सप्त विडंग स्थळांमधलं हे सातवं मंदिर आहे. तामिळनाडूमधल्या नागपट्टीनं जिल्ह्यामध्ये वेदारण्यम मध्ये वसलेलं आहे. हे पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. श्रेष्ठ शैव संत श्री अप्पर, श्री सुंदरर आणि श्री संबंधर ह्यांनी त्यांच्या दिव्य स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती गायली आहे.
मुलवर: श्री वेदारण्येश्वरर, श्री थिरुमरैकादर
देवी: श्री वेदनायकी, श्री वीणावेद विलासिनी
क्षेत्र वृक्ष: शमी, पुन्नाग (मराठी मध्ये करंज, तमिळमध्ये पुन्नाई)
पवित्र तीर्थ: मणिकर्णिका, वेद
पुराणिक नाव: थिरुमरैकादर
वर्तमान नाव: वेदारण्यम
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
पुराणांनुसार चार वेदांनी मनुष्य रूप धारण केले होते. वेदपती ह्या गावात त्यांनी निवास केला होता. ते जवळच असलेल्या पुष्पवन ह्या गावातून पुष्प आणून भगवान शिवांची पूजा करायचे. कलियुगाच्या आरंभी जेव्हां त्यांना लक्षात आलं कि आता सत्यता, प्रामाणिकता ह्यांना आता इथे स्थान नाही तेव्हां त्यांनी भगवान शिवांना निवेदन करून ह्या मंदिराचं प्रवेशद्वार बंद केलं आणि ते निघून गेले. असा समज आहे कि ते मंदिराच्या आजूबाजूला वनस्पती आणि वृक्षांमध्ये रूपांतरित झाले आणि अजूनही त्या रूपात ते भगवान शिवांची आराधना करत आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्या कारणाने भाविक जन मंदिराच्या बाजूच्या प्रवेशद्वारामधून प्रवेश करू लागले. इथे वेदांनी भगवान शिवांची आराधना केली म्हणून ह्या स्थळाला वेदारण्यम असे नाव प्राप्त झाले. कालांतराने इथे वेदांनी भगवान शिवांची आराधना केली म्हणून श्रेष्ठ शैव संत श्री अप्पर आणि श्री संबंधर हे भगवान शिवांची आराधना करण्यासाठी मरैकाडू येथे आले. त्यांनी पाहिलं कि इथे मुख्य प्रवेशद्वार बंद आहे आणि भाविक जन बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करत आहेत. श्री संबंधर ह्यांनी श्री अप्पर ह्यांना दिव्य स्तोत्र गायची विनंती केली जेणेकरून मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करता येईल. श्री अप्पर ह्यांनी दहा दिव्य स्तोत्र गायली आणि प्रवेशद्वार खुले झाले. त्यांनी मंदिरात जाऊन भगवान शिवांचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन परत आल्यावर श्री अप्पर ह्यांनी श्री संबंधर ह्यांना दिव्य स्तोत्र गायची विनंती केली जेणेकरून मुख्य प्रवेशद्वार कायमचे बंद होईल. श्री संबंधर ह्यांनी स्तोत्रे गायल्यावर प्रवेशद्वार कायमचे बंद झाले. ह्यावरून ह्या शैव संतांची महती दिसून येते.
इथे श्री अंबिका देवींचा स्वर श्री सरस्वती देवींच्या पेक्षाही मधुर होता म्हणून श्री अंबिका ह्यांना श्री याळै पळीथ्था मोहियल असे नाव आहे. म्हणून इथे श्री सरस्वती ह्या तपस्विनी आहेत आणि त्यांच्या हातात वीणा नाही पण पवित्र ग्रंथ आहेत.
श्री दुर्गा देवी ह्या परिवार देवता आहेत. त्यांची मूर्ती कोष्टामध्ये असून दक्षिणाभिमुख आहे. त्यांना इथे संरक्षक देवता मानतात. त्या उभ्या मुद्रेमध्ये आहेत आणि त्यांचं मुख उग्र आहे.
हे मंदिर ६४ शक्ती पीठांपैकी एक आहे. ह्या पीठाचे नाव सुंदरी पीठ आहे.
इथे ६३ नायनमार आणि १० त्यागराजांच्या मूर्ती आहेत.
परंज्योती ऋषी, ज्यांनी थिरूविलयादल हे पुराण लिहिलं आणि गायलं, ते ह्या गावातले होते.
इथल्या शमी वृक्षावरची फळे हि लांब, एका बाजूला काटेरी आणि दुसऱ्या बाजूला गोलाकार पण काटे नसलेली आहेत.
अजून एका आख्यायिकेनुसार प्रभू श्रीराम इथे रावणाच्या हत्येमुळे प्राप्त झालेल्या ब्रह्महत्येच्या दोषाचे निवारण करण्यासाठी आले. त्यांच्या पाउलांची चिन्हे अजूनही इथून जवळ असलेल्या रामर्पदं ह्या गावी जपून ठेवली आहेत.
एक उंदीर दिव्या मधलं तूप पिण्यासाठी म्हणून दिव्यावर चढला. त्यामुळे दिव्याची वात हलली आणि त्यामुळे दिवा अजूनच तेजस्विरीत्या जळू लागला. भगवान शिवांनी ह्याची नोंद घेतली आणि त्यांच्या कृपेने तो उंदीर पुढच्या जन्मी मवली नावाचा राजा बनून तो चक्रवर्ती झाला.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
मनू, मंधाता, दशरथ, प्रभू श्रीराम, पांडव, महाबली, चार वेद.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर हे मंदिर वसलेलं आहे. मंदिराच्या पूर्वेला साधारण १ किलोमीटर वर समुद्र आहे. मुख्य मध्यवर्ती देवालय हे पूर्वाभिमुख आहे. इथे पांच स्तरांचं राजगोपुर आहे. मंदिराच्या आवारात तीन परिक्रमा आहेत. शिव लिंग हे स्वयंभू असून ग्रॅनाईटचे आहे. हे शिव लिंग मध्यवर्ती देवालयामध्ये आहे. येथील विडंग भुवनी विडंगर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. भगवान शिवांनी इथे केलेल्या नृत्याचे नाव हंसनटनं, म्हणजे हंसासारखे नृत्य, असं आहे. परिक्रमेमध्ये गाभाऱ्याच्या दिशेने श्री गणेश, श्री मुरुगन, नंदी आणि नवग्रह ह्यांच्या मूर्ती आहेत. ह्या मंदिरामध्ये भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि श्री गणेश ह्यांच्यासाठी स्वतंत्र ध्वजस्तंभ आहे.
कोष्टामध्ये श्री दक्षिणामूर्ती, श्री दुर्गा देवी, श्री गणेश, श्री चंडिकेश्वर, श्री भैरव आणि भगवान महाविष्णू ह्यांच्या मूर्ती आहेत.
इथले शिव लिंग पाचूचे (मरगद) आहे. पश्चिमेकडच्या मनोऱ्यावर श्री गणेशांचे देवालय आहे ज्याचे नाव श्री वीर गणपती असे आहे. बाहेरच्या परिक्रमेमध्ये श्री वीणा वेदविलासिनी देवीचे देवालय आहे. ह्या देवीचे श्री याळै पळीथ्था मोहियल असे नाव आहे. ह्या नावाचा अर्थ असा आहे कि देवीचा स्वर याळै ह्या संगीत वाद्यापेक्षाही मधुर आणि गेयपूर्ण आहे. हे स्थळ शक्ती पीठांपैकी एक समजलं जातं. हे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या डाव्या बाजूला आहे. आदी शंकराचार्यांनी त्यांनी रचलेल्या सौंदर्य लहरी ह्या स्तोत्रामध्ये ६६व्या श्लोकामध्ये ह्या देवीची स्तुती केली आहे. ज्यांना संगीतामध्ये प्राविण्य मिळवायचे असेल त्यांनी हा श्लोक नियमित म्हणावा असे त्यांनी सूचित केले आहे.
मंदिरातील मणिकर्णिका तीर्थ पूर्वेकडील परिक्रमेमध्ये आहे आणि हे तीर्थ गंगा, यमुना, कावेरी, सरस्वती, सिंधू आणि नर्मदा नद्यांएवढंच पवित्र मानलं जातं. श्री काल भैरवांचं एक छोटं देवालय तीर्थाकडे मुख करून आहे. पुढच्या परिक्रमेमध्ये श्री त्यागराजांकडे मुख करून असलेले श्री सुंदरर तसेच ६३ नायनमार, स्थळ गणपती, श्री सुब्रमण्यम, श्री गजलक्ष्मी आणि दक्षिणाभिमुख श्री दुर्गा देवी ह्यांची देवालये आहेत.
इथले नवग्रह सरळ रेषेमध्ये असून एकाच दिशेने मुख करून आहेत. असा समज आहे कि ते नवीनच विवाह झालेल्या भगवान शिव आणि श्री पार्वती देवींकडे ते बघत होते.
नालवर, म्हणजेच चार श्रेष्ठ शैव संत ह्यांच्या मूर्ती भगवान शिवांच्या नृत्याकडे मुख करून आहेत.
गाभारा थोडा उंचावर आहे. स्वयंभू असलेल्या श्री वेदारण्येश्वरर ह्या शिव लिंगाच्या मागे अगस्त्य मुनींना दर्शन दिलेल्या दैवी दाम्पत्य म्हणजेच भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. भगवान शिवांनी अगस्त्यमुनींना वचन दिलं होतं कि त्यांना भगवान शिव आणि श्री पार्वती देवींच्या कैलासामध्ये साजऱ्या होणाऱ्या विवाहाचे दर्शन इथून घेता येईल. त्या वचनाला पाळून भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांनी अगस्त्यमुनींना वर-वधूच्या रूपात दर्शन दिलं.
श्री सरस्वती देवींच्या देवालयामध्ये त्यांच्या हातामध्ये वीणा नाही. गाभाऱ्याच्या आतमध्ये भिंतीवर भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचे चित्र आहे.
ह्या मंदिराच्या आजूबाजूला असलेले पाणी खारट आहे पण मंदिराच्या आतमध्ये असलेल्या विहिरीमधले पाणी मात्र गोड आहे. गावामध्ये पण हे पाणी पिण्यासाठी पुरवलं जातं.
सोळा सभांपैकी हे मंदिर बाराव्वी सभा आहे ज्याचे नाव देव भक्त सभा असे आहे.
शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी इथे श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
प्रार्थना:
मंदिराच्या पूर्वेकडील बाजूला आदि सेतू असे नाव आहे. इथे एकदा स्नान करणे हे रामेश्वरमला १०० वेळा स्नान करण्याच्या तुल्यबळ मानलं जातं.
पूजा:
१. मंदिरात नियमित रोज सकाळी ५.३० ते संध्याकाळी ८.३० च्या दरम्यान सहा पूजा होतात.
२. साप्ताहिक पूजा दर सोमवार आणि शुक्रवारी केल्या जातात.
३. मासिक पूजा पौर्णिमा आणि अमावास्येला केल्या जातात.
४. आडी आणि थै महिन्यांमधल्या पौर्णिमेला भाविक जन समुद्रामध्ये डुबकी मारतात.
५. प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा साजरी होते.
मंदिरात साजरे होणारे सण:
मासी (मे-जून): २९ दिवसांचा ब्रम्होत्सव. मंदिराची द्वारे खुली होतात. भगवान शिव मघा नक्षत्रावर समुद्राकडे जातात. ६३ नायनमार आणि इतर १० देवतांची रथयात्रा निघते. भगवान शिवांना कैलास वाहनामध्ये ठेऊन त्यांची रथयात्रा निघते.
आडी (जुलै-ऑगस्ट): १० दिवसांचा आडी पुरम उत्सव. हा उत्सव देवीला समर्पित असतो.
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): स्कंद षष्ठी
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment