीतवाद्य तोडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस भगवान शिवांनी त्यांच्यावर कृपा केली, त्यांच्या हातातून त्यांचे याळ हे वाद्य घेतले आणि आपण स्वतःच त्या वाद्यावर संबंधरांच्या गायनासाठी पार्श्वसंगीत जोडले. असं करताना भगवान शिवांनी नृत्य पण केले. संबधरांचं पडिगम आणि भगवान शिवांचे पार्श्वसंगीत आणि नृत्य पाहून नीलकंठ नायनार ह्यांचा अहंकार पूर्ण नाहीसा झाला. भगवान शिवांनी इथे याळ हे वाद्य वाजवले आणि नीलकंठ नायनार ह्यांचा अहंकार नाहीसा केला म्हणून इथे त्यांना श्री याळमुरी (घालवला) नाथर असं संबोधलं जातं. जेव्हां भगवान शिवांनी याळ वाजवलं आणि नृत्य केलं तेव्हां पार्वती देवींनी गोड आणि मधुर आवाजात पडिगम गायलं. त्यावेळी असं वाटत होतं की पार्वती देवींच्या मुखातून मध (थेन) आणि अमृत वाहत आहे. म्हणून श्री पार्वती देवींना इथे श्री थेनअमृतवल्ली असं संबोधलं जातं. असा समज आहे की ज्यावेळी श्री पार्वती देवी गात होत्या त्यावेळी एक कोयल पण तिच्या बरोबर गायली.

३. जेव्हां भगवान शिव याळ वाद्य वाजवत होते त्यावेळी श्री दक्षिणामूर्ती हे तन्मयतेने ऐकत होते आणि त्याचा आनंद घेत होते. ते इतके समरस झाले होते कि ते थोडे पाठीमागे झुकले. कोष्टामध्ये जी दक्षिणामूर्तींची मूर्ती आहे त्यामध्ये ते पाठीमागे झुकले आहेत असे चित्रित केले आहेत.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री महाविष्णू, श्री ब्रह्म, श्री युधिष्ठिर, शैव संत संबंधर, श्री यमदेव, श्री नीलकंठ याळट्टनर

वैशिष्ट्ये:

१. श्री दक्षिणामूर्ती थोडे पाठीमागे झुकले आहेत. सहसा श्री दक्षिणामूर्तींना पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसवलेले असते. पण इथे त्यांना भगव्या रंगाचे वस्त्र नेसवले आहे.

२. शैव संत संबंधर ह्यांनी भगवान शिवांची संगीत नियोजक म्हणून स्तुती गायली आहे तर श्री पार्वती देवींच्या मधुर आवाजाची स्तुती गायली आहे.

३. थिरु धर्मपूर अधिनम ह्या संस्थेचे संस्थापक थिरु ज्ञानसंबंधर ह्यांचे इथे देवालय आहे.

४. प्रकारामध्ये इथे एक पवित्र तीर्थ आहे ज्याचे नाव धर्म तीर्थ आहे. हे तीर्थ श्री यमदेवांनी निर्माण केले.

५. इथे श्री युधिष्ठिर ह्यांनी भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या स्थळाला धर्मपूरम असे म्हणतात.    

मंदिराबद्दल माहिती:

मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्ध मंडप, मुख मंडप आणि महा मंडप आहेत. गाभाऱ्याच्या भोवती मंडप आहे. मंदिराच्या पहिल्या पातळीवर पंच स्तरांचं तर दुसऱ्या पातळीवर तीन स्तरांचं राजगोपुर आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. दोन पातळ्यांच्यामध्ये नंदी आणि बलीपीठ आहे. राजगोपुराच्या पहिल्या स्तरावर शैव संत संबंधर आणि त्यांच्या पत्नी ह्यांचे स्टुक्कोचे चित्र आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे आणि त्याला कवच आहे.

कोष्ठ मूर्ती: श्री नर्थन विनायक, श्री दक्षिणामूर्ती (ह्या मूर्तीमध्ये त्यांचे शिर भगवान शिवांचे याळ हे संगीत वाद्य ऐकताना थोडे पाठीमागे झुकले आहे), श्री लिंगोद्भवर आणि त्यांच्या बाजूला श्री विष्णू आणि श्री ब्रह्म आहेत, श्री दुर्गा देवी आणि त्यांच्या मागे महिषासुर आहेत. श्री चंडिकेश्वरांचं देवालय त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे.

इथले शिव लिंग चांदीच्या कवचाने आच्छादित आहे. म्हणून ह्या शिव लिंगावर अभिषेक केला जात नाही. वेळोवेळी सिवेटचा लेप लावला जातो.

अंबिका देवींचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयामध्ये त्या आसनस्थ आहेत. त्यांचा एक हात त्यांच्या मांडीवर आहे. ह्या मुद्रेमध्ये असं भासत आहे कि त्या गात आहेत.

परिक्रमेमधल्या इतर मूर्ती आणि देवालये: श्री विनायक, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री सोमस्कंद, श्री नटराज, शैव संत नालवर, सनातन कुरुवर, ६३ नायनमार, श्री चंद्रशेखर, श्री विशालाक्षी समवेत श्री काशी विश्वनाथ, श्री महालक्ष्मी, नवग्रह, श्री सूर्य, श्री चंद्र आणि श्री भैरव.

श्री विनायकांना इथे श्री कर्पग विनायक असे संबोधले जाते. श्री याळमुरीनाथर ह्यांच्या मिरवणुकीतल्या मूर्तीमध्ये त्यांच्या हातामध्ये याळी हे संगीत वाद्य आहे. त्यांच्या एका बाजूला संबंधर आहेत तर दुसऱ्या बाजूला याळपनर नायनमार आहेत. श्री यमदेवांची मिरवणुकीतली मूर्ती फार सुंदर आहे.

प्रार्थना:

१. ज्यांना गायकीमध्ये प्राविण्य मिळवायचं आहे ते भाविक जन इथे अभिषेक करतात आणि श्री अंबिका देवींना वस्त्र अर्पण करतात.

२. ज्यांना संगीत वाद्य शिकून त्यात प्राविण्य मिळवायचं आहे ते भाविक जन इथे श्री दक्षिणामूर्ती आणि भगवान शिवांची पूजा करतात.

३. असा समज आहे की इथल्या पवित्र तीर्थातले जे भाविक जन तीर्थ प्राशन करतात त्यांच्या सर्व पापांचे क्षालन होते.

४. भाविक जन इथे आयुष्य होम करतात आणि षष्ट्याब्दिपूर्ती (६०व्वा वाढदिवस) साजरी करतात.

५. भाविक जन इथे विवाहातले अडथळे तसेच पुत्रदोषांचे निरसन करण्यासाठी उत्तराषाढा नक्षत्रावर श्री दुर्गादेवींवर अभिषेक करतात.

पूजा:

दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, मासिक आणि साप्ताहिक पूजा, विशेष पूजा केल्या जातात. वैकासि ह्या तामिळ महिन्यातील मूळ नक्षत्रदिवशी इथे शैव संत संबंधर ह्यांची गुरुपूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, संध्याकाळी ५ ते रात्री ९

मंदिराचा पत्ता

श्री याळमुरीनाथर मंदिर,
धर्मपूरम,
कारैक्कल जवळ,
पॉंडिचेरी,
तामिळ नाडू ६०९६०२

दूरध्वनी: +९१-४३६८२२६६१६

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment