सप्त विडंग स्थळांमधलं हे सहावं मंदिर आहे. थिरुवैमूर हे नागपट्टीनं पासून २० किलोमीटर्स वर थिरुथुराईपुंडी मार्गावर आहे. येथील विडंगराचे नाव नीलविडंगर असे आहे. इथे भगवान शिवांनी केलेल्या नृत्याचे नाव कमल नटनं (वाऱ्याच्या झुळुकीमध्ये फिरणाऱ्या कमळासारखं नृत्य) असं आहे.
मुलवर: श्री वैमूरनाथर
देवी: श्री क्षिरोपवासिनी, श्री पालीनं मोहीळीयल
क्षेत्र वृक्ष: फणस
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, इंद्र तीर्थ, प्रचंड मारुत तीर्थ, हरिश्चंद्र नदी
पुराणिक नाव: थिरुथेन थिरुवैमूर
वर्तमान नाव: थिरुवैमूर
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळ नाडू
क्षेत्र पुराण:
जेव्हां श्रेष्ठ शैव संत अप्पर हे वेदारण्यम मध्ये निवास करत होते तेव्हां भगवान शिव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी श्री अप्पर ह्यांना ह्या मंदिराला भेट देण्यास सांगितले. भगवान शिवांच्या आज्ञेनुसार श्री अप्पर येथे आले. पण ते जेव्हां आले त्यांना शिव लिंग दिसलं नाही. श्री गणेशांनी त्यांना शिव लिंग असलेली जागा दाखवली. इथे श्री गणेशांची अशी मूर्ती आहे ज्यामध्ये ते त्यांच्या सोंडेने श्री अप्पर ह्यांना शिव लिंग कुठे आहे ते दाखवत आहेत. अजून एक श्रेष्ठ शैव संत श्री संबंधर ह्यांनी पण श्री अप्पर ह्यांचं अनुसरण केलं आणि त्यांना शिव लिंगाचं दर्शन मिळालं.
असा समज आहे कि श्री सूर्यदेवांनी येथे भगवान शिवांची उपासना केली. पंगूनी महिन्याच्या बाराव्या आणि तेराव्या दिवशी सूर्याचे किरण भगवान शिव आणि देवीच्या मूर्तीवर पडतात.
संस्कृत मध्ये ह्या स्थळाला लीला रहस्यपुरम असं म्हणतात.
असा समज आहे कि श्री संबंधर ह्यांना ह्या मंदिरात भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांचे दैवी नृत्याचे दर्शन झाले.
श्री ब्रह्मदेव आणि इतर देव तारकासुराला घाबरून इथे पक्ष्यांच्या रूपात आले आणि त्यांनी प्रचंड मारुत तीर्थामध्ये स्नान केलं आणि त्यांच्या पापांचं क्षालन करण्यासाठी त्यांनी भगवान शिवांची पूजा केली.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर २००० वर्षे जुनं आहे. हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर वसलं आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. श्रेष्ठ शैव संत श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांनी त्यांच्या पदिगंमध्ये (दिव्य स्तोत्र) ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. ह्या मंदिराचा व्याप साधारण २ एकर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या ह्या मंदिराला तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि २ परिक्रमा आहेत. मूळ मंदिर हे विटांनी बांधलेले आहे. चोळा साम्राज्यातल्या विक्रम राजाने नंतर ह्या मंदिराची पुनर्निर्मिती केली. इथल्या शिलालेखांमध्ये चोळा राजांनी दिलेल्या देणग्यांचा तसेच त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख आढळतो.
इथे श्री त्यागराजांचे नाव नीलविडंगर असे आहे. हे खूप छोटं विडंगर आहे. मंदिर पण बाकीच्या मंदिरांच्या तुलनेमध्ये छोटं आहे. भगवान शिवांची इथे तीन देवालये आहेत - १) श्री त्यागराज २) श्री वैमूरनाथर आणि ३) श्री वेदारण्येश्वरर. श्री वैमूरनाथर आणि श्री वेदारण्येश्वरर हि शिव लिंगे मातीची आहेत, खूप छोटी आहेत आणि आच्छादलेली आहेत. श्री वेदारण्येश्वरर ह्यांनी श्री अप्पर ह्यांवर ह्या मंदिरामध्ये कृपावर्षाव केला. जेव्हां श्री अप्पर ह्यांनी श्री विनायकांना शिव लिंगाबद्दल विचारले तेव्हा श्री विनायकांनी त्यांना शिव लिंग कुठे आहे ते दाखवलं म्हणून इथे श्री विनायकांना कैकत्तीय (कै म्हणजे हात आणि कत्तीय म्हणजे दाखवणे) असं म्हणतात. ह्या देवालयामध्ये श्री विनायकाच्या मूर्तीमध्ये ते शिव लिंग कुठे आहे असे दाखवत आहेत असं दिसतं.
त्यागराज सभेमध्ये पूर्वाभिमुख असलेली शिव लिंगे एकमेकांच्या बाजूला आहेत.
मंदिरातील इतर मूर्ती आणि देवालये:
श्री अंबिका देवींचे देवालय बाहेरील परिक्रमेमध्ये आहे. त्यांचा वर्ण निळा आहे आणि त्यांचे नाव श्री क्षीरवचन नायकी असे आहे. सध्या हे मंदिर श्री भैरवर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. श्री कैकत्तीय विनायकांचे देवालय आतल्या परिक्रमेमध्ये आहे. श्री ऋषभ दक्षिणामूर्ती ह्यांचे देवालय बाहेरील परिक्रमेमध्ये आहे. अष्ट भैरव, श्री गणेश आणि श्री मुरुगन ह्यांची स्वतंत्र देवालये आहेत. श्री पालीनं मोहीळीयल ह्यांचे देवालय दक्षिणाभिमुख आहे. नवग्रहांचे पण स्वतंत्र देवालय आहे आणि ते सरळ रेषेमध्ये आहेत.
कोष्टामध्ये श्री भैरव, नालवर, श्री विनायक, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री मुरुगन, श्री महालक्ष्मी, श्री दक्षिणामूर्ती ह्यांच्या मूर्ती आहेत. तसेच शैव संत कारैक्कल अम्माईयार ह्यांची पण मूर्ती आहे.
श्री नटराजांची मूर्ती खूप सुंदर आहे. मंदिरातील पवित्र तीर्थे पश्चिमेला आहेत. मारुत तीर्थ मंदिराच्या पुढच्या बाजूला आहे.
प्रार्थना:
भाविक जन इथे ज्ञानप्राप्ती, वैभव प्राप्ती तसेच विवाहातील अडचणींवर मात करण्यासाठी प्रार्थना करतात.
मंदिरात साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथिराई
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): महिन्याच्या पहिल्या दिवशी श्री त्यागराज ह्यांची विशेष पूजा
वैकासि (मे-जुन): १८ दिवसांचा वसंतोत्सव
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment