Sunday, September 22, 2024

सप्त मातृका - श्री वाराही - वळूवूर विराट्टेश्वरर

भगवान शिवांच्या आज्ञेवरून श्री वाराही देवींनी राक्षसांची हत्या केल्याने प्राप्त झालेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी इथे भगवान शिवांची पूजा केली. त्या भगवान विष्णूंच्या शक्ती आहेत. राक्षसांबरोबरच्या युद्धामध्ये त्या श्री अंबिका देवींच्या पार्श्व भागातून प्रकट झाल्या. त्या काळ्या रेशमाचे पोशाख परिधान करतात. त्यांचे मुख रानडुक्कराचे आहे. त्यांचे वक्षस्थळ रुंद आहे आणि त्या स्वर्णालंकार परिधान करतात. त्यांना एक मुख आहे, चार हात आहेत, तीन नेत्र आहेत आणि त्यांचा वर्ण काळा आहे. त्यांच्या एका हातामध्ये नांगर आहे तर दुसऱ्या हातामध्ये युद्धामध्ये वापरली जाणारी कुऱ्हाड आहे. त्यांचे उरलेले दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत. त्यांच्या अजून एका रूपामध्ये त्यांच्या हातांमध्ये नांगर आणि कुऱ्हाड च्या ऐवजी शंख आणि चक्र असतात. काही पुराणांमधल्या त्यांच्या रूपाच्या वर्णनानुसार त्यांचे पोट मोठे असून त्यांना सहा हात असून त्यातील दोन हात अभय आणि वरद मुद्रेमध्ये आहेत तर उरलेल्या हातामध्ये त्रिशूल, कपाल (कवटी), मुसळ, साप, शंख असतात. त्यांची वाहने सिंह, रेडा, काळे ठिपके असलेले हरीण आणि काळा साप आहे. त्यांच्या पूजेसाठी योग्य दिवस - चतुर्थी, षष्ठी आणि अष्टमी.


हे अष्टविराट्ट स्थळांमधले सहावे मंदिर आहे. इथे भगवान शिवांनी गजासुराचा (उन्मत्त हत्ती) वध केला. ही जागा मयीलादुथुराई-थिरुवरुर मार्गावर आहे. ज्या मंदिरामध्ये जाऊन नायनमारांनी भगवान शिवांची स्तुती केली त्या स्थळांना पाडळ पेथ्र स्थळं म्हणतात. तर नायनमारांनी केलेल्या भगवान शिवांच्या स्तुतीमध्ये ज्या मंदिरांचा उल्लेख आढळतो त्या मंदिरांना थेवर वैप्पू स्थळं म्हणतात. 


ही जागा महाप्रलयामध्ये बुडाली नाही म्हणून ह्या जागेला वळूवूर असं नाव प्राप्त झालं. असा समज आहे की ह्या विराट्टस्थळाच्या सभोवताली पिप्पली वन, शमी वन, दारुका वन आणि बद्री वन आहे. 


मुलवर: श्री विराट्टेश्वरर, श्री कृत्तीवासर, श्री गजसंहार, श्री गजारी, श्री ज्ञानसभा

देवी: श्री बालांबिका, श्री बाल-गुजांबिका, श्री एलनकिल्याई नायकी

क्षेत्र वृक्ष: शमी, देवदार, कापुरी मदुरा

पवित्र तीर्थ: पाताळ गंगा, पंचमुख तीर्थ

स्थळ: थिरु वळूवूर

जिल्हा: नागपट्टीनं, तामिळ नाडू

पुराणिक नाव: दारुका वन


क्षेत्र पुराण:

एकदा दारुका वनामध्ये तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना अशी भावना निर्माण झाली कि त्यांच्या तपश्चर्येमुळे आता ते सहज मुक्ती मिळवू शकतील. त्यांच्या मध्ये अशी भावना निर्माण झाली कि त्यांना वाटायला लागलं कि आता त्यांना मुक्तीसाठी देवाच्या कृपेची गरज नाही. त्यांचा आणि त्यांच्या पत्नींचा अहंकार एवढा वाढला की भगवान शिवांनी त्यांना शिक्षण द्यायचं ठरवलं. भगवान शिव आणि भगवान विष्णू रूप बदलून दारुका वनात आले. भगवान शिवांनी भिक्षाटनर रूप घेतलं तर भगवान विष्णूंनी मोहिनी म्हणजेच मोहात पडणाऱ्या लावण्यवती स्त्रीचं रूप घेतलं. मोहिनीला बघून सर्व ऋषी तिच्यावर मोहित झाले तसेच भिक्षाटनरचे रूप बघून ऋषींच्या स्त्रिया त्यांच्यावर मोहित झाल्या. त्यांचं आपल्या दैनंदिन कर्तव्यामध्ये लक्ष लागेनासं झालं. भिक्षाटनर आणि मोहिनी ह्यांच्या मिलनातून श्री अय्यप्पा जन्माला आले आणि त्यानंतर भगवान विष्णू तेथून अदृश्य झाले. त्यामुळे सगळे ऋषी भिक्षाटनरवर क्रोधीत झाले. त्यांनी भिक्षाटनरचा नाश करण्यासाठी यज्ञ करून त्यातून मायावी अग्नी, वाघ, हरीण, कुऱ्हाड, साप आणि मुयालगन नावाचा राक्षस निर्माण करून ते भिक्षाटनरवर धाडले. पण ते कोणी भिक्षाटनरला हानी पोचवू शकले नाहीत. शेवटी ऋषींनी यज्ञातून उन्मत्त हत्ती म्हणजेच गजासुर निर्माण करून त्याला भिक्षाटनरला मारण्यासाठी धाडलं. भिक्षाटनर गजासुराच्या पोटामध्ये शिरले आणि ते फाडून बाहेर आले. बाहेर येताना ते ऊर्ध्व तांडव करत बाहेर आले. ऋषींना जेव्हां लक्षात आले कि भिक्षाटनर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भगवान शिव आहेत तेव्हा त्यांना आपली चूक ध्यानात आली आणि त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी येथे गजासुराचा संहार केला म्हणूनच त्यांना गजसंहार मूर्ती असे नाव प्राप्त झाले.


अजून एका आख्यायिकेनुसार श्री शनीश्वरांनी सूर्यमंडळामध्ये विक्रम राजाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. राजा पराभूत झाला आणि इथल्या तीर्थामध्ये पडला. राजाने तीर्थामध्ये स्नान केले आणि भगवान शिवांची आराधना केली. भगवान शिवांनी त्याच्या आराधनेवर प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा केली. जेव्हा श्री शनीश्वरांना कळलं कि विक्रम राजा भगवान शिवांचा भक्त आहे तेव्हां त्यांनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी त्यांना क्षमा केली पण त्यांनी श्री शनीश्वरांना एका पायाने अपंग केलं. 


अजून एका आख्यायिकेनुसार इथे ४८००० ऋषींनी तपश्चर्या केली आणि ज्ञान मिळवले.


मंदिराबद्दल माहिती:


ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. ह्या मंदिराची रचना बाकीच्या मंदिरांपेक्षा वेगळी आहे. इथे श्री नंदि आणि गाभाऱ्याच्या मध्ये तीर्थ (तलाव) आहे. येथील शिव लिंग स्वयंभू आहे. भगवान शिवांच्या पादकमलांचं दर्शन फक्त इथेच होतं. इथल्या तीर्थामध्ये पांच विहिरी आहेत. ह्या तीर्थाचे नाव पंचमुख किनारु विहीर असे आहे. ह्या तीर्थाचे दुसरे नाव पंचब्रह्म तीर्थ असे पण आहे. मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. 


मंदिरातील इतर मुर्त्या आणि देवालये:

इथे श्री गणेशांचं श्री सेल्व-विनायक असं नाव आहे. श्री गजसंहार मूर्ती हे ह्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. हि मूर्ती खूप भव्य आहे. ह्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा एक पाय गजासुराच्या डोक्यावर आहे. त्यांचा अविर्भाव गजासुराचं कातडं काढून ते परिधान करत आहेत असा आहे. ह्या मूर्तीच्या जवळ श्री पार्वती देवी बाल्य रुपातले श्री मुरुगन ह्यांना आपल्या कंबरेवर बसवून नेत आहेत अशी मूर्ती आहे. त्यांच्या चेहेऱ्यावर भय आहे आणि ह्या दृश्यापासून त्या दूर जात आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. बाल्यरूपातले श्री मुरुगन श्री पार्वती देवींना भगवान शिवांकडे म्हणजेच आपल्या पित्याकडे बोट करून तिकडे बघायला सांगत आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. चिदंबरम मंदिराप्रमाणे इथे पण गजसंहार मूर्तीच्या मागे यंत्र स्थापित केले आहे. ज्या मंडपात श्री गजसंहार मूर्ती आहे त्याचे नाव ज्ञानसबा असे आहे. भगवान शिवांनी इथे ऊर्ध्व तांडव नृत्य केले. श्री शनीश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. ते धनुष्यबाण घेऊन उभे आहेत असा त्यांचा अविर्भाव आहे. गाभाऱ्याच्या समोरील तीर्थाचे नाव पाताळ गंगा किंवा ईशान तीर्थ असे आहे. मुलवर मूर्तीच्या हातात अत्यंत आकर्षक आणि सुंदर नागभुषण आहे. गाभाऱ्याच्या भिंतींवर अष्टविराट्ट कथा भित्तिचित्रांवर चित्रित केल्या आहेत. जवळ जवळ १० शिळांवर विविध माहिती कोरलेली आहे. इथे श्री वीरभद्रांचे श्वान हे वाहन आहे. असा समज आहे कि ते भगवान शिव आणि मोहिनी रुपातले भगवान विष्णू ह्यांचा पुत्र श्री अय्यप्पा ह्यांचे रक्षण करण्यासाठी येथे आले. ह्या मंदिराला ध्वजस्तंभ आहे. 


मंडपामध्ये ६३ नायनमारांच्या मुर्त्या आहेत. तसेच श्री गजलक्ष्मी, श्री वल्ली आणि श्री दैवनै ह्यांच्या समवेत श्री मुरुगन ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. परिक्रमेमध्ये श्री सूर्य, श्री चंद्र, श्री शनी आणि श्री भैरव ह्यांच्या मुर्त्या आहेत. इथे स्वतंत्र नवग्रह संनिधी आहे. 


मंदिरात साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्रावर १० दिवसांचा गजसंहार उत्सव. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून मूर्तींची मिरवणूक काढली जाते. ९व्या दिवशी श्री गजसंहार मूर्तीची मिरवणूक निघते. १०व्या दिवशी “तीर्थवारी” नावाचा उत्सव साजरा होतो ज्यामध्ये तीर्थामधल्या मंडपामध्ये देवांना त्यांची पूजा करण्यासाठी नेले जाते

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): ३ दिवसांचा अरुद्र दर्शन उत्सव साजरा होतो. 

पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री उत्सव

कार्थिगई (ऑक्टोबर-नोव्हेंबर): सोमवारी रात्री विशेष पूजा केली जाते आणि गाभाऱ्यामध्ये यंत्र पूजा साजरी होते

आडी (जुलै-ऑगस्ट): पुरम उत्सव

पंगूनी (मार्च-एप्रिल): उथिरम उत्सव, महाशिवरात्री, अमावस्या प्रदोष पूजा


पोंगल च्या वेळेस इथे विशेष पूजा केली जाते तसेच तामिळ नववर्ष आणि इंग्लिश नववर्षदिनी पण विशेष पूजा केली जाते. 


भाविक जन इथे अपत्यप्राप्ती आणि विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करतात. असा समज आहे की इथल्या यंत्राची पूजा केल्याने वाईट शक्ती आणि वाईट करणींच्या परिणामांवर मात करता येते. मनःशांतीसाठी भाविक जन इथे श्री कृथीवासर ह्यांची पूजा करतात.


ह्या मंदिराशिवाय श्री वाराही देवींनी अवूर येथील श्री पशुपतीश्वरर, ज्याला पशुमंगई असं पण म्हणतात, ह्या मंदिरात पण भगवान शिवांची पूजा केली. आणि नवरात्रीमध्ये श्री पार्वती देवींसमवेत मयीलादुथुराई जवळ असलेल्या श्री कळूक्कनिमुट्टम ह्या मंदिरात पण भगवान शिवांची पूजा केली. ह्या मंदिराची माहिती इंग्लिशमध्ये आम्ही ऑक्टोबर ३ २०१९ ला प्रकाशित केली होती. ह्या मंदिराची माहिती मराठीमध्ये आम्ही लवकरच प्रकाशित करू.


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment