("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)
जेव्हा-जेव्हा पृथ्वीवर अधर्म थैमान घालतो, तेव्हा-तेव्हा दुष्टांचे पारिपत्य करण्यासाठी श्री विष्णु स्वतः पृथ्वीवर अवतरतात. श्री विष्णूंच्या दहा अवतारांपैकी एक अवतार म्हणजे रघुकुलोत्पन्न श्री रामचंद्र हे होत. त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला, तोच रामनवमी सोहळा होय.
वाचकांनी हे लक्षात घ्यावे की श्री विष्णुंचा एक अवतार शिल्लक असून तो 'कलंकी' या नावाने योग्य काळी पृथ्वीवर अवतीर्ण होणार आहे. ज्या दिवशी कलंकी अवतार घेतला जाईल, तो दिवस शुद्ध षष्ठी असेल, असे पुराणात सांगितले आहे. जन्मकाळ सायंकाळी असेल.
केव्हा?
रामनवमी म्हणजेच रामजन्म सोहळा चैत्र शुद्ध नवमी या दिवशी होतो. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मार्च महिन्याअखेर अथवा एप्रिल महिन्याच्या सुरवातीला हा सण येतो.
काय करतात?
रामजन्म सोहळा हा सर्वसाधारणपणे रामाच्या देवळात साजरा केला जातो. एक पाळणा हार-फुले इत्यादींनी सजवून ठेवतात. रामनवमीला सकाळपासून रामजन्मावर कीर्तन केले जाते. हे कीर्तन दुपारी बारा वाजण्याचे आत पूर्ण केले जाते; कारण रामाचा जन्म दुपारी बरोबर बारा वाजता होतो.
बारा वाजण्याचे सुमारास रामाच्या उत्सव मूर्तीस सुवासिक पाण्याने स्नान घालून वस्त्रालंकाराने सजवून बरोबर बारा वाजता पाळण्यात घातले जाते व उपस्थित भक्तगण जन्मोत्सव साजरा करतात. रामाला तुळस व दवणा हे फार प्रिय आहेत. स्त्रिया पाळण्याला झोके देऊन गोड स्वरात पाळण्याची गाणी म्हणतात. त्या दिवशी उपवास करावयाचा असतो.
रामजन्मानंतर विशेष प्रसाद म्हणून सुंठवडा देतात व सायंकाळी कलिंगड व पन्हे देऊन रामजन्म उत्सव साजरा करतात.
अयोध्येला चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामाच्या देवळात कीर्तने चालू होतात व ती रामनवमीपर्यंत चालतात. काही ठिकाणी संपूर्ण रामायणाचे वाचन केले जाते.
रामजन्मानंतर अयोध्येत दहा-दहा मिनिटांच्या अंतराने अनुक्रमे लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे पुत्र सुद्धा दशरथास प्राप्त झाले.
ज्या घराण्याचे कुलदैवत रामचंद्र आहे, त्यांच्या स्वतःच्या घरी देवळाप्रमाणेच उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे.
शिर्डीला श्री साईबाबांनी सुरु केलेला रामनवमी उत्सव आजतागायत नित्यनेमाने चालू आहे.
का करावे?
हिंदू धर्मामध्ये राम हा एकवचनी, संयमी व मर्यादा पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. पराक्रमाबरोबरच प्रेम, भक्ती, विश्वास ह्याचे पण तो प्रतिक आहे. राम जन्माच्या निमित्ताने रामाच्या सर्व गुणांची आपल्याला जाणीव होऊन, त्याच्या सारखे होण्याची प्रेरणा मिळते.
No comments:
Post a Comment