औरंगाबाद पासून तीस किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे बारावे ज्योतिर्लिंग. मध्वमुनीश्वर यांच्या मते ह्या पृथ्वीवर वेरूळला असलेली ही एकच जागा अशी आहे की जिथे भगवान श्री घृष्णेश्वर राहतात.
इतर ज्योतिर्लिंगाप्रमाणे या लिंगाविषयी सुद्धा अनेक दंतकथा आहेत. ही जागा म्हणजे मूलतः नागा जमातीचे वसतिस्थान होते. त्याचे नाव होते बांबी, म्हणजेच नागा लोकांचे वसतिस्थान, ज्याचा मराठीत अर्थ आहे वारूळ. काळाच्या ओघात त्याचे नाव येलूर अथवा वेरूळ असे पडले.
एका आख्यायिकेप्रमाणे एका राजाने शिकार करताना ऋषी व मुनींच्या अनेक प्राण्यांची हत्या केली. ऋषींनी दिलेल्या शापामुळे राजाचे सर्व अंग किडे व कीटकांनी भरून गेले. संपूर्ण जंगलात पाण्याचा शोध घेतल्यावर त्याला एक पाण्याचा खळगा सापडला. त्याचे पाणी प्राशन करताच तो रोगमुक्त झाला. त्याच जागी त्याने घोर तपश्चर्या केली व ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाने तेथे पारस तीर्थ निर्माण केले. याचे नाव नंतर ब्रह्मा सरोवर किंवा शिवालय म्हणून प्रसिद्ध झाले.
दुसऱ्या एका दंतकथेनुसार काम्यक वनातील जंगलातून उगम पावलेली येलगंगा नदीसुद्धा जवळच आहे. एकदा पार्वती तिच्या केसाच्या भांगामध्ये कुंकुम केशर भरत असताना तिने शिवालयाचे पाणी वापरले. त्याच क्षणी कुंकवाचे रूपांतर प्रखर प्रकाश बाहेर पडत असलेल्या शिवलिंगामध्ये झाले. शंकराने त्याला त्याच्या त्रिशुळाने तिथून हलवले. पार्वतीने त्याची स्थापना वेरूळला केली व त्याचे नाव कुंकुमेश्वर असे पडले. हे लिंग पार्वतीने तिच्या अंगठ्याने तयार केले म्हणून त्याचे नाव तिने घृष्णेश्वर असे ठेवले.
पुराणातील आणखी एका कथेनुसार सुधर्म नावाचा एक धार्मिक ब्राह्मण होता. त्याला मुलबाळ नव्हते. त्याची पत्नी सुदेहा हिने सुधर्माला तिची बहीण घुष्मा हिच्याशी विवाह करण्यास सांगितला. घुष्मा शंकराची निस्सीम भक्त होती. घुष्माने जेव्हा मुलाला जन्म दिला तेव्हा सुदेहाने मत्सरापोटी त्या मुलाला एका तलावात फेकून दिले. ह्याच तळ्यात यापूर्वी घुष्माने शिवलिंगाचे विसर्जन केले होते. मुलाच्या मृत्यूनंतर ती शंकराची अधिकच कठोर तपश्चर्या करू लागली. शंकराने घुष्माला दिव्यदृष्टी प्राप्त करून दिली. तिने आपल्या बहिणीला क्षमा करावी अशी विनंती केली. दयाळू शंकराने घुष्माच्या मुलाला जिवंत केले व स्वतः घुष्मेश्वर नावाने तिथेच मुक्काम केला. कालांतराने घुष्मेश्वरचे नाव घृष्णेश्वर असे झाले. देवी पार्वती शंकराबरोबर घृष्णेश्वरी म्हणून राहिली. सध्याचे मंदिर तेथील खेड्याचे पटेल होते त्यांनी बांधले आहे. या पटेलांना तेथील सापाच्या बिळात संपत्ती सापडली होती असे म्हणतात. अजंठा व एलोराच्या गुहासुद्धा येथून जवळच आहेत.
No comments:
Post a Comment