Thursday, June 13, 2019

श्री त्र्यंबकेश्वर

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग होय. महाराष्ट्रातील नाशिक येथे गोदावरी नदीकाठी त्र्यंबकेश्वर येथे हे स्थान वसले आहे. गोदावरी नदी गौतमी म्हणूनसुद्धा ओळखली जाते म्हणून काही ठिकाणी हे स्थान गौतमी काठी असल्याचा उल्लेख आहे. येथील शिवलिंगाचा आकार अद्वितीय असा आहे. त्याचे साधर्म्य उखळीच्या तळाच्या भागाशी असून मध्यभागी पोकळी सदृश्य भाग आहे. त्या खोलगट भागात अंगठ्याचा आकार असलेली तीन लिंगे असल्यामुळे ह्या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर असे म्हणतात. शिवलिंगाच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रातून अव्याहत पाणी वाहत असते. ह्या शिवलिंगाच्या दर्शनाला हजारो लोक येतात कारण ह्या शिवलिंगाच्या कृपेने अध्यात्मिक समाधान मिळते व भौतिक इच्छा पण पूर्ण होतात. दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. ह्या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक दंतकथा आहेत. त्यापैकी काही खाली दिलेल्या आहेत.



दक्षिण पर्वतावर गौतम ऋषी व त्यांची पत्नी अहिल्या तपश्चर्या करत होते. त्या काळात एका वर्षी कोरडा दुष्काळ पडला. सर्वत्र हाहाकार उडाला तेव्हा गौतम ऋषींनी वरुणाची कठोर साधना करून त्याला प्रसन्न करून घेतले. गौतम ऋषींना वरुणाने वर दिला की त्यांच्या आश्रमात पाण्याचा अक्षय पुरवठा होईल व त्यामुळे मुबलक अन्नधान्य उपलब्ध होईल. ही आश्रमातील सर्व प्रकारची सुबत्ता इतर साधू व त्यांच्या पत्नींच्या मनात द्वेष निर्माण करण्यास कारणीभूत झाली. त्यांनी मायेने एक गाय निर्माण केली व तिने अन्नधान्याची नासधूस करायला सुरुवात केली. त्या गाईला हाकलण्यासाठी गौतम ऋषींनी एक छोटीशी फांदी तिच्या अंगावर टाकताच ती गाय मरण पावली. त्या साधूंनी गौतम ऋषींवर ब्रह्महत्येचा आरोप करून त्यांना ब्रह्मगिरी पर्वतावर एकांतवासात हद्दपार केले. गौतम ऋषींनी ब्रह्मगिरीवर शंकराच्या पार्थिव लिंगाची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने त्यांना दोन वर दिले. एक म्हणजे गौतमीच्या रूपात तिथे प्रत्यक्ष गंगाच प्रकट होईल, तर दुसऱ्या वरानुसार त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग स्वरूपात शिव प्रगट होतील.  


दुसऱ्या एका आख्यायिके प्रमाणे पहिल्या लिंगाच्या प्रगटीकरणाच्या वेळी ब्रह्मदेवाने शंकराला शाप दिला की त्र्यंबकेश्वरचे लिंग जमिनीत ढकलले जाईल. म्हणूनच हे लिंग खळग्यामध्ये असून त्याचा आकार वरून अव्याहत वाहणाऱ्या पाण्यामुळे लहान आहे.


त्र्यंबकेश्वरला वराहतीर्थ नावाचे एक तीर्थ आहे. श्री विष्णूंच्या वराह अवतारामध्ये गौतमी नदीत त्यांनी स्नान केले होते तेच वराह तीर्थ. ब्रह्मगिरीपर्वतावरील ज्या झऱ्यापासून गोदावरी नदी उगम पावते त्याला गंगाद्वार असे म्हणतात. उगमानंतर गोदावरी जवळजवळ अदृश्य होऊन एकदम तहालहाटी येथे प्रकट होते. शंकराने दिलेल्या वरामुळे प्रकट झालेल्या गौतमीगंगेचा प्रवाह इतका जोरात होता की गौतम ऋषि त्यात स्नान करू शकले नाहीत. पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी गौतममुनींनी दर्भ फेकला. गंगा थांबलेल्या या स्थानाला कुशावर्त तीर्थ म्हणतात. परिक्रमेच्या मार्गावर रामतीर्थ, प्रयागतीर्थ, नरसिंहतीर्थ अशी अनेक तीर्थे आहेत.


पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ह्या जागी नारायण नागबळी केल्यास सर्प दोष नाहीसा होतो तर त्रिपिंडी श्राद्ध केल्यास पितृदोषाचे निराकारण होते.

No comments:

Post a Comment