हे मंदिर थिरुवैयारु पासून १९ किलोमीटर्सवर, थिरुकंडीयुर पासून १९ किलोमीटर्सवर आणि तंजावूर पासून २६ किलोमीटर्सवर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर वसलं आहे. शैव संत अप्पर, संबंधर आणि वल्लालर ह्या नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी अस्तित्वात असावं (साधारण २००० वर्षांपेक्षाही जुनं असावं). चोळा साम्राज्याच्या आदित्य चोळा I ह्या राजाने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इथे काही शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केलेल्या कामाच्या तसेच देणग्यांचा उल्लेख आहे.
मूलवर: श्री अग्नीश्वरर, श्री थीयाडीअप्पर
देवी: श्री सौंदर्यनायकी, श्री अळगम्मई, श्री वारकोंडा मुलैयम्मई
पवित्र वृक्ष (क्षेत्र वृक्ष): शमी, बिल्व
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, कावेरी नदी, कूडमुरूट्टी नदी, अग्नी (विहीर)
पौराणिक नाव: मेलै थिरुकट्टूपल्ली
वर्तमान नाव: थिरुकट्टूपल्ली
क्षेत्र पुराण:
१. आधीच्या एका पंच भूत स्थळांबद्दलच्या लेखात असा उल्लेख केला होता की भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना ते खोटे बोलल्याबद्दल त्यांची पृथ्वीवर कुठेही पूजा होणार नाही असा शाप दिला होता. श्री ब्रह्मदेव ह्या शापामुळे खूप व्यथित झाले. ह्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांची पूजा केली. त्यांच्या पूजेवर प्रस्सन होऊन भगवान शिवांनी त्यांचं इथे स्वतंत्र देवालय होईल असं वरदान दिलं. असा समज आहे कि हे पहिलं स्थळ आहे जिथे श्री ब्रम्हदेवांचं स्वतंत्र देवालय आहे.
२. स्थळ पुराणानुसार श्री इंद्रदेव आणि त्यांच्याबरोबर इतर देवांनीही इथे येऊन भगवान शिवांची पूजा केली. श्री अग्निदेवहि त्यामध्ये होते. श्री अग्निदेवांनी भगवान शिवांकडे आपली व्यथा प्रगट केली कि यज्ञामध्ये भाविक जनांची सर्व पापे ते जाळतात त्यामुळे ती सगळी पापे त्यांच्या अंगावर येतात तसेच त्यांचा ज्या गोष्टींना स्पर्श होतो त्या गोष्टी भस्म होतात असा त्यांच्यावर आरोप होतो. ह्या ओझ्यातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना इथे तीर्थ निर्माण करण्यास सांगितले आणि त्या तीर्थातल्या पाण्याने अभिषेक करण्यास सांगितले. श्री अग्निदेवांनी भगवान शिवांच्या आज्ञेने तीर्थ निर्माण करून त्यातील पाण्याने अभिषेक केला आणि त्यामुळे ते शुद्ध झाले. श्री अग्निदेवांनी भगवान शिवांची इथे पूजा केली म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री अग्नीश्वरर असे आहे आणि त्यांनी निर्माण केलेल्या तीर्थाचे नाव अग्नितीर्थ आहे.
३. त्रिची मधल्या श्री थायूमानवर मंदिराबद्दलच्या लेखामध्ये सिद्धमुनि थिरुमूलर ह्यांचे वंशज सरममुनी ह्यांच्याबद्दल उल्लेख केला होता. ते भगवान शिवांची शेवंतीच्या फुलांनी पूजा करायचे. म्हणून तिथे भगवान शिवांचे नाव शेवंतीनाथर असे आहे. उरैयुर येथील चोळा राजाला दोन राण्या होत्या. एक राणी राज्याची राजधानी उरैयुर येथे होती तर दुसरी राणी ह्या ठिकाणी होती. राजाचा एक सेवक सरम मुनींच्या नंदनवनातून शेवंतीची फुले चोरायचा आणि ती राजाच्या दोन राण्यांना द्यायचा. उरैयुर येथील राणी ती फुले स्वतःसाठी वापरायची तर इथली म्हणजेच थिरुकट्टूपल्ली येथील राणी ती फुले भगवान शिवांच्या पूजेसाठी वापरायची. सरम मुनींनी आपल्या नंदनवनातील फुले चोरी होत असल्याची तक्रार राजाकडे केली. पण राजाने त्याची दखल घेतली नाही. तेव्हां सरम मुनींनी उरैयुर येथील भगवान शिवांकडे तक्रार केली. भगवान शिव पश्चिमेकडे म्हणजेच राजाच्या दरबाराकडे वळले आणि त्यांनी आपला क्रोध कटाक्ष त्या दिशेने टाकला ज्यामुळे वादळ निर्माण होऊन उरैयुर वादळामध्ये बुडून गेले. पण हे स्थळ मात्र सुरक्षित राहिले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भगवान विष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री सूर्य, श्री अग्नी, श्री इंद्र, इतर देव, भगीरथ राजा आणि चोळा राजाची राणी.
वैशिष्ट्ये:
१. इथला गाभारा जमिनीच्या पातळीखाली आहे.
२. नवग्रह संनिधीमध्ये सगळे ग्रह सुर्याभिमुख आहेत.
३. इथे श्री दक्षिणामूर्तींच्या दोन मूर्ती आहेत. एक श्री योग दक्षिणामूर्ती आणि एक श्री गुरु दक्षिणामूर्ती. श्री योग दक्षिणामूर्तींची मूर्ती अलौकिक आहे.
४. इथला ध्वजस्तंभ तांब्याने आच्छादलेला आहे.
५. कोष्टामध्ये सहसा असलेल्या श्री लिंगोद्भवर मूर्तीच्या ऐवजी श्री अर्धनारीश्वरांची मूर्ती आहे.
६. श्री ब्रम्हदेवांचे इथे स्वतंत्र देवालय आहे जे विश्वातील त्यांचे पहिले देवालय आहे असे मानले जाते.
मंदिराबद्दल माहिती:
गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थमंडप आहे. हे पहिलं मंदिर आहे जिथे श्री ब्रम्हदेवांचे स्वतंत्र देवालय आहे. ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. मंदिराचा व्याप साधारण १ एकर आहे. ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदि राजगोपुराच्या पुढे एका नवनिर्मित मंडपामध्ये आहेत. ध्वजस्तंभ तांब्याने आच्छादित आहे. राजगोपुराच्या उजव्या बाजूला श्री विनायकांचे देवालय आहे. गाभारा जमिनीच्या पातळीच्या चार पायऱ्या खाली आहे. ह्या गाभाऱ्याला एक लहान प्रवेशद्वार आहे. इथले शिवलिंग छोटे आहे आणि स्वयंभू आहे. शिवलिंगाचा वरचा भाग सर्पाच्या पांच फण्यांनी आच्छादलेला आहे. ह्या गाभाऱ्यामध्ये पुजाऱ्याशिवाय कोणालाही आत यायची परवानगी नाही.
कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री योग दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रम्हदेव, श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री लिंगोद्भवर ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे.
बाहेरील परिक्रमेमध्ये नटराज सभा, उत्सव मूर्ती आणि नवग्रह संनिधी आहे. नवग्रह संनिधीमध्ये सर्व ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत.
आतील परिक्रमेमधल्या मूर्ती आणि देवालये: श्री वलमपुरी विनायकर, श्री लिंगोद्भवर, श्री अर्धनारीश्वरर, श्री विशालाक्षी समवेत श्री काशीविश्वनाथ, श्री उन्नमलैअम्मन, श्री वल्ली आणि श्री देवानै समवेत श्री सुब्रमण्यम, श्री श्रीदेवी आणि श्री भूमादेवी समवेत श्री श्रीनिवास, श्री गजलक्ष्मी देवी, श्री चण्डिकेश्वरर, एका स्वतंत्र देवालयामध्ये श्री ब्रम्हदेव, श्री सट्टाईनाथर.
ह्या मंदिरामधे श्री दक्षिणामूर्तींच्या दोन मूर्ती आहेत - श्री योग दक्षिणामूर्तीआणि श्री गुरु दक्षिणामूर्ती. श्रो योग्य दक्षिणामूर्तींना दोन हात आहेत आणि ते कुरंगासनामध्ये बसले आहेत. त्यांच्या जटांमध्ये सूर्य आणि चंद्र आहेत आणि गळ्यामध्ये मकरंदी रुद्राक्ष आहे. पुढील मंडपाच्या उजव्या बाजूला श्री भैरव आणि शैव संत नालवर ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री अंबिका देवी एका स्वतंत्र दक्षिणाभिमुख देवालयात आहेत आणि त्यावर विमान आहे. त्यांच्या देवालयाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला द्वारपालकांची स्टुक्कोची चित्रे आहेत. इथल्या मंडपाच्या छतावर भगवान शिव, श्री पार्वती देवी, श्री मुरुगन आणि श्री विनायकर ह्यांची स्टुक्कोची चित्रे आहेत. श्री अंबिका उभ्या मुद्रे मधे आहेत. त्यांच्या देवालयामध्ये श्री विनायकांची मूर्ती आहे.
प्रार्थना:
भाविक जन इथे पुढील कारणांसाठी प्रार्थना करतात: १) विवाहातल्या अडचणींच्या निवारणासाठी, २) धन आणि समृद्धी प्राप्ती साठी, ३) शिक्षणात यश आणि ज्ञानप्राप्ती साठी
पूजा:
आगम नियमांनुसार नियमित पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष दिवशी नियमित प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा नक्षत्रावर ब्रम्होत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (फेब्रुवारी-मार्च): मघा नक्षत्र उत्सव, महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते सकाळी ११, दुपारी ४ ते रात्री ८.३०
पत्ता: श्री अग्नीश्वरर मंदिर / श्री थीयाडीअप्पर मंदिर, थिरुकट्टूपल्ली पोस्ट, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू ६१३०१४
दूरध्वनी: +९१-९४४२३४७४३३
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment