हे मंदिर तामिळनाडू मधल्या थिरुवन्नामलै ह्या गावामध्ये वसलेलं आहे. हे पंच भूत स्थळांपैकी एक आहे. पंच महाभुतांमध्ये हे अग्नी ह्या तत्वाचं प्रतीक आहे. ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे मंदिर आथार स्थळांपैकीपण एक आहे आणि तांत्रिक चक्रांपैकी हे मणिपूर चक्राचं प्रतीक आहे. ह्या ठिकाणी शिव लिंग हे पर्वताच्या रूपात आहे. पर्वताच्या बाजूचा भागात हे मंदिर आहे. ह्या स्थळाला शोणचलम, शोणगिरी आणि अरुणाचल अशी पण नावे आहेत. पुराणांनुसार इथे भगवान शिव हे ज्योती स्वरूपात आहेत.
मुलवर: श्री अण्णामलैयार
देवी: श्री पार्वती देवी, श्री उण्णामली अम्मन, श्री अभिथा गुजांबळ
पवित्र तीर्थ: अग्नी तीर्थ
क्षेत्र पुराण:
एकदा श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णू ह्यांच्या मध्ये त्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे ह्यावर वाद निर्माण झाला. ह्या वादाचं निरसन करण्यासाठी ते भगवान शिवांकडे गेले. भगवान शिव एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्याच्या अंताचा आणि उगमाचा ठावठिकाणा जाणणे अशक्य आहे. त्यांनी श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव दोघांनाही ह्या त्यांच्या रूपाच्या उगमाचा आणि अंताचा शोध घेण्यास पाठविले. श्री विष्णू वराह अवतार घेऊन त्या स्तंभाचा तळ शोधण्यास गेले तर श्री ब्रह्मदेव हंसाच्या रूपामध्ये ह्या स्तंभाचे शिखर शोधण्यास गेले. श्री ब्रह्मदेवांना केतकी पुष्प दिसलं म्हणून त्यांना वाटलं आपल्याला शिखराचा शोध लागला पण श्री विष्णूंनी मात्र मान्य केलं की त्यांना तळाचा शोध लागला नाही म्हणून. श्री ब्रह्मदेव खोटं बोलले म्हणून भगवान शिवांनी त्यांना शाप दिला कि त्यांची पृथ्वीवरील कुठल्याही मंदिरात त्यांची पूजा होणार नाही.
अजून एका आख्यायिकेनुसार एकदा कैलास पर्वतावरील एका बागेमध्ये भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवी असताना श्री पार्वती देवींनी खेळीमेळीमध्ये भगवान शिवांचे डोळे मिटले. पण त्यांच्या ह्या कृत्यामुळे जगाचे व्यवहार स्तंभित झाले आणि त्यामुळे श्री पार्वती देवींकडून पाप घडलं. ह्या पापाचं निरसन करण्यासाठी त्या ह्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी अजून काही शिव भक्तांसमवेत तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून भगवान शिव अन्नमलै पर्वतावर एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांनी श्री पार्वतीदेवींवर कृपेचा वर्षाव केला. म्हणून अन्नमलै मंदिराच्या मागे असलेला अन्नमलै पर्वत (लाल पर्वत) हा पवित्र मानला जातो आणि ह्या पर्वतालाच शिव लिंग समजलं जातं.
मंदिराबद्दल माहिती:
गाभाऱ्याच्या मागे श्री वेणूगोपाळस्वामी (श्री कृष्ण) ह्याची मूर्ती आढळते. गाभाऱ्याच्या भोवती श्री सोमस्कंद, श्री दुर्गा, श्री चंडिकेश्वर, श्री गजलक्ष्मी, श्री आरूमुगस्वामी (श्री संकमुख), श्री दक्षिणामूर्ती आणि श्री लिंगोद्भवर ह्यांच्या मुर्त्या आढळतात. गाभाऱ्याच्या भोवतीच्या दुसऱ्या आवरणामध्ये श्री पार्वती देवींची मूर्ती आहे जिचे नाव श्री उन्नमलै अम्मन असे आहे. ध्वजस्तंभाच्या उत्तरेला श्री संबंध विनायकाची मूर्ती आहे. इथे १००० स्तंभ असलेलं एक सभागृह आहे आणि त्याच्या दक्षिणेला श्री सुब्रह्मण्य ह्यांचे देवालय आहे. इथे एक भूमिगत शिव लिंग आहे ज्याला पाताळ लिंग असे म्हणतात. इथे श्री नंदि आणि श्री सूर्य ह्यांची पण मंदिरे आहेत.
ह्या पर्वताच्या उतारावर श्री रमण महर्षी ह्यांनी तपश्चर्या केली. ह्या पर्वताच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे. ह्या शिवाय संत शेषाद्री स्वामिगळ, योगी रामसुरत कुमार ह्यांचा पण ह्या स्थळांशी संबंध आहे.
ज्या दिवशी भगवान शिव इथे एका भव्य ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकट झाले तो दिवस सर्व जगात महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. ह्या ठिकाणी तो सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. स्कंद पुराणातल्या महेश्वर खंडामध्ये महर्षी व्यासांनी अरुणाचलाचा महिमा वर्णन केला आहे.
श्री रमण महर्षी ह्या स्थळाबद्दल म्हणतात - “काशी, वाराणसी आणि हृषीकेश हि स्थळे भगवान शिवांची निवासस्थाने समजली जातात, तर अरुणाचल हे मात्र स्वतः भगवान शिवच आहेत. हे खूप गोपनीय स्थान आहे. हे स्थळ ज्ञानदात्री क्षेत्र आहे. इथे साक्षात भगवान शिव हे अरुणाचल ह्या पर्वतरूपी ज्योतिस्वरुपात आहेत.”
अरुणाचल महिमानुसार असं म्हणलेलं आहे कि - एखाद्याला चिदंबरमच दर्शन घेतल्यावर मुक्ती मिळेल, किंवा थिरुवरुर मध्ये जन्मास आल्यामुळे मुक्ती मिळेल, किंवा काशीमध्ये मृत पावल्यामुळे मुक्ती मिळेल, पण अरुणाचलाचा नुसता विचार मनात आल्यामुळे मुक्ती मिळते.
ह्या पर्वताच्या प्रदक्षिणेला गिरिवलम असं म्हणतात. ह्या गिरीवलमच्या मार्गावर १२ राशींच्या संबंधित आठ छोटी मंदिरे आहेत.
मंदिरात साजरे होणारे सण:
इथे ४ महत्वाचे सण साजरे होतात - ब्रह्मोत्सव, कार्थिगई दीपम, चैत्र पौर्णिमा, थिरु
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थिरुवुदळ (ह्या दिवशी श्री नंदिदेवांना फळे, भाज्या आणि स्वादिष्ट पदार्थांनी सजवल जातं, तामिळनाडूमध्ये हा बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो ज्याला माट्टू-पोंगल असं म्हणतात. हा मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. )
चित्राई (एप्रिल-मे): ब्रह्मोत्सव, चैत्र पौर्णिमा
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम
ह्याशिवाय इथे दर पौर्णिमेला हजारो यात्रिक अरुणाचलेश्वराला गिरीवलम (प्रदक्षिणा) घालतात.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment