हे मंदिर अक्कुर मार्गे मयीलादुथुराई-पुम्पूहार मार्गावर मयीलादुथुराई पासून १८ किलोमीटर्स वर आहे.
हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे आणि ह्याची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी गायली आहे. हे माड शैलीचे मंदिर कोचेंगट चोळा राजाने बांधले. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर विजयनगर राजांनी ह्याचा विस्तार केला. इथे दहा शिलालेख आहेत ज्यामधे उत्तम चोळा राजा आणि सिम्बिअन महादेवी (राणी) ह्यांचे उल्लेख आहेत. हे मंदिर पुम्पूहार पासून खुप जवळ आहे. हे स्थळ संगम काळाच्या मदल मारयवन् ह्याचे जन्मस्थान आहे. पूर्वी तामिळ नाडू मध्ये जमिनींना किंवा गावांना ज्यांनी देणग्या दिल्या त्यांच्या नावावरून नाव ठेवण्याची प्रथा होती. म्हणून ह्या स्थळाला तलै + शंख + काडू = तलैचेंकाडू असे नाव प्राप्त झाले.
मुलवर: श्री शंखअरण्येश्वरर, श्री शंखअरुणनाथर, श्री पलाशपुरेश्वरर
उत्सव मूर्ती: सोमस्कंदर
देवी: श्री सौंदर्यनायकी, श्री बृहद्सुंदराम्बिका
क्षेत्र वृक्ष: पळस वृक्ष (तामीळमध्ये पुरसू)
पवित्र तीर्थ: शंख तीर्थ, कावेरी नदी
पूजा / आगम: कारण आगम
पुराणिक नाव: थिरुतलैचेंकाडू
ऐतिहासिक नाव: शंखवनम, शंख अरण्यं, तलैचंगनम्
वर्तमान नाव: तलैचेंकाडू
क्षेत्र पुराण:
१. विश्व आणि मानवांचं रक्षण करण्यासाठी श्री महाविष्णूंनी श्री शंखअरण्येश्वरर ह्यांची पूजा केली. भगवान शिवांनी त्यांना पांचजन्य (तामिळ मध्ये तलीचंगू) नावाचा शंख प्रदान केला. सर्व शंखांमध्ये हा शंख अग्रगण्य समजला जातो (शंख हे श्री महाविष्णूंचे अस्त्र आहे).
२. काही जाणकारांच्या मते ह्या स्थळाचे पुराण आणि थिरुवलम्पुरी ह्या स्थळाचे पुराण सारखेच आहे.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री महाविष्णू, शैव संत संबंधर
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग उंच आहे आणि त्याचे वैशिष्ट्य असे आहे की ह्या लिंगावर तिळाच्या तेलाचा अभिषेक करताना जटा दिसतात.
२. ह्या मंदिराची रचना सोमस्कंद शैलीची आहे.
३. इथल्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार इतकं छोटं आहे की त्यातून हत्ती आत जाऊ शकत नाही.
४. लिंगोद्भवर ह्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्या दोन्ही बाजूंना श्री महाविष्णू आणि श्री ब्रह्मदेव त्यांची पूजा करत आहेत असे चित्रित केले आहे.
५. गाभाऱ्याच्या प्रवेशावर संगनिधी आणि पद्मनिधी ह्यांची उठावदार चित्रे आहेत.
६. येथील क्षेत्र वृक्षाखाली (पळस वृक्ष) शिव लिंग आणि श्री विनायकांची मूर्ती आहे.
७. ह्या क्षेत्राची महती बिल्वारण्य, वेदारण्य, श्वेतारण्य आणि वडवारण्य ह्यांच्या तुल्यबळ आहे.
८. शिव लिंगाचा पाया (अवूदयार) शंखाच्या आकाराचा आहे.
९. इथे श्री महाविष्णूंचे स्वतंत्र देवालय आहे. सहसा शिव मंदिरामध्ये असे आढळत नाही.
मंदिराबद्द्ल माहिती:
हे मंदिर माड शैलीचे असून पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराला राजगोपुर नाही. इथे दोन परिक्रमा आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्ध मंडप आहे. गाभाऱ्याचा आकार अर्धवर्तुळाकार खंदकासारखा आहे. हे मंदिर थोडे उंचावर आहे आणि ह्याचा व्याप साधारण दोन एकर आहे. मंदिराचे तीर्थ मंदिराच्या पुढ्यात आहे. ह्या मंदिराची रचना सोमस्कंद रचनेसारखी आहे. म्हणजेच जसे आपण ह्या मंदिराच्या डाव्या बाजूने प्रवेश करतो तसे पहिले आपल्याला शिव लिंगाचं दर्शन होतं, त्यानंतर श्री कार्थिकेयांचं आणि त्यानंतर श्री पार्वती देवींचं दर्शन होतं. अशीच रचना थिरुवेंकाडू, थिरुमारीकाडू आणि थिरुछायाकाडू इथे पण आहे. इथली मूलवर मूर्ती शंखाच्या आकाराची आहे. इथला गाभारा इतर मंदिरांच्या तुलनेत मोठा आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशावर संगनिधी आणि पद्मनिधी (वैश्विक कोट्याधीश) ह्यांची शिल्पे आहेत. इथले शिव लिंग तीन फूट उंच आहे आणि स्वयंभू आहे. भगवान शिव आणि उत्सव मूर्ती सोमस्कंद ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. लख्ख उजेड असताना जेव्हा ह्या शिव लिंगावर तिळाच्या तेलाने अभिषेक केला जातो त्यावेळी ह्या शिव लिंगावर जटेची मुळे दिसतात.
कोष्ठ मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म आणि श्री दुर्गा देवी.
श्री दुर्गा देवींची मूर्ती जरा मोठी असल्याकारणाने ती कोनाड्याच्या बाहेर ठेवली आहे. अर्ध मंडपामध्ये नालवर (चार श्रेष्ठ शैव संत) तसेच कोचेंगट राजा ह्यांचं त्यांच्या पत्नीसमवेत शिल्प आहे. ह्याच्या जवळच श्री वल्लभ विनायक आणि कावेरी नदी ह्यांची शिल्पे आहेत. अंबिका देवींचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि मंडप आहे. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्यांचे हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत.
परिक्रमेमधील इतर मूर्ती आणि देवालये: श्री विनायक, श्री शृंगार सुब्रह्मण्य (तामिळ मध्ये सिंगार), श्री भूदेवी आणि श्री श्रीदेवी ह्यांच्या समवेत श्री श्रीनिवास, शिव लिंग, श्री धनाकर्षण वायू लिंगेश्वरर, श्री नीळकंठेश्वरर, श्री अखिलान्डेश्वरर, श्री भुवनेश्वरर, श्री वलम्पुरी विनायक, श्री बालसुब्रमण्य, कावेरी नदी, अगस्त्य ऋषी, श्री महालक्ष्मी, श्री ज्येष्ठा देवी, श्री भैरव, श्री सूर्यदेव, श्री प्रदोष नायकर, नालवर, पट्टिनाथर आणि कोचेंगट चोळा राजा ह्या मूर्ती एका रांगेत आहेत तर दुसऱ्या रांगेत पुढील मूर्ती आहेत - श्री चंडिकेश्वरर, श्री महाविष्णू, श्री ज्वरहरेश्वरर, श्री सीतासमवेत श्री श्रीराम.
प्रार्थना:
१. भाविक स्त्रिया इथे अपत्य प्राप्तीसाठी श्री पार्वतीदेवींची पूजा करतात. पौर्णिमेच्या दिवशी त्या उपवास करून पौर्णिमा व्रत करून पूजा करतात. उपवास सोडण्यासाठी श्री पार्वती देवींना लावलेल्या चंदनांतलं थोडंसं चंदन ग्रहण करतात.
२.भाविक जन आपल्या अपत्यांच्या कल्याणासाठी भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची पूजा करतात.
पूजा:
नियमित दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा तसेच पौर्णिमेला विशेष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी आणि अन्नाभिषेक. स्कंद षष्ठी उत्सवामध्ये एके दिवशी लक्षार्चना केली जाते
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्रि
वैकासि (मे-जून): विशाखा नक्षत्रावर ५ दिवसांचा उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते ११, संध्याकाळी ५ ते ७.३०
मंदिराचा पत्ता:
श्री शंखअरण्येश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट अक्कुर,
तालुका: तरंगंपडी,
तामिळनाडू ६०९३०१
दूरध्वनी: +९१-४३६४२८०७५७
पुरोहिताचा संपर्क:
श्री बालचंद्रन - +९१-९४४३४०१०६०
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment