शुक्र ग्रह मंदिराची माहिती:
मंदिराची माहिती:
मंदिराचे नांव: अरुलमीगु अग्निश्वरर् कोविल
स्थल देवता: श्री अग्निश्वरर्
देवीचे नांव: श्री कर्पगम् अम्बाळ
ग्रहाचे नांव: शुक्र
गणपती: कर्पग विनायगर
गावाचे स्थान: आडुदुराई-कुट्रालम् मार्ग, कंजनूर, तामिळनाडू ६०९८०४, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव: अरुलमीगु अग्निश्वरर् कोविल
मंदिराकडे जाण्याचा मार्ग:
कुंभकोणम - मयीलाडुदुराई मार्गावर असलेल्या आडुदुराई ह्या गावावरून ह्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आडुदुराई, कुंभकोणम आणि मयीलाडुदुराई पासून ह्या मंदिराकडे जाणाऱ्या बसेस आहेत. हे मंदिर सूर्यनार कोविल पासून ३ किमी, आडुदुराई पासून ५ किमी तर मयीलाडुदुराई पासून २० किमी वर आहे.
शुक्र ग्रह मंदिराचा इतिहास:
कंजनूर गावामध्ये वासुदेवर नावाचा एक वैष्णव होता. त्याला सुदर्शनर नावाचा पुत्र होता. सुदर्शनरला आपल्या कपाळावर विभूती, भगवान शंकराचं प्रतीक, लावण्याची तीव्र इच्छा होती. पण गावामधल्या कट्टर वैष्णवांनी त्याला नकार दिला. सुदर्शनर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान विष्णूंनीच सुदर्शनर म्हणून जन्म घेतला होता. त्या वैष्णवांना सत्याची जाणीव करून देण्यासाठी सुदर्शनर जळत्या बैठकीवर बसला. दक्षिणामूर्ती, म्हणजेच भगवान शिव, त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सुदर्शनरवर कृपा केली. सुदर्शनर नंतर हरदत्त ह्या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याने शिवाची उपासना केली.
इथल्या शिव आणि पार्वतीच्या मंदिरांबद्दल एक कथा आहे. ब्रह्मदेवाने शिव आणि पार्वतीदेवीचे नवीन लग्न झालेल्या वधू-वराच्या रूपामध्ये दर्शन घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिव आणि पार्वतीने त्याला वधू-वराच्या रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणूनच इथे शिव मंदिर उजव्या बाजूला तर पार्वतीचे मंदिर डाव्या बाजूला आहे.
असं म्हणतात की इथे ऊस आणि मध हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, आणि म्हणून ह्या गावाला कंजनूर नाव पडलं.
असा समज आहे की चंद्र, पराशर मुनी आणि कृष्णाचा मामा कंस ह्याने इथे शिवाची उपासना केले. आणि म्हणून इथे ३ शिव लिंग आहेत.
ह्या मंदिराच्या आजूबाजूला ३ पवित्र तीर्थ आहेत - १. ब्रह्माने निर्माण केलेलं ब्रह्मतीर्थ, २. अग्नीने निर्माण केलेलं अग्नी तीर्थ (किंबहुना अग्नीने इथे शिवाची उपासना केली आणि म्हणूनच इथे शिवाचे नाव अग्निश्वरर् असे आहे), ३. पराशर मुनींनी निर्माण केलेलं पराशरतीर्थ
शुक्र ग्रहाचा इतिहास:
पुराणांनुसार शुक्र हे भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी पुलोमिषा ह्यांचे पुत्र. शुक्र हे पुढे मोठे होऊन शुक्राचार्य नावाने प्रसिद्ध झाले. हे दैत्यांचे गुरु होते. त्यांनी शिवाची उपासना करून त्याच्याकडून संजीवनी विद्या प्राप्त केली होती. ही विद्या वापरून ते युद्धामध्ये मेलेल्या दैत्यांना परत जिवंत करायचे.
शुक्राचार्यांना शुक्र हे नाव त्यांच्या रुपेरी कांतीमुळे प्राप्त झालं. जेव्हां ते संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळेस इंद्र देवाची कन्या जयंतीने शुक्राचार्यांची सेवा केली. त्यांना देवयानी नावाची कन्या झाली. त्यानंतर जयंती परत देवलोकी निघून गेली.
शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या प्राप्त करून घेण्यासाठी देवांचे गुरु बृहस्पतींनी त्यांच्या कच नावाच्या पुत्राला शुक्राचार्यांकडे पाठवले. कचाने प्रामाणिकपणे शुक्राचार्यांची सेवा करून त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले. शुक्राचार्यांची कन्या देवयानी कचाच्या वर्तनावर आणि रूपावर मोहित झाली. दैत्यांना कच हा कपटाने शुक्राचार्यांना प्रसन्न करायला बघतोय हे लक्षात आलं. त्यांनी कचाला मारलं आणि त्याच्या अस्थींची पूड करून ती पाण्यात मिसळून ते पाणी त्यांनी शुक्राचार्यांना पाजलं. कच जेव्हा कुठे दिसेना तेव्हा देवयानीला अतिशय शोक झाला. कन्येचा शोक बघून शुक्राचार्यांना राहावलं नाही आणि त्यांनी आपल्या ज्ञानदृष्टीने कचाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना लक्षात आलं की कच आपल्या पोटामध्येच आहे. त्यांनी ते देवयानीला सांगितलं. देवयानीने त्यांना संजीवन मंत्राचा वापर करून त्याला जिवंत करण्याचा हट्ट धरला. शुक्राचार्यांनी तिला समजावलं की कचाला जिवंत केलं तर तो पोट फाडून बाहेर येईल आणि त्यांचा मृत्यू होईल. पण हट्टाला पेटलेल्या देवयानीने त्यांना आश्वासन दिलं कि ते जेव्हां संजीवनी मंत्र जपतील तेव्हा तो श्रवण करून स्मृतीत ठेवून ती तो मंत्र वापरून परत शुक्राचार्यांना जिवंत करेल. कन्येच्या हट्टाला शरण जाऊन शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्र जपला आणि त्याचबरोबर कच त्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने शुक्राचार्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र जपताच कचाने तो आत्मसात केला आणि आपलं ध्येय प्राप्त केलं. पण त्यामुळे शुक्राचार्य आपली संजीवनी मंत्राची शक्ती गमावून बसले.
शुक्राचार्यांना तीन पत्नी होत्या. त्यांना एक पुत्र आणि दोन कन्या होत्या. त्यांनी एक ग्रंथ पण लिहिला आहे त्याचे नाव शुक्रनीति.
शुक्राचार्यांनी काशीला जाऊन उपासना केली. भगवान शंकरांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना ग्रह बनण्याचं वरदान दिलं.
शुक्र ग्रहाचे महत्व:
शुक्र हा शुभ ग्रह आहे. तो वृषभ आणि तूळ राशींचा स्वामी आहे. मीन राशीमध्ये तो उच्च स्थानी आहे तर कन्या राशीमध्ये नीच स्थानी. ऋग्वेदामध्ये शुक्राला वेण असे नाव आहे. शुक्राचा प्रभाव विवाह संबंधित गोष्टींवर असतो. शुक्राच्या कृपेमुळे नपुंसकत्वावर मात करता येते. शुक्राचा शुभ प्रभाव पुढील महिन्यांमध्ये अनुभवास येतो - नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च आणि एप्रिल, आणि तो जेव्हां वृषभ, तूळ आणि मीन राशींत असतो तेव्हां. शुक्र महादशा २० वर्षांची असते.
शुक्र ग्रहदोषांपासून निवृत्ती:
शुक्र ग्रहदोषांपांसून निवृत्तीचे काही उपाय - देवी उपासना (गजलक्ष्मी आणि/किंवा राजराजेश्वरी). देवीमहात्म्याचे पारायण. शुक्रवारी उपवास. श्वेत रंगाचे कपडे परिधान करणे आणि पूजेमध्ये श्वेत कमळ आणि श्वेत वस्त्र अर्पण करणे.
शुक्र ग्रहाची वैशिष्ठ्ये:
#
|
वैशिष्ठ्य
|
शुक्र ग्रह
|
१
|
पत्नी
|
सुकीर्ती / उर्ज्जस्वती
|
२
|
कपड्यांचा रंग
|
श्वेत (पांढरा)
|
३
|
लिंग
|
स्त्री
|
४
|
पंच महाभूतातील घटक
|
जल
|
५
|
देव
|
इंद्राणी
|
६
|
वाहन
|
अश्व / उंट / मगर
|
७
|
अधिदेवता
|
महालक्ष्मी
|
८
|
धातू
|
रूपे
|
९
|
रत्न (खडा)
|
हिरा
|
१०
|
अवयव
|
वीर्य
|
११
|
चव
|
आम्ल (आंबट)
|
१२
|
धान्य
|
पावटा
|
१३
|
ऋतू
|
वसंत
|
१४
|
ग्रहाच्या मुखाची दिशा
|
पूर्व
|
१५
|
पुष्प
|
पांढरं कमळ
|
१६
|
क्षेत्र वृक्ष
|
पळस
|
१७
|
आठवड्यातला दिवस
|
शुक्रवार
|
१८
|
ध्वनी
|
नी
|
शुक्र ग्रहाची रांगोळी:
शुक्राची पूजा करताना काढावयाची रांगोळी:
शुक्र ग्रहाचा श्लोक :
शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा
ध्यान श्लोक:
हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुम् |
सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ||
No comments:
Post a Comment