Sunday, August 23, 2026

थेवूर येथील श्री देवपुरीश्वरर मंदिर

हे मंदिर तमिळनाडू राज्यातील थिरुवारूर जिल्ह्यात, कीळवेलूरजवळील थेवूर येथे वसले आहे. कीळवेलूरमार्गे जाणाऱ्या नागपट्टीनं - थिरुवारूर मार्गावर कीळवेलूरपासून ५ किमी, थिरुवारूरपासून १८ किमी आणि नागपट्टीनंपासून १८ किमी अंतरावर आहे. 

कावेरी नदीच्या दक्षिण तीरावरील शैव संतांनी स्तुती केलेल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शैव संत अप्पर आणि संबंधर यांनी या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर सहाव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं.

कोचेंगट चोळा राजा याने बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. मंदिर परिसरात पांड्या तसेच विजयनगर राजांच्या काळातील दगडी शिलालेख आढळतात. प्रारंभीच्या चोळा राजांनी या मंदिराची दगडी बांधकाम करुन पुनर्बांधणी केली. पुढील काळात विजयनगर, नायक राजांनी आणि नगरथर यांनी मंदिराचा विस्तार केला.

मूलवर: श्री देवपुरीश्वरर, श्री देवगुरुनाथर, श्री कदलीवनेश्वरर, श्री आदिदीक्षिराम उदयार

देवी: श्री तेनमोळीअल, श्री पन्निलवियामोळियुमै, श्री मधुरभाषिणी

पवित्र तीर्थे: देव तीर्थ, संजीवनी तीर्थ, मरुद तीर्थ, वरुण तीर्थ आणि गौतम तीर्थ

पवित्र क्षेत्रवृक्ष: कदली. हे केळीच्या जातीतील एक विलक्षण वृक्ष आहे. हे वृक्ष पाण्याशिवाय खडकावर वाढते. तामिळ भाषेत त्याला “कल्वळी” असे म्हटले जाते.

पौराणिक नावे: थिरुथेवूर, देवानूर

वर्तमान नाव: थेवूर

क्षेत्र पुराण:

१. पुराणानुसार कुबेर हे देवलोकाचे कोषाध्यक्ष होते. ते रावणाचे सावत्र बंधू होते. एका युद्धात रावणाने कुबेरांची शंखनिधी, पद्मनिधी यांसह सर्व संपत्ती हिरावून घेतली. आपले पद आणि संपत्ती पुन्हा प्राप्त व्हावी म्हणून कुबेरांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊन भगवान शिवांची आराधना केली. त्यावेळी देवगुरू बृहस्पती यांनी त्यांना शुक्र होरेमध्ये या पवित्र स्थळी भगवान शिवांची पूजा करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी ६ ते ७ आणि दुपारी १२ ते १ या काळात लाल कमळाच्या फुलांनी पूजा करण्यास सांगितले. बृहस्पतींच्या मार्गदर्शनानुसार कुबेरांनी येथे भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना त्यांचे हरवलेले पद आणि संपत्ती पुन्हा प्राप्त करून दिली.

२. पुराणानुसार इंद्रदेवांसह सर्व देवतांनी वृद्धासुराचा वध केल्यामुळे प्राप्त झालेल्या पापातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी भगवान शिवांची पूजा केली. देवतांच्या या आराधनेमुळे भगवान शिव येथे देवपुरीश्वरर या नावाने प्रसिद्ध झाले आणि या स्थानाला थेवूर हे नाव प्राप्त झाले. येथे देवतांच्या नावांपुढे “देव” ही उपाधी लावली जाते. देवतांसोबत इंद्रदेव आणि एक पवित्र क्षेत्रवृक्षही येथे आला. त्या वृक्षाने भगवान शिवांची आराधना केली आणि नंतर तो याच ठिकाणी राहिला. हा वृक्ष आजही खडकावर पाण्याशिवाय वाढत असल्याचे मानले जाते.

३. महाभारताच्या युद्धाच्या काळात राजा विराट आणि त्यांची कन्या उत्तरा या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांनी येथे भगवान शिवांची पूजा केली.

४. स्थळपुराणानुसार जगात बारा वर्षांचा भीषण दुष्काळ पडला असताना गौतम ऋषी या पवित्र स्थळी आले आणि येथे वास्तव्य केले. त्यांनी स्वतः शिवलिंगाची निर्मिती करून त्याची प्रतिष्ठापना केली आणि भगवान शिवांची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिले. लोकांना दुष्काळातून दिलासा मिळावा म्हणून भगवान शिवांनी गौतम ऋषींना संपत्ती आणि अन्न प्रदान केले.

५. स्थळपुराणानुसार मगध देशाचा राजा कुलवर्धन याने या पवित्र स्थळी यज्ञ केला.

ह्याठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

गौतम ऋषी, इंद्रदेव, कुबेर, कदली वृक्ष, देवगुरू बृहस्पती, राजा विराट आणि त्यांची कन्या उत्तरा, राजा कुलवर्धन, सूर्यदव तसेच शैव संत संबंधर आणि अप्पर.

वैशिष्ट्ये:

१. या मंदिरातील क्षेत्रवृक्ष हा केळीच्या जातीतील अत्यंत विलक्षण वृक्ष आहे. तो पाण्याशिवाय खडकावर वाढतो. हा वृक्ष देवलोकातून येथे आणला गेला असा समज आहे.

२. हे सोमस्कंद स्थळ आहे.

३. दक्षिणामूर्तींच्या पायांखाली मुलयगन नाही.

४. देवगुरू बृहस्पती यांनी येथे भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांना “गुरू” ही पदवी प्राप्त झाली असा समज आहे. त्यामुळे येथील भगवान दक्षिणामूर्तींना देवगुरू म्हणून गौरविले जाते.

५. या मंदिरातील देवी दुर्गेचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे त्या शिव-विष्णु दुर्गा या दुर्मिळ रूपात विराजमान आहेत.

६. या मंदिरातील देवतांच्या नावांमध्ये “देव” ही उपाधी आढळते.

७. देवतांसोबत क्षेत्रवृक्षही येथे आला आणि त्याने देवतांसह भगवान शिवांची आराधना केली असा समज आहे. त्यानंतर तो याच पवित्र भूमीत राहिला.

८. तामिळ महिन्यातील कार्थिगई महिन्यातील रविवारी सूर्यकिरणे थेट शिवलिंगावर पडतात. 

९. हे मंदिर गुरुदोषासाठी परिहार स्थळ मानले जाते.

मंदिराबद्दल माहिती:

मंदिरात गर्भगृह, अंतराळ, अर्धमंडप आणि मुखमंडप असे प्रमुख भाग आहेत. हे पूर्वाभिमुख मंदिर असून त्याला तीन स्तरांचे राजगोपुरम आहे. मंदिरात पाच परिक्रमा आहेत.

या पवित्र स्थानाचा उल्लेख महाभारत आणि रामायणात आढळतो.

गर्भगृहातील शिवलिंग हे स्वयंभू लिंग मानले जाते. ते मोठ्या चौकोनी अवुदयारवर आहे. कार्थिगई महिन्यातील रविवारी सूर्यकिरणे शिवलिंगावर पडतात.

राजगोपुरमच्या पलीकडे जमिनीच्या पातळीवर बलिपीठ, नंदी आणि ध्वजस्तंभ आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ, राजगोपुरमच्या डाव्या बाजूस नंदी आहे.

कोष्ठमूर्ती: श्री विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री भैरव आणि श्री दुर्गादेवी.

कोष्ठामध्ये सामान्यतः ज्या ठिकाणी लिंगोद्भवरांची मूर्ती असते, तिथे श्री महाविष्णूंची मूर्ती आहे.

बृहस्पतींनी येथे भगवान शिवांची आराधना केल्यामुळे श्री दक्षिणामूर्तींच्या पायांखाली मुलयगनाची मूर्ती नाही.

सामान्यतः शिवमंदिरांमध्ये अंबिकेच्या स्वरूपानुसार शिवदुर्गा किंवा विष्णुदुर्गेचे स्वरूप आढळते. मात्र येथे देवी दुर्गेच्या हातात भगवान विष्णूंशी संबंधित शंख आणि भगवान शिवांशी संबंधित मझू म्हणजे कुऱ्हाड, अशी दोन्ही आयुधे आहेत. हे स्वरूप अत्यंत दुर्मिळ मानले जाते. 

हे मंदिर अष्टविनायक मंदिरांपैकी एक असल्याचे मानले जाते.

येथील क्षेत्रविनायक ब्रह्मवरद या नावाने प्रसिद्ध आहेत. ते वलंपुरी विनायक (उजव्या सोंडेचे) आहेत.

श्री मुरुगांचे देवालय भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या मध्ये आहे. भगवान शिव, देवी पार्वती आणि त्यांच्यामध्ये विराजमान असलेले श्री मुरुगन यांचे हे स्वरूप सोमस्कंद मूर्ती रचनेचे दर्शन घडवते.

जमिनीच्या पातळीवरील मूर्ती आणि देवालये: मंदिराच्या जमिनीच्या पातळीवर पुढील देवता व पवित्र मूर्तींचे दर्शन होते: ६३ नायनमार, श्री वलंपुरी विनायकर, अहिल्येने पूजिलेले शिवलिंग, श्री महालक्ष्मीदेवी, गौतम ऋषींनी पूजिलेले शिवलिंग, नवग्रह, श्री इंद्रदेव, श्री मुरुगन, श्री गणेश, श्री भैरव.

वरच्या स्तरावरील मूर्ती व देवालये: नटराज सभा, सोमस्कंदर, अम्मयप्पर, श्री चंद्र, श्री सूर्य

प्रकारातील मूर्ती: मंदिराच्या प्रकारात बाल गणपती, बाल मुरुग, इंद्रलिंग तसेच संत माणिक्कवाचकरांनी पूजिलेले शिवलिंग आहे. या शिवलिंगाची आत्मलिंग म्हणून स्तुती केली जाते.

येथे श्री नटराजांचेही दर्शन होते.

श्री अंबिका देवींचे स्वतंत्र दक्षिणाभिमुख देवालय आहे. देवी उभ्या स्वरूपात विराजमान आहेत.

प्रार्थना:

१. गुरूग्रहाशी संबंधित दोषांचे निवारण करण्यासाठी भाविक जन येथे भगवान शिवांची आराधना करतात.

२. विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीसाठी भाविक जन सोमवारी पवित्र कदली वृक्षाची पूजा करतात.

३. हरवलेली संपत्ती पुन्हा प्राप्त व्हावी, जीवनात समृद्धी यावी तसेच शिक्षण आणि ज्ञानात प्रगती व्हावी यासाठी भाविक जन भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा करतात.

पूजा

मंदिरात दररोज नित्यपूजा केली जाते. त्याशिवाय प्रदोष पूजा तसेच सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी विशेष पूजा केली जाते.

मंदिरात साजरे होणारे सण:

वैकासी (मे-जून): ब्रह्मोत्सव

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई

मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकरसंक्रांती

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ६:०० ते दुपारी १२:००, संध्याकाळी ४:०० ते रात्री ८:००

मंदिराचा पत्ता:

श्री देवपुरीश्वरर मंदिर
थेवूर, थिरुवारूर जिल्हा
तामिळनाडू – ६१११०९

दूरध्वनी: +९१-४३६६२७६११३, +९१-९४६८२७८८१०

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment