Sunday, September 27, 2026

थिरुविलामर येथील श्री पातंजली मनोहरर मंदिर

विलामर हे थिरुवारुर-तंजावूर मार्गावर थिरुवारुर पासून ३ किलोमीटर्सवर वसले आहे. त्यागराजा मंदिरापासून ३ किलोमीटर्सवर, नागपट्टीनं पासून ३० किलोमीटर्सवर आणि कुंभकोणमपासून ३९ किलोमीटर्सवर वसले आहे. हे मंदिर कावेरी नदीची उपनदी असलेल्या उदमपोक्कैअरु ह्या नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. पुढील काळात चोळा राजांनी ह्या मंदिराची पुनर्निर्मिती केली आणि नायक राजांनी विस्तार केला. 


मूलवर: श्री पातंजली मनोहरर, श्री विलामर, श्री विमलन 

देवी: श्री मधुरभाषिणी, श्री मंजुळवाणी, श्री याळीनिम मेनमोळी अम्माई, श्री तेनमोळी अम्माई 

पूजा / आगम: शिव आगम

क्षेत्र वृक्ष: बिल्व आणि एक वृक्ष ज्याला तामिळ मध्ये किलूवाई म्हणतात  (मराठीमध्ये भुत्य) किंवा गुमकरय किंवा कटेट्टेरागूम असं म्हणतात  

पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ

पुराणिक नाव: थिरुविलामर, थिरुवरगम, थिरुवडी क्षेत्र, शिवपाद क्षेत्र

वर्तमान नाव: विलामर


क्षेत्र पुराण:

१. पातंजली आणि व्याघ्रपाद ऋषींनी भगवान शिवांचे तांडव नृत्य बघावयास मिळावे म्हणून चिदंबरम येथे तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांच्यासमोर तांडव नृत्य सादर केले. पातंजली ऋषी आणि व्याघ्रपाद ऋषींनी परत एकदा भगवान शिवांकडे रुद्र तांडव आणि अजब नृत्याचे दर्शन दाखविण्याची विनंती केली. त्यांनी भाविक जनांना त्यांच्या पादुकांचे दर्शन व्हावे अशी पण प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना थिरुवारुर, ज्याला पूर्वी श्रीपूरम असे पण म्हणायचे, त्या स्थळी जाण्याचा सल्ला दिला. जेव्हा ते येथे आले तेव्हा त्यांना सगळीकडे शिव लिंगे दिसू लागली. म्हणून पातंजली ऋषींनी सर्पाचे रूप घेतले आणि व्याघ्रपाद ऋषींनी वाघाचं रूप घेतले आणि त्यांनी पार्वती देवींची, ज्यांना कमलांबल असे संबोधले जाते, त्यांची आराधना केली. पार्वती देवींनी त्यांना ह्या ठिकाणी येऊन भगवान शिवांची आराधना करण्याचा सल्ला दिला. पातंजली आणि व्याघ्रपाद ऋषींनी इथे येऊन मातीचे शिव लिंग तयार करून त्याची आराधना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी अजब नृत्य सादर केले तसेच त्यांना आपल्या दिव्य पादुकांचे दर्शन घडविले. जिथे त्यांनी पादुकांचे दर्शन घडविले त्या स्थळाचे नाव विमल (विमल म्हणजे तामिळमध्ये पवित्र पादुका). पातंजली आणि व्याघ्रपाद ऋषींबरोबरच श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, मुचुकुंद चक्रवर्ती तसेच सर्व देवदेवतांनी ह्या नृत्य दर्शनाचा तसेच पवित्र पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. तेव्हापासून ह्या स्थळाला थिरुवडी, थिरुविलामल तसेच शिवपाद क्षेत्र असे संबोधले जाते.

२. स्थळ पुराणानुसार श्रीरामांचे पिता दशरथ ह्यांनी पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्याच्या आधी ह्या स्थळाला भेट दिली.


ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

राजा दशरथ, श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव, मुचुकुंद चक्रवर्ती, श्री सूर्य, देव, पातंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी, अगस्त्य ऋषी.


वैशिष्ट्ये:

१. गाभाऱ्यामध्ये आपल्याला शिव लिंग, त्याच्या पाठीमागे श्री नटराज आणि पुढे पवित्र पादुका ह्या सर्वांचे एकाच वेळी दर्शन मिळते.

२. असा समज आहे कि ज्यांना कोणाला थिरुवारुर येथील त्यागराजा मंदिर आणि ह्या ठिकाणच्या भगवान शिवांच्या पादुकांचे दर्शन घडेल त्यांना मुक्ती प्राप्त होईल.

३. इथले शिव लिंग मातीचे बनले असल्या कारणाने इथे दीपाराधना केली जाते. हे शिव लिंग ज्योतिर्लिंगासारखे भासते.

४. इथे मधुरभाषिणी देवी असल्याकारणाने ह्या स्थळाला श्रीविद्यापीठ मानले जाते.

५. हे अशा स्थळांपैकी एक आहे जिथे राजा दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली.

६. इथे भगवान शिवांनी त्यांच्या पादुकांचे दर्शन दिले म्हणून इथे नवग्रह देवालय नाही.

७. नंदिंचे चे शिर वायव्याकडे झुकले आहे जणू काही ते भगवान शिवांचे नृत्य बघत आहेत, ज्यामध्ये भगवान शिवांनी आपले विश्वरूप दाखवले.

८. श्री विनायकांची मूर्ती अद्वितीय आहे. त्यांनी आपल्या हातामध्ये घंटा धरली आहे.  

९.  श्री महालक्ष्मींची मूर्ती अद्वितीय आहे. ह्या मूर्तीमध्ये त्यांच्या दोन्ही बाजूला हत्ती आहेत.

१०. इथे सर्व अमावास्यांना अन्नाभिषेक साजरा केला जातो.

११. इथे भगवान विष्णूंचे एक अद्वितीय शिल्प आहे ज्यामध्ये त्यांनी भगवान शिवांचे पदकमल आपल्या शिरावर धरले आहेत.

१२. श्रीमधुरभाषिणी देवींना भगवान शिवांसारखे तिसरे नेत्र आहे.

१३. श्री भैरवांच्या माथ्यावर चंद्रकोर आहे. 

१४. श्री भैरवांना क्षेत्रपाल असे संबोधले जाते आणि त्यांना नवग्रहांचे मुख्य मानले जाते. 


मंदिराबद्दल माहिती:

हे खूप छोटं गाव आहे. हे पूर्वाभिमुख मंदिर पण खूप छोटं आहे आणि ह्याला एक परिक्रमा आहे. इथे राजगोपुर नाही. त्या ऐवजी इथे प्रवेशावर एक कमान आहे ज्यावर ऋषभावर आरूढ असलेले भगवान शिव आणि पार्वती देवी ह्यांचे शिल्प आहे. 

मंदिराच्या पुढ्यात तीर्थ आहे. मुख्य मंदिरात गाभारा, अंतराळा, अर्धमंडप आणि महामंडप आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशावर दोन्ही बाजूंना श्री मुरुगन आणि श्री विनायक ह्यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यावर एका स्तराचे विमान (शिखर) आहे. कमानीनंतर गाभाऱ्याकडे मुख असलेले नंदी आणि बलीपीठ आहे. गाभाऱ्याच्या आजूबाजूला द्वारपालकांची स्टुक्कोची चित्रे आहेत.

इथले शिव लिंग स्वयंभू असून मातीचे बनले आहे. म्हणून ह्या लिंगावर अभिषेक होत नाही. आरतीच्या वेळेस शिव लिंग ज्योतिर्लिंगासारखे भासते.

कोष्ठ मूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा देवी आणि श्री विष्णू.

श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या जागी आहे.

श्री दुर्गादेवींना इथे अष्टभुजा रूपांत चित्रित केले आहे. त्यांनी आपल्या हातांमध्ये विविध शस्त्रे धरली आहेत तसेच एका हातात पोपट आहे. त्या बैठ्या मुद्रेत आहे.

श्री मधुरभाषिणी एका स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालयात स्थित आहेत. त्यांच्या कपाळावर पण भगवान शिवांसारखे तिसरे नेत्र आहे. हे त्यांच्या करुणेचे प्रतीक दर्शवते. भगवान शिवांचे तिसरे नेत्र सूर्यासारखे तेजस्वी आहे तर देवींचे तिसरे नेत्र चंद्रासारखे शांत आहे. त्यांनी आपल्या हातामध्ये चक्र धारण केले आहे. त्या आपल्या भक्तांना सर्व ३४ सौभाग्ये प्रदान करतात. त्यांना सदाक्षर देवी तसेच राजराजेश्वरी देवी ह्या नावाने संबोधले जाते. म्हणून ह्या स्थळाला श्रीविद्यापीठ मानले जाते. अगस्त्य ऋषींनी त्यांची श्री राजसिंहासनेश्वरी आणि श्री ललिताम्बिका ह्या नावांनी स्तुती केली आहे.

श्री भैरवांना क्षेत्रपाल तसेच नवग्रहांचे मुख्य मानले जाते. त्यांचे स्वतंत्र देवालय आहे. त्यांच्या माथ्यावर चंद्रकोर आहे.

इथल्या क्षेत्र विनायकांना श्री सिद्धी विनायक असे संबोधले जाते. 

श्री राजदुर्गादेवी त्यांच्या मूर्तीमध्ये त्यांच्या सिंह ह्या वाहनावर आरूढ आहेत. त्या अष्टभुजा रूपांत आहेत. त्यांच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आहे तर डाव्या हातात पोपट आहे. भाविकांचा असा समज आहे की त्यांची आराधना केल्याने मंगल तसेच राहूकेतू दोषांचे निवारण होते. 

महामंडपामध्ये पातंजली आणि व्याघ्रपाद ऋषींच्या मूर्ती आहेत.

प्रकारामधल्या मूर्ती आणि देवालये: श्री चंद्र, श्री सूर्य, शैव संत नालवर, श्री गजलक्ष्मी देवी, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नी वल्ली आणि दैवानै ह्यांच्या समवेत, श्री शनीश्वरर, भगवान विष्णूंची मूर्ती ज्यामध्ये त्यांनी भगवान शिवांचे पदकमल आपल्या शिरावर घेतले आहेत. ह्या मंदिरात नवग्रहांचे देवालय नाही.


प्रार्थना:

१. भाविक जन इथे अपत्य प्राप्तिसाठी, विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच रोगांचे आणि ज्वरांचे निवारण होण्यासाठी प्रार्थना करतात. ते अग्नी तीर्थामध्ये स्नान करतात आणि अन्नाभिषेक करतात.

२. हे राहूकेतू दोषांचे परिहार स्थळ आहे.

३. श्री पार्वती देवी इथे मधुरभाषिणीअम्माई ह्या रूपांत असल्याने भाविक जनांचा असा समज आहे की श्री पार्वती देवींच्या पदकमलांवर मध अर्पण करून ते प्राशन केल्याने त्वचेच्या दोषांचे निवारण होते.

४. भाविक जन इथे शिक्षणात प्राविण्य प्राप्त करण्यासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी मधाचा अभिषेक करतात.

५. इथे पालक आपल्या मुलांसाठी विद्यारंभ पूजा करतात.


पूजा:

शिव आगमानुसार नित्य पूजा केल्या जातात तसेच प्रदोषपूजा केल्या जातात.


मंदिरात साजरे होणारे सण:

ह्या ठिकाणी मारगळी ह्या महिन्यातील थिरुवथीरै ह्या सणाचे महत्व खूप आहे. ह्या उत्सवामध्ये आर्द्रा नक्षत्र दिवशी भगवान शिवांच्या पादुकांचे दर्शन घडते.

इथे साजरे केले जाणारे इतर सण असे आहेत 

आनी (जून-जुलै): थिरुमंजनं

आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरम (पूर्वा आषाढा नक्षत्र दिवशी उत्सव)

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी 

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम, प्रत्येक सोमवारी पूजा

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, पुष्य नक्षत्र दिवशी पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं (उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा)


मंदिराच्या वेळा: सकाळी ७.३० ते १२, दुपारी ४.३० ते संध्याकाळी ७.३०


मंदिराचा पत्ता:

श्री पातंजली मनोहरर मंदिर,
थिरुविलामर (विलामल),
जिल्हा आणि तालुका थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१०००२


दूरध्वनी: +९१-९८९४७८१७७८, +९१-९४८९४७९८९६


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment