हे मंदिर मयीलादुथुराई-थरंगंपाडी मार्गावर मयीलादुथुराई पासून १७ किलोमीटर्स वर आहे. सेम्बरनार कोविल पासून ५ किलोमीटर्स वर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या काठावर आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केली आहे. हे माड कोविल शैलीचे मंदिर कोचेंगट चोळा राजाने बांधले. त्यामुळे हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. ह्या मंदिरातील शिलालेखांमध्ये चोळा आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केलेल्या कामांचा आणि दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे.
पाडळ पेथ्र स्थळांमध्ये दोन प्रकारची माडम शैलीची मंदिरे आहेत. पहिल्या प्रकाराला थूंगनैमाडम असं म्हणतात ज्याचा अर्थ ही मंदिरे मानवनिर्मित टेकड्यांवर आहेत. दुसऱ्या प्रकाराला थानथोंड्रीमाडम असं म्हणतात ज्याचा अर्थ ही मंदिरे अशा टेकड्यांवर आहेत ज्या टेकड्या वासुकी आणि आदिशेष ह्यांच्या द्वंद्वामध्ये मेरू पर्वताच्या शिखराचे तुकडे उडाले आणि ते जिथे पडले तिथे ह्या टेकड्या निर्माण झाल्या. हे मंदिर थानथोंड्रीमाडम प्रकाराचं आहे.
मूलवर: श्री थानथोंड्रीश्वरर मंदिर, श्री स्वयंभूनाथर
देवी: श्री कडगनेत्रीअंबाळ, श्री वाळनेडुंगकन्नी अंबिका
क्षेत्र तीर्थ: कुमुद तीर्थ
क्षेत्र वृक्ष: बहुवा, बिल्व आणि सुपारी
पूजा / आगम: कारण आगम
पुराणिक नाव: यरुक्कुऊर
वर्तमान नाव: आक्कूर
ऐतिहासिक नाव: शंखारण्यं
क्षेत्र पुराण:
१. स्थळ पुराणानुसार कोचेंगट चोळा राजाला पोटामध्ये झालेल्या व्रणामुळे त्रास होत होता. एकदा आकाशवाणीने त्याला सांगितले की त्याने तीन वृक्ष असलेल्या स्थळी मंदिर बांधले तर त्याची या रोगातून मुक्तता होईल. त्याने इथे बहुवा, बिल्व आणि सुपारी अशी तीन वृक्षे पाहिली आणि इथे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. बांधकाम चालू असताना त्याने आदल्या दिवशी बांधलेली भिंत दुसऱ्यादिवशी पडत होती. राजाने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. भगवान शिवांनी राजाला ४८ दिवस रोज १०० ब्राह्मणांना अन्नदान करण्याची आज्ञा केली. प्रत्येक दिवशी एका ब्राह्मणाची कमतरता भासत होती. शेवटच्या दिवशी १००० ब्राह्मण आले आणि त्यात एक नवीन ब्राह्मण होता जो वृद्ध होता. राजाने त्या वृद्ध ब्राह्मणाला त्याचा ठावठिकाणा विचारला. तेव्हां त्या वृद्ध ब्राह्मणाने उलट प्रश्न विचारून उत्तर दिले. त्याने तामिळ भाषेत विचारले “यरुक्कुऊर?” म्हणजे “ही जागा कोणाची आहे?”. हा प्रश्न ऐकल्यावर राजाचे रक्षक क्रोधीत झाले आणि त्यांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला पळवून लावले. तो वृद्ध ब्राह्मण पळून जाऊन एका वारुळामध्ये गुप्त झाला. रक्षकांनी ते वारूळ पहारीने खणले तेव्हां त्यांना तिथे शिव लिंग सापडले. आणि त्या शिव लिंगावर ज्या पहारीने ते वारूळ खणले त्या पहारीचा वण पण आढळला. अजूनही इथे शिव लिंगावर तो वण दिसतो.
२. इथे मंदिराच्या मागे एक विनायकांचे देवालय आहे. त्याला श्री पोय्या विनायक असे संबोधले जाते. स्थळ पुराणानुसार इथल्या राजाला मंदिर बांधताना काही समस्या निर्माण झाल्या. आदल्या दिवशी बांधलेलं मंदिर दुसऱ्यादिवशी पडून जायचं. एकदा श्री विनायक एका ब्राह्मणाच्या रूपांत आले आणि त्यांनी राजाकडे त्याच्या समस्येबद्दल चौकशी केली. जेव्हां त्यांना समस्या कळली तेव्हां त्यांनी राजाला मंदिराच्या तीर्थामध्ये डुबकी मारून काही वेळ पाण्यात राहण्याचा सल्ला दिला जेणेकरून राजाला त्याच्या समस्येवर उपाय मिळेल. राजाला तीर्थात डुबकी मारून उपाय मिळेल ह्यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हां श्री विनायकांनी त्याला सांगितलं की हे स्थळ काशीपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि इथल्या तीर्थात डुबकी मारल्याने मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू त्याला प्राप्त होतील ज्या वस्तू काशीमध्ये राहिल्या होत्या. राजाचा संशय दूर झाला. जेव्हा तो श्री विनायकांनी सांगितल्याप्रमाणे तीर्थात डुबकी मारून वरती आला तेव्हां त्याच्याबरोबर मंदिराचा गाभारा पण वरती आला. राजाला खूप आनंद झाला आणि त्याने नंतर कुठलाही उशीर ना करता मंदिर बांधले.
३. स्थळ पुराणानुसार आक्कूर गावाच्या रहिवाश्यांनी राजाकडे मंदिर बांधण्याची विनंती केली होती. राजाने परवानगी दिल्यावर त्यांनी मंदिरासाठी जागा निवडली आणि जमिनीचे सपाटीकरण चालू केले. सपाटीकरण चालू असताना त्यांना एका ठिकाणी उच्च स्वरात एक आवाज ऐकू आला. त्या ठिकाणी खनन करताना त्यांना शिव लिंग सापडले जे तेजाने तळपत होते. म्हणून त्यांनी इथे मूळ मंदिर बांधले असावे. आणि भगवान शिव इथे स्वतःहून आले म्हणून ह्या शिव लिंगाचे नाव त्यांनी थानथोंड्रीश्वरर (स्वतः प्रकट होणे) असे ठेवले असावे. खनन करताना पहारीने केलेल्या वाराचे चिन्ह अजूनही शिव लिंगावर बघावयास मिळते. जाणकारांच्या मते मार्कंडेयांना न्यायला आलेल्या यमराजांना थांबविण्यासाठी ह्याच शिव लिंगातून भगवान शिव बाहेर आले. ह्यातून असं प्रदर्शित होतं की मूळ मंदिर कोचेंगट चोळा राजा, ज्याने हे शिव लिंग शोधून काढलं आणि मंदिर बांधलं, त्याच्याही आधीपासून अस्तित्वात असावं.
४. पुराणानुसार भगवान शिव आणि श्री पार्वती देवी विश्व भ्रमण करत होते त्यावेळी श्री पार्वती देवींना पृथ्वीवर एका छान महालामध्ये राहण्याची इच्छा झाली. भगवान शिवांनी श्री पार्वती देवींचं मन वळविण्याचा भरपूर प्रयत्न केला पण तो फोल ठरला. स्वर्गीय वास्तुविशारद विश्वकर्मा ह्यांनी पुलस्ती ऋषींच्या नेतृत्वाखाली एक सुंदर महाल बांधला आणि गृहप्रवेश विधी पण केला. गृहप्रवेशानंतर भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांनी पुलस्ती ऋषींना त्यांना दक्षिणा काय द्यावी ह्याची विचारणा केली. पुलस्ती ऋषी म्हणाले की ते भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करून समाधानी आहेत. पण पुलस्ती ऋषींच्या पत्नीला महाल प्राप्त करण्याची इच्छा होती. ह्यामुळे श्री पार्वती देवींना राग आला आणि त्यांनी तो महाल युद्धभूमीमध्ये परिवर्तित होईल असा शाप दिला. श्री पार्वती देवींनी भगवान शिवांकडून अत्री ऋषींची कन्या म्हणून जन्म घेण्याची अनुमती मागितली. श्री पार्वती देवी भगवान शिवांपासून दूर गेल्यावर भगवान शिव ध्यानामध्ये मग्न झाले. बऱ्याच काळानंतर अगस्त्य मुनींनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या एकत्र दर्शनाचा लाभ कधी होईल असं भगवान शिवांना विचारलं. भगवान शिवांनी सांगितलं की सध्या श्री पार्वती देवी अत्री ऋषींची कन्या कडगनेत्री म्हणून पृथ्वीवर वास्तव्य करत आहेत. आणि आता त्यांच्या पुनर्मीलनाची वेळ जवळ आली आहे. पण जर अंबिका देवींनी विवाहासाठी जप केला तर विवाह अजूनही लवकर होईल. जेव्हां श्री पार्वती देवींनी अगस्त्य मुनींना भगवान शिवांबरोबर पुनर्मीलन होण्यासाठी कुठला मंत्र जपावा असं विचारलं तेव्हां अगस्त्य मुनींनी त्यांना स्वयंवर मंत्र दिला. तेव्हापासून श्री पार्वती देवींनी जप करण्यास आरंभ केला. आणि नंतर लवकरच भगवान शिव आले आणि त्यांनी श्री पार्वती देवींबरोबर विवाह केला. हा विवाह पंगूनी ह्या तामिळ महिन्यातील वसंत नवरात्रीमध्ये साजरा झाला. ह्या ठिकाणी म्हणजेच आक्कूर मध्ये श्री पार्वती देवींनी जप केला. त्यांच्या साठी जो महाल बांधला गेला तो श्रीलंके मध्ये होता. रावण आणि कुबेर हे पुलस्ती ऋषींचे नातू होते.
५. पुलस्ती ऋषी, विश्वरस ऋषी, अगस्त्य ऋषी आणि अत्री ऋषी ह्यांनी ह्या ठिकाणी वास्तव्य केले आहे.
६. स्थळ पुराणानुसार सिरप्पूली नायनार हे अन्नदान करायचे आणि हे अन्नदान सर्वांना खुलं असायचं. सिरप्पूली नायनार ह्यांची हि जन्मभूमी आहे. इथे त्यांना मोक्ष प्राप्त झाला.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
पुलस्ती ऋषी, विश्वरस ऋषी, अगस्त्य ऋषी, अत्री ऋषी, रावण, कुबेर, सिरप्पूली नायनार, शैव संत संबंधर आणि कोचेंगट चोळा राजा.
वैशिष्ट्ये:
१. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्या दोघांचीही देवालये पूर्वाभिमुख आहेत.
२. श्री सरस्वती देवी ह्यांचे इथे स्वतंत्र देवालय आहे.
३. श्री मुरुगन ह्यांचे देवालय रथाच्या आकाराचे आहे.
४. शैव संत संबंधर ह्यांनी त्यांच्या स्तोत्रांमधे आक्कूर गावातल्या भक्तांची, ज्ञानी ब्राह्मणांची तसेच ह्या मंदिराची स्तुती गायली आहे.
५. ६३ नायनमारांमधले सिरप्पूली नायनार ह्यांची ही जन्मभूमी आहे.
६. हे मंदिर अशा स्थानांपैकी एक आहे जिथे भगवान शिवांनी अगस्त्य मुनींना दर्शन दिले.
७. हे अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे जिथे षष्ठ्याब्दीपूर्ती सोहळा (म्हणजेच ६०व्वा वाढदिवस) साजरा केला जातो.
८. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी इथल्या श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून इथे तीन स्तरांचं राजगोपुर आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. बलीपीठ आणि नंदी हे राजगोपुराच्या पुढे आहेत. मुख्य गाभारा आणि मंडपे उंचावलेल्या पीठावर आहेत. गाभारा, अंतराळ, अर्ध मंडप, महामंडप आणि मुख मंडप वरच्या पातळीवर आहेत. वरच्या पातळीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. इथले शिव लिंग स्वयंभू लिंग आहे आणि त्यावर एक भेग आहे.
कोष्ठ मूर्ती: अगस्त्य मुनी, श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गा देवी.
अंबिका देवींचे देवालय पूर्वाभिमुख असून ते भगवान शिवांच्या देवालयाच्या बाजूला आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत. परिक्रमेमध्ये श्री विनायक, श्री मुरुगन, श्री सरस्वती देवी, श्री विशालाक्षी देवींसमवेत श्री विश्वनाथ, सिरप्पूली नायनार, शैव संत मूवर, सुंदरर आणि त्यांच्या पत्नी श्री संगीली नाचियार आणि श्री परवै नाचियार, महालिंग, श्री बाल मुरुगन, शैव संत अरुणागिरिनाथर, श्री गजलक्ष्मी, श्री कैलासनाथर, श्री भैरव आणि श्री सूर्य. रथयात्रेच्या मूर्ती स्वतंत्र देवालयामध्ये आहेत आणि त्यांना आयिरथतील ओरुवर असे संबोधले जाते. सुरक्षितेच्या दृष्टीने इथे मूर्ती न ठेवता त्यांची छायाचित्रे ठेवली आहेत.
श्री मुरुगन ह्यांचे देवालय रथाच्या आकाराचे आहे आणि खूप सुंदर आहे. पाठीमागे श्री विनायक ह्यांचे देवालय आहे. त्यांना श्री पोय्या विनायक असे संबोधले जाते.
प्रार्थना:
१. भाविक जनांची अशी श्रद्धा आहे की मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी इथे श्री अंबिकादेवींची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वैभवाची प्राप्ती होते.
२. विवाहातील अडचणींचा परिहार करण्यासाठी भाविक जन इथे श्री अंबिका देवींची पूजा करतात आणि स्वयंवर होम करतात.
३. भाविक जन इथे संतान प्राप्तीसाठी संतान गोपालकृष्ण होम करतात. ह्यासाठी ते श्री अंबिका देवींची पांढऱ्या रंगाच्या कमळांनी पुढील दिवशी अर्चना करतात - शुक्रवार आणि श्री अंबिका देवींच्या पूजेसाठी शुभ मानले गेलेले दिवस जसे अष्टमी, पौर्णिमा, प्रदोष, मंगळवार, रविवार किंवा ज्या नक्षत्रावर अर्चना करणाऱ्याचा जन्म झाला त्या नक्षत्र दिवशी.
४. भाविक जन वैभव प्राप्तीसाठी श्री भैरवांची कृष्णाष्टमीला सहस्रनामांनी अर्चना करतात.
५. ग्रहांच्या प्रतिकूल परिणामांचा परिहार करण्यासाठी भाविक जन इथे नवग्रह होम करतात.
६. सर्व प्रकारच्या प्रयत्नांमध्ये यश मिळावं म्हणून इथे भाविक जन श्री दुर्गासप्तशती होम करतात.
७. तसेच इथे भाविक जन वराह होम आणि कूर्म होम पण करतात.
पूजा:
कारण आगमानुसार इथे दैनंदीन पूजा केल्या जातात तसेच प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, रविवारी आणि पौर्णिमेला विशेष पूजा केल्या जातात. कृष्णाष्टमीला श्री भैरवांची विशेष पूजा केली जाते. तसेच प्रदोष पूजा पण नियमित केली जाते.
मंदिरात साजरे होणारे महत्वाचे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई, प्रत्येक सोमवारी भगवान शिवांवर १०८ शंखांचा अभिषेक, पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर सिरप्पूली नायनार ह्यांची गुरुपूजा केली जाते.
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते ११, संध्याकाळी ५ ते ८
मंदिराचा पत्ता:
श्री थानथोंड्रीश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट आक्कूर,
तालुका: थरंगंपाडी,
जिल्हा: नागपट्टीनं,
तामिळनाडू ६०९३०१
दूरध्वनी: +९१-९८६५८०९७६८, +९१-९७८७७०९७४२
पुरोहिताची संपर्क माहिती:
श्री नागराज गुरुक्कल - +९१-७५०२२२२८५०
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment