नेडुंगळं हे त्रिची-तंजावूर मार्गावर थुवक्कुडी पासून ४ किलोमीटर्सवर आहे. थुवक्कुडी हे त्रिची पासून १७ किलोमीटर्सवर आहे आणि तंजावूर पासून २७ किलोमीटर्स वर आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती केली आहे. तामिळ मध्ये थिरु नेडुंगळं म्हणजे विस्तारित पठारे. थेवरं मध्ये ह्या स्थळाचा उल्लेख नेडुंगलामानगर असा आहे ज्याचा अर्थ मोठं शहर असा आहे. पण आता ते फक्त एक गांव आहे. मूळ मंदिर सातव्या शतकाच्याही आधी बांधलं गेलं असावं. सध्याचे मंदिर हे साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलं असावं. संबंधर ह्यांनी ह्या स्थळाची स्तुती “एदार कळैयुम पथीगम” (विघ्नांचे हरण करणारे भजन) असे केले आहे. चोळा, पांड्या, होयसाला आणि विजयनगर साम्राज्यांच्या काळातले शिलालेख इथे आहेत. ह्या शिलालेखांमध्ये भगवंताची विविध नावांनी स्तुती केली आहे.
मूलवर: श्री नेडुंगळंनाथर, श्री नित्यसुंदरेश्वरर
देवी: श्री मंगलनायकी, श्री ओप्पीलनायकी
उत्सवर: श्री सोमस्कंदर
क्षेत्र वृक्ष: बिल्व आणि मराठीमधलं कण्हेर
पवित्र तीर्थ: अगस्त्य तीर्थ, सुंदर तीर्थ
पौराणिक नाव: थिरु नेडुंगळं
क्षेत्र पुराण:
१. आधीच्या लेखामध्ये जे सोमस्कंद क्षेत्र पुराणाचे वर्णन केले होते तेच क्षेत्र पुराण ह्या मंदिराचे पण आहे.
२. पुराणांनुसार एकदा श्री पार्वती देवी इथे तपश्चर्या करत असताना त्यांच्या बरोबर खोडसाळपणा करण्याच्या हेतूने भगवान शिव एका चोराच्या रूपात आले. श्री पार्वती देवी घाबरून येथून जवळ असलेल्या ओळीमधीचोळै ह्या गावात असलेल्या थळै वृक्षांच्या बागेमध्ये जाऊन लपल्या. भगवान शिवांनी त्यांना आपले मूळ रूप दाखवले आणि ते श्री पार्वती देवींना कैलास पर्वतावर घेऊन गेले.
३. पुराणांनुसार अगस्त्य मुनींनी इथे अगस्त्य तीर्थ निर्माण करून भगवान शिवांची आराधना केली.
४. स्थळ पुराणानुसार वाणिक्य चोळा ह्या राजाला भगवान शिवांनी विवाहाच्या पोषाखामध्ये दर्शन दिलं म्हणून भगवान शिवांना इथे श्री नित्य कल्याण सुंदरेश्वरर असे नाव आहे.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
अगस्त्य मुनी
वैशिष्ट्ये:
१. हे क्षेत्र काशी क्षेत्राशी तुल्यबळ मानलं जातं.
२. शैव संत संबंधर ह्यांनी इथे एक पथीगम रचून ते गायले आहे.
३. शैव संत अय्याडीगळ कडवरकोण नायनार ह्यांनी ह्या मंदिरातल्या भगवान शिवांची स्तुती गायली आहे. हे संत अप्पर आणि संबंधर ह्यांच्याही आधी अस्तित्वात होते. त्यामुळे हे मंदिर २००० वर्षापेक्षाही जुने असावे.
४. श्री योग दक्षिणामूर्तींची मूर्ती अलौकिक आहे.
५. श्रो सोमस्कंदांची मूर्ती पण अलौकिक आहे.
६. आडी ह्या तामिळ महिन्याच्या सातव्या आणि बाराव्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
७. सप्त मातृका दोन जागी आहेत. परिक्रमेमध्ये त्यांच्या मूर्ती आहेत तर अजून एका ठिकाणी त्यांची शिल्पे एका स्लॅबवर कोरलेली आहेत.
८. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्यदेव त्यांच्या पत्नींसमवेत असून ते पश्चिमाभिमुख आहेत. आणि बाकीचे ग्रह त्यांच्या कडे मुख करून आहेत.
९. शैव संत श्री अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील श्री मुरुगन ह्यांच्या स्तुत्यर्थ स्तोत्रे रचली आहेत.
१०. चोळा साम्राज्याच्या काळातली एक उखळ इथे आहे.
मंदिराबद्दल माहिती:
ह्या मंदिराच्या आवाराचा व्याप साधारण २ एकर आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे आणि इथे दोन परिक्रमा आहेत. पहिल्या प्रवेशद्वारावर राजगोपुर नाही. दुसऱ्या प्रवेशद्वारावर दोन स्तरांचं राजगोपुर आहे. दोन प्रवेशद्वारांच्या मधे ध्वजस्तंभ, नंदि मंडप आणि मोठ्ठं बलीपीठ आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशाजवळ श्री मुरुगन आणि श्री विनायकर ह्यांची देवालये आहेत. मंदिराच्या समोर तलाव (तीर्थ) आहे. हे क्षेत्र अलौकिक आहे. इथे भगवान शिवांच्या देवालयावर दोन विमाने आहेत. ह्या देवालयामध्ये भगवान शिवांनी आपल्या शरीराचा अर्धा भाग श्री पार्वती देवींना दिला आहे आणि म्हणूनच त्यांना अर्धनारीश्वरर असे संबोधले जाते. इथे अर्धनारीश्वरांची मूर्ती नाही त्यामुळे शिव लिंग हेच अर्धनारीश्वरर आहेत. श्री अंबिका देवी ह्या शिव लिंगामध्ये अरुप रूपात आहेत असा समज आहे. म्हणून शिव लिंग केंद्रित नाही. असा समज आहे कि भगवान शिव श्री पार्वती देवींना सामावून घेण्यासाठी थोडे बाजूला झाले. देवाच्या गाभाऱ्यावर दोन विमानं असणं ही योजना ह्या मंदिराशिवाय फक्त काशी मध्ये दिसून येते. आडी ह्या तामिळ महिन्याच्या सातव्या आणि बाराव्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
कोष्टामध्ये श्री योग दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री दुर्गा देवींच्या मूर्तीजवळ श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती आहे. श्री दक्षिणामूर्ती हे पद्मासनात आहेत. श्री विनायकांचे देवालय मंदिराच्या नैऋत्य दिशेला आहे आणि इथे त्यांचे नाव श्री कन्नी विनायकर असे आहे. बाहेरील परिक्रमेच्या ईशान्येकडील कोनामध्ये श्री अंबिका ओप्पीलानायकी ह्यांचे देवालय आहे. नावाप्रमाणेच ही मूर्ती अतिशय सुंदर आहे. त्यांची मूर्ती चतुर्भुज आहे आणि उभ्या मुद्रेमध्ये आहे. हे देवालय नंदी मंडपाच्या डाव्या बाजूला आहे. ह्या देवालयासमोर स्तंभ असलेला मंडप आहे. ह्या देवालयाच्या जवळ थिरुकल्याण मंडप (विवाह मंडप) आहे. आतल्या परिक्रमेच्या आग्नेय दिशेला श्री सोमस्कंदर आणि श्री चंद्रशेखर ह्यांची देवालये आहेत. दक्षिणेकडील परिक्रमेमध्ये सप्त मातृका, श्री दक्षिणामूर्ती, आणि अय्यनार ह्यांची देवालये आहेत.
पश्चिमेकडील परिक्रमेमध्ये श्री सुब्रमण्यम ह्यांचे देवालय आहे. त्यांच्या पत्नींसमवेत ते भक्तांवर कृपा करतात. दक्षिणेला श्री वरदराज पेरुमल त्यांच्या पत्नींसमवेत त्यांच्या देवालयामध्ये आहेत. उत्तरेला अगस्त्य मुनींचे देवालय आहे. आतल्या परिक्रमेमध्ये श्री भैरव आणि श्री शिवगामी देवींसमवेत श्री नटराज ह्यांची देवालये आहेत. परिक्रमेमध्ये श्री ज्येष्ठा देवी, अप्पू लिंग, वायू लिंग, कुपू लिंग, नवग्रह, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री काळभैरव, शैव संत नालवर आणि सेक्कीळर ह्यांच्या मूर्ती आणि देवालये आहेत. इथे सप्त मातृकांच्या दोन, श्री चंडिकेश्वरांच्या दोन तसेच श्री वाराही देवींची मूर्ती आहे. अगस्त्य तीर्थाजवळ अगस्त्य मुनींचे अजून एक स्वतंत्र देवालय आहे.
श्री सोमस्कंदरांच्या मूर्तीमध्ये त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा नाही. असा समज आहे कि राजाने हा अंगठा एका खटल्यामध्ये खोटी साक्ष दिल्याबद्दल शिक्षा म्हणून कापला.
प्रार्थना:
१. ह्या स्थळी एदार कळैयुम पथीगम गायल्याने सर्व विघ्नांचे निवारण होते ह्या भावनेने भाविक जन ते इथे गातात.
२. भाविक जन इथे अपत्य प्राप्तीसाठी पूजा करतात.
३. विवाहामधल्या अडचणींचे निवारण होण्यासाठी भाविक जन श्री वाराही देवींची पूजा करतात. उखळीमध्ये दळलेली हळद अर्पण केली जाते.
पूजा:
१. दररोज दिवसभरात सहा पूजा केल्या जातात.
२. शैव संत संबंधर, अप्पर, सुंदरर आणि माणिकवासगर ह्यांच्या जन्मनक्षत्राच्या दिवशी विशेष पूजा केल्या जातात.
३. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
४. आडी ह्या तामिळ महिन्याच्या दर शुक्रवारी विशेष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
आनी (जून -जुलै): विनायकर चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरु कार्थिगई
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
मंदिराच्या वेळा: सकाळी ६.३० ते दुपारी १२, संध्याकाळी ४.३० ते संध्याकाळी ८
पत्ता: श्री नेडुंगळंनाथर मंदिर, थिरुनेडुंगळं पोस्ट, थुवक्कुडी मार्गे, तालुका आणि जिल्हा त्रिची, तामिळ नाडू ६२००१५
दूरध्वनी: +९१-४३१२५२०१२६
पुरोहिताचा दूरध्वनी: श्री रमेश गुरुक्कल - ९५७८८९४३८२, ९८४२०२८७७४
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment