कैलास पर्वताच्या जवळ असणारे केदारनाथ हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडामध्ये आहे. चारधाम यात्रेपैकी एक असलेले हे ठिकाण हिमालयाने वेढलेले आहे. या स्थानाविषयी अनंत आख्यायिका परंपरेने आलेल्या आहेत. वर्षातील फक्त सहा महिने ही यात्रा लोक करू शकतात. शिवसाधकांनी (म्हणजेच ६३ नायन्मार) स्तोत्रे व मंत्र म्हणलेल्या २७५ स्थळांपैकी हे एक आहे.
श्री केदारनाथाच्या लिंगाची घडण व रचना कशी झाली ह्या विषयी अनेक कथा आहेत. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत.
एका कथेप्रमाणे श्री विष्णूंच्या नर व नारायण अवतारात श्री विष्णूंनी ध्यान करून घोर तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन विष्णूंना वर मागावयास सांगितले. नर आणि नारायण दोघांनी शंकराला विनंती केली की त्यांनी स्थायी स्वरूपाच्या ज्योतिर्लिंगात येथे रहावे म्हणजे जे कोणी लिंगाची भक्ती करतील त्यांची सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता होईल. हेच ते केदारनाथ ज्योतिर्लिंग.
दुसऱ्या एका कथेनुसार मानव जातीच्या कल्याणासाठी पांडवांनी शंकराचे ध्यान करून त्याला प्रसन्न करून घेतले. शंकर स्वयंभू लिंगाच्या स्वरूपात प्रगट झाले. हेच ते केदारनाथ ज्योतिर्लिंग. काळ्या दगडाच्या पसरट स्वरूपात हे ज्योतिर्लिंग आहे.
आणखीन एका कथेप्रमाणे जेव्हा पांडव त्यांच्या अंतिम प्रवासासाठी निघाले होते तेव्हा त्यांना टाळण्यासाठी शिवाने बैलाचे किंवा जंगली डुकराचे रूप धारण केले. जेंव्हा पांडव केदारनाथ मंदिरात पोहोचले तेंव्हा भीमाने बैलाची शेपटी ओढायचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले नाही पण बैलाला मात्र कुबड आले. असा समज आहे की बैल सरळ नेपाळला गेला व तेथे पशुपतिनाथाची स्थापना झाली. बैलाच्या पार्श्वभागावर शंकर ज्योतिर्लिंग म्हणून प्रगट झाले. शिवाने त्रिकोणी आकाराच्या ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात कायम वास्तव्य करण्याचे मान्य केले. ज्या पर्वत शिखरावरून पांडव स्वर्गात पोचले ते बद्रीनाथाजवळच आहे. असा समज आहे की भीमाची शंकराशी बैलाच्या रूपात असताना जी झटापट झाली त्यानंतर भीमाने शंकराला तुपाने मालिश केले. म्हणून त्रिकोणी ज्योतिर्लिंगाला तुपाने मालिश करण्याची प्रथा पडली आहे.
दुसऱ्या एका कथेनुसार नर आणि नारायण बद्री नावाच्या खेड्यात गेले. तेथे त्यांनी पार्थिव लिंगाची पूजा सुरु केली. तेव्हा शंकराने केदार येथे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात राहण्याचे मान्य केले. अशा प्रकारे त्या ज्योतिर्लिंगाला केदारेश्वर हे नाव प्राप्त झाले. केदारनाथाच्या मंदिरासभोवती अनेक पवित्र स्थळे आहेत. या पर्वत शिखरावरच आदी शंकाराचार्यांना मोक्ष प्राप्ती झाली.
३५८३ मीटर उंचीवर असलेले हे पवित्र स्थळ मंदाकिनी नदीकाठी हृषीकेश पासून २२३ किलोमीटर अंतरावर आहे. मंदाकिनी ही गंगेची उपनदी होय.
No comments:
Post a Comment