Thursday, September 12, 2024

सप्त मातृका - श्री कौमारी - श्री पंचवटीश्वरर

सप्त मातृकांमधल्या श्री कौमारी ह्यांनी राक्षसांची हत्या करून प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी इथे भगवान शिवांची पूजा केली. श्री कौमारी ह्या श्री सुब्रमण्यम, ज्यांना श्री कुमारस्वामी असं पण म्हणतात, ह्यांच्या शक्ती आहेत. श्री कौमारीदेवींना श्री षष्ठी देवी किंवा श्री देवसेना देवी असं पण संबोधलं जातं. त्यांना सहा मुखे आहेत, बारा नेत्र आहेत आणि बारा हात आहेत. त्यांचा वर्ण किंचित रक्तवर्ण आहे. त्यांच्या ध्वजावर मोराचे चिन्ह आहे. त्यांचे वाहन मोर आहे. त्या वीरतेचं प्रतीक आहेत आणि निर्भय आहेत. त्यांच्यामुळेच श्री सुब्रमण्यम ह्यांना राक्षसांवर विजय मिळवता आला. सहा कृत्तिका कन्या त्यांची सेवा करतात. त्या आपल्या हातांमध्ये त्रिशूल आणि भाला धारण करतात. तसेच त्यांचे दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. कधी कधी त्यांच्या ध्वजावर कोंबडा हे चिन्ह पण असतं. त्या अपत्य प्राप्तीचे वरदान देतात आणि अपत्यांचं रक्षण पण करतात.


मुलवर: श्री पंचवटीश्वरर, श्री जटानादर

देवी: श्री बृहन्नायकी, श्री कल्याणसुंदरी


क्षेत्र पुराण:

ऋषी आनंदमुनी ह्यांच्यासाठी भगवान शिवांनी येथे आनंद तांडव नृत्य केले म्हणून ह्या स्थळाला आनंदतांडवपुरम असं नाव प्राप्त झालं. 


भारद्वाज ऋषींची श्री पार्वती देवी आणि भगवान शिव ह्यांना वधूवरांच्या रूपात पाहण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या प्रार्थनेला मान देऊन श्री पार्वती देवी आणि भगवान शिवांनी त्यांना इथे वधूवरांच्या रूपात दर्शन दिलं. म्हणून इथे श्री पार्वती देवींचे नाव श्री कल्याणसुंदरी असे आहे. श्री कल्याणसुंदरी ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे. तसेच श्री बृहन्नायकी देवी ह्यांचे पण स्वतंत्र देवालय आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. 


६३ नायनमारांपैकी श्री मनकंजर हे भगवान शिवांचे कट्टर भक्त होते. ते येथील राजाच्या सैन्याचे सेनापती होते. त्यांच्या पत्नीसमवेत त्यांनी भगवान शिवांची मनोभावे भक्ती केली. त्यांना अपत्य नव्हते. ते आपल्या पत्नीसमवेत भगवान शिवांकडे अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करायचे. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना अपत्यप्राप्तीचा आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या प्रभावाने त्यांना शुभ दिवशी शुभ लग्नी कन्याप्राप्ती झाली. तिचे पुण्यवर्धिनी असे नामकरण करण्यात आले. पुण्यवर्धिनी मोठी झाल्यावर खूप सुदंर दिसायला लागली. तिचे केस खूप लांब आणि सुंदर होते. श्री मनकंजर ह्यांनी पुण्यवर्धिनीचा विवाह निश्चित केला. तो तरुण पण शिव भक्तच होता. विवाहाच्या आदल्यादिवशी त्यांच्या घरी एक शिव मुनी आले. त्यांनी भगवं वस्त्र परिधान केलं होतं आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा परिधान केल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जटा पांच भागामध्ये विभागल्या होत्या आणि त्या त्यांनी  उपवित (जानवे) म्हणून परिधान केल्या होत्या (म्हणूनच इथे भगवान शिवांचे नाव श्री पंचवटीश्वरर किंवा श्री जटानादर असे आहे). त्या काळात शिव मुनी आणि शैव संतांची ही एक प्रथा होती. पुण्यवर्धिनीचे सुंदर आणि लांब केस पाहून ते शिवमुनि म्हणाले कि ते केस त्यांच्या पंचवटी (उपवित) आहेत. हे ऐकून श्री मनकंजरांनी पुण्यवर्धिनीचे केस कापले आणि ते शिव मुनींना अर्पण केले. त्यानां आपल्या कन्येचे केस शिवमुनींसाठी पंचवटी म्हणून उपयोग होणे हे एक पुण्यकर्मच भासले. तिथे विवाहासाठी आलेले बाकीचे लोक मात्र ह्या घटनेने अचंबित झाले. त्यांना हे सगळं शास्त्रबाह्य आहे असे वाटत होते. म्हणून त्यांना खूप वाईट वाटले. त्याचवेळी शिवमुनींच्या जागी भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी श्री मनकंजर, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या कन्येला आशीर्वाद दिले तसेच पुण्यवर्धिनीचे केस पण पुनःप्रस्थापित केले. जेव्हा नवरदेवांना ही बातमी कळली तेव्हां ते पण ह्या स्थळी धावत आले आणि आपल्याला भगवान शिवांचे दर्शन झाले नाही म्हणून शोक करू लागले. पुढे जाऊन ते पण ६३ नायनमारांपैकी एक नायनमार झाले ज्यांचे नाव कालिकाम नायनार म्हणून प्रसिद्ध झाले.


मंदिराबद्दल माहिती:

हे खूप छोटं पण सुंदर मंदिर आहे. मंदिरासमोर तलाव आहे. मंदिराला एक परिक्रमा आहे. इथे राजगोपुर नाही पण प्रवेशद्वाराच्या वर भगवान शिव, श्री पार्वती देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्याशिवाय येथे श्री कौमारीदेवी, श्री गणपती, श्री सुब्रमण्यम ह्यांची छोटी देवालये आहेत. तसेच श्री आनंदमुनी, भारद्वाज ऋषी, नालवर ह्यांच्या मूर्ती आहेत. 


मंदिरात होणाऱ्या मुख्य पूजा:

प्रत्येक महिन्यात प्रदोष पूजा तसेच शिव रात्री पूजा साजऱ्या होतात. तसेच दैनंदिन पूजा, अभिषेक हे पण साजरे होतात. 


भाविक जन येथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करतात. तसेच शांती आणि वैभव प्राप्तीसाठी भगवान शिवांना आणि श्री पार्वती देवींना वस्त्र अर्पण करतात आणि अभिषेक करतात.


मंदिराचा पत्ता: आनंदतांडव पुरम, जिल्हा मयीलादुथुराई, तामिळनाडू

मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते १०, संध्याकाळी ५ ते ८


श्री कौमारी देवींनी अजून एका मंदिरात नवरात्रीच्या दरम्यान भगवान शिवांची पूजा केली. त्या मंदिराचे नाव शूलमंगई तसेच श्री क्रित्तिवागीश्वरर असे आहे. हे मंदिर पापनाशम-अय्यमपेट्टई-तंजावूर मार्गावर आहे. ह्या मंदिराची माहिती इंग्लिशमध्ये आम्ही ऑक्टोबर १ २०१९ ला प्रकाशित केली होती. ह्या मंदिराची माहिती मराठीमध्ये आम्ही लवकरच प्रकाशित करू.

No comments:

Post a Comment