Sunday, December 1, 2024

थिरुक्कुवलई येथील श्री ब्रह्मपुरीश्वरर

सप्त विडंग स्थळांमधलं हे पांचवं मंदिर आहे. पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक मंदिर आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलं आहे. श्रेष्ठ शैव संत अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्यांनी केलेल्या स्तुतीमध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आहे. 

हे मंदिर थिरुवारुरच्या पश्चिमेला साधारण ३५ किलोमीटर्स वर थिरुवारुर - थिरुथुराईपुंडी ह्या मार्गावर आहे. येथील विडंगाचे नाव अवनी विडंगर असे आहे. भगवान शिवांनी इथे केलेल्या नृत्याचे नाव भृंग नटनं आहे, ज्याचा अर्थ भुंगा जसा एखाद्या पुष्पाभोवती फिरतो तसे नृत्य. 

मूलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री कोलिनीनाथर, श्री कोलिनाथेश्वरर
देवी: श्री ब्रह्मगुजांबिका
क्षेत्र वृक्ष: सागवान, थेट्टा
पुराणिक नाव: थिरुकोलीली, थिरुकुवलई
वर्तमान नाव: थिरुक्कुवलई
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळ नाडू

क्षेत्र पुराण:

पुराणांनुसार श्री ब्रह्मदेव भगवान शिवांशी खोटं बोलले म्हणून त्यांना भगवान शिवांकडून शाप मिळाला. त्यामुळे त्यांच्या सृष्टीनिर्माण कार्यामध्ये खंड पडला आणि त्यामुळे नवग्रहांच्या कर्तव्यामध्ये पण अडथळे आले. त्या शापाचं विमोचन करण्यासाठी श्री ब्रह्मदेव इथे आले आणि त्यांनी इथे तीर्थ निर्माण केलं, तसेच पांढऱ्या वाळूपासून एक शिव लिंग तयार करून त्याची पूजा केली. ह्या पूजेच्या प्रभावाने त्यांना शापातून मुक्ती मिळाली. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री ब्रह्मपुरीश्वरर असे आहे. 

तसेच नवग्रहांना पण त्यांना मिळालेल्या शापातून इथे मुक्ती मिळाली म्हणून ह्या जागेचे नाव कोलिली असे पडले. 

बकासुराचा वध केल्याने भीमाला शाप मिळाला होता. भीमाने इथे भगवान शिवांची पूजा केल्याने त्याला शापातून मुक्ती मिळाली. 

शैव संत सुंदरर थिरुवारुर येथे भक्तांना अन्नप्रदान करायचे. हे करण्यासाठी लागणाऱ्या धनासाठी ते भगवान शिवांकडे सोनं प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करायचे. एकदा ते त्यांच्या प्रवासामध्ये थिरुक्कुवलई येथे आले आणि त्यांच्या ह्या कार्यामध्ये मदत मिळविण्यासाठी त्यांनी भगवान शिवांना प्रार्थना केली. इथे अजून एक शिवभक्त होते ज्यांचे नाव कुंडईयूर होतं. ते पण सुंदरर ह्यांच्या अन्नदानाच्या कार्यात सहभागी होते. भगवान शिव त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी कुंडईयूर ह्यांना पर्वताएवढा भात मिळेल असा आशीर्वाद दिला आणि तो भात सुंदरर ह्यांना देण्याची आज्ञा केली. सुंदरर ह्यांना खूप आनंद झाला. पण त्यांना एवढा भात भक्तांपर्यंत कसा पोचवायचा ह्याची चिंता लागली. म्हणून त्यांनी ह्यावर तोडगा मिळविण्यासाठी भगवान शिवांची एक पदिगं गाऊन प्रार्थना केली. एक चमत्कार झाला आणि शिव गणांनी रातोरात तो सर्व भात उचलून थिरुवारुर मधल्या प्रत्येक घरासमोर नेऊन ठेवला. 

इथली नदी चंद्रनदी हि गंगा नदीएवढीच पवित्र मानली जाते.

मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

श्री ब्रह्मदेव, भगवान विष्णू, वलारी, अगस्त्य मुनी, मुकुंद चक्रवर्ती, पांडव, नवग्रह आणि ओमकण्ठ. 

वैशिष्ट्ये:

इथे शिव लिंग पांढऱ्या मातीचे असल्या कारणाने ते नेहमी आच्छादित असते. ह्या लिंगावर अभिषेक होत नाही. अमावास्येच्या दिवशी एक विशेष तेल (तामिळ मध्ये थैलं) ह्या लिंगावर लावले जाते आणि इतर दिवशी आच्छादित असलेल्या लिंगाची पूजा केली जाते. 

मंदिराबद्दल माहिती:

हे मंदिर साधारण १५०० वर्षे जुनं आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याला ५ स्तरांचे राजगोपुर आहे आणि एक परिक्रमा आहे.

राजगोपुरावर एका स्टुक्को चित्रामध्ये इथले स्थळ पुराण चित्रित केले आहे. मुख्य मंडपामध्ये ध्वजस्तंभ, बलीपीठ आणि नंदि त्यांच्या नेहमीच्या जागी आहेत. गाभाऱ्यावरचे विमान एक स्तराचे स्टुक्को वेसर विमान आहे. भगवान शिव हे पांढऱ्या मातीच्या लिंग स्वरूपात आहेत. हे लिंग स्वयंभू आहे. हे नेहमी धातूच्या कवचाने (तामिळ मध्ये कुवलई) आच्छादलेले असते. म्हणून ह्या स्थळाला थिरुक्कूवलई असं म्हणतात. 

कोष्टामध्ये श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रह्मदेव, श्री नटराज, श्री नर्थन गणपती, श्री दक्षिणामूर्ती, श्री भिक्षाटनर, भगवान महाविष्णू ह्यांच्या मूर्ती आहेत.

भगवान शिव आणि देवी हे दोघेही पूर्वाभिमुख आहेत. 

मंदिरातील इतर मूर्ती आणि देवालये:

परिक्रमेमध्ये सुंदरर आणि त्यांची पत्नी परवाई ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री त्यागविनायक, श्री विश्वनाथर आणि श्री विशालाक्षी ह्यांची देवालये आहेत. ह्या शिवाय येथे श्री इंद्रपुरीश्वरर, श्री चोक्कलिंगर, श्री अन्नमलयार ह्या नावांची शिव लिंगे आहेत. नालवर आणि श्री गजलक्ष्मी देवी ह्यांची इथे स्वतंत्र देवालये आहेत. इथे नवग्रह एका रेषेत असून ते सर्व दक्षिणाभिमुख आहेत. श्री त्यागराजांचे देवालय गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला आहे जिथे श्री ब्रह्मपुरीश्वरर हे मुख्य दैवत आहे. मंदिरामध्ये अनेक शिलालेख आहेत ज्यांवर चोळा आणि पांड्य राजांनी केलेल्या कामांची वर्णने आहेत. 

पूजा:

मुचुकुंद अर्चना, वसंत उत्सव आणि मासिक प्रदोष व्रत साजरे होतात.

मंदिरामध्ये साजरे होणारे सण:

अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): विनायगर चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथिराई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): पोंगल आणि थैपुसम
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.


No comments:

Post a Comment