Wednesday, April 4, 2012
Shri Hanuman Jayanti
("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)
संपूर्ण भारत वर्षात, विशेष करून, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर भारत, बिहार आणि संपूर्ण काशीखंड येथे अत्यंत भक्तीभावाने उपासना केले जाणारे एक प्रमुख दैवत म्हणजेच श्री हनुमान होय. शक्ती, भक्ती, युक्ती, ज्ञान, सेवाभाव हे ज्याच्यामध्ये एकवटले आहेत, असे हे एकमेव दैवत आहे. प्रत्यक्ष शनिदेव सुद्धा ज्याला वचकून आहेत, असा हा पराक्रमी व अखंड ब्रह्मचारी देव, त्याचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी केली जाते.
केव्हा?
चैत्र शुद्ध पौर्णिमेला हा उत्सव असतो व इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये येतो. ही पौर्णिमा सूर्योदयव्यापिनी असते. म्हणजेच सूर्योदयाचे वेळेस पौर्णिमेचे अस्तित्व असावयास लागते. याचे कारण म्हणजे जन्म होताच, हनुमानाच्या उत्पत्ती काळीच, तो सूर्याला फळ समजून त्याच्यावर झेपावतो, हे आहे.
काय करावे?
चैत्र शुद्ध पौर्णिमेला ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच पाहते साडेचार वाजल्यापासून मारुती मंदिरामध्ये हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. प्रवचनकार प्रवचन रूपाने अथवा किर्तनकार किर्तन रूपाने मारुती जन्माची कथा सांगतात. सूर्योदयाला किर्तन संपवून मारुतीचा जन्मोत्सव साजरा करतात.
मारुतीला तिळाच्या तेलाचा अभिषेक करून, रुईच्या पानांच्या माळा घालतात. उपस्थित भक्त गणांना सुंठवडा, खोबरे व साखर ह्याचा प्रसाद दिला जातो. हनुमानाला हरभरा प्रिय आहे व म्हणूनच दुपारी दाखविण्याच्या महानैवेद्यात भाजणीचा वडा असावयास लागतो. किंबहुना कच्च्या भाजणीच्या वड्याचा नैवेद्य सुद्धा चालतो. संपूर्ण दिवसभर भजने वगैरे धार्मिक कार्यक्रम चालूच रहातात.
ज्यांचे कुलदैवत हनुमान आहे, त्यांच्या घरी हनुमान जयंती उत्साहाने साजरी केली जाते. सर्वसाधारणपणे रुद्र करून, हनुमानाला अभिषेक करून, पंचोपचाराने पूजा केली जाते. हनुमानास अशोकाचे फुल तसेच दवणा हे प्रिय आहेत. (पौर्णिमेला दवणा वहावा, अशी वहिवाटपण आहेच) हनुमान हा शिवस्वरूप असल्यामुळे अभिषेकापुर्वी रुद्र सांगितला जातो. हनुमान ज्याचे कुलदैवत आहे, त्यांचे घरी पाषाणाची मूर्ती असते. तिला शेंदूर तेलामध्ये कालवून त्याचे लेपन करतात. मंदिराप्रमाणे नैवेद्य व महानैवेद्य दाखविला जातो.
हनुमानदर्शनाविषयी कथा
हनुमानाचे दर्शन करावयाची एक विशिष्ट पद्धत नमूद करण्यासारखी आहे. त्याचे दर्शन घेताना सर्वप्रथम त्याच्या डाव्या पायावर दृष्टी टाकल्यास भक्तांचे संकट निवारण तो त्वरित करतो, अशी श्रद्धा आहे व त्या विषयीची कथा अशी -
अहीरावण व महीरावण या असुरांनी देवीला बळी देण्यासाठी राम व लक्ष्मण यांना कैद केले. ज्या देवळात त्यांना बळी देणार होते त्या जागेविषयीचे ज्ञान हनुमानास झाले. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळेच हनुमानास लहान-मोठे रूप धारण करण्याची शक्ती प्राप्त होती. त्याप्रमाणे सूक्ष्म रूप धारण करून, हनुमान देवीच्या मागे जाऊन बसले. सर्व प्रथम हनुमानाने देवीचा विरोध मोडून काढला. त्यानंतर अहीरावण व महीरावण यांना देवळाच्या गाभाऱ्यात पाचारण करून त्यांचा वध केला. नंतर रामचंद्र व लक्ष्मण यांना पाठविण्याची राक्षसांना विनंती केली. ते आत येताच, रामाला उजव्या खांद्यावर व लक्ष्मणाला डाव्या खांद्यावर बसवून व डावा पुढे टाकून मारुतीने उड्डाण केले. उजव्या खांद्यावर बसलेल्या रामाची नजर हनुमानाच्या डाव्या पायावर प्रथम पडली व रामाने त्याला वर दिला की, जो कोणी तुझ्या डाव्या पायाचे दर्शन घेईल, त्यांचे संकट निवारण होईल.
फलप्राप्ती
विद्वान, शक्तिशाली, महापराक्रमी, सेवाधर्मी अशा हनुमानाचे पूजन केल्यास, तेच गुण भक्तास प्राप्त होऊ शकतात. संकटग्रस्त भक्तांनी, संकटमुक्त होण्यासाठी रात्री ११.३० ते १२.३० या वेळेस हनुमानचालीसा किंवा रामदासस्वामीविरचित हनुमानस्तोत्र अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे. रामदास स्वामींनी सुद्धा शक्ती प्राप्त व्हावी, म्हणून अकरा मारुतींची स्थापना केली, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment