Saturday, September 28, 2024

सप्त मातृका - श्री चामुंडी - श्री वडारण्येश्वरर

हे मंदिर वल्ललर कोविल ह्या नावाने पण प्रसिद्ध आहे. ह्या मंदिरामध्ये सप्त मातृकांपैकी श्री चामुंडी देवी ह्यांनी महिषासुर ह्या राक्षसाची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी भगवान शिवांच्या आज्ञेवरून भगवान शिवांची पूजा केली. 


श्री चामुंडी देवी:

ह्यांना श्री पिडारी आणि श्री भद्रकाली अशी पण नावे आहेत. भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्रामधून त्या बाहेर आलेले दात आणि उग्र मुख अशा रूपात प्रकट झाल्या. कालांतराने त्या श्री चामुंडी देवीमध्ये रूपांतरित झाल्या. त्यांना एक मुख आहे आणि सोळा हात आहेत. त्या व्याघ्राजिन परिधान करतात. त्यांचा वर्ण काळा आहे आणि त्यांना तीन नेत्र आहेत. काही वेळेला त्यांना त्या महिषासूराच्या मृत शरीरावर बसल्या आहेत अशा रूपात चित्रित केलं जातं. त्या सापांचा हार परिधान करतात. त्यांना पुढे आलेले दात आहेत. त्यांची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळवता येतो आणि इच्छिलेली वरदाने प्राप्त होतात. त्यांना रुद्राचे अंश मानलं जातं. चंड आणि मुंड ह्या राक्षसांना मारण्यासाठी त्या प्रकट झाल्या. श्री चामुंडी रूपामध्ये त्यांना एक शिर, चार हात, तीन नेत्र, तीक्ष्ण टोकदार दात आहेत. त्यांचा वर्ण काळा आहे, त्या वाघाचं कातडं आणि कवट्यांची माळ परिधान हरतात. डाव्या हातात त्या त्रिशूल परिधान करतात आणि छेदलेलं शिर धरतात. त्यांच्या उजवीकडील वरच्या हातामध्ये तलवार असते तर डाव्या हातामध्ये कवटी असते. त्या मृत झालेल्या महिषासुरावर बसल्या आहेत. त्यांचं मुख क्रूर आणि भीतीदायक आहे. त्यांना विजयाची देवता मानलं जातं. भाविक जन शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी तसेच शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी त्यांची पूजा करतात. त्यांची पूजा केल्यामुळे पती पत्नीमध्ये सुसंवाद साधतो. त्या सप्त मातृकांमधल्या पहिल्या मातृका देवी आहेत. 


ह्या ठिकाणी त्या श्री अष्टादशभुजा स्वरूपात भक्तांवर कृपावर्षाव करतात.


ह्या मंदिराला श्री मेधा दक्षिणामूर्ती असं पण म्हणतात. हे पंच दक्षिणामूर्ती स्थळांपैकी एक आहे. कावेरी नदीच्या उत्तर काठावर हे मंदिर वसलं आहे.


मुलवर: श्री वडारण्येश्वरर, श्री वल्ललर

देवी: श्री ज्ञानाम्बिका

पवित्र तीर्थ: कावेरी

स्थळ: मयीलादुथुराई, तामिळ नाडू


क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार एकदा ऋषभ (म्हणजेच श्री नंदीदेव) भगवान शिवांना विविध स्थळीं घेऊन गेले. त्या वेळी श्री पार्वती देवी पृथ्वीवर लांडोरीच्या रूपामध्ये भगवान शिवांची पूजा करत होत्या. ह्या पूजे मध्ये सहभागी होण्यासाठी श्री ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन, भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन आणि इतर देवता त्यांच्या त्यांच्या वाहनावर आरूढ होऊन पूजेच्या ठिकाणी आले. भगवान शिवांच्या कृपेने नंदीदेव सर्वात आधी पोचले. आपण भगवान विष्णूंच्या आधी पोचलो ह्या भावनेने श्री नंदीदेवांना अहंकार झाला. ह्या अहंकाराचा नाश करण्यासाठी भगवान शिवांनी आपल्या जटांमधला एक केस श्री नंदीदेवांवर ठेवला ज्यामुळे श्री नंदीदेव मूर्च्छित झाले आणि ते खाली जाऊ लागले. श्री नंदीदेवांना आपल्या अहंकाराची जाणीव झाली. त्यांनी भगवान शिवांकडे क्षमाप्रार्थना केली. भगवान शिवांनी श्री नंदीदेवांना कावेरी नदीच्या काठावरील एका स्थळी जाऊन तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. तपश्चर्येच्या अंती भगवान शिवांनी श्री नंदीदेवांना श्री दक्षिणामूर्तींच्या रूपात दर्शन दिलं आणि उपदेश पण दिला. श्री नंदीदेवांनी भगवान शिवांना ह्या स्थळी श्री दक्षिणामूर्तींच्या रूपात कायम राहण्याची विनंती केली. त्यांनी श्री दक्षिणामूर्तींची ८ स्तोत्रे रचून स्तुती केली. ह्या स्थळी श्री दक्षिणामूर्तींचे नाव श्री मेधा दक्षिणामूर्ती असे आहे. ह्या स्थळी भगवान शिवांनी आनंद तांडव नृत्य केलं.


पुराणांनुसार


१. जे कोणी श्री नंदीदेवांनी रचलेल्या ८ स्तोत्रांनी श्री दक्षिणामूर्तींची पूजा करतील त्यांना ज्ञानप्राप्ती होईल, त्यांचा अहंकार निघून जाईल आणि त्यांच्या सर्व पापांचं आणि दोषांचं निवारण होईल.


२. जे ऋषभ तीर्थामध्ये स्नान करतील त्यांना गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा आणि ताम्रभरणी नदींमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. तसेच त्यांना कुरुक्षेत्र, प्रयाग आणि इतर तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. 


३. हे स्थळ गुरु ग्रहदोषांचे परिहार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच अपत्यप्राप्तीसाठी तसेच ज्ञान, बुद्धी आणि शिक्षणांत प्रगती होण्यासाठी प्रार्थना करतात.


मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर साधारण १२०० वर्ष जुनं आहे. असा समज आहे कि हे मंदिर चोळा साम्राज्यातल्या राजांनी बांधलं आहे आणि ते सध्या धर्मपूरम अधिनम ह्यांच्या नियंत्रणाखाली आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. हे मंदिर २ एकरवर पसरलेलं असून त्याला दोन परिक्रमा आहेत. प्रवेशद्वाराजवळ श्री विनायक, श्री मुरुगन, श्री पार्वती देवी आणि श्री दक्षिणामूर्ती ह्यांच्या मूर्ती आहेत. येथील अधिष्ठान देवता पश्चिमाभिमुख आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. कोष्ठा मध्ये श्री गणपती, श्री मेधा दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री चंडिकेश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथली श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती ज्यांना इथे गुरु भगवान म्हणतात, दक्षिणाभिमुख असून ते श्री नंदीदेवांवर आरूढ झालेले आहेत. ते वटवृक्षाच्या खाली आहेत, त्यांनी चंद्रकोर धारण केली आहे, त्यांचा उजवा हात ज्ञानमुद्रेत आहे तर डाव्या हातामध्ये पुस्तक धरलेलं आहे. त्यांच्या पायाशी चार सनत्कुमार ऋषी बसले आहेत ज्यांच्यापुढे श्री दक्षिणामूर्ती हे खूप तरुण दिसत आहेत. श्री दक्षिणामूर्तींच्या शिरावर गंगा आहे, अग्नी आहे आणि त्यांच्या शरीरावर विभूती विलेपली आहे. त्यांच्या पायाखाली एक राक्षस आहे तो अज्ञानाचे प्रतीक आहे. 


श्री देवींचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या देवालयामध्ये सप्त मातृका, श्री गणेश, श्री मुरुगन त्यांच्या पत्नी श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांसह, श्री शनैश्वर, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री मंगळ ह्यांच्या मूर्ती आहेत तसेच अगस्त्य लिंग आणि ब्रह्म लिंग पण आहे. 


पंच दक्षिणामूर्ती स्थळे:

मयीलादुथुराई च्या आसपास पंच दक्षिणामूर्ती स्थळे आहेत.

१. श्री मयूरनाथर मंदिर (मयीलादुथुराई)

२. श्री मार्गसहेश्वरर मंदिर (मुवलूर). इथे भगवान शिवांना श्री वळीकट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं

३. श्री उचिरावनेश्वरर (थिरुविलनगर). इथे भगवान शिवांना श्री थूरैकट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं

४. श्री वेदारण्येश्वरर (मयीलादुथुराई). इथे भगवान शिवांना श्री ककट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं

५. श्री वागेश्वरर (पेरूमचेरी). इथे भगवान शिवांना श्री मोळीकट्टूमवल्लाळ असं संबोधलं जातं


मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): चैत्र पौर्णिमेला चंडी होम

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव 

पुरत्तासी (सप्टेंबर-ॲाक्टोबर): नवरात्र 

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): विशेष पूजा, पौर्णिमा आणि अमावास्येला विशेष अभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): शेवटच्या गुरुवारी विशेष पूजा केल्या जातात, कार्थिगई दीपम

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): अरुद्र दर्शन उत्सव

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, मासी माघम

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरम


गुरु गोचराच्या (गुरुग्रहाचे एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण) समयास इथे विशेष पूजा केली जाते. 


ह्या मंदिराशिवाय अजून एक मंदिर आहे जिथे श्री चामुंडी देवींनी श्री पार्वती देवींसमवेत भगवान शिवांची पूजा केली. त्या मंदिराला पुल्लमंगई असा म्हणतात आणि येथील भगवान शिवांचे नाव श्री अलनथुराईनाथर असे आहे. ह्या मंदिराबद्दल ची माहिती आम्ही Shri Alanthurai Nathar Temple ह्या शीर्षकाखाली ऑक्टोबर ५ २०१९ ला इंग्लिश मध्ये प्रकाशित केली आहे. ह्याचे मराठी भाषांतर आम्ही लवकरच प्रकाशित करू.

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment