Sunday, July 5, 2026

पयत्तरंगुडी येथील श्री पयतृनाथर मंदिर

पयत्तरंगुडी मयीलादुथुराई-थिरुवारुर मार्गावर थिरुवारुर पासून ११ किलोमीटर्सवर, थिरूमारूगल पासून ५ किलोमीटर्सवर, नागपट्टीनं पासून २५ किलोमीटर्सवर तर थिरकन्नपुरम पासून ७ किलोमीटर्सवर आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैव संत अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ६व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. चोळा राजांनी ह्या मंदिराची पुनर्निर्मिती केली आणि नायक राजांनी जीर्णोद्धार केला. इथल्या शिलालेखांमध्ये चोळा राजांनी मंदिराला दिलेल्या देणग्या तसेच त्यांनी केलेल्या कामाचे उल्लेख आहेत.

मूलवर: श्री पयतृनाथर, श्री पयत्रीईश्वरर, श्री मुक्तपुरीश्वरर
देवी: श्री नेत्राम्बिका, श्री नेत्राम्बळ, श्री काव्यांगकन्नीअंबळ
पवित्र तीर्थ: देवी तीर्थ, करुणा तीर्थ
पुराणिक नाव: थिरुपयथ्थरुर
क्षेत्र वृक्ष: इंडियन ट्युलिप, अष्ट, भेंड, परापिप्पल (हिंदी), सिळंथी (तामिळ)
उत्सव मूर्ती: सोमस्कंदमूर्ती

क्षेत्र पुराण:

१. गतकाळामध्ये नागपट्टीनं हे बंदर होतं. व्यापारी इथून अरेबियाला मिरी निर्यात करायचे आणि त्या बदल्यात घोडे आयात करायचे. एकदा एक व्यापारी, जो भगवान शिवांचा भक्त होता, तो मिरीची पोती निर्यात करण्यासाठी निघाला. नागपट्टीनंच्या वाटेवर असताना त्याला लक्षात आले कि मिरी निर्यात करण्यासाठी कर भरावा लागेल. ह्या करामुळे त्याला बराच तोटा होणार आहे हे त्याला लक्षात आले. त्याला हे पण कळले कि डाळी निर्यात करण्यासाठी कर भरावा लागत नाही. त्याने कर भरावा लागू नये म्हणून भगवान शिवांची प्रार्थना केली कि करनाका ओलांडवेपर्यंत मिरीचे रूपांतर डाळीमध्ये व्हावे. त्या रात्री त्याने ह्या ठिकाणी विश्रांती घेतली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी मिरीचे रूपांतर डाळीमध्ये केले आणि स्वप्नांत तसं त्या भक्ताला सांगितल. सकाळी उठून तो व्यापारी नागपट्टीनं कडे निघाला. व्यापाराच्या पोत्यांमध्ये डाळी असल्याने करनाक्यावरच्या अधिकाऱ्याने त्याला कर माफ करून जाऊ दिले. त्या व्यापाऱ्याने नागपट्टीनं इथे जो नफा कमावला तो त्याने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला. तामिळ मध्ये डाळींना पयरु म्हणतात. म्हणून इथे भगवान शिवांना पयतृनाथर असं संबोधलं जातं आणि ह्या स्थळाला थिरुपयत्तरुर असं संबोधलं जातं.

२. इथल्या स्थळ पुराणानुसार जे इथे उपासना करतात त्यांना भगवान शिव मुक्ती देतात. म्हणून इथे भगवान शिवांना मुक्तीश्वरर असं संबोधलं जातं. सिध्दांपैकी एक सिद्ध पोय्यामोळी ह्यांनी भगवान शिवांची पयतृतुराई मुक्तीश्वरर अशी स्तुती केली आहे.

३. स्थळ पुराणानुसार पंचनाद वन्नन ह्यांनी भगवान शिवांना त्यांच्या नेत्रांमधल्या दोषनिवारणासाठी प्रार्थना केली. ते बरे झाल्यावर त्यांचा असा समज झाला की भगवान शिवांनीच त्यांना बरं केलं.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भैरव महाऋषी, पोय्यामोळी सिद्ध

वैशिष्ट्ये:

१. इथल्या क्षेत्र वृक्षाची फुले पिवळी आहेत आणि त्यांचा आकार कोळ्यांसारखा आहे.

२. इथे दुर्गादेवींचे देवालय नाही पण त्या जागी वीरमहाकाली देवींचे देवालय आहे.

३. महामंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.

४. भैरव महाऋषिनीं इथे भगवान शिवांची उपासना केली.

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. इथल्या मुख्य गोपुराला स्तर नाही. पण स्तरांच्या ऐवजी पंच मूर्तींची शिल्पे आहेत त्या पंच मूर्ती अशा  - भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री विनायक, श्री मुरुगन, श्री अंगारक (मंगळग्रह). इथे ध्वजस्तंभ नाही. बलीपीठ आणि नंदी मुख्य कमानीच्या नंतर लगेचच नवीन बांधलेल्या मंडपात आहेत आणि ते गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ, महामंडप आणि मुखमंडप आहेत. महामंडप आणि मुखमंडप ह्यांचा आकार वटवाघुळाच्या कपाळाच्या आकाराचा आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि त्याचा तळ (अवूदयार) चौकोनी आहे. 

कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती

श्री चंडिकेश्वरांचे देवालय त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहे. 

गाभाऱ्याच्या डाव्याबाजूला श्री अंबिका देवींचे दक्षिणाभिमुखी स्वतंत्र देवालय आहे. त्यांना चार हात असून वरच्या बाजूचे हात वरद आणि अभय मुद्रेत आहेत. खालच्या हातांमध्ये अक्षमाला आणि कमळ आहे. 

महामंडपामध्ये श्री नटराजांचे स्वतंत्र दक्षिणाभिमुखी देवालय आहे. तसेच महामंडपामध्ये उत्सव मूर्ती आणि सोमस्कंद मूर्ती आहे.

परिक्रमेमधल्या इतर मूर्ती आणि देवालये:

श्री सिद्धी विनायक, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री वीरमहाकाली देवी, श्री दंडपाणी, श्री विशालाक्षींसमवेत श्री विश्वनाथ, श्री गजलक्ष्मी, भैरव महाऋषी, श्री ब्रह्मदेव, श्री सूर्य, श्री चंद्र आणि नवग्रह.

प्रार्थना:

१. व्यापारामध्ये यश मिळविण्यासाठी इथले व्यापारी भगवान शिवांची प्रार्थना करतात.

२. ज्यांना नेत्र दोष आहेत ते भाविक जन करुणा तीर्थामध्ये स्नान करून श्री पार्वती देवींची पूजा करतात. जेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण होतात तेव्हा ते भगवान शिवांना वस्त्र देऊन त्यांची पूजा करतात आणि अंबिका देवींना गोड पोंगल चा नैवेद्य दाखवतात.

३. दुष्ट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून इथे भाविक जन श्री वीरमहाकाली देवींची पूजा करतात.

पूजा:

नियमित दैनंदिन पूजा आणि प्रदोष पूजा.

मंदिरात साजरे होणारे सण:

चित्राई (एप्रिल-मे): पौर्णिमा साजरी होते

आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम - पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर पूजा, तसेच दर शुक्रवारी पूजा

आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री

ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंदषष्ठी, अन्नाभिषेक

कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई

थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, तसेच दर शुक्रवारी पूजा

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री

मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०

मंदिराचा पत्ता:

श्री पयतृनाथर मंदिर,
पयत्तरंगुडी, कंगलनचेरी मार्गे,
तालुका नन्नीलं,
तामिळ नाडू ६१०१०१

दूरध्वनी: +९१-४३६६२७२४२३, +९१-९८६५८४४६७७

मंदिराच्या पुजाऱ्याच्या संपर्क: श्री चंद्रशेखर गुरुक्कल +९१-९६२६४७६४२८

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment