हे मंदिर मयीलादुथुराई-थिरुक्कडैयुर मार्गावर मयीलादुथुराईपासून १३ किलोमीटर्स वर आणि सेंबरनार कोविल पासून ५ किलोमीटर्स वर आहे. हे कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील पाडळ पेथ्र स्थळ आहे. मंदिराचे वर्तमान बांधकाम साधारण १२०० वर्षे जुने आहे. ह्या मंदिराची स्तुती अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्या शैव संतांनी ह्यांनी गायली आहे. म्हणून हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. ह्या ठिकाणी कावेरी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. इथे ह्या नदीला बस्वमागिनी असं म्हणतात. इथे १८ शिलालेख आहेत ज्यातील १७ शिलालेख चोळा साम्राज्याच्या काळातले आहेत तर १ विजयनगर साम्राज्याच्या काळातला आहे.
मूलवर: श्री नतृनैअप्पर, श्री स्वर्णपुरीश्वरर
देवी: श्री पर्वतराजपुत्री, श्री स्वर्णाम्बिका, श्री मलयन मदनिथी
पवित्र तीर्थ: स्वर्ण तीर्थ
पवित्र वृक्ष: पुन्नाग, सोनचाफा (तामिळ मध्ये शेनबागम)
क्षेत्र पुराण:
१. इथे असा समज आहे की भगवान शिव आपल्या भक्तांना चांगल्या आयुष्यासाठी आणि सत्यमार्गासाठी मार्गदर्शन करतात. म्हणून इथे भगवान शिवांना नतृनैअप्पर असं संबोधलं जातं.
२. पुराणांनुसार अगस्त्य मुनींच्या कमंडलूमधून कावेरी नदीला मुक्त करण्यासाठी श्री विनायकांनी कावळ्याचं रूप धारण केलं. पण अगस्त्य मुनींनी शाप दिल्याने त्यांना आपल्या मूळ रूपांत येता आलं नाही. ह्या शापातून मुक्त होण्यासाठी श्री विनायक इथे आले आणि त्यांनी इथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली. तीर्थामध्ये डुबकी मारून वर येताच त्यांना स्वर्णवर्ण प्राप्त झाला. म्हणून ह्या स्थळाला पोनसै (म्हणजे तामिळ मध्ये स्वर्ण किंवा बदल) असं नाव प्राप्त झालं. कालांतराने हे नाव पुनचै (पुनजै) मध्ये बदललं.
३. स्थळ पुराणानुसार हे मंदिर शैव संत संबंधर ह्यांच्याशी निगडित आहे. हे संबंधरांच्या मातेचं, म्हणजेच भगवती अम्माईयार, ह्यांचं जन्मस्थान आहे. संबंधरांनी इथे भगवान शिवांची स्तुती केल्यावर त्यांना सुवर्ण प्राप्ती झाली हे ऐकून इथल्या नागरिकांना संबंधरांनी इथे यावं अशी इच्छा झाली. त्यावेळी संबंधर बालवयीन होते. ते आपल्या पित्याच्या खांद्यावर बसून इथे आले. आणि खांदयावर बसूनच त्यांनी स्तोत्र गायलं. त्या स्तोत्राच्या प्रभावाने इथली नापीक जमीन सुपीक झाली. ह्या स्थळाला पुनचै (पुनजै) संबोधण्याचं हे पण एक कारण आहे.
४. स्थळ पुराणानुसार इथे श्री गणेश आणि अगस्त्य मुनी ह्यांना भगवान शिवांच्या विवाहाचे दर्शन घेण्याची दिव्य दृष्टी प्राप्त झाली. ह्या घटनेचं माहात्म्य दर्शवण्यासाठी इथल्या परिक्रमेमध्ये श्री सुंदरेश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
अगस्त्य ऋषी, श्री गणेश आणि शैव संत संबंधर
वैशिष्ट्ये:
१. इथल्या बहुतेक मूर्ती भव्य आणि सुंदररीत्या शिल्पकाम केलेल्या आहेत.
२. इथे चित्राई ह्या महिन्याच्या सप्तमी पासून त्रयोदशी पर्यंत श्री सूर्यदेव आपली किरणे शिव लिंगावर पाडून भगवान शिवांची पूजा करतात. ह्या दिवसांत विशेष पूजा केल्या जातात.
३. इथला गाभारा एवढा मोठा आहे कि एकदा इथे हत्ती गाभाऱ्यात शिरला आणि त्याने भगवान शिवांची पूजा केली होती.
४. इथे भगवान शिवांच्या देवालयावर खूप भव्य विमान (शिखर) आहे ज्याचा आकार एखाद्या घुमटासारखा आहे.
५. इथल्या मुख्य मंडपाला ननीपल्लीकोडीवट्टम असे नाव आहे.
६. इथले सगळे मंडप आणि गाभारा सौंदर्यात्मक बांधले आहेत.
७. गाभाऱ्याच्या भिंतीवर रामायणातल्या घटना उठावदार चित्रांमध्ये चित्रित केल्या आहेत.
८. इथल्या मंडपातल्या स्तंभावर पौराणिक याळीचे शिल्प आहे.
९. भगवान शिव आणि श्री पार्वती देवींनी इथे अगस्त्य ऋषी आणि श्री गणेशांना विवाह मुद्रेमध्ये दर्शन दिलं.
१०. ह्या मंदिरात श्री चंडिकेश्वरर हे आपल्या पत्नींसह भाविकांवर कृपावर्षाव करतात.
११. इथे श्री पार्वती देवींची दोन देवालये आहेत. एका मध्ये त्यांचे नाव श्री मलयन मदनथै आहे तर दुसऱ्यामध्ये त्यांचे नाव श्री पर्वतराजपुत्री आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर असून इथे एक परिक्रमा आहे. इथल्या मुख्य शिखराला स्तर नाहीत. प्रवेशद्वारावर एक कमान आहे ज्यावर भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री विनायक, श्री मुरुगन आणि श्री चंडिकेश्वरर ह्यांची शिल्पे आहेत. इथला गाभारा खूप भव्य आहे. असा समज आहे कि इथे एकदा एक हत्ती भगवान शिवांची उपासना करायला थेट मंदिरात आला होता. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. चित्राई या तामिळ महिन्याच्या सप्तमी ते त्रयोदशी ह्या दरम्यान सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
भगवान शिव मानवांना सत्य मार्गाचे मार्गदर्शन करतात म्हणून इथे भगवान शिवांना श्री नतृनैअप्पर असं संबोधलं जातं.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री विनायक, अगस्त्य मुनी, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा देवी, श्री चंडिकेश्वरर आणि श्री चंडिकेश्वरी.
गाभाऱ्यामध्ये श्री कल्याणसुन्दरेश्वरर आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. इथल्या गाभाऱ्यावरचे विमान (शिखर) तामिळनाडू मधल्या मंदिरातल्या सर्वात भव्य विमानांपैकी एक आहे आणि त्याचे स्थापत्य प्रसिद्ध आहे. इथली श्री नटराजांची मूर्ती कांस्याची आहे आणि साधारण १००० वर्षे जुनी आहे. इथला गाभारा आणि मंडप बघितल्यावर ह्या मंदिराच्या बांधकामामधल्या शिल्पकलेची तसेच सौंदर्यदृष्टीची कल्पना येते. कोष्टामधल्या भिंतींवर रामायणातले देखावे चित्रित करणारी शिल्पे आहेत. इथल्या परिक्रमामधल्या मंडपाचे नाव ननीपल्लीकोडीवट्टम् असे आहे. हा मंडप अतिशय सुंदररित्या बांधला आहे. ह्या मंडपामध्ये श्री दक्षिणामूर्ती, भगवान शिव, श्री ब्रह्मदेव, श्री लिंगोद्भवर आणि श्री चंडिकेश्वरर त्यांच्या पत्नींसमवेत ह्या सुंदर मूर्ती आहेत.
ह्या मंदिरामध्ये श्री अंबिका देवींची दोन देवालये आहेत. भगवान शिवांच्या उजव्याबाजूला श्री पार्वती देवींचे देवालय आहे ज्यामध्ये त्यांचे नाव पर्वतराजपुत्री (श्री स्वर्णाम्बिका) असे आहे. त्यांचे दुसरे देवालय परिक्रमेमध्ये आहे. हे देवालय पश्चिमाभिमुख असून इथे त्यांचे नाव श्री मलयन मदनथै असे आहे.
इथे एक देवालय आहे ज्यामध्ये श्री गणेशांच्या चार मूर्ती आहेत.
कोष्टामधल्या श्री दुर्गादेवींचे नाव श्री कोत्रावैदेवी असे आहे. सहसा श्री दुर्गादेवींच्या मूर्तीमध्ये त्यांच्या पायाखाली महिषासुराची मूर्ती असते, पण इथे त्यांच्या बाजूला सिंह आणि मृग आहेत आणि ते शुंभ आणि निशुंभ दैत्यांचा संहार करत आहे असे दृश्य आहे.
परिक्रमेमधल्या इतर मूर्ती आणि देवालये: श्री विनायकांच्या चार मूर्ती, श्री सुब्रमण्यम श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्या त्यांच्या पत्नींसमवेत, श्री नटराज, नालवर, शिवलिंग आणि श्री सूर्य. मंडपामधल्या एका स्तंभावर याळी (अर्ध मानव आणि अर्ध सिंह) ह्या पौराणिक प्राण्याचे शिल्प कोरले आहे. सहसा ह्या प्राण्याच्या तोंडामध्ये एक दगडी चेंडू चित्रित केलेला असतो पण तो इथे दिसत नाही. ह्या शिल्पाच्या मुखात समजा आपण एखादा दोरा घातला तर तो ह्या प्राण्याच्या शरीराच्या दुसऱ्या छिद्रामधून मधून तो बाहेर येऊ शकतो.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी श्री कल्याणसुंदरेश्वरर ह्यांची पूजा करतात.
२. भाविक जन इथे वैभवप्राप्ती, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच ज्ञानप्राप्तीसाठी श्री नटराज ह्यांची पूजा करतात.
पूजा:
१. दैनंदिन पूजा तसेच प्रदोष पूजा केल्या जातात.
२. चित्राई महिन्याच्या सप्तमी ते त्रयोदशी ह्या दिवसांमध्ये इथे श्री सूर्यांची विशेष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री विनायक चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी आणि अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते १२, संध्याकाळी ५ ते ७
मंदिराचा पत्ता: श्री नतृनैअप्पर स्वामि मंदिर (पुंचाई थिरु ननीपल्ली), ऍट पोस्ट किदाराम कोंडान, तामिळनाडू ६०९३०४
दूरध्वनी: ९१-४३६४२८३१८८
पुजाऱ्याचा दूरध्वनी: श्री वैद्यानंद गुरुकल ९१-९४४३९०६५८७
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment