हे मंदिर थिरुमारुगल-नागोर मार्गावर थिरुमारुगल पासून ३ किलोमीटर्स वर, थिरुवारुर पासून २८ किलोमीटर्सवर आणि कुंभकोणम पासून ४८ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. शैव संत संबंधर आणि वल्ललर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. ह्या स्थळाला पूर्वी थिरुछठमंगै असे नाव होते. ६व्या आणि ७व्या शतकाच्या आसपास ह्या मंदिराचे नाव आयवंथी असे होते. म्हणून हे मंदिर ६व्या आणि ७व्या शतकाच्या दरम्यान अस्तित्वात असावं. चोळा राजांनी ह्या मंदिराची दगडी बांधकाम करून पुनर्निर्मिती केली. कालांतराने पांड्या, नायक आणि नागरथर राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी मंदिराला दिलेल्या भेटवस्तू आणि देणग्यांचे उल्लेख आहेत. हे मंदिर कावेरी नदीची उपनदी असलेल्या मुडीकोंदण ह्या नदीच्या उत्तर काठावर आहे. थिरुनीळनक्क नायनार ह्यांचे हे जन्मस्थान आहे.
मूलवर: श्री आयवंदीश्वरर, श्री ब्रह्मपुरीश्वरर
देवी: श्री उभयपुष्पविलोचीनी, श्री मलर-कन्न-अम्माई, श्री एरु-मलर-कन्न-अम्माई
पवित्र तीर्थ: मंदिरासमोरील तीर्थ. ह्या तीर्थाच्या अर्ध्या भागाला चंद्र तीर्थ म्हणतात तर दुसऱ्या अर्ध्या भागाला सूर्य तीर्थ म्हणतात.
पूजा / आगम: रुद्रयामल तंत्र आगम
पवित्र वृक्ष: बहुवा (तामिळ मध्ये कोन्द्र)
पुराणिक नाव: थिरुछठमंगै
वर्तमान नाव: सियाथमंगै
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार श्री ब्रह्मदेवांनी, ज्यांना श्री आयवन असे पण संबोधले जाते, ह्या ठिकाणी पूजा केली. म्हणून भगवान शिवांना इथे श्री आयवंदीश्वरर आणि श्री ब्रह्मपुरीश्वरर असे संबोधले जाते.
२. इथले स्थळ पुराण ६३ नायनमारांमधले २८वे नायनार थिरुनीळनक्क नायनार ह्यांच्या संदर्भात आहे. ते जातीने ब्राह्मण होते आणि वेदपारंगत होते. ते उत्कट शिवभक्त होते. जेव्हा जेव्हा कोणी शिवभक्त त्यांच्याकडे यायचे ते त्यांचं स्वागत त्यांचे पाय धुवून करायचे. ते आगम नियमानुसार पूजाअर्चा करायचे. एकदा पौर्णिमेच्या दिवशी ते आपल्या पत्नीसह मंदिरात गेले होते. ते जेव्हा पूजा करत होते त्यावेळी एक कोळी आपल्या जाळ्यामधून शिव लिंगावर पडला. त्यांच्या पत्नीने तो कोळी फुंकर मारून उडवला. नीळनक्क नायनार ह्यांच्यानुसार हे कृत्य अपमानास्पद आणि निंदनीय होते. त्यांच्यामते त्यांच्या पत्नीने दुसरा कुठल्या मार्गाने त्याला बाजूला करावयास पाहिजे होते. त्यांनी आपली पूजा पूर्ण केली. पण त्यांनी आपल्या पत्नीला सोडून दिले आणि तिला मंदिरात ठेवून घरी परत आले. रात्री त्यांच्या स्वप्नात भगवान शिव आले. त्यांचं शरीर व्यवस्थित होतं पण कोळ्याचे विष जिथे पडले होते तो भाग सुजला होता. ज्यावर नीळनक्क नायनार ह्यांच्या पत्नीने फुंकर मारली होती तो भाग व्यवस्थित होता पण उरलेला भाग सुजला होता. नीळनक्क नायनार ह्यांना कळून चुकले कि भक्ती ही कर्मकांडापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते पहाटेच मंदिरात गेले. त्यांनी शिवांची पूजा केली आणि आपल्या पत्नीला घेऊन आले. त्यांनी भगवान शिवांप्रती तसेच शिवभक्तांप्रती सेवा चालू ठेवली.
३. एकदा नीळनक्क नायनार शैव संत संबंधरांना भेटायला गेले. त्यावेळी संबंधर खूप लहान होते. त्यावेळी संबंधरांबरोबर थिरुनीळकंठ याळप्पानर पण होते. ते दोघे सियाथमंगैकडे येत होते. नीळनक्क नायनारांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्यासाठी रात्री राहण्याची सोय केली. संबंधरांच्या सूचनेनुसार त्यांनी याळप्पानर आणि त्यांच्या पत्नीसाठी, ते दुसऱ्या जातीचे असल्याकारणाने, होमकुंडाजवळ सोय केली. रात्री होमकुंडामधला अग्नी जास्त तेजाने झळकत होता. ही याळप्पानर आणि त्यांच्या पत्नींच्या भक्तीची साक्ष होती. नीळनक्क नायनार ह्यांना ह्यातून शिक्षण मिळालं की भक्तीला जातींचं बंधन नसतं. संबंधर नीळनक्क नायनार ह्यांच्याबरोबर मंदिरात आले आणि त्यांनी भगवान शिव आणि नीळनक्क नायनार ह्यांची स्तुती गायली. संबंधरांनी नीळनक्क नायनार ह्यांना आपल्या विवाहाचे पौरोहित्य करण्यासाठी थिरुमननेल्लुर येथे येण्याचे आमंत्रण दिले. ते सगळे थिरुमननेल्लुर येथे गेले. तेथे संबंधर ह्यांनी भगवान शिवांकडे मुक्तीची प्रार्थना केली. ते सगळे भगवान शिवांच्या ज्योतीमध्ये विलीन झाले.
४. स्थळ पुराणानुसार एकदा ह्या गावातून काही व्यापारी प्रवास करत होते. तेवढ्यात त्यांच्यापुढे अचानक एक मुलगी आली. त्या व्यापाऱ्यांमधल्या सर्वात ज्येष्ठ व्यापाऱ्याला तिने मोडकळीस आलेल्या मंदिराला भेट देण्याची विनंती केली. तिचे मंत्रमुग्ध करणारे रूप पाहून त्या व्यापाऱ्याला तिच्या विनंतीला मान द्यावासा वाटला आणि तो आणि इतर व्यापारीपण तिच्याबरोबर त्या मंदिरात गेले. मंदिरात गेल्या गेल्या ती मुलगी अदृश्य झाली. त्यांना कळून चुकले कि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात त्या मंदिरातल्या पार्वती देवी होत्या. त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्मदेव, व्यापारी, संबंधर, थिरुनीळनक्क नायनार आणि त्यांची पत्नी.
वैशिष्ट्ये:
१. श्री अंबिका देवींच्या देवालयामध्ये देवींच्या कपाळावर भगवान शिवांसारखेच तिसरे नेत्र आहे.
२. श्री अर्धनारीश्वरांचा एक पाय नंदीवर आहे. हे दृश्य अतिशय दुर्मिळ आहे.
३. श्री शनीश्वरांचा एक पाय त्यांच्या वाहनावर म्हणजेच कावळ्यावर आहे.
४. दररोज रुद्रयामल तंत्र आगमानुसार चार पूजा केल्या जातात.
५. स्तंभावरील श्री आयवंदीश्वरर आणि श्री बाळकृष्णांची शिल्पे खूप आकर्षक आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे. हे मंदिर चारी बाजूंनी ग्रॅनाईट भिंतींनीं आच्छादलेले आहे. मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्धमंडप आहे. मध्यभागी स्टुक्कोची एक कमान आहे. अलीकडेच गाभाऱ्याच्या भोवती एक मंडप बांधला आहे. बलीपीठ आणि नंदी गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. राजगोपुराच्या समोर मंदिराचे पवित्र तीर्थ आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. गाभाऱ्याचा आकार शिव लिंगासारखा आहे. इथल्या शिव लिंगावर फोड दिसतात. गाभाऱ्याच्या प्रवेशावर द्वारपालक आहेत तसेच श्री गणपती आणि श्री दंडपाणी ह्यांची देवालये आहेत.
कोष्ट मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री अर्धनारीश्वरर, अगस्त्य मुनी, आलिंगन मूर्ती, श्री भिक्षादनर आणि श्री दुर्गादेवी.
श्री अर्धनारीश्वरर उभ्या मुद्रेत आहेत आणि त्यांचा एक हात नंदींवर आहे.
श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र पश्चिमाभिमुख देवालय आहे. त्यांच्या देवालयाचं द्वारपालकी रक्षण करत आहेत. त्यांना उभ्या मुद्रेत चित्रित केले आहे आणि त्यांना चार हात आहेत. त्यांच्या कपाळावर भगवान शिवांसारखं तिसरं नेत्र आहे. त्यांच्या गाभाऱ्यासमोर त्यांच्याकडे मुख करून नंदी आहे. तो थोड्या उंचावर आहे. त्यांच्या देवालयाला आणि गाभाऱ्याला स्वतंत्र प्रवेशद्वारे आहेत. श्री अंबिका देवींच्या देवालयाच्या परिक्रमेमध्ये श्री विनायक, श्री मुरुगन, श्री सूर्य ह्यांची देवालये आहेत. तसेच त्यांच्या देवालयामध्ये शयनगृह पण आहे.
बाहेरील परिक्रमेमधली इतर देवालये आणि मूर्ती: श्री चंद्र, श्री सूर्य, एक पाय त्यांच्या वाहनावर असलेले श्री शनीश्वर, शनीश्वरांचे वाहन कावळा, सप्त मातृका, श्री भैरव, नवग्रह, महालिंग, श्री विशालाक्षीदेवींसमवेत श्री काशी विश्वनाथ आणि श्री गणेश.
आतल्या परिक्रमेमध्ये पुढील देवालये आणि मूर्ती आहेत: वल्ली आणि दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रमण्यम, श्री गजलक्ष्मी, शैव संत नालवर, थिरुनीळनक्क नायनार त्यांच्या पत्नींसमवेत, मंगैयारकरसी, श्री सोमस्कंदर, श्री महागणपती, उत्सव मूर्ती आणि नर्दन सुंदरर.
नटराज सभेमध्ये श्री शिवकामींसमवेत श्री नटराज तसेच शैव संत माणिकवाचगर ह्यांच्या मूर्ती आहेत.
बाहेरील परिक्रमेमध्ये क्षेत्र वृक्षाच्या खाली श्री गणपतींच्या मूर्ती आणि शिव लिंग आहे. इथल्या स्तंभांवर श्री आंजनेय आणि त्यांच्या शेपटीवर घंटा तसेच रांगणाऱ्या बाळकृष्णांची शिल्पे कोरलेली आहेत.
प्रार्थना:
१. हे मूळ नक्षत्रासाठी परिहार स्थळ आहे.
२. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी, शिक्षणामध्ये प्रगतीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी तसेच वैभवप्राप्तीसाठी प्रार्थना करतात.
पूजा:
आगमानुसार रोज चार पूजा तसेच नियमित प्रदोष पूजा केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी, मूळ नक्षत्र दिवशी उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते ११, दुपारी ४ ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता:
श्री आयवंदीश्वरर मंदिर,
सियाथमंगै,
तालुका आणि जिल्हा: नागपट्टीनं
तामिळ नाडू ६०९७०२
दूरध्वनी: +९१-४३६६२७००७३, +९१-९७५१०७५०२८
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment