गंगा, वारणा आणि अस्सी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर उत्तर प्रदेशातील वाराणसीला हे पवित्र स्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी प्रत्यक्ष शंकरानेच वाराणसीची स्थापना केली असे समजतात. काशी विश्वनाथ याविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. काशी विश्वेश्वर हे एक पवित्र यात्रा केंद्र आहे. काशा नावाची जमात येथे वास्तव्य करून होती व त्यावरून या ठिकाणाला काशी हे नाव प्राप्त झाले.
पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की पुरुष आणि प्रकृती म्हणजे निसर्ग यांची नेमणूक भगवान शंकराने तप करून सृष्टीमध्ये सर्वोत्तम गोष्टींची निर्मिती विशिष्ट जागी करण्यासाठी केली. पुरुष आणि प्रकृती ही शिव आणि शक्तीची रूपे होत. निर्गुण शिवांनी पंचक्रोशी नावाचे शहर निर्माण केले. इथे श्री विष्णूंनी तपश्चर्या केल्याने पाण्याचे अनंत झरे निर्माण झाले. त्याचे अवलोकन करीत असता त्याच्या कानातील रत्नजडित खडा खाली पडला म्हणून ह्या जागेचे नाव मणिकर्णिका असे पडले. ह्या पंचक्रोशीतील सर्व पाणी शंकराने त्याच्या त्रिशुळामध्ये गोळा केले. त्यानंतर श्री विष्णूंच्या बेंबीतून आलेल्या कमळावर ब्रह्मदेवाचा जन्म झाला. शंकराने सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. पुराणांप्रमाणे या जगाची व्याप्ती पन्नास कोटी योजने असून येथे चौदा लोकांचा वास आहे. शंकराने कर्माने बांधले गेलेल्या लोकांचे जीवन वाचविण्यासाठी पंचक्रोशी शहराला संपूर्ण सृष्टीबाहेर ठेवले. या शहरात शिवाने मुक्तिदायक ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. त्यानंतर काशीला त्याच्या त्रिशूळावरून काढून ह्या मर्त्यलोकात शिवाने आणून ठेवले. म्हणून काशीला विमुक्त क्षेत्र म्हटले जाते. अविमुक्तेश्वर लिंग काशीला आहे. अनेक दंतकथानुसार काशीवर ब्रह्मा, विष्णु आणि महेश राज्य करतात. लोकांचा असा विश्वास आहे की काशीला वास्तव्य करणाऱ्यांना मुक्ती प्राप्त होते. दुसऱ्या एका दंतकथेप्रमाणे या शहराचे कालभैरव व दंडपाणी रक्षण करत असल्यामुळे प्रलयातसुद्धा या शहरांचा विनाश होणार नाही. गंगेच्या काठावर वैदिक काळापासून असलेले चौऱ्याऐंशी स्नानाचे घाट व अगणित तीर्थकुंड येथे आहेत.
आधी म्हटल्याप्रमाणे या स्थानाविषयी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. काशी शहराच्या एका स्थानी ब्रह्मदेवाने तपस्या केली. शंकराचे स्तुतीपर वेद म्हणत असता ब्रह्मदेवाने एक कडवे चुकीच्या पद्धतीने म्हणले. त्यामुळे रागावून शंकराने ब्रह्मदेवाचे एक डोके उडवले. ह्या शिखराला कायमस्वरूपी व शाश्वत अशी जागा मिळाली. त्यालाच ब्रह्मकुंड असे म्हणतात.
वाराणसी हे देवीचे एक शक्तीपीठ असून तेथे देवीच्या कानातील एक कर्णफुल पडले. त्या ठिकाणी देवी विशालाक्षी पाण्याचा झरा आहे. काशीमध्ये जेव्हा बराच काळ दुष्काळ पडला होता तेव्हा देवीने सर्वांना अन्न पुरवले. अन्नपूर्णा देवीचे पूजन करण्याची पवित्र जागा सुद्धा येथेच आहे. शंकराने केलेल्या ब्रह्महत्येच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून तो भिकारी झाला व म्हणून देवीने वाटलेल्या अन्नाचा लाभ त्याला पण मिळाला. त्याने केलेल्या ब्रह्महत्येमुळे शिवाच्या डाव्या हाताच्या तळव्याला ब्रह्मदेवाची कवटी चिकटून बसली. शंकराला देवीकडून भिक्षा मिळताच ती कवटी गळून पडली.
तिथे असलेला हरिश्चंद्र घाट म्हणजेच हरिश्चंद्राला ज्या स्मशानावर डोंबारी म्हणून नेमले होते ती जागा होय.
वाराणसीवर मोगलांनी अनेक हल्ले केले व त्यात विश्वेश्वराचे मंदिर सुद्धा उध्वस्त केले. त्याची पुनर्बांधणी मराठा व राजपूत युगात झाली.
No comments:
Post a Comment